श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय दहावा


वारणावतातील प्रसंग


॥ श्रीगणेशाय नमः ॥
समस्तांस म्हणे द्रोण । विद्या जाहली तुम्हांस पूर्ण ।
तरी गुरुदक्षिणा प्रीतींकरुन । आतां दिधली पाहिजे ॥ १ ॥
समरांगणी जिंकुनी । द्रुपद आणावा बांधूनी ।
माझे हस्तीं ओपा इतुकेनी । आचार्यदक्षिणा पावली ॥ २ ॥
अवश्य म्हणोनि ते अवसरीं । ठोकिल्या संग्रामसंकेतभेरी ।
कौरव पांडव थोर गजरीं । निजभारेंशी चालिले ॥ ३ ॥
प्र्लयीं जैसा फुटे सागर । तैसे चालिले चतुरंगदलभार ।
महावाद्यांचा गजर । तेणें अंबर कोंदलें ॥ ४ ॥
पुढें धांवले नृपहेर । हडबडिलें पांचालपुर ।
राजा प्रधान आणि कुमार । नगराबाहेर धांवले ॥ ५ ॥
अभिमान मनीं धरुन । कौरव पुढें जाती धांवोन ।
द्रोणास म्हणे अर्जुन । कौतुक पाहूं क्षण एक ॥ ६ ॥
पांचालाचे दल धुरंधर । फुटला जैसा प्रलयसमुद्र ।
युद्ध मांडले दुर्धर । परस्परें झगटती ॥ ७ ॥
गजाशीं गज भिडती । स्वारांस स्वार हाणिती ।
रथियांशीं रथी झगटती । एकवटती पायदळें ॥ ८ ॥
कौरवांची सबल पृतना । तृणवत वाटे पांचालनंदना ।
बाणांचा पर्जन्य जाणा । दोन्ही दलें वर्षती ॥ ९ ॥
अनिवार द्रुपदाचा मार । कौरवसेना केली जर्जर ।
सांडूं पाहती समरधीर । कर्ण सुयोधन तेधवां ॥ १० ॥
कौरवांस म्हणे द्रुपदराज । द्रोणासमान मानूनि मज ।
शस्त्रें ठेवून सतेज । दंडवत घालणें ॥ ११ ॥
माझा गुरुबंधु द्रोण । त्याचे शिष्य तुम्ही संपूर्ण ।
विद्या असेल अपूर्ण । ती शिकवीन मी येथें आतां ॥ १२ ॥
अलातचक्र फिरत । तैसें द्रुपदाचें चाप झळकत ।
बाण सोडिले संख्येरहित । सुटला कंप कौरवांतें ॥ १३ ॥
अनिवार द्रुपदाचा मार । पळों लागले धृतराष्ट्रकुमार ।
पाठीं धांवती द्रुपददलभार । सेना समग्र लुटियेली ॥ १४ ॥
नगरवासी लोक बहुत । पाठीं धावती घ्या घ्या म्हणत ।
अष्टदिशांनीं धाकें पळत । कौरवसेना त्वरेनें ॥ १५ ॥
कर्ण विकर्ण दुर्योधन । दुःशासन शकुनि आदिकरुन ।
वेगें पळती उठोन । सकलराजयांसहित पैं ॥ १६ ॥
टाळी पिटून पांचाल हांसत । आडमार्गें पळती अंधसुत ।
म्हणे अभय देऊन समस्त । नीट वाटे लावा कीं ॥ १७ ॥
धांपें दाटले कौरव । म्हणती भीमार्जुन धांव ।
सेना पराभविली सर्व । निर्वाण काय पाहतसां ॥ १८ ॥
ऐसें ऐकतां भीमार्जुन । द्रोणचरणी करुन नमन ।
रथारुढ होऊन । मनोवेगें धांवती ॥ १९ ॥
रथाखालीं उतरोन । भीम धांवे गदा घेऊन ।
वीज वृक्षीं पडे कडकडोन । तेवीं परचमूंत मिसळला ॥ २० ॥
कुंजरांच्या थाटी बहुत । गदाघायें निवटित ।
मस्तकींचीं मुक्तें विखुरत । वाटे नक्षत्रवृष्टि होतसे ॥ २१ ॥
मुसलघाये मृदघट होय चूर्ण । तेवीं कुंभस्थले जाती फुटोन ।
संहारिले गज संपूर्ण । म्हणे प्रलय मांडला ॥ २२ ॥
अश्वरथियांवरी पार्थ । धांवला प्रलयशर सोडित ।
नागरिक दीन जाहलीं समस्त । दांतीं धरिती तृण तेव्हां ॥ २३ ॥
त्यांस न मारिती भीमार्जुन । म्हणती नगरांत जा पळोन ।
इकडे पुरंदरनंदन । आर्त पुरवी गुरुचें ॥ २४ ॥
लक्षून द्रुपदाचा रथ । चालला दलासी संहारित ।
रक्तनद्या धांवती बहुत । वाट पुसती सिंधूची ॥ २५ ॥
मुकुटांसहित शिरें उडवित । शस्त्रांसहित छेदिले हस्त ।
शिरकमलांच्या लाखोल्या बहुत । भूलिंगास समर्पिल्या ॥ २६ ॥
रक्तगंगासंगेंकरुनियां । प्रेतें जाती सिंधूस भेटावया ।
उरले ते पाठी देऊनियां । पळती तेव्हां दशदिशा ॥ २७ ॥
द्रुपदें सोडिले सहस्त्र बाण । ते पार्थवीरें पाहोन ।
लक्षबाणेंकरुन । पांचालराव खिळियेला ॥ २८ ॥
इतुक्यांत धांवला सत्यजित । तेणें युद्ध केलें अपरिमित ।
पार्थाचें युद्ध अद्‍भुत । दुरुन पाहत भीम तेव्हां ॥ २९ ॥
अश्वांसह सत्यजिताचा रथ । बाणें चूर्ण केला क्षणांत ।
हांक फोडोनियां त्वरित । सत्यजित पळाला ॥ ३० ॥
पुढें पांचाल सोडी बाण । ते कदा न लेखी अर्जुन ।
जैसे मतवादियाचें भाषण । वेदांतज्ञानी मानीना ॥ ३१ ॥
गांडीविघनमंडल अद्‍भुत । बाणधारा वर्षे पार्थजीमूत ।
पांचाल तेव्हां मनीं भावित । आला मृत्यु यावरी ॥ ३२ ॥
ध्वज छत्र चाप बाण तूणीर । तत्काल छेदून केले चूर ।
अश्व सारथि सत्वर । प्रेतें करुन पाडिले ॥ ३३ ॥
समुद्रांत देऊनि बुडी । विनायक जैसा मत्स्य काढी ।
तेवीं पार्थ खालीं उतरुन प्रौढी । स्वबाहीं कवळी द्रुपदातें ॥ ३४ ॥
बळें उचलोन तत्काळ । स्यंदनावरी घातला पांचाल ।
तेव्हां कौरवबंधु सकल । जयजयकारें गर्जती ॥ ३५ ॥
चौफेरीं फुटे तडागजल । तैसें पळाले पांचालदल ।
ग्राम लुटावया तत्काल । कौरववीर धांवती ॥ ३६ ॥
अर्जुनें धांवडिले दूत । प्रजा पीडणें हें अनुचित ।
द्रोणाचा गुरुबंधु पांचालनाथ । वद्यं होय आम्हांतें ॥ ३७ ॥
जिंकलिया द्रुपदवीर । द्रोणाचें हें राज्य समग्र ।
अभिलाषितां सत्वर । दोषसागरीं बुडाल पैं ॥ ३८ ॥
दूतमुखें आज्ञा ऐकून । फिरले समस्त कौरवजन ।
पार्थें दूत पाठवून । प्रधान आणिले द्रुपदाचे ॥ ३९ ॥
तेही द्रोणापाशीं येऊन । उभे ठाकले कर जोडून ।
द्रुपदपुत्र आणून । गुरुपुढें उभा केला ॥ ४० ॥
पार्थ म्हणे द्रोणासी । भेटावें आतां गुरुबंधूसी ।
मग हास्यमुखें द्रुपदासी । भारद्वाज बोलतसे ॥ ४१ ॥
तूं राजा मी ब्राह्मण दीन । मित्रत्व नव्हेचि समान ।
बोललास जें मागें वचन । मनामाजी आठवीं ॥ ४२ ॥
अधोवदनें द्रुपद बोले । अज्ञानापासून अंतर पडलें ।
सज्ञानें क्षमा करावें वहिलें । थोरपण तरीच तें ॥ ४३ ॥
ऐसें बोलतां पृषदनंदन । कृपेनें आलिंगी गुरु द्रोण ।
म्हणे मनांत भय न धरीं पूर्ण । आनंदघन असावें ॥ ४४ ॥
आम्ही तुम्ही बालमित्र विशेष । असों अग्निवेशाचे शिष्य ।
केला असे विद्याभ्यास । तो आठव मज आहे ॥ ४५ ॥
म्यां केला पुरुषार्थ । राज्य घेतलें तुझें समस्त ।
दक्षिणेस मज देत पार्थ । तुजसहित साधूनियां ॥ ४६ ॥
त्यांत अर्धविभाग राज्य पूर्ण । मी देतों संतोषेंकरुन ।
वैरभाव टाकून । तें त्वां भोगून असावें ॥ ४७ ॥
ऐसें बोलोनियां द्रोणें । स्वस्थलीं धाडिलें बहुमानें ।
परि तो अपमानकृशानें । संतापून दग्ध जाहला ॥ ४८ ॥
मनांत म्हणे नृपवर । प्रसन्न करुन अपर्णावर ।
अयोनिजन्म मागेन कुमार । द्रोणालागीं मारी ऐसा ॥ ४९ ॥
असो इकडे कौरवपांडव । हस्तनापुरा आले सर्व ।
धार्तराष्ट्र पांडवांशी द्वेषभाव । दिवसेंदिवस वाढविती ॥ ५० ॥
लोटलिया एक वर्ष । बल बुद्धि विवेक विशेष ।
भीष्में जाणूनि धर्मास । युवराज्य दिधलें ॥ ५१ ॥
सुहृद सेवक प्रजा सकलिक । सुखी केले धर्में अधिक ।
जे ते धर्मास स्तविती लोक । राज्ययोग्य होय हा ॥ ५२ ॥
विद्यानिपुण भीमसेन । तरी गुरु करुन रेवतीरमण ।
गदायुद्धीं कुशल पूर्ण । कृष्णाग्रजे तो केला ॥ ५३ ॥
हें देखोन दुर्योधन । अच्युताग्रजापाशीं जाऊन ।
भीमाचे ईर्षेनें पूर्ण । गदायुद्ध शिकला पैं ॥ ५४ ॥
राज्यधर्मीं संपूर्ण । युधिष्ठिर जाहला निपुण ।
गदायुद्धीं भीमसेन । निवडला अर्जुन शस्त्रास्त्रीं ॥ ५५ ॥
नीतिज्ञानीं पूर्ण कुशल । परम विवेकी जाहला नकुल ।
रणपंडित धर्मशील । सेवेसी सादर धर्माचे ॥ ५६ ॥
भूत भविष्य वर्तमान । क्षात्रधर्मीं सहदेव निपुण ।
पांचही विद्यागुणबलें पूर्ण । जन म्हणते जाहले ॥ ५७ ॥
एकांती पार्थासी म्हणे द्रोण । म्यां तुज विद्या दिधली संपूर्ण ।
अगस्त महामुनीचा शिष्य जाण । माझा गुरु अग्निवेश ॥ ५८ ॥
तेणें अस्त्र सांगितलें पूर्ण । तें जैसें तेजाळ विष्णुसुदर्शन ।
सोडितां ब्रह्मांड संपूर्ण । निमेषार्धें जाळील पैं ॥ ५९ ॥
तें कोणासी न सांगावें । भलतियावरी न घालावें ।
मग तें ब्रह्मास्त्र बरवें । अर्जुनास उपदेशिलें ॥ ६० ॥
अर्जुन घाली लोटांगण । म्हणे एवढें द्यावें मजलागून ।
सकल रायांदेखतां दारुण । मजसीं युद्ध करावें ॥ ६१ ॥
तथास्तु म्हणे गुरु द्रोण । यावरी भीम नकुल सहदेव घेऊन ।
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण । दिग्विजय केला अर्जुनें ॥ ६२ ॥
समस्त जिंकून नृपवर । द्रव्यें भरिलें हस्तनापुर ।
हें परिसोन धृतराष्ट्र । चिंतार्णवीं पडियेला ॥ ६३ ॥
म्हणे पांडाव जाहले बलवंत । राज्य घेतील क्षणांत ।
अभागी माझे सुत । भिक्षा मागतील वाटतें ॥ ६४ ॥
मग कणिकनामा प्रधान । अंधें आणिला बोलावून ।
धृतराष्ट्राचा सखा निर्वाण । दीर्घद्रष्टा नष्ट तो ॥ ६५ ॥
अंध एकांतीं त्यास सांगत । पांडाव जाहले बलवंत ।
माझ्या पुत्राचे मनोरथ । पुढें निष्फल दिसताती ॥ ६६ ॥
तो सकल कुटलांमाजी श्रेष्ठ । खलदुर्जनांत वरिष्ठ ।
कुबुद्धिसागर पापिष्ठ । कापट्यवेषी धूर्त तो ॥ ६७ ॥
म्हणे राया ऐकें सावधान । पुढें आहे बहुतां दिवशीं मरण ।
तरी त्याचा विचार जाण । अवश्य आतांचि करावा ॥ ६८ ॥
वैरी पादोदर कृशान । सर्वथा म्हणू नये लहान ।
त्यांचे निर्मूल करावे पूर्ण । सकल कार्य टाकोनिया ॥ ६९ ॥
गोत्रज सर्पातुल्य भूपती । न कळे कोणे काळीं डंखिती ।
सर्प क्वचित दृष्टी पडती । गोत्रज पीडिती पदोपदीं ॥ ७० ॥
कृत्रिम मैत्री करुन । घ्यावा वैरियाचा प्राण ।
आपुलें गुह्य न सांगोन । वर्म लक्षावें शत्रूचें ॥ ७१ ॥
घ्यावें बहुतांचें मनोगत । आपलें न सांगावे हृदगत ।
कुंडाग्नि आपलें आराध्यदैवत । परि तो जाळील क्षणार्धें ॥ ७२ ॥
सूर्यनारायण दैवत पाहीं । परि मंडल कोणा न धरवे हृदयीं ।
गुरु सुजाण सर्वही । त्यासही नमितची भजावें ॥ ७३ ॥
स्वर्गीहूनि आले पितृगण । तरी त्यांसही शमीपत्रप्रमाण ।
पिंड दर्भ देऊन । बोळवावे थोडक्यांत ॥ ७४ ॥
माता पिता आणि बंधू । आगळे वाढतां करावा वधू ।
धूर्त कुटिल कपटसिंधू । राजगृही असावे ॥ ७५ ॥
क्षेत्रालागीं कंटकावरण । पायास रक्षक उपानह जाण ।
आप्तसुहृदाचे घ्यावया प्राण । विष जवळी असावें ॥ ७६ ॥
तस्कर धरावया श्वान । मत्स्य आकळावया जाळें जाण ।
शोधावया शत्रूचें न्यून । खल कपटी असावे ॥ ७७ ॥
स्तंभ ओढितां पडे मंदिर । मूळीं तोडितां पडे तरुवर ।
शत्रूचें न्यून अहोरात्र । लक्षितां क्षय सहजचि ॥ ७८ ॥
भुजंगाचे दंत पाडून । आधींच गारुडी करिती दीन ।
किंवा उन्मत्त गज जाण । अंकुशें क्षीण करिती पैं ॥ ७९ ॥
आधीं मुखीं ताडावा भुजंग । मग चूर्ण करावें मागील अंग ।
वृश्चिकाचें पुच्छ सवेग । छेदून क्षीण करावें ॥ ८० ॥
साम दान भेद दंड करुन । घ्यावा शत्रूंचा प्राण ।
आप्तता हे टाकून । व्हावें कठिण कालवत ॥ ८१ ॥
राजा म्हणे कणिका सुमति । त्वां कथिल्या त्या मानल्या युक्ति ।
परि प्रस्तुत कैसी रीति । करावी तें सांग पां ॥ ८२ ॥
पोटास आला जो रोग । तो काय मानावा पुत्र सांग ।
छेदून काढावा सवेग । तत्काल प्राणहर्ता तो ॥ ८३ ॥
कणिक म्हणे युक्ति हेचि प्रमाण । बाहेर दावून भलेपण ।
घ्यावे शत्रूंचे प्राण । विचार अन्य असेना ॥ ८४ ॥
बाह्य नम्रता धरुन बहुत । अंतरीं त्याचा करावा घात ।
बलिष्ठ देखोन अत्यंत । लीनता तेथें धरावी ॥ ८५ ॥
द्रव्यलुब्धासी देऊन धन । वश करावें न लागतां क्षण ।
जो असेल अपणासमान । त्याशीं स्पर्धा करावी ॥ ८६ ॥
शत्रु दुर्बल होऊन । जरी आला आपणा शरण ।
त्याचें न करितां पालन । घ्यावा प्राण न कळतां ॥ ८७ ॥
जरी नाटोपती जागेपणीं । तरी निजलिया लावावा अग्नी ।
किंवा फलतांबूल भोजनीं । विषप्रयोग करावा ॥ ८८ ॥
हारी आणावी द्यूत खेळोनी । भाकें गोवावें सत्यवचनीं ।
एवं पांडव नाहींत अवनीं । ऐसें करुन टाकावें ॥ ८९ ॥
पांडव असतां जिवंत । न वांचती तुझे सुत ।
हाचि जाण मुख्यार्थ । फार काय बोलूं मी ॥ ९० ॥
इकडे पांडवांची वर्तणूक । देखोनि स्वस्थ प्रजालोक ।
म्हणती उदया आला आमुचा भाग्यार्क । धर्म राजा होईल कीं ॥ ९१ ॥
सकलांमाजी विद्या अद्‍भुत । पार्थाचे ठायीं पूर्ण बिंबत ।
बलाधिक भीम होत । नकुल सहदेव तैसेचि ॥ ९२ ॥
विवेकीं परम निपुण । धर्मराज धर्मपरायण ।
ऐसें देखोन प्रजा संपूर्ण । म्हणती धर्मास राज्य द्यावें ॥ ९३ ॥
ऐसी हेरमुखे वार्ता समस्त । दुर्योधन श्रवन करित ।
मनीं होऊन संतप्त । पितयाजवळी पातला ॥ ९४ ॥
म्हणे प्रजा होऊनि एकचित्त । राज्य धर्मास देऊं पाहत ।
तुज चक्षुहीन म्हणती समस्त । राज्याधिकार नाहीं तूतें ॥ ९५ ॥
द्रोणाचार्य गंगासुत । तेही त्यांस मिळाले यथार्थ ।
मज वधितील समस्त । अति अनर्थ ओढवला ॥ ९६ ॥
कोणाच्या वीर्यापासून । पांडव जाहले निर्माण ।
हे दूर ठेवावे आपणापासून । तरीच कल्याण कांहीं एक ॥ ९७ ॥
अंधें बोलावून पांडवांप्रती । म्हणे तुम्हीं रहावें वारुणावती ।
बैसोनियां दिव्यरथीं । आतांच शीघ्र जाइजे ॥ ९८ ॥
तेंही राज्य आमुचें । कौतुक पहावें तेथींचें ।
मानस रुचेल साचें । तरी तेथेंचि रहावें ॥ ९९ ॥
धर्म म्हणे तूं पिता गुरु पूर्ण । तुझी आज्ञा मज प्रमाण ।
आतांच जातों म्हणोन । वंदी चरण अंधाचे ॥ १०० ॥
भीष्म द्रोण आणि विदुर । यास नमित युधिष्ठिर ।
तों दुर्योधनें विचार । एकांतीं दृढ मांडिला ॥ १०१ ॥
कणिक शकुनि कर्ण । दुःशासनादि खल मिळोन ।
जैसे वृकाचे सदनीं श्वान । प्रधानत्व करिती पैं ॥ १०२ ॥
यवनज्ञाति पुरोचन । महाखल दुष्ट दारुण ।
तो म्लेच्छ बोलावून । दुर्योधनें कंठीं धरियेला ॥ १०३ ॥
म्हणे वारुणावतास जाऊन । घेऊन समस्त प्रजाजन ।
पांडवांस दीजे बहुत मान । आणि सदन ऐसें निर्मावें ॥ १०४ ॥
लाक्षा राळ कर्पूर । यांचें रचावें मंदिर ।
वंश तैलकाष्ठें अपार । यांचे थाट बांधावे ॥ १०५ ॥
वंशाचे नळे संपूर्ण । भरी दीपनद्रव्येंकरुन ।
वाख सणसूत्रें जाण । ठायीं ठायीं आळे बांधीं ॥ १०६ ॥
कार्पास वंशपत्रें सणकाडिया । येणें वरील आडें गुंडोनियां ।
कापूर नवनीत कालवूनियां । भिंती समग्र लिंपिजे ॥ १०७ ॥
त्यावरी मृत्तिकेचा लेप अणुमात्र । देऊनि भिंती घोटीं समग्र ।
वरी चित्रे काढावीं विचित्र । मनोहर चहूंकडे ॥ १०८ ॥
अतसीचूर्ण घालून । भूमि करावी समान ।
रमणीय निर्मावें सदन । शक्र देखोन भुले ज्यातें ॥ १०९ ॥
भरुन सकल संपत्ती । मग देई पांडवांप्रती ।
बहुत नम्रता धरुन चित्तीं । शत्रु तेथें होमावे ॥ ११० ॥
आम्ही ज्या वेळीं करुं श्रुत । त्या वेळीं अग्नि लावावा त्वरित ।
पळ न लागतां समस्त । गृहासहित भस्म करीं ॥ १११ ॥
कोणास कळों नेदीं मात । वैरी होमावे अकस्मात ।
मग तो यवन उठत । अवश्य म्हणोन तेधवां ॥ ११२ ॥
रथासी रासभ लावून । पुढें धांवला तो दुर्जन ।
सवेंच निघाले पंडुनंदन । करिती रोदन जन सर्व ॥ ११३ ॥
वनास रिघतां रघुवीर । अयोध्याजन रडती समग्र ।
कीं मथुरेस जातां यादवेंद्र । गौळीजन चडफडती ॥ ११४ ॥
तैसेच गजपुरींचे जन । शोक करिती दारुण ।
प्रजा समस्त मिळोन । पाठीं धांवती धर्माचे ॥ ११५ ॥
सकल प्रजांचें समाधान । धर्मराज करी आपण ।
म्हणे मी सत्वर येतों परतोन । मनीं अन्य न धरावें ॥ ११६ ॥
बोळवून आले कौरव समस्त । विदुर द्रोण गंगासुत ।
प्रजेचा प्रेमा देखोनि तुकित । मान सुयोधन तेधवां ॥ ११७ ॥
असो प्रजेचें करुन समाधान । रथीं बैसती पंडुनंदन ।
विदुरास म्हणे दुर्योधन । तुम्ही निरोप मागा आतां ॥ ११८ ॥
त्रिकालज्ञानी विदुरभक्त । कापट्य जाणून मनांत ।
धर्मास जाणवूं पाहे मात । परि दुर्जन भोवतीं ॥ ११९ ॥
मग म्लेच्छ भाषा जी बर्बर । त्या शब्दसंकेतें बोले विदुर ।
हूं हूं म्हणोनि युधिष्ठिर । श्रवण करी उगाची ॥ १२० ॥
तुज पीडा आली परम कठिण । अहोरात्र सावधान ।
गृहस्वरुपें केवळ अग्न । चतुरें पूर्ण ओळखिजे ॥ १२१ ॥
वणव्याचें भय देखोनी । विवरांतूनि निघती प्राणी ।
दिवसा मृगया कीजे वनीं । रात्रीं हरिस्मरणीं जागावें ॥ १२२ ॥
अमित्राचा गोड शब्द । केवळ जाणिजे विषकंद ।
जैसे गोड बोलोन मैंद । पाश घालिती न कळतां ॥ १२३ ॥
विषरुप जाणिजे अन्न । गृहस्वरुपें कृशान ।
कथिलें जें वर्तमान । पंचप्राणांस विदित असो ॥ १२४ ॥
कुबेर दिशा पाठीसी घालून । सूर्यपुत्रदिशा पुढें लक्षून ।
विजयी होईल वायुनंदन । दुसरेन जाण पुढती पैं ॥ १२५ ॥
हृदयीं स्मरतां कंसारी । कदा दुःख न बाधे संसारीं ।
अपाय ते उपाय निर्धारीं । सर्वोपरी जाणिजे ॥ १२६ ॥
पुढें होईल गुरुदर्शन । विजयश्री वरील पूर्ण ।
सकल विघ्नें निवटून । भक्त पावती निजपदा ॥ १२७ ॥
विदुर म्हणे गा सुमती । अर्थ धरिला कीं सर्व चित्तीं ।
धर्म सद्‌गद होऊन प्रीतीं । म्हणे धन्य धन्य सज्ञाना ॥ १२८ ॥
असो समस्तांस राहवून । वारुणावतीं चालिले पंडुनंदन ।
मार्गीं माता पुसे धर्मालागून । विदुरें काय जाणविलें ॥ १२९ ॥
धर्म सांगे मातेच्या कर्णीं । पूर्वीं विष घातलें भीमालागूनी ।
आतां वरुणावतास नेऊनी । जाळूं पाहती गृहांत ॥ १३० ॥
असो वारुणावताजवळी पांडव । आले ऐकूनि प्रजा सर्व ।
पुरोचन करी महोत्सव । सामोरा येत धर्मातें ॥ १३१ ॥
द्रव्य वस्त्रें अलंकार । उपायनें देती जन समग्र ।
पुरोचनें जीर्णशाला सत्वर । प्रथम वस्तीस स्थान दिधलें ॥ १३२ ॥
नित्यनैमित्तिक कर्माचरण । नित्य पंक्तीस ब्राम्हणभोजन ।
सर्वही पुरवी पुरोचन । जें जें लागे धर्मातें ॥ १३३ ॥
मग कापट्यगृह निर्मून । धर्मास विनवी पुरोचन ।
तुहांलागीं निर्मिले सदन । तें येऊन अवलोकावें ॥ १३४ ॥
म्यां कष्ट केले बहुत । तें सार्थक करावें समस्त ।
अवश्य म्हणोनि त्वरित । पांचही जण ऊठिले ॥ १३५ ॥
उपरमाडिया गोपुर । भिंती स्तंभ चित्रविचित्र ।
देखतां जन भुलती समग्र । म्हणती धन्य कर्त्याची ॥ १३६ ॥
जैसे विषय दृष्टीं देखुनी । भुलती संसारिक प्राणी ।
परि साधु तत्काल विटे मनीं । क्षणिक असत्य म्हणोनियां ॥ १३७ ॥
तैसा गृहस्वरुपें केवळ अग्न । एक धर्मराज जाणे आपण ।
जैसी बकाची शांति गहन । कीं साधुपण मैंदाचें ॥ १३८ ॥
धर्म म्हणे भीमा अवधारीं । सदनपरीक्षा बरी करीं ।
उदक शिंपून भिंतीवरी । सुवास घेऊन पाहें पां ॥ १३९ ॥
धन्य धन्य महाराज विदुर । गोष्टी प्रत्यया आल्या समग्र ।
मग म्हणे वृकोदर । तरी कासया येथें रहावें ॥ १४० ॥
धर्म म्हणे आम्हांस पंथ । देईल येथें द्वारकानाथ ।
परि पुरोचनाशीं मैत्री बहुत । लावोनियां वर्तावें ॥ १४१ ॥
असो करुन गृहप्रवेश । केली पुरोचनाशीं मैत्री विशेष ।
दिवसा जाती मृगयेस । कीर्तनघोष रात्रीं करिती ॥ १४२ ॥
असो इकडे विदुराचे ध्यानीं । प्रकटोनियां चक्रपाणी ।
म्हणे खनकास पाठवूनी । विवर कोरवीं सत्वर ॥ १४३ ॥
समाधि विसर्जून विदुर ॥ खनक आपुला प्राणमित्र ॥
कृष्णोपासक पवित्र ॥ साधू आणि निर्लोभी ॥ १४४ ॥
त्यास विदुरें बोधूनी । पाठवून दिधलें ते क्षणीं ।
तो एकांतीं जाऊनी । धर्मरायास भेटला ॥ १४५ ॥
विदुरोक्ति सांगतां पूर्ण । तोषलें धर्माचें मन ।
म्हणे तूं गुरु आम्हांसी पूर्ण । सन्मार्ग पैं दावणारा ॥ १४६ ॥
मग एकांतीं गृहांत जाऊन । खनकें विवर कोरिलें पूर्ण ।
वारुणावताबाहेर सप्तयोजन । द्वार केलें उमटावया ॥ १४७ ॥
धर्में भीमास विवर दावून । द्वारीं लाविला चंड पाषाण ।
म्हणे बाहेर निघतां साही जण । विवरद्वार बुजवावें ॥ १४८ ॥
कृष्णपक्षीं चतुर्थीचे निशीं । पुरोचन अग्नि लावील गृहासी ।
सावध असावें सांगोन त्वरेशीं । खनक गेला गजपुरा ॥ १४९ ॥
तों जवळी आली चतुर्थी । जे पुरोचनाची प्राणहत्रीं ।
बैसवून ब्राह्मणांच्या पंक्ती । भोजन दिधलें धर्मराजें ॥ १५० ॥
पंचपुत्रांशीं निषादी ते दिवसीं । येऊन राहिली वस्तीसी ।
कुंतीनें भोजन दिधलें त्यांसी । मग तीं निजलीं तेथेंचि ॥ १५१ ॥
पांडवपंक्तीस आधीं बसून । पुरोचनें सारिले भोजन ।
तों द्वादशघटिका रात्र पूर्ण । जाहली जाण ते दिवसीं ॥ १५२ ॥
निद्रेचें मिष घेऊनि । भीम सावध पाहे नयनीं ।
तों पुरोचन चुडी पाजळोनी । मंदिरद्वारा पातला ॥ १५३ ॥
इतक्यात भीम सावध होय । म्हणे पुरोचना करितोस काय ।
तंव तो बोले लवलाहें । शीत बहुत वाजतें मज ॥ १५४ ॥
म्हणोन पाजळिला अग्न । लटिकाच तापे पुरोचन ।
मागुती निद्रेचें मिष घेऊन । भीमसेन पाहतसे ॥ १५५ ॥
घटिका एक जाहली पूर्ण । मागुता उठे लावावया अग्न ।
तों भीम बैसला उठोन । कां रे कृशानु लावितोसी ॥ १५६ ॥
तुज शीत वाजतें बहुत । तरी शेकितों नेऊन सदनांत ।
मग तो यवन बांधून त्वरित । गृहामाजी टाकिला ॥ १५७ ॥
मग भीमसेनें तत्काळ । गृहास चहूंकडे लाविला जाळ ।
बंधु माता घेऊन सकळ । विवरमार्गें चालिला ॥ १५८ ॥
तैलदीपिका पाजळून । साही जणे चाललीं तेथून ।
जय जय श्रीरुक्मिणीरमण । वारंवार स्मरताती ॥ १५९ ॥
श्रीकृष्णकृपेंकरुन । विवरमार्ग गेलीं क्रमून ।
भीमसेनें द्वार बुजवून । तत्कालचि टाकिलें ॥ १६० ॥
तों मागें पेटला प्रलयाग्न । कीं मांडलें लंकादहन ।
घोर सुसाटें भरलें गगन । नगरजन हडबडिले ॥ १६१ ॥
वंशनळे तटतडां उडती । लक्षानुलक्ष गगनीं जाती ।
लाक्षारसाचे पूर धांवती । वास येती औषधींचे ॥ १६२ ॥
निषादी पंचसुतांसहित । आणि पुरोचन भस्म झाला गृहांत ।
लोक हाहाकार करित । महाशब्दासी मिती नाहीं ॥ १६३ ॥
मस्तक आपटिती नगरजन । एक वक्षःस्थलें घेती बडवून ।
आठवून पांडवांचे गुण । मुर्च्छा येऊन पडताती ॥ १६४ ॥
म्हणती धृतराष्ट्र चांडाल यथार्थ । तेणेंच अग्नि लाविला त्वरित ।
तुझाही कुलक्षय समस्त । ऐसाच होईल दुर्जना ॥ १६५ ॥
इकडे भीमसेन कांस घालून । चौघे बंधु माता जाण ।
स्कंधीं आपुले बैसवून । दक्षिणपंथें जातसे ॥ १६६ ॥
वारुणावताहून धांवले दूत । गजपुरीं जाऊनि सांगती मात ।
ऐकोन धृतराष्ट्र शोक करित । कौरव विलपती लटिकेचि ॥ १६७ ॥
दुर्योधन करी हाहाकार । म्हणे कैसा करावा विचार ।
तंव तो परम चतुर । मनांत हांसत विलपे वरी ॥ १६८ ॥
म्हणे न कळे ईश्वरकळा । पुढें काय देखूं डोळां ।
चिरंजीव भूमंडळा- । वरी कोण जाहलासे ॥ १६९ ॥
ज्याचें कर्म त्यास बाधक पूर्ण । एका पुढें एका मागें मरण ।
तुम्ही आम्ही क्षेमकल्याण । वांचों काय दिवस बहु ॥ १७० ॥
पांडव दग्ध जाहले गृहांत । उरले तेही नाशवंत ।
असो कौरव स्नानें करुन समस्त । उत्तरक्रिया सारिती ॥ १७१ ॥
वारुणावतीं दूत धाडिले । पांडव ये स्थलीं निमाले ।
तेथें वृक्ष लावा वहिले । मठ मंडप निर्मूनि ॥ १७२ ॥
असो इकडे भागीरथीतीर । पांडव पावले समग्र ।
नमन करी युधिष्ठिर । भागीरथीस तेधवा ॥ १७३ ॥
पावावया पैलथडीस । नाहीं नौका आणि मनुष्य ।
तों कर्णधार त्या समयास । विदुरें सत्वर पाठविला ॥ १७४ ॥
तो नौका घेऊन कर्णधार । पांडवांपाशीं आला सत्वर ।
विदुराच्या खुणा समग्र । पूर्वापार सांगतसे ॥ १७५ ॥
मग साही जणें उतरोनी । परतीरा नेलीं तये क्षणीं ।
धर्में तयास आलिंगूनी । अश्रु नयनीं आणिले ॥ १७६ ॥
म्हणे तुझा न विसरुं उपकार । संकटीं रक्षी तो सद्‌गुरु नर ।
अन्नदाता भयत्राता साचार । तोही गुरु म्हणावा ॥ १७७ ॥
विदुर आणि यदुवीर । खनक आणि तूं कर्णधार ।
पांचवा पंडुराज निर्धार । पांचही समान मजलागीं ॥ १७८ ॥
असो तो तारक धर्मास वंदुन । गजपुरा गेला न लागतां क्षण ।
इकडे भागीरथीचें स्नान । पांडव करिती आनंदें ॥ १७९ ॥
स्वर्धुनीचें प्रेमें स्तवन । करिती तेव्हां पांडव जाण ।
जिचे करितां पयःपान । भवरोगहरण तत्काल ॥ १८० ॥
जय जह्नुकुमारि अघसंहारके । भागिरथि त्रिविधतापमोचके ।
कमलाभवानीसुखदायके । कीं ज्ञानप्रदे जाह्नवी ॥ १८१ ॥
पद्मनाभचरणोद्‍भवे जननि । त्रिपथगामिनि मंदाकिनि ।
व्योमकेशमस्तकविलासिनि । सितसुमनहारावलि ॥ १८२ ॥
जलजासनप्रियादोषनिवारिणि । काशीतलवाहिनि सगरकुलतारिणि ।
मणिकुंडलभूषणधारिणि । त्रिदशमुनितोषके ॥ १८३ ॥
जय अलकनंदे जनपावलि । ज्ञानगंगे कनकदुकूलधारिणी ।
सहस्त्रवदनदुःखहारिणि । शुभकारके शुभसलिले ॥ १८४ ॥
जय हिमनगपाषाणभेदिनि । परमपददायके देवव्रतजननि ।
तव चिंतनी दर्शनीं स्पर्शनीं । होती प्राणी पावन ॥ १८५ ॥
तव सलिलीं ठेवितां कलेवर । पुनरपि नाहीं संसार शरीर ।
मातृपयोधरपान साचार । सर्वथाही न करी तो ॥ १८६ ॥
तो जाहला जन्मरहित । शरीर धरी अकस्मात ।
शंखचक्राद्यायुधें समस्त । तो पहुडे भोगेंद्रावरी ॥ १८७ ॥
उरगरिपूवरी बैसोन । हिंडोन लोक करी पावन ।
ऐसें भागीरथीचें स्तवन । पृथानंदन करिते जाहले ॥ १८८ ॥
नित्यनेम सारुनी । भीम स्कंधीं घे वसुदेवभगिनी ।
नामें रुपें झांकूनी । घोर काननीं प्रवेशती ॥ १८९ ॥
पुढें कथा रसभरित । सुधारसाहून गोड बहुत ।
श्रीधरमुखें पंढरीनाथ । अति सुरस वदवील ॥ १९० ॥
बालकाचा धरुन हात । स्वयेंचि लिही जैसा पंडित ।
त्याचपरी श्रीरुक्मिणीकांत । अर्थसहित सर्वकर्ता ॥ १९१ ॥
तो भीमातीरवासी दिगंबर । श्रीधरहृत्कह्लारमधुकर ।
यतिवर्य ब्रह्मानंद उदार । अभंग साचार विनटला ॥ १९२ ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्व व्यास भारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । दशमाध्यायीं कथियेला ॥ १९३ ॥
इति श्रीपांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्वटीका श्रीधरकृत ।
गुरुप्रतिज्ञा जाहली सुफलित । पांडवमोचन लाक्षागृहीं ॥ १९४ ॥
इति श्रीधरपांडवप्रतापादिपर्वणि दशमोऽध्यायः ॥ १० ॥
अध्याय दहावा समाप्तGO TOP