॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय चवथा ॥

श्रीशिवराम गुरवेनमः ॥
शिवगीता हे वेदान्त प्रकार । लक्षणें पाहतां येथें चत्वार ।
विषय संबंध प्रयोजन अधिकार । भिन्न भिन्न बोलिले ॥ १ ॥
प्रथमाध्यायीं हें निरूपण । बोलिलें चारींचेंही लक्षण ।
त्यांत अधिकारियाचें असाधारण । मुखत्व चहूं अध्यायीं ॥ २ ॥
तृतीयोऽध्याया पर्यंत । विरजा दीक्षेचा संकेत ।
येणें अधिकार स्पष्ट उमटत । ज्ञानायोग्य पात्र ॥ ३ ॥
आतां चतुर्थोऽध्यायेंकडून । विरजा दीक्षेचें मिषेंकरून ।
बोलिजेल गुरुभक्तीचें लक्षण । जेणें अनधिकारिया अधिकार ॥ ४ ॥
हे मुमुक्षु साधकां तरी मनींहूनी । आवडीच असे येथींच्या श्रवणीं ।
परी येर जे संसारी प्राणीं । विनवणी असे तया ॥ ५ ॥
कीं गुरुभक्तीचा हा प्रसम्ग । अतिशय सुगम असे मार्ग ।
जेणें आचरणें लागवेग । शिवसद्‌गुरु भेटे ॥ ६ ॥
तुम्हां जीवांचिये कळवळें ।रामें अकर्त्तव्य कीं आरंभिलें ।
शरीर तेंहीं कष्टविलें । जेवीं कामुक ॥ ७ ॥
असो राम साधना प्रवर्तला । तोचि अर्थ येथें प्रगट केला ।
तया नुसधियाचि श्रवणाला । गुंतूं नका ॥ ८ ॥
तरीं राम जें जें करील साधन । तैसेंचि तुम्हीं आचरावें ऐकून ।
तरी तुम्हांसीही शिवगुरूचें दर्शन । होईल बाप हो ॥ ९ ॥
अभ्यासेंवीण करितां श्रवण । नोहेचि शिवगुरूचें दर्शन ।
जरी मना आवडे कीं व्हावें पवन । तरी अभ्यास करा ॥ १० ॥
कायेनें सेवा वाणीचें भजन । मनासि धारणा ध्यान ।
ऐसें त्रिविध गुरुभक्तीचें लक्षण । रामचि अंगें आरंभीत ॥ ११ ॥
या गुरुभक्ती ऐसें नाहीं सार । सुलभ आणि रोकडा साक्षात्कार ।
खळासीही फुटती पाझर । श्रवण करितां ॥ १२ ॥
परी अनंत जन्मीचें सुकृत । असतां आवडीचा उद्‍भवे हेत ।
असो श्रोतयांसी प्रार्थिजेत । कीं बोलिल्या रीतीं अभ्यासा ॥ १३ ॥
तृतीयाध्याय संपतां क्शणीं । बोलिले असती अगस्ती मुनि ।
कीं रामा शरण जाईं शूलपाणीं । जीवांचिया ह्ता ॥ १४ ॥
आतां आरंभींच चतुर्थाचे । सूत बोलतसे वाचें ।
येथें लक्षण गुरुभक्तीचें । शौनकहो ऐका ॥ १५ ॥


सूत उवाच -
एवमुक्त्वा मुनिश्रेष्ठ गते तस्मिन् निजाश्रमम् ।
अथ रामगिरौ रामः पुण्ये गोदावरी तटे ॥ १ ॥


ऐसें बोलोन मुनिश्रेष्ठ अगस्ती । जाता झाला निजाश्रमाप्रति ।
नंतर गौतमीतीरीं रामगिरी वरुती । राम येता झाला ॥ १६ ॥
रामा हें जीवाचिये कणवें । बोलिलें विरजा दीक्षेसी आघवें ।
तेआं तुवां निजांगें अनुष्ठावें । थोरीव सांडूनि ॥ १७ ॥
सकळ मननकर्त्यांत वरिष्ठ । यास्तव अगस्ती मुनि श्रेष्ठ ।
या रीतीं बोलोनियां स्पष्ट । निजाश्रमा जाता झाला ॥ १८ ॥
अगस्तीनें बोलिलें जितुकें । मनीं ठेवुनियां तितुकें ।
हें मी आचरेन अंगें निकें । येणें मज काय उणीवता ॥ १९ ॥
गोदावरी तीरापासून । रामगिरी पर्वत कोस तीनी ।
आतां नाम असे तया लागूनी । रामशेज ऐसें ॥ २० ॥
तेथें राम लक्ष्मणासहित । अति हर्षें सत्वर येत ।
आणि अनुष्ठान आरंभित । तेंचि कैसें अवधारा ॥ २१ ॥


शिवलिंगं प्रतिष्ठाप्य कृत्वा दीक्षां यथाविधि ।
भूतिभूषितसर्वांगो रुद्राक्षाभरणैर्युतः ॥ २ ॥


तेथें शिवलिंग प्रतिष्ठिलें । विर्जा दीक्षेतें यथाविधि केलें ।
विभूति लेपनें सर्वांग शोभलें । रुद्राक्ष आभरनासहित ॥ २२ ॥
कायेनें घडावें पूजन । या हेतू स्थूळलिंगाचें करी स्थापन ।
वाणीनें घडावें स्तवन भजन । यास्तव ब्रह्माण्डलिंग स्थापिले ॥ २३ ॥
ध्यान घडावें अंतरीं मनासीं । यास्तव नामरूप सर्व जगतासी ।
अस्ति भाति प्रिय रूपासी । स्वानुभवें स्थापिलें ॥ २४ ॥
सच्चिदानंद निर्गुण । जगीं असे नामरूपाधिष्ठान ।
हें उत्तम शिवलिंगाचें स्थापन । ज्ञानियावीण नव्हे ॥ २५ ॥
सर्व ब्रह्माण्ड हें शिवलिंग पवित्र । वेद गाताती शिवाचें चरित्र ।
हा मध्य स्थापनेचा प्रकार । स्तवनासी योग्य ॥ २६ ॥
कनिष्ठ हें कायिक सेवेसी । लिंग प्रतिष्ठा प्रतिमा पूजेसी ।
एवं हें त्रिविध प्रकारेशीं । रामें शिवलिंग स्थापिलें ॥ २७ ॥
आतां जीवानें हें कैसें करावें । तेंहि बोलिजेल चित्त द्यावें ।
तिहीं प्रकारें सेवन घडावें । श्रीसद्‌गुरूचें ॥ २८ ॥
गुरूचा देह हाचि शिवलिंग । तेथें कायेने सेवा कीजे अंग ।
हेंचि अर्चन होतएं सांग । गुरुभक्तासी ॥ २९ ॥
गुरुमाहात्म्य जे वेद गाती । तया करुण वचनें करावी स्तुति ।
सोडवीं सोडवीं मज दीनाप्रति ।तुजवीण तारिता कवणु ॥ ३० ॥
आतां तिसरा ध्यानाचा प्रकारू । तो ती प्रकारें असे साचारू ।
स्वयें ध्यायिजे निर्विकारु । हें उत्तम ध्यान ॥ ३१ ॥
सर्वांभूती एक सद्‌गुरु पाहे । दुजें नामरूप कांहीं न साहे ।
हा ध्यानानाचा प्रकार मध्यम आहे । गुरुभक्तासी ॥ ३२ ॥
गुरुमूर्तीचें मानस पूजन । आनख अवयवांचें ध्यान ।
हें सामान्य परी अगत्य होणें । गुरुभक्तासी ॥ ३३ ॥
असो ऐसें लिंग प्रतिष्ठून । रामें विरजा दीक्षा घेतली जाण ।
जे पूर्वीं झाली निरूपण । यथाविधि तैशी ॥ ३४ ॥
सर्वांगीं विभूति भूषित । हें ही त्रिविध ऐका सावचित्त ।
अखण्डैकरसपूर्ण मी अनंत । सागरीं मनमीन रमे ॥ ३५ ॥
समरसतां वृत्ती सांडून । निर्वृत्तिक तें पूर्ण विज्ञान ।
मानसीक भस्म लेपन । उत्तम अधिकारिया ॥ ३६ ॥
दृश्यात्मक हे सर्व जगतीं । नामरूपात्मक ह्या आत्मविभूती ।
येणेशीं भूषित विशेषमति । हें भस्मलेपन मध्यम ॥ ३७ ॥
अग्निहोत्राचें जें भस्म उत्तम । येणें शरीर हें शोभे परम ।
हेंही भस्म लावी श्रीराम । आतां रुद्राक्षाभरण ऐका ॥ ३८ ॥
सर्व इंद्रियांच्या वृत्ति । ब्रह्माकारेंचि स्फुरती ।
अस्ति भाति प्रियात्मक दिसती । विषय नारूपेंवीण ॥ ३९ ॥
एवं अक्षांपुढें हा रुद्र आघवा । हाचि उत्तम रुद्राक्ष प्रकार जाणावा ।
वाणीनें रुद्रचि आठवून भजावा । हा प्रकार मध्यम ॥ ४० ॥
शरीरासी रुद्राक्ष बांधावे । ऐसे हे तिन्ही प्रकार समजावे ।
एवं विभूति रुद्राक्ष हे धारण करावे । बोलिल्या रीतीं ॥ ४१ ॥


एवंविधोभवद् राम शिवपूजनतत्परः ।


यापरी विधानासहित । तत्पर होऊनी शिवार्चनीं रत ।
झालासे राम एकांतीं निवांत । कीं कीवें ऐसें करावें ॥ ४२ ॥
राम निजांगें आचरे म्हणोनी । जीवेंची प्रवर्तावें या साधनीं ।
पुढें ऐका चित्त देऊनी । अर्चन विधि कैसा ॥ ४३ ॥


अभिषिच्य जलैः पुण्यैः गौतमी सिन्धुसंभवैः ॥ ३ ॥
अर्चयित्वा वनपुष्पैः तद्वत् अन्य फलैरपि ।


सागरसंभव गौतमीं जळें । शिवलिंगासी अभिषेक केले ।
आणि वन्य पुष्पें आणोनि फळें । भावें पूजिलें यथाविधि ॥ ४४ ॥
समुद्रीं जाऊन मिळाली । गौतम ऋषीस्तव उद्‌भवली ।
या हेतु सिंधुसंभव गुअतमी बोलिली । तिच्या जळें अभिषेक केला ॥ ४५ ॥
चित्सागरीं मिळे जाऊनी । न्यायाचे युक्तीनें वृत्ति उद्‍भवूनी ।
एवं वृत्तिजळे लिंग रूपें निर्गुणीं । अभिन्नत्वें शिंचिलें ॥ ४६ ॥
दृश्यपुष्पें स्वतां निर्माण । येणें शिवलिंगाचें केलें पूजन ।
इकडे चम्चळत्वें तीं दिव्य सुमनें । निश्चळीं समर्पिलीं ॥ ४७ ॥
वनामाजीं फळें जी निर्मित । हे प्रवृत्तिरूप पूजन होत ।
निवृत्तरूपें सहज कर्मफळें समस्त । निष्कर्त्वें वाहिलीं ॥ ४८ ॥
एवं प्रव्रुत्ति समसमानें । शिवलिंग पूजिलें रामानें ।
याच रीतीं जीवानें करणें । जया चाड मोक्षाची ॥ ४९ ॥
ऐसा राम रामगिरीवरुता । अनुष्ठानीं झाला प्रवर्तता ।
ते समयीं सांगि सुमित्रासुता । मी दीक्षित होऊनि बैसलों ॥ ५० ॥
येथें राक्षस विघ्नें करिती । तरी तुवांधनुष्यबाण घेऊनि हातीं ।
सावध असावें अहोरातीं । आलिया संहार करी ॥ ५१ ॥
असो बोलिल्या रीती हें अर्चन । राम करीतसे प्रतिदिन ।
आणिकही नेम अथवा कीर्तन । करीतसे ते ऐका ॥ ५२ ॥


भस्मच्छन्नो भस्मशायी व्याघ्रचर्मासने स्थितः ॥ ४ ॥
नाम्नां सहस्रं प्रजपन् नक्तं दिवं अनन्यधीं ।


भस्म लावून भस्मीं निजावें । व्याघ्रचर्मासनींच असावें ।
शिवसहस्रनाम अखण्ड जपावें । दिवा कीं रात्री ॥ ५३ ॥
पूर्वाध्यायी भस्मप्रकार । सांगितला असे सविस्तर ।
या अध्यायींही त्रिविध विचार । बोलिला किंचित ॥ ५४ ॥
विज्ञानरूप भस्म मनासी । सर्व विभूति स्तवन वाचेसी ।
दृश्य भस्म लावीं अम्गासी । येणें रीतीं भस्मच्छन्न ॥ ५५ ॥
निद्रा जरी आली राघवा । वाणी मनासी विज्ञानी विसांवा ।
भस्मावरीच देह पडावा । भस्मशायी ऐसा ॥ ५६ ॥
सर्वदां स्थित व्याघ्रासनीं । याचेही प्रकार असती दोनी ।
देह सदां जागृती शयनीं । व्याघ्रांबरावरी ॥ ५७ ॥
द्वैतभयद्‍रूप व्याघ्र मारिला । ऐक्यबोधचर्म काधिता झाला ।
तेथें वृत्ति समरसून बैसे उगला । हा प्रकार दुसरा ॥ ५८ ॥
ऐसा भस्मयुक्त व्याघ्रासनीं । रामा ऐसें जीवें प्रवर्तावें साधनीण् ।
तरी शिवगुरु प्रत्यक्ष भेटे नयनीं । सदृढ निश्चयें ॥ ५९ ॥
आतां सहस्रनामापा कैसा जप । राम करीतसे प्रलाप ।
तेणेंचि रीति जीव जो किंचिज्ञ अल्प । येणें करुना भाकावी ॥ ६० ॥
अगा हे प्रभु शिवगुरु समर्था । मज कां न स्वीकारिसी अनाथा ।
वेद गातसे जया परमार्था । तेंचि अंगें न करिसी ॥ ६१ ॥
या भवापासून सोडविता । कोण असे शिवगुरु परता ।
मोक्षपाणि नाम हें असतां । उपेक्षिसी कैसा ॥ ६२ ॥
ब्रह्मादिक जरी रुसले । तरी अनन्या सद्‌गुरूनें संरक्षिले ।स
द्‌गुरु रुसतां न जाय रक्शिलें । कवणाचेनि ॥ ६३ ॥
मी अज्ञान्डोहीं पदिलों असें । येतात भांतीचे उमासे ।
उभा राहून तूं पाहसी कैसें । कौतुक अनन्याचें ॥ ६४ ॥
मी कामधेनूचें वासरूं । भवब्याघ्रें धरिलें सधरु ।
तुज मायेसी पडिला विसरू । कैसा तो नेणें ॥ ६५ ॥
गुरुमाये तूं शुखशयनी । मज बाळका टाकिलें मायाविपिनीं ।
हें श्लाघ्य वाटे तुजलागूनी । कसें तें नेणो ॥ ६६ ॥
माय उपेक्श्तां जनक रक्षी । उभयीं त्यागितां राजा निरीक्षी ।
तिघीं अव्हेरितां देव तया लक्षी । कृपाळूपणें ॥ ६७ ॥
मजला तूंचि माता तूंचि पिता । तूंचि प्रेम तूंचि देवता ।
तूं जरी होसी उपेक्षिता । तरी मज त्राता नाहीं ॥ ६८ ॥
चातकासी न वर्षे घन । चकोरा नुगवे रोहिणी रमण ।
तरी काय असे तयालागून । दुसरा उपाय ॥ ६९ ॥
तैसा तूं शिवगुरु कृपा न करिसी । तरी मज काय उपाय अनन्यासी ।
धांवे पावे करुणा नये कैशी । अतिकृपाळू तूं असतां ॥ ७० ॥
विश्वचक्षु तूंच होशी । अश्रोत्र परी सूक्ष्म ऐकसी ।
अमनस्क परी ओळखिसी । धांवे पावे करुणा न ये कैशी ॥ ७१ ॥
तरी काय माझें अंतर न कळें । कीं करुणाशब्द कर्णा नातळे ।
कीं मी शिणतों न देखती डोळे । कीं धारिष्ट पाहशी ॥ ७२ ॥
की दीनवरी कोप धरिला । किंवा उगाचि आळस केला ।
कीं कृपेचा लेश सरला । हें न कळे मज ॥ ७३ ॥
अथवा ब्रीद जेंहोतें बांधिलें । तें कोण वैरियें हरोनि नेलें ।
कीं निजकरुणेचें आजि केलें । उद्यापन ॥ ७४ ॥
असो न करा कृपा जरी । तरी मी पाउलें न सोडीं अंतरीं ।
स्वसुखावीण वृथा संसारीं । वांचून काय ॥ ७५ ॥
एका जन्मीं जरी न पावसी । तरी पावेन शत जन्मेंशी ।
हे प्रतिज्ञा केलीसे मानसीं अन्यथा नव्हे ॥ ७६ ॥
ऐसा हा निर्धार दीनाचा । विहीत वाटेल तें करावें साचा ।
मज तुझ्या वियोगें अवकाश क्षणाचा । कल्पप्राय वाटे ॥ ७७ ॥
व्याघ्र समुदायीं वत्स पडिलें । पाहून कामधेनूनें उपेक्षिलें ।
तेणेंचि रीतीं वाटतें झालें । उपेक्शितां तुवां ॥ ७८ ॥
तरी आतां ऐसें न करावें । आपुलिया दीना उद्धरावें ।
ब्रादालागीं सत्य करावें । सद्‍गुरुराया ॥ ७९ ॥
हे शिव शंकर सदाशिवा । उमाकांता वामदेवा ।
हे वृषभवाहना देवाधिदेवा । विसांवा सर्व जीवांसी ॥ ८० ॥
ऐसा अनन्य बुद्धीनें श्रीराम । जपत असे सहस्रनाम ।
हा सदा वाचेचा धर्म । करुणा भाकीतसे ॥ ८१ ॥
आतां कायेचा निर्धार कैसा । दंडळीना पर्वता ऐसा ।
तोंचि अवधारावें मानसा । धैर्यवंत पुरुषें ॥ ८२ ॥


मासमेकं फलाहारो मासं पर्णाशनः स्थितः ॥ ५ ॥
मासमेकं जलाहारो मासं च पवनाशनः ।


मास एक फल भक्षण । दुजे मासी खात असे पर्ण ।
तिसरे मासीं करी जलपान । वायुआहार चौथिया ॥ ८३ ॥
येथें कोणी कल्पना करिती । कीं उभयतां शिव राम एक चिन्मूर्ति ।
असतां चार मास कासया लोटती । क्षणार्धांत दर्शन व्हावें ॥ ८४ ॥
हें वास्तवीक परी जीवासी कळावें । कीं हे दुराराध्य गुरुदर्शन जाणावें ।
आणि अतिसायासें जे वस्तूसी पावावें । तेथें अतिशय प्रेम उठें ॥ ८५ ॥
अनायासें ज्या वस्तऊची प्राप्ति । ते ते अहाच वाटे चित्ताप्रति ।
तैसा गुरु जरी भेते शीघ्रगति । तरी अत्यम्त प्रेम नव्हे ॥ ८६ ॥
ऐसें हें रामासे असे ठावें । आणि जाणिजे तें सदाशिवें ।
यास्तव दर्शन न व्हावें । सद्‌गुरूचें शिष्यासी ॥ ८७ ॥
चार मास लोटले म्हणोनि । श्रीराम तळमळीना मनीं ।
अथवा मुखावरी न ये ग्लानी । हर्षयुक्त सदां ॥ ८८ ॥
परिणामीं साध्य वाटे जया । तरी श्रम न वाटे करितां उपाया ।
हें सत्य सत्य केलें न जाय वांया । ऐसें साधकें समजावें ॥ ८९ ॥
तस्मात् धैर्यचि असावें । प्राणांत साधन न सोडावें ।
तया कृपा करिजेल गुरुदेवें । येथें संशय न धरावा ॥ ९० ॥
असो श्रीराम अनुष्ठी होऊन साधक । अनुष्ठान हें निश्चयात्मक ।
त्यांत सांगितलें वाचिक कायिक । आतां मानसीक ऐका ॥ ९१ ॥
मानसिक म्हणजे करावें ध्यान । श्रीसद्‌गुरूचे< दंडायमान ।
त्या सद्‍गुरूचीं स्वरूपें दोन । एक मूर्त दूजे अमूर्त ॥ ९२ ॥
आरंभीं मूर्तिमान सद्‍गुरूचें । ध्यान साधकां घदावें साचें ।
यास्तव राम ध्यान करी शिवाचें । अति हर्षेंकडूनी ॥ ९३ ॥


शान्तो दान्तः प्रसन्नात्मा ध्यायनेनेवं महेश्वरम् ॥ ६ ॥
हृत्पंकजे समासीनं उमादेहार्धधारिणम् ।


शांत दांत प्रसन्न होत्सातां चित्त । राम महेश्वराचें ध्यान करित ।
हृदयकमळीं उमेसहित । असे स्थित सदाशिव ॥ ९४ ॥
मनीं किंचितही नसे तळमळ । विकाररहित सदां निश्चळ ।
ऐसा शाम्त होऊनि केवळ । ध्यान करिता झाला ॥ ९५ ॥
इंद्रियवृत्ति सर्व आंवरून । जया नांव बोलिजे दमन ।
ऐसा दांत्अ होत्साता करी ध्यान । एकाग्रभावें ॥ ९६ ॥
आतां शिवगुरूची होय प्राप्ति । सुटिका होईल जीवाप्रति ।
यास्तव हर्षें कोंदाटली चित्तवृत्ति । निःसंशयपणें ॥९७ ॥
ऐसा होत्साता श्रीराम । ध्यान करीतसे सप्रेम ।
हृदयकमळीं स्थापिली परम । श्रीमूर्ति शिवाची ॥ ९८ ॥
अर्धांगी उमा लावण्यखाणी । महेश्वर शोभे कमलासनीं ।
तेजें आकाश गेलें व्यापोनी । किरणेंशीं सूर्य जैसा ॥ ९९ ॥


चतुर्भुजं त्रिनयनं विद्युत्पिंग जटाधरम् ॥ ७ ॥
कोटिसूर्यप्रतिकाशं चन्द्रकोटिसुशीतलम् ।


चतुर्भुज आणि त्रिनयन । जटा विद्युत्प्राय पिंगटवर्ण ।
कोटिसूर्यापरी प्रकाश गहन । परी शीतल चंद्रकोटिसम ॥ १०० ॥


सर्वाभरणसंयुक्तं नागयज्ञोपवीतिनम् ।
व्याघ्रचर्मांबरधरं वरदाभयधारिणम् ॥ ८ ॥


सर्वांभरणेशी संयुक्त । नागासहित शोभे यज्ञोपवीत ।
व्याघ्रचर्मांबरधारी वरदहस्त । अभयप्रद निजभक्तां ॥ १ ॥


व्याघ्रचर्मोत्तरीयं च सुरासुरनमस्कृतं ।
पंचवक्त्रं चंद्रमौलिं त्रिशुलडमरूधरम् ॥ ९ ॥


दुजें उत्तरीय वस्त्र व्याघ्रांबर । सुरासुर करिती नमस्कार ।
मस्तकीं शोभे चंद्र पंचवक्त्र । त्रिशुल डमरू हस्तकीं ॥ २ ॥
ऐसा मूर्तिमंत शिवशंकरु । जगद्‍वंद्य जगद्‌गुरु ।
राघव ध्यातसे निरंतरु । जीवाच्या कणवें ॥ ३ ॥
मायावेषें हें रूप धरूनि ।बोधितसे मुमुक्षुलागुनी ।
ऐक्य बोध होतां समाधानी । मोक्ष पावती शिष्यवर्ग ॥ ४ ॥
तरी बोलिल्यारीती सगुणमूर्ति । ध्यानीं धरील जो सुमति ।
तो येचि देहीं पावेल मुक्ति । सद्‍गुरु उपदेशें ॥ ५ ॥
मूर्तिमान सद्‍गुरूचें ध्यान । करितां मूर्तिचें होय सातत्यपण ।
हळुहळु मग करावें आपण । निर्गुण रूपतें ॥ ६ ॥
तेंचि करण्याची हतवटी । कैशी ते ऐका सावध गोष्टी ।
नखशिख मूर्तिवरी असतां दृष्टी । तें आधींचरणीं आणावी ॥ ७ ॥
उभय पाउलें अतिसुंदर । वाळे नुपुरादि अलंकार ।
तेथेंचि दृष्टि करावी स्थिर । आल्हादयुक्त मनें ॥ ८ ॥
मग गुल्फापासून जानूपर्यंत । जंघा दोनी सुशोभित ।
पीतांबरेंशीं आच्छादीत । ध्यावें कांहीं काळ ॥ ९ ॥
तया पुढें उरु दोनी वस्त्राच्छादित । गुह्यस्थान जघन सुशोभित ।
तेथेंचि रमवावें चित्त । आवडी ऐसें ॥ ११० ॥
पुढें कतिदेश सलक्षण । कटिसूत्र पहावें दैदीप्यमान ।
तेथेंचि वर्तुळ नाभिस्थान । सान कमलापरी ॥ ११ ॥
तेथून वरुती हृदयस्थान । उभय बाहू लंबायमान ।
दिव्य कंठीं मालादि भूषण । धवधवीत पहावें ॥ १२ ॥
नंतर मुखनासिकादि मस्तक । आकर्णनयन कुगुट समौक्तिक ।
हास्यवदन परम सौम्य सम्यक । अति हर्षें ध्यावें ॥ १३ ॥
मग सवही मुखाकृती सोडून । नुसधें हास्यावरी ठेवावें मन ।
तेंचि पुढें सच्चित्‌घन । आकाशापरी करावें ॥ १४ ॥
पूर्वोत्तरादि दशदिशा । प्रकाशमय कांतिविशेषा ।
पोकळ अंत नाहीं ऐशा । एकतान अवलोकाव्या ॥ १५ ॥
दृश्यावीण ओतप्रोत । तया गगनीं वृत्ति क्रीडत ।
क्षणा उमसे क्षणा नासत । परी तें स्वरूप अविनाश ॥ १६ ॥
तेंचि अमूर्त गुरूचें निजरूप । जेथून माया उठे सह स्ंकल्प ।
तेंचि श्लोकार्धें बोलिके अल्प । श्रीराम जें ध्यातसे ॥ १७ ॥


नित्यंच शाश्वतं शुद्धं ध्रुवमक्षरमव्ययम् ॥ १० ॥


तेंचि नित्य तेंचि शाश्वत । तयासी धुवत्वाचा संकेत ।
अक्शर अव्यय सदोदित । परी अविषय वृत्तीसी ॥ १८ ॥
शब्दादि विषयचि जेथें नसतां । तें गोचर कैसें इंद्रियां समस्तां ।
वृत्तिमात्र व्यापी अनंता । परी येतां न ये वृत्तीसी ॥ १९ ॥
विद्युल्लता जैशी आकाशी । वृत्ति उमटे आटे स्वरूपीं तैशी ।
तोचि ध्याता ओळखी एक देशी । ओतप्रोत तें ध्येय ॥ १२० ॥
उत्पत्ति स्थिति लय वृत्तीसी । परी तिहीं माजी ते अविनाशी ।
आदि अंतीं स्थिति असे जैशी ।तैशींच मध्येंही ॥ २१ ॥
याचि हेतूतें स्वरूप नित्य । उद्‍भवे नासे तें अनित्य ।
जितुकें उपाधीचें असे कृत्य । तेंचि नासे येर उरे ॥ २२ ॥
काल कर्मासी अतीत । या हेतू बोलिलें शाश्वत ।
येर साकार तितुकें अशाश्वत । बोलावें न लगे ॥ २३ ॥
मायारहित पूर्णपणीं । तेंचि शुद्ध बुद्ध चिन्मात्रखाणी ।
जेथें कदां त्रिपुटीची उभवणी । नव्हेचि नव्हे ॥ २४ ॥
तेंचि स्वरूप ध्यायील जो ध्याता । तो तेंचि अंगें होतसे तत्वतां ।
याचि हेतू मुळीं तया अनंता । ध्रुव ऐसें बोलिलें ॥ २५ ॥
उपाधि नसतां तें न नासे । यास्तव अक्षर बोलिलें असे ।
सर्वांसि वृद्धि क्षय होतां अपैसें । जैसें तैसें तें अव्यय ॥ २६ ॥
एवं ऐसा अमूर्ति गुरु । तोचि मूर्तिमान मागें बोलिला प्रकारु ।
उभयरूपें ध्यातसे रघुवीरु । तरी तुम्हीही द्या ऐसा ॥ २७ ॥
पहा पहा तुम्हां जीवांसाठी । श्रीराम अनुदिनीं होतसे कष्टी ।
तुम्ही आचराल जरी हे हातवटी । तरे कष्ट हरती रामाचे ॥ २८ ॥


एवं नित्यं प्रजपतो गतं मासचतुष्टयम् ॥ ११ ॥


एवं ध्यान मूर्तामूर्त शिवाचें । तेवेंच अनुष्ठान वाचिक कायेचें ।
ऐसेंचि अनुष्ठितां लोटले साचे । मास चतुष्टय ॥ २९ ॥
आतां शिवगुरूच्या भेटीचा समयो । शिष्यहृदयींचा होईल अज्ञानक्षयो ।
तो सावध ऐकून करारे निश्चयो । कीं रामा ऐसें आपण करूं ॥ १३० ॥
रामासी जेवीं शिवगुरु भेटला । तेवींच सद्‍गुरु भेटेल तुम्हांला ।
परी सोडूं नका साधनाला । कठीण म्हणोनी ॥ ३१ ॥
कायेनें करावी सद्‍गुरु सेवा । वाणीनें भजावें गुरुसहस्र नांवा ।
मूर्तामूर्त सद्‍गुरु ध्यावा । अंतःकरणीं ॥ ३२ ॥
असो जयाचा भाग्योदय थोर । तयासीच मति होय दृढतर ।
अभागी पामर करिती अव्हेर । सहस्र वेळा सांगतां ॥ ३३ ॥
आतां ऐका शिवरामाची भेटी । होईल कैशी ते बोलिजेल गोष्टी ।
शौनकहो अति आवडी असो द्या पोटीं । श्रवण मननाची ॥ ३४ ॥


अथ जातो महानादः प्रलयाम्बुदभीषणः ॥ १२ ॥
समुद्रमथनोद्‌भ्त मन्दरावनिभृद्‍ध्वनिः ।


चारी मास लोटलिया वरी । महानाद दाटला अंबरी ।
प्रलयांबुद गर्जने परी । कर्कशरूप ॥ ३५ ॥
जेवीं सुरासुरीं मथन करितां । मंदर पर्वत टाकिला आतौता ।
नाद उद्‍भवला अवनी वरुता । तयाचेही शतगुनें ॥ ३६ ॥


रुद्रबाणाग्निसंदीप्तभ्रश्यत्‌त्रिपुरविभ्रमः ॥ १२ ॥
तमाकर्ण्य संभ्रान्तो यावत्पश्यति पुष्करम् ।


रुद्र बाणाग्नीचे संयोगें । त्रिपुर बहुधा जळूं लागे ।
संतप्त झालें तेवीं लागवेगें । कुंठीत मति रामाची ॥ ३७ ॥
जेवीं सद्‍गुरु वचनेंकडून । पाषांडाचें कुंठित मन ।
अथवा गुरुवचन बाणाग्न । येणें देहत्रिपुर तापे ॥ ३८ ॥
ऐशी ते महाध्वनि ऐकूनि । भ्रांति पडे श्रीरामालागूनी ।
तो महाशब्द नायकवे कर्णीं । कवणासीही ॥ ३९ ॥
गंगादि तीरीम् जे गजादि पशुजाती । अथवा कमळें टवटवीत जळावरती ।
तो नाद ऐकतां जाऊन बुडती । अथवा जळीं ॥ १४० ॥
अथवा वनीं ग्रामीं जे जे जीव । त्यांचे गलाले जीवभाव ।
निर्व्यापार जाहले सर्व । जेवीं चित्रें रेखिलीं ॥ ४१ ॥
सद्‍गुरुबोधें सच्छिष्यासी । शक्तिपात होतां निश्चळ मानसीं ।
तैशी दशा झाली सर्वांसी । तया महाशब्दें ॥ ४२ ॥


तावदेव महातेजो समस्यासीत्पुरो द्विजण् ॥ १३ ॥
तेजसा तेन संभ्रान्तो नापश्यत्स दिशो दश ।


जेथवर नाद उठिला । तेथवरी प्रकाशही दाटला ।
द्विजहो येथें दृष्टान्त सुचला । ऐका सांगूं सूत म्हणे ॥ ४३ ॥
समाधिकाळीं साधकासी । कषाय दाटे ज्ञानदृष्टीसी ।
तेवेंच रामाचे स्वकीय नेत्रासी । प्रकाश थोर दाटला ॥ ४४ ॥
तया तेजेंकडूनि भ्रांत । दृष्टि असे चाचरी जात ।
दशदिशा कांहींच न दिसत । तेव्हां पदार्थ तरी कैंचे ॥ ४५ ॥


अंधीकृतेक्षणस्तूर्णं मोहं यातो नृपात्मजः ॥ १४ ॥
विचिन्त्य तर्कयामास दैत्यमायां द्विजेश्वराः ।


नेत्रांसी पडिली झांपडे । पाहतांचि न ये करितां तांतडी ।
अंतःकरणेंचि झालीं वेडीं । दशरथात्मजाचीं ॥ ४६ ॥
जेवीं साधक शून्य संदेहीं । पडतां तर्क न फुटती कांहीं ।
तेवीं रामासी दशा झाली पाही । कांहीं सुचेना ॥ ४७ ॥
मग बळेंमनासी देऊनि धीर । म्हणें हें काय असे न कळे प्रकार ।
तर्किता झाला कीं हे दुर्धर । राक्शसी माया ॥ ४८ ॥
विश्वामित्राचे याग रक्षणीं । राक्षसी माया देखिली नयनीं ।
तेवींच येथेंही मजलागूनी । दैत्य विघ्न करूण् आले ॥ ४९ ॥
बैसलों जेव्हां अनुष्ठाना । तेव्हां सांतलें होतें लक्ष्मणा ।
कीं सज्ज करून धनुष्यबाणा । सावध असावें ॥ १५० ॥
तरी तें काय बाळ तान्हुलें । त्यादैत्य कैसे जाती आटोपले ।
किंवा जाऊन असेल निजेलें । अथवा त्यागिलें धनुष्य ॥ ५१ ॥
योगी शून्यातें ब्रह्म भावी । कीं दृश्यत्व लेखी ब्रह्मानुभवी ।
श्रीरामालागीं दशा तेवीं । शिवदर्शना म्हणे दैत्यमाया ॥ ५२ ॥


अथोत्थाय महावीरः सज्जं कृत्वा स्वकं धनुः ॥ १५ ॥
अविध्यन्निशितैर्बाणैः दिव्यास्त्रैरभिमंत्रितैः ।


केवळ भावून नाहीं राहिला । धनुषय्ही सज्ज करिता झाला ।
जैसा उत्थानीं दांत खावूं लागला । कामादिकांवरी ॥ ५३ ॥
तेवीं प्रकर बाण विंधूनी । दिव्यास्त्रें योजि अभिमंत्रूनी ।
तेंचि ऐका सावधपनीं । अस्त्रें कोणकोणती ॥ ५४ ॥


आग्नेयं वारुणं सौम्यं मोहनं सौरपार्वतम् ॥ १६ ॥
विष्णुचक्रं महाचक्रं कालचक्रं च वैष्णवम् ।
रौद्रं पाशुपतं ब्राह्मं कौबेरं कुलिशालिनम् ॥ १७ ॥
भार्गवादि बहूनि अस्त्राणि अयं प्रायुक्तं राघवः ।


अग्नि वरुण आणि सोमास्त्र । मोहन सूर्यास्त्र पर्वतास्त्र ।
विष्णुचक्र महाचक्र । कालचक्र वैष्णवास्त्रें ॥ ५५ ॥
रुद्रास्त्र आणि पाशुपतास्त्र । ब्रह्मास्त्र इंद्रास्त्र वायु अस्त्र ।
भार्गवादि बहुत अस्त्र । सोडीतसे राघव ॥ ५६ ॥
जेवीं साधक ब्र्ह्मरूप असोनि । दृश्य नामरूपात्मक सत्य मानी ।
प्रवर्ते तयाचे अपलापनीं । तेवीं राम मारूं पाहे ॥ ५७ ॥
रज्जूवरी सर्प नसतां । मरे कैसा वाळू मंत्रितां ।
निष्फळ होती साधनें करितां । तेवींच रामबाण व्यर्थ ॥ ५८ ॥


तस्मिन्तेजसि शस्त्राणि चास्त्राण्यस्य महीपतेः ॥ १८ ॥
विलीनस्य महाभ्रस्य करका एव नीरघौ ।


रामाचें शस्त्रास्त्र संपूर्ण । त्या महातेजीं झाले लीन ।
जैसा मेघोदकाच्या गारा जाती विघरून । समुद्रीं पडतांचि ॥ ५९ ॥


ततः क्षणेन जज्वाल धनुस्तस्य कराच्च्युतम् ॥ १९ ॥
तूणिरं चांगुलित्राणं गोधिकापि महीपते ।


तत्क्षणींच रघुपतीचें । सशित धनुष्य पडिलें करींचें ।
दह्यमान होऊन वेष्टण अंगुलीचें त्यासहित भाताही गळे ॥ ६० ॥


तद्‍दृष्ट्वा लक्ष्मणो भीतः पपात भुवि मूर्च्छितः ॥ २० ॥
अथ किंचित्करो रामो जानुभ्यामवमों गतः ।


तेव्हां राम स्तब्धत्वें राहिला । तें पाहून लक्श्मण अति भ्याला ।
तत्क्षणी भूमीसी मूर्च्छित पडिला । शंभुमाया मोहें ॥ ६१ ॥
पुढें काय जो झाला वृत्तान्त । तो कांहींच नेणें सुमित्रासुत ।
इकडे राम विचारूण् लागे मनांत । कीं म्यांहें काय केलें ॥ ६२ ॥
माझिये अनुष्ठान समाप्तीचा काळ । हें शिवगुरूची प्रसन्नतेची वेळ ।
म्यां हें काय भाविलें बरळ । दैत्यमाया म्हणोनी ॥ ६३ ॥
उगेंचही मनीं नाहीं भाविलें । दैत्य म्हणोनि शस्त्रास्त्र सोडिलें ।
केवढें मजपासून अंतर पडलें । तस्मात् मी थोर अपराधी ॥ ६४ ॥
जेवीं दोरें लुटितां धांवणें आलें ।\ तया चोर म्हणून युद्ध केलें ।
तैसेंच मजलागीं अघटित घडलें । हा अपराध शिव क्षमा करो ॥ ६५ ॥
यास्तव जानू भूमीवरी टेंकुनी । प्रवर्तला साष्टांग नमनीं ।
हें प्रभो अपराध क्षमोनी । पाहीं दीनातें ॥ ६६ ॥


मीलिताक्षो भयविष्टः शंकरं शरणं गतः ॥ २१ ॥
स्वरेणाप्युच्चरन्नुच्चैः शंभोर्नामसहस्रकम् ।


नेत्र झांकून भयभीत झाला । हे शंभो मी शरण असे तुजला ।
शिवसहस्रनाम उच्चारूं लागला । अट्टाहास स्वरें ॥ ६७ ॥
घर पुसत आली कामधेनु । नोळखितां मारिला म्यां पाशाणु ।
तैसा मी अन्यायी परी आलों शरणु । अपराध क्षमा करी ॥ ६८ ॥
हरहर शंकर सदाशिवा । करुणार्णवा देवाधिदेवा ।
अपराध माझा न पहावा । कनवाळूपणे ॥ ६९ ॥
बाळक लाथ मारी नेणतां । तयावरी क्षोभे काय माता ।
तैसा मी अति अन्यायी असतां । तूं क्षमार्ह असशी ॥ १७० ॥
ऐसा उच्चस्वरें बद्धांजली । अनंत नामें उच्चारी वहिली ।
अपराध क्षमूनियां केली । पाहिजे कृपा ॥ ७१ ॥


शिवं च दण्डवत् भूमौ प्रणनाम पुनः पुनः ॥ २२ ॥
पुनश्च पूर्ववच्चासीत् शब्दो दिग्मंडलं ग्रसन ।


तों मागुतीं पूर्ववत् । ध्वनि उठला माहा अद्‍भुत ।
तेणें स्वरें दिग्मंडल दाटत । आकाशही नादावलें ॥ ७३ ॥


चचाल वसुधा गोरं पर्वताश्च चकम्पिरे ॥ २३ ॥
ततः क्षाणेन शीतांशु शीतलं तेज आपतत् ।


घोरें पृथ्वीं कंप असे होत । आणि कांपूं लागले सर्वही पर्वत ।
हें पाहून श्रीराम स्तवित । नेत्र नुघडितां ॥ ७४ ॥
हे सद्‍गुरु शिव परात्परा । हें क्रूर भीषण आवरा ।
अति सौम्य रूप होऊन मज लेंकुरा । कुरवाळावें ॥ ७५ ॥
भयंकर रूप असतां क्षणभरी । श्रीराम स्तवितां करुणोत्तरीं ।
अति शीतल सौम्य रूप धरी । चंद्रासमान ॥ ७६ ॥


उन्मीलिताक्षो रामस्तु यावदेतत् प्रपश्यति ॥ २४ ॥
तावद्ददर्श वृषभं सर्वालंकारसंयुतम् ।


मग हळुहळु नेत्र उघडी । जेथवर दृष्टीची होय प्रौढी ।
तेथवरी देखतसे परवडी । वृषभ महाथोर ॥ ७७ ॥
ऐसा नंदी परम सुंदर । युक्त असती सर्व अलंकार ।
देखतां श्रीराम आनंदे थोर । म्हणे भाग्योदय जीवाचा ॥ ७८ ॥


पीयूशं अथनोद्‍भूत नवनीतस्य पिण्डवत् ॥ २५ ॥
प्रोतस्वर्णं मरकतच्छायश्रृंगद्वयान्वित ।


अमृत मथूनि काढिलें नवनीत । त्याचेपरी शुद्धवर्ण श्वेत ।
सुवर्णकवचें आच्छादिलीं शोभत । श्रृंगें दिनीं ॥ ७९ ॥


नीलरत्‍नेक्षनं र्‍हस्वकण्ठकम्बलभूषितम् ॥ २६ ॥
र‍त्नपल्याणसंयुक्तं निबद्धं श्वेतचामरैः ।


नीलरत्‍नापरी नेत्राचें पाहणें । कीं इंद्रनीलचि जोडिले दोन ।
कंठही सान शोभायमान । कंबल कंठातळीं लोंबे ॥ १८० ॥
अथवा वशण्ड उच्च वरुती । कीं अलंकार मौक्तिकादि शोभती ।
झूल जे असे पाठीवरुती रत्‍नजडित शोभे ॥ ८१ ॥
रत्‍नें मुक्ताफळेंसि जडित । दैदीप्यमान लखल्कहित ।
आणि चामरें उभयभागीं श्वेत । बांधिलीं असतीं ॥ ८२ ॥


घंटिकाघर्घरीशब्दैः पूरयन्तं दिशो दश ॥ २७ ॥
तत्रासीनं महादेवं शुद्धस्फटिकविग्रहम् ।


लहान मोठ्या घंटा वाजती । तेणें शब्दें दशदिशा नादावती ।
ऐसा नंदी सुशोभित अत् । देखे श्रीराम ॥ ८३ ॥
मायायोगें देह धरिला । विग्रह स्फटिकापरी शोभला ।
तया नांदीवरुती बैसला । देखे श्रीराम ॥ ८४ ॥


कोटिसूर्यप्रतिकाशं कोटिशीतांशुशीतलम् ॥ २८ ॥
व्याघ्रचर्माम्बरधरं नागयज्ञोपवीतिनम् ।


कोटि सूर्यापरी दिव्य प्रकास्य् । शीतल जैसा कोटि शीतांशु ।
व्याघ्रचर्मांबरधारी नाग हा विशेषु । यज्ञोपवीत जया ॥ ८५ ॥
प्रकाशयुक्त देदीप्यमान । परी देह ज्याचा नव्हे उष्ण ।
देखतांचि शीतल होय मन । चंद्र पाहतां चकोर जेवीं ॥ ८६ ॥


सर्वालंकारसंयुक्तं विद्युत्पिंगजटाधरम् ॥ २९ ॥
नालकण्ठं व्याघ्रचर्मोत्तरीयंचन्द्रशेखरम् ।


सर्वालंकारेशी संयुक्त । विद्युत्प्राय जटा पिंघट शोभत ।
नीलकंठ उत्तरीय वस्त्र रुळत । व्याघ्रचर्माचें ॥ ८७ ॥
सर्व अलंकारामाजीं अलंकार । शोभतसे मस्तकीं चंद्र ।
यास्तव नाम चंद्रशेखर । आल्हादकर मुमुक्षूसी ॥ ८८ ॥
चकोरा होतां चंद्रदर्शन । तृप्ति पावतसे आपण ।
तेवीं पाहतां मुमुक्षुजन । समाधान पावती ॥ ८९ ॥
शिष्याचें बंधरूप विष हरी । तें आपुलें ठेवी कंठा माझारीं ।
या हेतु नीलकंठ नामधारी । सद्‍गुरुनाथु ॥ १९० ॥


नानाविधायुधोद्‍भासि दशबाहुं त्रिलोचनम् ॥ ३० ॥
युवानं पुरुषश्रेष्ठं सच्चिदानंदविग्रहम् ।


[ no shl2oka numbered as 191]

सच्चिदानंद पूर्ण ब्रह्म । तेथे कैंचा देहाचा उद्‍गम ।
परी मुमुक्षूचा भाग्योदय परम । कृपें गुरु देहधारी ॥ ९२ ॥
कीं तें सच्चिदानंदत्व गोठलें । शिवगुरुरूपें आकारासी आलें ।
याचि हेतूस्तव असे बोलिलें । सच्चिदानंदविग्रह ॥ ९३ ॥
क्षराक्षरातीत जो स्पष्ट । याआंच नांवें पुरुषश्रेष्ठ ।
प्रबोधशक्तिपटुतर अवीट । तरुण बोलिलें या हेतू ॥ ९४ ॥
दृश्यभास शून्य साक्षी । या तिहीं नेत्रीं सर्वदां निरीक्षी ।तो
त्रिनयन निजपद अपरोक्षीं । बैसवीं साध्कां ॥ ९५ ॥
प्रबोधशक्तीचे अनेक प्रकार । हेचि दहाही शोभती कर ।
नाना पाषांडांचा व्हावा संहार । यास्तव नाना आयुधें धरी ॥ ९६ ॥
ऐसा सद्‍गुरु सदाशिव । नंदीवरी बैसला स्वयमेव ।
देखता झाला श्रीराघव । आणिक पुढें तें काय ऐका ॥ ९७ ॥


तत्रैव च सुखासीनं पूर्णचन्द्रनिभाननाम् ॥ ३१ ॥
नीलेन्दीवरदामाभाद् उद्यन्मरकतप्रभाम् ।


तया पुढेंहि नंदीवरुती । सुखें स्थित असे पार्वती ।
पूर्ण चंद्रापरी वदनकाम्ति । तेचि ज्ञप्ति शोभायमान ॥ ९८ ॥
किंचित नील श्वेत चंद्राचेपरी । तप्त सुवर्णासम निर्धारी ।
दैदीप्यमान प्रभा फांके अंबरीं । व्याओऊन दशदिश ॥ ९९ ॥


मुक्ताभरणसंयुक्तां रात्रिं ताराञ्चितामिव ॥ ३२ ॥
विन्ध्यक्षितिधरोत्तुंग कुचभारभरालसाम् ।


अंबरी तारागनांच्या पंक्ति । तेवीं वस्त्रालंकारां मुक्तें शोभतीं ।
जे देखतांचि बद्धतेची समाप्ति । होय मुमुक्षूच्या ॥ २०० ॥
विंध्याद्रि ऐसे दोन पर्वत । हृदयीं शोभती कुच उन्नत ।
ते असती वस्त्राच्छादित । तेणें अतिशय लावण्यशोभा ॥ १ ॥



सदसत्संशयाविष्ट मध्यदेशान्तराम्बरम् ॥ ३३ ॥
दिव्यभरणसंयुक्तां दिव्यगन्धानुलेपनम् ।


कटिदेश वस्त्राच्छादित सान । तो सदसत्संशशयापन्न ।
जैशी माया आहे नाहींशी अनिर्वचन । नाम रूपें आच्छादित ॥ २ ॥
दिव्यभरणेशीं युक्त । दिव्यगंध सर्वांग चर्चित ।
जेवीं माया तन्मात्रासहित । तेवीं शोभे जगदंबा ॥ ३ ॥


दिव्यमालाम्बरधरां नीलेन्दीवरलोचनम् ॥ ३४ ॥
अलकोद्‍भासिवदनां ताम्बूलग्रासशोभिताम् ।


दिव्य माला अंबरावरी । दिव्य नीलकमलनेत्री ।
तक्तवर्ण तांबुलवक्त्रीं । आणि केसांची बट शोभे ॥ ४ ॥


शिवलिंगनसंजात पुलकोद्‍भासिविग्रहाम् ॥ ३५ ॥
सच्चिदानन्द रूपाध्यां जगन्मातरमाम्बिकाम् ।
सौंदर्यसारसंदोहां ददर्श रघुनन्दनः ॥ ३६ ॥


दिव्य तरुवरी जैशी लता । तेवीं शिवासी वेष्टून राहे तत्वतां ।
सर्वांगीं होतसे पुलकांकिता । स्पर्शमात्रें कडूनी ॥ ५ ॥
आरंभी सच्चिदानंदरूपी । अंबिका माया उद्‍भवे नामरूपी ।
जगकार्यासी कारणरूपी । जगन्माता बोलिजे ॥ ६ ॥
मायेचें सत्व सुंदरत्व होअऊन गोळा । त्या सारांशाची उद्‍भवली हें बाळा ।
ऐसी पार्वती देखिलीं डोळां । श्रीरघुनंदनें ॥ ७ ॥
आणिकही दिक्पाळ समस्त । देवही असती शिवासी वेष्टित ।
ते पाहतां श्रीराम त्वरित । वेगाळले नयनीं ॥ ८ ॥


स्वस्ववाहनसंयुक्तान् नानायुधलसत्करान् ।
बृहद्‍रथन्तरादीनि सामानि परिगायतः ॥ ३७ ॥
स्वस्वकान्तासमायुक्तान् दिक्पालान्वरितः स्थितान् ।


आपुलाले वाहनीं बैसती । नाना निजायुधें शोभती हातीं ।
सर्वही सामगायनें करिती । इन्द्रादि दिक्पाळ ॥ ९ ॥
आपुलाल्या कांता घेऊनी । बैसले असती स्व स्व वाहनीं ।
शिवाभोंवतीं स्तविती वदनीं । शिवालागीं सर्व ॥ २१० ॥
आणिकही ऐका कोण कोण । त्यांचिया रूपासहित कीजे वर्णन ।
सूत म्हणे शौनकालागून । अवधान असों द्या ॥ ११ ॥


अग्रगं गरुडारूधं शंखचक्रग्अदाधरम् ॥ ३८ ॥
कालाम्बुदप्रतिकाशं विद्युत्कान्त्या श्रिया युतम् ।
जपन्तमेकमनसा रुद्राध्यायं जनार्दनम् ॥ ३९ ॥


अग्रभागीं गरुडवाहानीं । शंखचक्रगदापाणि ।
तो विष्णू चतुर्भुज आकर्णनयनीं । नीलकमलापरी कांति ॥ १२ ॥
रुद्राध्याय स्वमुखें गात । जो का सर्व जीवांचें पालन करीत ।
गौरलक्ष्मीसह दृष्टी पाहत । आरंभीं श्रीराम ॥ १३ ॥


पश्चाच्च्तुर्मुखं देवं ब्रह्माणं हंसवाहनम् ।
चतुर्वक्त्रैश्चरुत्वेद रुद्रसूक्तैर्महेश्वरम् ॥ ४० ॥
स्तुवन्तं भारतीयुक्तं दीर्घकूर्चं जटाधरम् ।


पाथीमागें चतुर्वदनीं । ब्रह्मदेव हंसवाहनी ।
चहूंमुखें चारी वेद वाखाणी । रुद्रसूक्तें शिवा स्तवी ॥ १४ ॥
सरस्वतीशीं समवेत । श्मश्रुसह जटाधरा स्तवित ।
ऐसा श्रीराम असे पाहत । नंदीच्या मागें ॥ १५ ॥


अथर्वशिरसा देवं स्तुवन्तं मुनिमण्डलम् ॥ ४१ ॥
गंगादितटिनीयुक्तं अम्बुधिं नीलविग्रहम् ।


सर्व मुनिराजमंडळ मिळूनी । अथर्वशिर उपनिषदेंकडॊनी ।
स्तविती उपापतीलागूनी । होऊनी सादर ॥ १६ ॥
तो उमापती आहे कैसा । सर्व नद्यांसहित सागर जैसा ।
असो ऋषिसंघ पाहिला ऐसा । श्रीरामें दृष्टी ॥ १७ ॥


श्वेताश्वतरमंत्रेण स्तुवन्तं गिरिजापतिम् ॥ ४२ ॥
अनन्तादि महानागान् कैलासगिरिसन्निभान् ।


अनंतादिमहानाग । कैलासपर्वतावरे ज्यांचे अंग ।
गिरिजापतीसी स्तविती सांग । स्व्हेताश्वतर मंत्रें ॥ १८ ॥


कैवल्योपनिषत् पाथान् मणिरत्‍नविभूषिताम् ॥ ४३ ॥
सुवर्णवेत्रहस्ताढ्यं नन्दिनम् पुरतः स्थितम् ।


मणिरत्‍नेंसीं अलंकृत । सुवर्णकाठी हातीं शोभत ।
तो नंदीगण असे पाठ करीत । कैवल्योपनिषदाचा ॥ १९ ॥
तो नंदीकेश्वरापुढें जवळा । वेत्रपाणि रामें देखिला डोळां ।
आणिकही भूतगणांचा मेळा । वेष्टून चाले ॥ २२० ॥


दक्षिणे मूशकारूढं गणेशं परवतोपमम् ॥ ४४ ॥
मयूरवाहनारूढम् उत्तरे षण्मुखं तथा ।


दक्षिणे बैसला मूषकावरुती । तो देखिला पर्वतप्राय गनपति ।
मयूरवाहनीं षण्मुख निश्चितीं । उत्तरे देखे श्रीराम ॥ २१ ॥


महाकालं च चण्डेशं पार्श्वयोर्भीषणाकृतिम् ॥ ४५ ॥
कालाग्निरुद्रं दूरस्थं ज्वलद्दावाग्निसान्निभम् ।


ज्वलदावाग्नि ऐशी अंगें । शिवसन्निध उभयभागें ।
भीषणाकृति चंडेश महाकाल दोघे । कालाग्निरुद्रा दूरी देखिलें रामें ॥ २२ ॥


त्रिपादं कुटिलाकारं नटद् भृङ्‌गिरिटिं पुरः ।
नानाविकारवदनान् कोटिशः प्रमथाधिपान् ॥ ४६ ॥


नटद् भृंगिरिटी गणविशेष । आणि नानाविकारी वदनविकास ।
ऐसे प्रमथाधिपं सावकाश । कोटिसंख्या देखिले ॥ २४ ॥


नानावाहनसंयुक्तं परितो मातृमण्डलम् ।
पंचाक्षरीजपासक्तान् सिद्धविद्याधरादिकान् ॥ ४७ ॥


नानावाहेनीं मातृका भोंवतीं । सिद्धविद्याधरादि कोटि गणती ।
पंचाक्षरी मंद्त्र सदां जपती । तेही देखिलें रामें ॥ २५ ॥


दिव्यरुद्रकगीतानि गायत्किन्नरवृन्दकम् ।
तत्र त्रैयम्बकं मंत्रं जपादिद्विजकम्बकम् ॥ ४८ ॥


दिव्य रुद्रक गीत गाती किन्नर । तेथेंचि द्विज जपती त्र्यंबक मंत ।
ऐसे हे दोन्ही थोवे देखती नेत्र । श्रीरामाचे ॥ २६ ॥


गायन्तं वीणया गीतं नृत्यन्तं नारदं दिवि ।
नृत्यतो नाट्यनृत्येन रम्भादीन् अप्सरोगणान् ॥ ४९ ॥


अंतरिक्ष उभा राहूनि नारद । नाचतसे वीणा वाजवी छंद ।
गीत गात नाना प्रबंध । म्हणे जीव आतां उद्धरती ॥ २७ ॥
नाना नृत्यकळा जाणती । हस्तसंकेत दाऊन मुखें गाती ।
ऐशा असंखय् अप्सरा नाचती । रहातसे राम ॥ २८ ॥


गायच्चित्ररथादिनां गन्धर्वाणां कदम्बकम् ॥ ५० ॥
कम्बलाश्वतरौ शंभु कर्णभूषणतां गतौ ।
गायन्तौ पन्नगौ गीतं कपालं कम्बलं तथा ॥ ५१ ॥


चित्ररथादि मिळूनि गंधर्व । कदम्ब म्हनजे तो सर्व समुदाव ।
नाना आलापें गाती अपूर्व । श्रीराम पाहता झाला ॥ २९ ॥
कंबलादि सर्व पन्नग मिळती । कित्येक कर्णीं कुण्डलापरी शोभती ।
कित्येक आनंदें नाचती गाती । शंभूचिया पुढें ॥ २३० ॥
तया पन्नगामध्यें शिरोमणी । कपाल कंबल नामाचे दोनी ।
गीत गाती देखे नयनीं । श्रीरामचम्द्र ॥ ३१ ॥


एवं देवशभां दृष्ट्वा कृतार्थो रघुनन्दनः ।


यापरी देवसभा पाहून । कृतार्थ झालो म्हणे रघुनन्दन ।
माझे मनोरथ झाले पूर्ण । करनें सफल झालें ॥ ३२ ॥
सूत म्हणे शौनकादिकांसी । सावध असा कीं कथा श्रवनासी ।
सांगितलेंचि पुन्हा अनुवादेंसी । बोलिले पाहिजे ॥ ३३ ॥
शिवसद्‍गुरु नंदीवरुतीं । बैसलासे सहितपार्वती ।
अष्टदिक्पाळही तया भॊवती । नाना स्तुति करिताती ॥ ३४ ॥
विष्णु आणि चतुरानन । षण्मुख आणि गजवदन ।
नाना नाग पन्नग भूतगण । हे सर्व मिळोनियां सभा ॥ ३५ ॥
ऐशी हे देवसभा पाहून । कृतार्थ झाला तघुनन्दन ।
कीं आतां जीव होतील पावन । शिवसद्‍गुरु प्रगटला ॥ ३६ ॥
तिम्ही म्हणाल कीं शिव रामा भेटला । येथें जीवाचा उपयोग कोण झाला ।
तरी अल्पत्वें पाहिजे अवधारिला । संकेतें बोलूं कांहीं ॥ ३७ ॥
रामें ज्या ज्या रीतीं अनिष्ठिलें । जें कायिक वाचिक मानसिक बोलिलें ।
येणें रीतीं जे संपन्न झाले ।साधन चतुष्टय ॥ ३८ ॥
तयांसी हा शिवसद्‌गुरु । प्रगट होईल होऊन साकारु ।
द्विनेत्र द्विभुरूपें श्रीगुरु । प्रबोध करावया ॥ ३९ ॥
जयाच्या बोधें सकार्य अज्ञान । संशयरहित होतसे हनन ।ऐ
क्यबोध पावे विज्ञान । जेथें भेदा उरी नाहीं ॥ २४० ॥
ऐसा सद्‍गुरु सच्छिष्यासी । भेटेल बोलिल्या न्यायार्थेसी ।
काआंहीं संशय न धरावा मानसीं । हा वरुचि शिवाचा ॥ ४१ ॥
उत्तम सद्‌गुरु मज भेतावा । ऐसा मुमुक्षु असे जो बरवा ।
तयासी भेटेल गुरु सदैवा । शिववरदें कडोनी ॥ ४२ ॥
परी पूर्वीं गुरूचा घेतला मंत्र । आणि सेवा करीतसे अहोरात्र ।
तयासी ज्ञान नसतां स्वतंत्र । त्याची गती ते काय ॥ ४३ ॥
तरी ऐका सावधान । त्रिविधा गुरूचें जो करी सेवन ।
तया गुरूसी नसतांही ज्ञान । त्या गुरूच्या देहीं शिव प्रगटे ॥ ४४ ॥
तया शिष्याचिया भावार्थ बलें । शिवरूपें तेथें गुरुत्व उफाळे ।
आपेंआपचि ज्ञान निवळें । अज्ञान जाऊनी ॥ ४५ ॥
प्रबोधरूप नंदी प्रगटे । सामान्यज्ञान ज्ञप्ति उमटे ।
विष्णुविचार अपैसा उठे । ब्रह्मदेव शब्दब्रह्म ॥ ४६ ॥
अष्टादिक्पाळ तें साधन । जें योगयुक्त अभ्यास लक्षण ।
प्रबोधावया शिष्यालागून । श्रवण मननादि प्रकार ॥ ४७ ॥
ॐकार हाचि गणपति । षण्मुक शमदमादि संपत्ति ।
आणि क गणगंधर्वादि प्रगटती । दुर्विघ्नेंनिवारावया ॥ ४८ ॥
वैराग्यरूपें तो नारद । करील नामरूपाचा छेद ।
परब्रह्मचि होईल अभेद । तेथें द्वैत कैचें ॥ ४९ ॥
मग तया गुरुपासून शिष्या अंतरीं । प्रबोधमात्रें प्रवेशती सारीं ।
तो शिवरूपाचि होय अधिकारी । निजांगें ब्रह्म ॥ २५० ॥
जीवन्मुक्ति विदेहमुक्ति । सहजस्थिति नित्यमुक्ति ।
शिवरूप होतां साधकाप्रति । न सोडिती जरी दवडिल्या ॥ ५१ ॥
ऐसा उपाय श्रीरामें रचिला । जीवसंघ आजि वाटे सोडविला ।
ऐशिया हेतू राम कृतार्थ झाला । देवसभा पाहूनी ॥ ५२ ॥


हर्षगद्‍गदया वाचा स्तुवन्देवं महेश्वरम् ॥ ५२ ॥
दिव्यानामसहस्रेण प्रणनामपुनः पुनः ।
इति श्रीपद्‍मपुराणे शिवगीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
शिवराघवसंवादे शिवप्रादुर्भावाख्यश्चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥


मग स्वमुखेंचि रघुनण्दन । दिव्य सहस्रनामें कडून ।
हर्षें गद्‍गदवाणी होऊन । पुनः पुन्हा शिव नमीं स्तवी ॥ ५३ ॥
हे शिवप्रभो करुनाकरा । अनंत जीवासी तूं एक थारा ।
जीवा न्यावया मुक्तीच्या माहेरा । प्रगट झाला अससी ॥ ५४ ॥
हें दयानिधे जीवाच्या कणवें । स्वकीय निराकारतव नाठवितां बरवें ।
सगुण साकार रूपचि धरावें । निजांगें तुवां ॥ ५५ ॥
हें शंकरा तूं पावरीपति । जेव्हां प्रगटलासी चिन्मूर्तिं ।
तेव्हांचि जीवाचे भाग्याची उन्नति । अतिशय झाली वाटे ॥ ५६ ॥
ऐसें अनंतनामें कदून । श्रीराम स्तवीतसे आपण ।
कंठीं बाष्पें आलीं दाटून । तेणें सद्‍गदवाणी ॥ ५७ ॥
नेत्रीं चालिल्या अश्रुधारा । गात्रें कांपती थरथरां ।
पुनः पुन्हा घाली नमस्कारा । वारंवार स्तवी ॥ ५८ ॥
माझी मनकामना सिद्धी गेली । जे प्रगट झाली शिवगुरु माऊली ।
धन्य तो अगस्ति जेणें दाविली । वाट जीवां मुक्तीची ॥ ५९ ॥
माझेही कश्टांचा परिहार । झाला प्रगटतां श्रीशंकर ।
धन्य धन्य माझें भाग्य थोर । ऐसा राम आनंदला ॥ ६० ॥
सूत म्हणे शौनकादिकांप्रति । पुढें कृपा करील पार्वतीपति ।
तेचि ऐका एकाग्र चित्तीं । व्यासोक्ति बोलिजे ॥ ६१ ॥
इति श्रीमद्‍वेदेश्वरी । शिवगीता पद्मपुराणांतरी ।
शिवविर्भावानुकारी । चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
श्रीसद्‍गुरुचरणारविन्दार्पणमस्तु ॥ श्रीशिवंभवतु ॥ ॐ ॥ ॐ ॥ ॐ ॥
ओवी संख्या २६१ ॥ श्लोक ५२ ॥