॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय पाचवा ॥

श्रीशिवराम गुरवे नमः ॥
जयजय शिव सनातन । जयजय शिव अनंतघन ।
जयजय शिव परिपूर्ण । सच्चिदानंद ॥ १ ॥
जयजय शिव ज्ञानघन । जयजय शिव जगज्जीवन ।
जयजय शिव आद्यंतहीन अक्षय अभंग ॥ २ ॥
जयजय शिव अमूर्ति । जयजय शिव स्वयंज्योति ।
जयजय शिव चिन्मूर्ति । भव विषग्रसन ॥ ३ ॥
जयजय शिव परब्रह्म । जयजय शिव परमधान ।
जयजय शिव सर्वआराम । त्रिपुरांतक ॥ ४ ॥
जयजय शिव मंगळ । जयजय शिव अचळ ।
जयजय शिव विमळ । कैवल्यप्रद ॥ ५ ॥
शौनक म्हणती सूताप्रति । आम्हीं ऐकिली तुझी वचनोक्ति ।
परी जेथें तेथें होतसे स्तुति । ज्या त्या देवाची ॥ ६ ॥
भागवतीं विष्णूच थोरु । शिवपुराणीं श्रीशंकरु ।
देवीभागवतीं जगदंबा सुंदरु । स्तविली असे ॥ ७ ॥
कोणी म्हणतसे गणपति । कोणी म्हणती म्हाळसापति ।
कोणी कृष्ण कोणी रघुपति । कोणी नृसिंह वामन ॥ ८ ॥
ऐसें अनंत अनंतातें भजती । तरी हा अर्थवाद दिसे आम्हांप्रति ।
यांत कोण थोर हा निश्चितीं । निर्धार नव्हे ॥ ९ ॥
सूत म्हणे प्रवृत्तीकडे पाहतां । हा अंतचि लागेना तत्त्वतां ।
आवडी ऐसे भाविती अनंता । देवोदेवी ॥ १० ॥
परी निवृत्तिपंथीं आदिगुरु । एकचि परमात्मा श्रीशंकरु ।
कारणसाक्षी निर्विकारु । सच्छिष्यासी ॥ ११ ॥
जनाचा स्वभावचि उलटा । प्रवृत्तीचा फळदाता मोठा ।
गुणवंता म्हणती गोमटा । निर्गुणी अवगुणी ॥ १२ ॥
तेवीं कार्यसाक्षी सर्वज्ञ जाणता । कारणसाक्षी त्या म्हणती नेणता ।
थोर म्हणती विकारवंता । निर्विकारी उणा ॥ १३ ॥
धनाढ्य मूर्खासी थोर म्हणती । विद्वान करंत्या अव्हेरिती ।
दूध विकारी तें सोंवळें भाविती । पाणी तें ओंवळें ॥ १४ ॥
वृक्षापासून कापूस उत्पन्न । तयासी विटाळ मानिती ब्राह्मण ।
किड्याचा गू पशूचे केश ऊर्ण । तया म्हणती निर्दोष ॥ १५ ॥
ऐसें सांगतां हे अपार । ग्रंथासि होईल विस्तार ।
परी याचा पहावा विचार । विवेकीं पुरुषें ॥ १६ ॥
नवसायास देव पावती । तया हीनजन थोर म्हणती ।
जे का संकटीं सोडविती । तयासि म्हणती मध्यम ॥ १७ ॥
जो प्रवृत्तिसंकटीं पावेना । नवसही कोनाचा पुरवीना ।
तो परमात्मा उत्तमाधिकाराविना । कळे कैसा ॥ १८ ॥
पहा पां जडत्वासि जितुकें आलें । तेंचि जनीं मोठें पूज्य झालें ।
सूक्ष्म तितुकें असोनि थोरिलें । अव्हेरिलें जनीं ॥ १९ ॥
जितुकें पृथ्वीचें करिती अर्चन । तितुकें आपाचें न करिती जन ।
तरी काजीवन भूमीहून धाकुटें झालें ॥ २० ॥
जीवन जितुकें पूज्य असे । तितुका पूज्य अग्नि नसे ।
म्हणोनि काय उणा होतसे । जीवनाहून अग्नि ॥ २१ ॥
जितुकी अग्निची असे प्रतिष्ठा । तितुका वायू पूज्य कोठें मोठा ।
परी सर्वथा नव्हे वायू धाकुटा । अग्नीपरीस ॥ २२ ॥
असो सर्वांत आकाश थोरलें । परी कवणें तरी असे पूजिलें ।
तें कवणें देखिलें ना ऐकिलें । अव्हेरिलें जनीं ॥ २३ ॥
तैसा सदाशिव कारणाचा जाणता । तयासी तमोगुणी म्हणती नेणता ।
डोळा जैसा अंधारासी पाहतां । तया आंधळा म्हणती ॥ २४ ॥
विष्ण्वादि हे कारासि जाणती । तयासि जाणतेपणें सर्वज्ञ म्हणती ।
दृश्य जे सत्यत्वें सान थोर भाविती । तया म्हणती डोळस ॥ २५ ॥
जेव्हां विष उल्बण प्रकटलें । तेव्हां विष्ण्वादि कोठें होते गेले ।
त्रिपुर जेव्हां अति मातले । ते कां वधिले नाहींत ॥ २६ ॥
साधकाचें भवरूपविष गहन । तो हा शिवगुरुचि करी ग्रसन ।
त्यावीण अज्ञान भवबंधन । तुटेना इतरां ॥ २७ ॥
देहत्रय त्रिपुर हें गहन । शिवगुरूचि करील दहन ।
हें नव्हेचि इतरांचेन । जरी थोर विष्ण्वादि ॥ २८ ॥
जरी विष्णूचि असे ज्ञानदाता । तरी राम कां शिवासी शरण जाता ।
जो का आंगेंचि विष्णु असतां । जीवा कां न सोडवी ॥ २९ ॥
हे वर्म श्रीरामचि जाणे । येरें काय जाणिजे बापुडिये अज्ञानें ।
असो जयासी स्वहित करणें । तेणे शिवगुरु सेवावा ॥ ३० ॥
अन्य देव सर्व उपेक्षून । एक सद्‌गुरूसीच जावें शरण ।
अन्य शास्त्रें सर्व उपेक्षून । एक वेदांतचि पहावा ॥ ३१ ॥
अन्य व्यापार सर्व त्यागावे । एक सद्‌विचारासी प्रवर्तावें ।
एवं गुरु शास्त्रेअविचार मीनतां स्वभावें । ज्ञानद्वारां मोक्ष ॥ ३२ ॥
यांत एक जरी उणें होतां । मोक्ष नव्हे नव्हे तत्त्वतां ।
तस्मात् एतद् विषयीं प्रवर्ता । जरी अत्यंत चाड असे ॥ ३३ ॥
हें साधक मुमुक्षा निरविलें । येरांसि हात जोडून मीन धरिलें ।
आवडें तैसें प्रवर्तोत वहिलें । आम्हां चाड नाहीं ॥ ३४ ॥
असो चतुर्थोध्याय संपतां । शिवगुरु प्रगटले सर्व देवता ।
तेणें आनंद दाटला निजदृष्टीं देखतां । श्रीरामा अत्यंत ॥ ३५ ॥
आतां शिवगुरु सर्व जीवां प्रति । ज्ञानमय होईल वरदमूर्ति ।
तेणें स्कार्य अज्ञाना निवृत्ति । सहज मुक्ति साधकां ॥ ३६ ॥
जीवाचिये हिता लागून । श्रीरामें केला असे प्रयत्‍न ।
हें एक जाणतसे उमारमण । इतर ते अन्य भाविती ॥ ३७ ॥
रामाचा मनोगत जाणून । प्रगटला नंदीवरी बैसून ।
आपुलें द्यावें पाशुपतास्त्र विज्ञान । तेणें बंधमोचन जीवाचें ॥ ३८ ॥
राम भेटीचीही अति आवडी । कांही स्वसुख बोलावें परवडी ।
यास्तव शिवासि अति तांतडी । जेवीं वसाची धेनूसी ॥ ३९ ॥
परी नंदीवरी बैसलों असतां । रामासि सान्निधान नये बैसवितां ।
यास्तव रथ असावा ऐसें कल्पितां । आविर्भाव झाला ॥ ४० ॥


सूत उवाच -
अथ प्रादुरभूत् तत्र हिरण्मय रथो महान् ।
अनेकदिव्य रत्‍नांशु किर्मीरित दिगन्तरः ॥ १ ॥


शिवाचिये इच्छेसरिसा । हिरण्मय रथ उत्पन्न हो अपैसा ।
महान् दिव्य रत्‍नाच्या प्रकाशा । दशदिशा उज्वलित ॥ ४१ ॥


नव्योपांतिक पंकाढ्य महाचक्र चतुष्टयः ।
मुक्तातोरण संयुक्तः श्वेतच्छत्रशतावृतः ॥ २ ॥


जयासी असती मोठीं चक्रें चार । कर्दम न स्पर्शेंचि अणुमात्र ।
शतावधी शोभती श्वेतछत्र । मुक्त तोरणेंशीं युक्त ॥ ४२ ॥


शुद्धहेमखलीनाढ्य तुरंगगणसंयुतः ।
मुक्तावितान विलसद् ऊर्ध्वदिव्यवृषध्वहः ॥ ३ ॥


जया रथासि घोडे चत्वार । शुद्ध सुवर्णयुक्त लगाम सुंदर ।
मुक्तमय शोभती झालर पदर । वरुतीं वृषभध्वज झळके ॥ ४३ ॥


मत्तवारणिअकायुक्तः पट्टतल्पोपशिभित ।
पारिजाततरूद्‌भूत पुष्पमालाभिरंजितः ॥ ४ ॥
मृगनाभिसमुद्‌भूत कस्तुरिमदपंकिलः ।
कर्पूरागरुधूपोत्थ गन्धाकृष्टमधुव्रतः ॥ ५ ॥
संवर्तघन घोषाढ्यो नानावाद्यसमन्वितः ।
वीणावेणुस्वनासक्त किन्नरीगणसंकुलः ॥ ६ ॥
एवं दृष्ट्वा रथश्रेष्ठं वृषादुत्तीर्य शंकरः ।
अंबया सहितस्तत्र पट्टतल्पेंविशत्तदा ॥ ७ ॥


चहूं बाजूंसी चारी हस्तिणी । पट्टयुक्त तल्पक शोभे दिव्यखाणी ।
आणीकही रथीं काय काय वचनीं । बोलूं तें ऐका ॥ ४४ ॥
पारिजात पुष्पांच्या माळा साजुक । कदां न सुकती निश्चयात्मक ।
तेणें शोभा दिसतसे अधिक । आणि सुगंध कोंदाटे ॥ ४५ ॥
मृगनाभि कस्तूरीपासून । कर्पूर धूपादि जळती तेथून ।
उन्मत्त सुगंध होतसे उत्पन्न । तेणें भ्रमरें रथ वेढिला ॥ ४६ ॥
प्रलयकालीं मेघाची गर्जना । तेंवीं वाद्यें वाजती नाना ।
सुस्वरनाद वेण्वादिवीणा । किन्नरीगण शब्दें व्याप्त ॥ ४७ ॥
साहीं श्लोकें केलें वर्णन । येणें परी तो रथ पाहून ।
उतरते झाले नंदीवरून । पार्वतीसहित शंकर ॥ ४८ ॥
दिव्य अस्तरणें त्या रथामाजीं । त्यावरी वैसले येऊन सहजीं ।
गिरजा अंकावरी नव्हे दुजी । अर्धांगचि शिवाचें ॥ ४९ ॥


नीराजनैः सुरस्त्रीणां श्वेतचामरचालनैः ।
दिव्यव्यजनपातैश्च प्रहृष्टो नीललोहितः ॥ ८ ॥
क्वणत्कंकणनिध्वानैः मंजुमंजीरसिंजितैः ।
वीणावेणुस्वनैर्गीतैः पूर्णमासीत् जगत् त्रयं ॥ ९ ॥
शुककेकिकुलारावैः श्वेतपारावतस्वनैः ।
उन्निद्रभूषाफणिनां दर्शनादेव बर्हिणः ॥ १० ॥
ननृतुर्दर्शयन्तः स्वान् चंद्रकान्कोटिसंख्यया ।
चकोरान् अनृतुस्तत्र चंद्रकांतावलोकनात् ॥ ११ ॥


सनीरांजन नागकन्या चामरें वारिती । अथवा नाना व्यजन जाणविती ।
तेणें अतिशय आनंदला चित्तीं । नीललोहितकेशी ॥ ५० ॥
वाजती कंकणाच्या ध्वनी । आणि मंजुळ सुस्वरपणीं ।
वीणा वेण्वादि नाना गायनीं । पूर्ण झाले जगत्त्रय ॥ ५१ ॥
रावे पारवे मयूर कोकिलास्वरें । जागृत चंचल झालीं फणिवरें ।
तयांच्या दर्शनेकडून मयूरें । सावध झालीं ॥ ५२ ॥
आपुली स्वकीयजाति असंख्य कोटी । पाहतां आनंद दाटला मयूरांपोटीं ।
नाचते झाले पुच्छाच्या थाटी । मस्तकावरती शोभती ॥ ५३ ॥
याचि परी चंद्र शिवमस्तकींचा । तेणें चंद्रकांतीं पाझर सुटे साचा ।
तो पाहतां आल्हाद होय चकोराचा । तेव्हां नाचों लागती ॥ ५४ ॥
यापरी रथारूढ शंकर । पाहतां आनंदला रघुवीर ।
घालिईतसे साष्टांग नमस्कार । तो शिवें दृष्टीं देखिला ॥ ५५ ॥


प्रणमन्तं ततो रामं उथाप्य वृषभध्वजः ।
आनिनाय रथं दिव्यं प्रहृष्टेनान्तरात्मना ॥ १२ ॥


नमस्कार घालितां राम देखिला । शिवें बाहु पसरून उठविला ।
तैसाचि निज रथावरी नेला । अति संतुष्ट चित्तें ॥ ५६ ॥
हा राम मी शिव नव्हेचि दोन । निजरूपें अभेद असों अभिन्न ।
जगदोद्धारास्तव मांडिला प्रयत्‍न । प्रयोजन नसतां यासी नेणें ॥ ५७ ॥
तस्मात् मी असून मज नमस्कारी । तेणें मी अति तुष्टलों त्रिपुरारी ।
ऐशिया आनंदें स्वकीय करीं । उठविलें रामा ॥ ५८ ॥
तैसाचि रथीं उचलून आणिला । आलिंगून सन्निध बैसविला ।
अद्वैत असून पूर्ण लाभ झाला । उभयां दर्शनाचा ॥ ५९ ॥


कमण्डलुजलैः स्वच्छैः स्वयमाचम्य यत्‍नतः ।
समाचम्याथ पुरतः स्वांके राममुपानयत् ॥ १३ ॥


निजकमण्डलुचे स्वच्छ जलेंकडून । स्वतां रामासि करविती आचमन ।
आचमन झालिया स्वांकीं बैसवून । जीवन तएं पाजिलें ॥ ६० ॥
चारी मास श्रम झाले रामा । यास्तव कमण्डलु जल विश्रामा ।
आचमन करवूनिया आरामा । पाववी स्वसुखा ॥ ६१ ॥
कांही नसून जो उद्‍भवला । अंतताप रामासि वातला ।
तो ताप निपटून जावयाला । जळ पाजविलें ॥ ६२ ॥
केवळ श्रीरामाचाचि ताप जावा । ऐसा भाव नसेचि शिवा ।
रामनिमित्तें सुख व्हावें जीवां । सद्‌गुरु प्रसादें ॥ ६३ ॥
नाम रूपाचा त्याग करणें । या नांव बोलिजे आचमन ।
ब्रह्म होणें तें जलपान । तेव्हां अज्ञान हरे ॥ ६४ ॥
जीवाचिया कळवळ्या करितां । श्रीरामें शीण केला तत्त्वतां ।
हें स्वमुखेंही न बोलतां । श्रीसांब जाणे अंतहेतु ॥ ६५ ॥
रामें नसतां प्रश्न केला । जेणें सुटिका होईल जीवांला ।
ऐसें अभिन्नज्ञान देता झाला । पाशुपतास्त्ररूपें ॥ ६६ ॥


अथ दिव्यं धनुस्तस्मै ददौ तूणीरमक्षयम् ।
पहा पाशुपतं नाम दिव्यमस्त्रं ददौ ततः ॥ १४ ॥


रामांतरींचा हेतू जाणून । अक्षयी भाता दिव्य धनु देई शान ।
आणिक महापाशुपत नामें दिव्यास्त्र पूर्ण । तेंही देता झाला ॥ ६७ ॥
जया सद्‌बुद्धीच्या ठायीं । लक्षबाण राहती बहु समुदायी ।
ऐसा हा भाता परिपूर्ण अक्षयी । निजकृपें देता झाला ॥ ६८ ॥
ध्येयध्यानरूप निदिध्यासन । जें त्रिपुटीरूप अनुसंधान ।
हेंचि दिव्य धनुष्य दृढ गहन । अभंग देता झाला ॥ ६९ ॥
आणिक आपुलें निज पाशुपतास्त्र । अभिन्नज्ञान जें वस्तुतंत्र ।
जेथें त्रिपुटी द्वैतभेद नसे अणुमात्र । देता झाला तेंही ॥ ७० ॥
एवं धनुष्य तेंचि अनुसंधान । सद्‍बुद्धि विचार भाता पूर्ण ।
पाशुपतास्त्र तें अभिन्नज्ञान । ऐशीं तिन्हीही दिधलीं ॥ ७१ ॥
रामाप्रति हे तीन दिधले । येथें संशय घेती कोणी वहिले ।
कीं हे रामापाशीं काय नसती पहिले । आतां नूतन दिल्हे कैसे ॥ ७२ ॥
तरी अवधारा निश्चयेंशीं । हें असेचि सर्व रामापाशीं ।
परी प्राप्त व्हावें मुमुक्षुसाधकासी । सद्‍गुरु प्रसादें ॥ ७३ ॥
राम हा निमित्त उपलक्षण । परी सच्छिष्य जे अधिकारी पूर्ण ।
तयां देत शिवसद्‍गुरु आपण । अहंकारादि निवटावया ॥ ७४ ॥
अन्य साधनें कांहींही करितां । अहंकार उणा नव्हेचि तत्त्वतां ।
अभिन्नज्ञानेंचि होतसे घाता । या हेतू शिवेंचि दिधलें ॥ ७५ ॥
तरी येथें साधकें ऐसें करावें । सद्‌बुद्धि भात्यांतील लक्ष बाणा काढावे ।
अनुसंधान धनुष्यासी योजावें । धैर्यें ठाण मांडोनि ॥ ७६ ॥
लक्ष बाणावरी पाशुपतास्त्र । जें का अभिन्नज्ञान दिव्यमंत्र ।
जपन अभेद वस्तुतंत्र । निजांगें ब्रह्म व्हावें ॥ ७७ ॥
ज्याक्षणीं निजांगें झाला ब्रअह्म । तत्क्षणीं अहंकारादि पावती उपरम ।
साधकां अक्षयीसुख निजधाम । द्वैत रहित होय ॥ ७८ ॥
येणेंचि ज्ञानें जीव सुटावे । ऐसेंचि साधकें अगत्य करावें ।
याचिलागीं दिधलें गुरुशिवें । श्रीरामालागीं ॥ ७९ ॥
हें अस्त्र देऊन रामाप्रति । माहात्म्य सांगतसे उमापति ।
तेंचि ऐकावें हो सादर श्रोतीं । यथामति बोलिजे ॥ ८० ॥


उक्तश्च तेन रामोऽपि सादरं चन्द्रमौलिना ।
जगन्नाशकरं रौद्रं उग्रमस्त्रमिदं नृप ॥ १५ ॥


चंद्रमौलि गुरुशंकरें । श्रीरामा सांगितलें आदरें ।
हें क्रूर उग्रास्त्र जया नाशील सारें । आणै नाटोपे अस्त्रज्ञा ॥ ८१ ॥
संपूर्ण जीवाचीं मनें मिळालीं । जयाचें भाळीं चंद्रत्वें शोभलीं ।
याचि हेतू नामें चंद्रमौली । मनोहर गुरु ॥ ८२ ॥
ऐशिया गुरूनें निजांगें । रामासी सांगितलें वेगें ।
कीं हें विज्ञानास्त्र नव्हे वा‍उगें । कल्पांतीही ॥ ८३ ॥
हें सुटतां बुद्धिधनुष्यापासून । कवणाचेनें नव्हे निवारण ।
सर्वही जग नामरूपात्मक दहन । तत्क्षणीं करी ॥ ८४ ॥
तेथें देहबुद्धीचा अहंकार । उरेल कोठें रावण पामर ।
सर्वां क्षय करून आपणही सत्वर । विरे चिद्‌गगनीं ॥ ८५ ॥
बहु बोलणें बापा कास्या । हें निवटील ज्ञानाभिमानिया ।
नावरेचि कदा ब्रह्मवेत्तिया । स्वरूपींच मेळवी ॥ ८६ ॥
येणेंचि अस्त्रें मी सर्व जगाचा । नाश करीतसें साचा ।
तुझा अधिकार पाहून अंतरींचा । गुप्त ठेवा तुज दिधला ॥ ८७ ॥


अतो नेदं प्रयोक्तव्यं सामान्यसमरादिके ।
अन्यन्नास्ति प्रतीधातं एतस्य भुवनत्रये ॥ १६ ॥


परी रामा अन्य संगरांत । याचे योजना करनें नव्हे युक्त ।
आचा करील कोणी प्रतिघात । ऐसा वीर नसे तिहीं लोकीं ॥ ८८ ॥
तस्मात् सामान्ययुद्ध जेथें व्हावें । तेथें या विज्ञानास्त्रा न सोडावें ।
याचें मुख्यफळ तें कदां नव्हे । अधिकारावीण ॥ ८९ ॥
विंचवावरी शस्त्र धरणें । तेफ़्वीं सामान्य्स्बुद्धीं हें शस्त्र सोडणें ।
तस्मात् पाखंडियामाजीं बोलणें । प्रसंग पडतां नको करूं ॥ ९० ॥
हें जतन जीवापैलीकडे ठेवावें । उत्तम अधिकारियालागीं द्यावें ।
मध्यमासी धानधारणा सांगावें । हें अभिन्नज्ञान न देतां ॥ ९१ ॥
हें एकदां ज्ञान झालिया । प्रतिघात करी कोण यया ।
ऐसा कोण असे भुवनत्रयीं या । देखिला ना ऐकिला ॥ ९२ ॥
देव ऋषी कीं आले पितर । आमचे ऋण असे म्हणती साचार ।
परी जयासी हें ज्ञान होय स्वतंत्र । त्यापुढें यांचें चालेना ॥ ९३ ॥
अरे म्यां सद्‌गुरूनें नरी दिधलें । साधका अंगीं दृढ बाणलें ।
तरी मजशींही न जाय हरितलें । सच्छिष्यापासोनि ॥ ९४ ॥
मग इतर कोण यासी नाशी । ऐसें दृढतर हे अविनाशी ।
निःसंशय ज्ञान जयासी । एकदां झालें ॥ ९५ ॥
परी पाखण्डी आणि अनधिकारी । तेथें निर्फळ होय निरूपणसंगरीं ।
तस्मात् न द्यावें भलतिया करीं । आतां द्यावें कोना तें सांगों ॥ ९६ ॥


तस्मात् प्राणात्यये राम प्रयोक्तव्यमुपस्थिते ।


तस्मात् निर्वाण होय प्राणांत । ऐसा समय होतां उपस्थित ।
तेधवां हें शस्त्र प्रेरीं त्वरित । कांहीं न विचारितां ॥ ९७ ॥
अनधिकारीयासि वर्जून । अधिकारीया करीं निरूपण ।
तया अधिकारियाचें लक्षण । अल्पसें बोलूं ॥ ९८ ॥
गुरुसेवेसी क्कीं निरूपणीं । प्राण वेंचिला तरी नव्हे ग्लानि ।
शूर जैसा समरांगणीं । प्राणांतधिवसा न सोडी ॥ ९९ ॥
सद्‌गुरूचें मुखांतून वचन । निघालें कीं अमुक हा करीं यत्‍न ।
तरी पाहे प्राणाचें निर्वाण । उडीच घाली ॥ १०० ॥
न व्हावयाजोगें असतां । नव्हे ऐसें कदां नुद्‍भवे चित्ता ।
प्राणचि वेंचीन गुरु‍अज्ञान होतां । ऐसा निश्चय जया ॥ १ ॥
श्रवणीं निर्धार दृढ अंतरीं | जरी ब्रह्माण्ड कोसळें शरीरीं ।
तरी निश्चळ गगनापरीं । कदां गजबजीना ॥ २ ॥
ऐसा अधिकारी असतां निरूपणीं । हें विज्ञानास्त्र द्यावें निःसंशयपणीं ।
अस्रग्राहक भेटतां समरांगणीं । तरीच अस्त्रें योजावीं ॥ ३ ॥
अथवा धरिलें जें अनुसंधान । तें कदां न सोडी यावत्काल प्राण ।
त्यासी अवश्य द्यावें हें विज्ञान । विचार न घेतां ॥ ४ ॥
अथवा प्राणांत जेव्हां उपस्थित झाला । तेव्हां उपदेश करी पिता पुत्राला ।
तैसा तूं रामा जासी निजधामाला । तेव्हां ज्ञान भूमीवरी ठेवून जावें ॥ ५ ॥
अन्यथा तूम् अनधिकारिया । हें ज्ञान देशि गा रामराया ।
तरी तो पाखण्डी होय पापिया । व्यर्थ भूमीभार ॥ ६ ॥


अन्यदैतत् प्रयुक्तं तु जगत् संख्षयकृद्‌भवेत् ॥ १७ ॥


ऐसा शूर संग्रामीं न भेततां । तूं हें शस्त्र सोडिसी अवचितां ।
तरी तें तयासी नाटोपता । जगाचा क्षय करील ॥ ७ ॥
तनुमनधनेंशी अति‍उदार । गुरुसेवेसी विकी जो शरीर ।
ऐसा नसतां वरपांगीं पामर । तयासी जरी हें देशी ॥ ८ ॥
वरीवरी रडून भाव दावी । प्रसंग पडतां युक्तीनें चुकवी ।
ऐशिया कुबुद्धिया हे ज्ञानपदवी । जरी देसी रामा ॥ ९ ॥
तरी तो पापपुण्या मिथ्या म्हणे । स्वर्गनरक असती स्थानीं कोणें ।
यथेष्टाचरण अंतःकरणें । करील पाखंडी ॥ ११० ॥
दैत्य जैसा भूमीवरी मातला । तो निष्कारण भूमीभार झाला ।
तेवींच हा पापी जन्मला । त्याचा भार न सोसी भूमी ॥ ११ ॥
आपण यथेष्टाचरण करील । आणि सर्व जनासी तेंचि शिकवील ।
तरी सर्व जन स्वहिता मुकेल । ऐसा क्षय होय जगाचा ॥ १२ ॥
हें ज्ञान पडतां ज्याचे कानपुडां । एकदां पाखंडा झाला वरपडा ।
मग जरी कल्पांत झाला रोकडा । तरी तो सहसा न सुटे ॥ १३ ॥
अगा जया ज्ञानें सहज सुटावें । त्याचि ज्ञानें बंधन दृढ व्हावें ।
हें रामा अधिकारापाशीं आघवें असें सर्व ॥ १४ ॥
तस्मात् अधिकारिया निःसंशय द्यावें । अनधिकारिया किमपि न बोलावें ।
दिव्यास्त्र अस्त्रज्ञावरी योजावें । येरां न प्रेरिजे ॥ १५ ॥
असो रामा तुज म्यां हें ज्ञान दिधलें । जीविचें गूज परी नाहीं चोरिलें ।
हें जतन करूनिया वहिलें । उत्तम अधिकारिया द्यावें ॥ १६ ॥
चिमणी जैशी चारा मुखीं धरीं । निज पिलां नेऊन घाली निर्धारीं ।
तैसेंचि हें ज्ञान सांठवून अंतरीं । श्रवनीं भरीं अधिकारियाच्या ॥ १७ ॥
या ज्ञानाची जया होईल प्राप्ति । त्यासी न इच्छितां होय गा मुक्ति ।
तेथें अहंकारादि उभ्या प्राण सांडिती । स्वात्मानुभूती प्राप्त होय ॥ १८ ॥
रामा तुझें मनोगत जें होतें । तुवा सांगितलें नसतां मातें ।
मी तें ओळखून गुह्यज्ञान तूंते । देता झालों ॥ १९ ॥
येणें निःसंशय जीव सुटती । अहंकारादि निःशेष मरती ।
आणि तुझी स्वात्मनिष्ठ अनुभूति । प्राप्त होईल तुज ॥ १२० ॥
हाचि माझा वर परिपूर्ण । जो का अधिकारी यथाविधान ।
त्यासी मी गुरु प्रगट होऊन । करीन हें ज्ञान दृढ ॥ २१ ॥
मग तो इंद्रियमनसहित । मुक्त होईल कल्पनारहित ।
अहंकारादि मरती समस्त । माझिया ज्ञानदर्शनें ॥ २२ ॥
स्वरूपाभिन्नचि होती । तया कायशी बंधमुक्ति ।
तेचि मोक्षप्रद अन्या होती । उपदेशायोग्य गुरु ॥ २३ ॥
तुज आशंका चित्तीं वाटेल । कीं इंद्रियमन केवीं होती अनुकूळ ।
तरी मी प्रसन्न असतां गुरुदयाळ । देवही आज्ञाधारक होती ॥ २४ ॥
माझी आज्ञा सर्व देव मानुनी । अनुकूळ होतील परमार्था लागूनी ।
तरी मग सर्व इंद्रियांच्या श्रेणी । मनासहित मार्गीं लागती ॥ २५ ॥
पाहे पा रामा तुझियाचि देखतां । मी आता करीतसें सर्वां देवतां ।
ते अनुकूळ होती जीवाचिया हिता । अधिकारी परमार्थिया ॥ २६ ॥
सूत म्हणे अधिकारिहो ऐका । रामकृपेनें फळला साधका ।
शिवगुरु प्रसन्न करून घेतला निका । तेणें वर दिधला जगदोद्धारा ॥ २७ ॥
सर्व देवांसी आज्ञा करीं शंकर । कीं तुम्हीही अधिकारिया द्यावा वर ।
तस्मात् जीवाचें भाग्य उदेलें थोर । आतां परमार्थ माजेल भूमीं ॥ २८ ॥
आतां श्रवणीं सादर व्हा देवांप्रति । काय बोलतसे उमापति ।
तेंचि बोलिजे यथानिगुति । कांहीं एक ॥ २९ ॥


यथाहून सुरश्रेष्ठान् लोकपालान् महेश्वरः ।
उवाच परमप्रीतः स्वं स्वमस्त्रं प्रयच्छत ॥ १८ ॥
राघवोऽयं च तैरस्त्रै रावणं निहनिष्यति ।


देवहो ऐका सुनिषित । शिव परमप्रीतीनें असे बोलत ।
आपुलालें अस्त्र द्या समस्त । राघवाप्रति ॥ १३० ॥
जया अस्त्राच्या योगेंकडूनी । राम प्रकर्षें मारील समरांगणीं ।
ससुत ससैन्य रावणालागुनी । हे आज्ञा माझी ॥ ३१ ॥
तुम्ही इंद्रियांचे दैवत । इंद्रियव्यापार तुमचेनि होत ।
परी तुम्ही स्वाधीन असा समस्त । रज‍अहंकाराचे ॥ ३२ ॥
या रीतीं कारागृहीं अडकलां । येथून सुटावें वाटे जरी तुम्हांला ।
तरी अनुकूळ होऊनिया रामाला । अहंकारानिवटावें ॥ ३३ ॥
म्हांही रावणवधाकरितां । विज्ञानास्त्र दिधलें तुम्हां देखतां ।
तेणेंचि होईल रावणाचे घाता । परी तुम्हीही असा अनुकूळ ॥ ३४ ॥
जे अधिकारी सद्‍गुरु सेवून । करू लागती श्रवण व मनन ।
तयांच्या परमार्था तुम्हीं सानुकूल होणें । हेंचि वरदान अस्त्रें द्या ॥ ३५ ॥
मी रामावरी प्रसन्न अति । अनुकूळ गुरु झालों जीवांप्रति ।
तुम्हीही साह्य असतां माझी प्रीती । वाढे अधिक ॥ ३६ ॥
राम हा प्रत्यगात्मा कूटस्थ । जीवत्वें केला आच्छादित ।
तुम्ही साह्य असतां इंद्रियदैवत । प्रगट होईल ममबोधीं ॥ ३७ ॥
माझा बोध तुमची अनुकूलता । येणें अहंकाराचे करील घाता ।
उरोंचि नेदी कार्यजाता । मम ऐक्यत्वबोधें ॥ ३८ ॥
अहंकार सकार्य जरी मरे । देवहो तुम्ही सुटाल सारे ।
जीवही ममरूपीं मिळती खरे । स्वानुभूति आत्मया भेटे ॥ ३९ ॥
तुम्ही म्हणाल कीं स्वतंत्रपणीं । अहंकारा मारूं समरांगणीं ।
तरी सावध असा माझिये वचनीं । बोलत असें जें ॥ १४० ॥


तस्मै देवैरवध्यत्वं इति दत्तो वरो मया ॥ १९ ॥


तया रावणाप्रति म्यां देवाधिदेवें । धातारूपें वर दिधले बरवे ।
देवांच्या हातें तुझा वध नव्हे । समरांगणीं ॥ ४१ ॥
अहंकार जेव्हां झाला उत्पन्न । तेव्हांचि अज्ञान याचें कारण ।
तें अज्ञान न होतां हनन । सर्वां अजिंक्य असे ॥ ४२ ॥
तें ज्ञानेवीण कदां नासेना । हा नेमूचि असे वेदीं पहाना ।
ऐशिये रीतीं यासी वरदाना । मी देता झालों ॥ ४३ ॥
तुम्ही देव परा ग्‌मुख सर्व । अधोमुखचि इंद्रियांचा स्वभाव ।
यास्तव कदांही नसे अभाव । तुम्हां हस्तें अहंकाराचा ॥ ४४ ॥
ज्ञानेंचि अज्ञानाचें हनन । अज्ञानक्षयें अहंकार पावे मरण ।
तें ज्ञान नरदेहावीण । हाही नेमचि असे ॥ ४५ ॥
तुम्ही म्हणा आम्ही स्वर्गवासी । निजांगें पावूं अभेदज्ञानासी ।
हें खरें परी लीनत्व अभिमानासी । न ये स्वर्गीं ॥ ४६ ॥
सत्यलोकादिकीं जे राहती । त्यांसी नसेचि सध्यां मुक्ति ।
येथें कल्पांतीं क्रमयोगें पावती । तो काल अभिमान न मरे ॥ ४७ ॥
यास्तव मनुष्यलोकीं अवतारावें । नरयोनीसी स्वतां पावावें ।
परमार्थालागीं साह्य व्हावें । अधिकारीयाच्या ॥ ४८ ॥


तस्माद् वानरतामेत्य भवन्तो युद्धदुर्मदाः ।
साहाय्यमस्य कुर्वन्तु तेन सुस्था भविष्यथ ॥ २० ॥


तस्मात् तुम्ही वानर होऊनी । दुर्मद असावें युद्धांगणीं ।
साह्य व्हावें श्रीरामालागुनी । तेणें तुम्हीही सुखी व्हाल ॥ ४९ ॥
स्वर्गीं अभिमान उणा नव्हे । तरी तुम्हीं मृत्युलोकीं जन्मावें ।
वानर अथवा नर व्हावें । आतांचि ये समयीं ॥ १५० ॥
तुम्ही देव होऊनी हरिकिन्नर । प्रगटा किष्किंधें व्हा रामा साह्यकर ।
किंवा इंद्रियरूपें मानवयोनि थोर । पावून आमच्या रामा साह्य व्हा ॥ ५१ ॥
बहुधा स्वतंत्र मानवचि होऊनि । परमार्थ माजवावा सर्वजनीं ।
आत्मारामासी साह्य होऊनी । अहंकारा निवटावें ॥ ५२ ॥
तुम्ही स्वतां कराल जैसें अंगें । तैसाच जनासीही मार्ग लागे ।
यास्तव विषयाचेनि अनिरागें । गुंतूंचि नका ॥ ५३ ॥
विषयलालुची किमपि न धरावी । ऐशी युद्धदुर्मदता स्वीकारावी ।
जेणें ससैनय् अहंकारादि अघवीं । धाकती अपसया ॥ ५४ ॥
ऐसें नररूप तुम्हीं अंगें व्हावें । अथवा जीव नरदेहा आले स्वभावें ।
तयाच्या परमार्थासि साह्य असावे । इंद्रियवृत्ति द्वारां ॥ ५५ ॥
नुसतें रामाचेंचि नव्हे कार्य । आणि जीवचि सुखी एकला न होय ।
तुम्ही पावाल निःसंशय । सुखरूपतेसी ॥ ५६ ॥
ऐशी शिवाज्ञा होतां क्षणीं । सर्व देवीं ते ऐकिली कर्णीं ।
मग महाप्रसाद जी जी म्हणोनि । तथास्तु वचनीं बोलती ॥ ५७ ॥


तदाज्ञां शिरसा गृह्य सुरां प्रांजलस्तथा ।
प्रणम्य चरणौ शंभोः स्वं स्वमस्त्रं ददुर्मुदा ॥ २१ ॥


देवसर्वही अंजलीपुट जोडिती । जाहील् आज्ञा ते शिरीं वंदिती ।
शंभूच्या दरणा नमस्कारून देती । स्व स्व अस्त्रें हर्षोनि ॥ ५८ ॥
पूर्वीं उद्‌भवता नाना योनीं । गो‍अश्वादि देखतां आली ग्लानी ।
पुरुषतनु पाहतांचे देवांलागुनी । अतिहर्ष झाला होता ॥ ५९ ॥
ऐशी आवडी देवां नरतनूची । तेचि आज्ञा झाली प्रभूची ।
जेवीं रोगिया आवडी शर्करेची । तया वैद्य तेचि पुडी देत ॥ १६० ॥
नर व्हावें म्हणून आज्ञा होतां । आनंद जाहला सर्वां देवतां ।
हस्त जोडोनि विनविती तत्त्वतां । आणि साष्टांग घालिती ॥ ६१ ॥
एवं नमस्कारून शिवगुरुचरणा । तथास्तु म्हणती न उल्लंघूं आज्ञा ।
आणि देते झाले अस्त्ररूपवरदाना । रामालागीं अतिहर्षें ॥ ६२ ॥
कोणते अस्त्र वरदान कोणाचें । आणि कोणतें फळ असे तयाचें ।
तेंचि ऐका श्लोकांतरीचे । अर्थातें बोलूं ॥ ६३ ॥


नारायणास्त्रं दैत्यारिः ऐंद्रमस्त्रं पुरंदरः ।


विष्णु तो सत्वगुणी आपण । नारायणास्त्र करी दान ।
पुरंदर नामें देवेंद्र जाण । ऐंद्रास्त्र देतसे ॥ ६४ ॥
अंतरिंद्रिय बहिःकरण । हा अवघाचि इंद्रियगण ।
यास्तव सर्व इंद्रियदेवता प्रसन्न । होऊनियां वर देती ॥ ६५ ॥
सर्व देवांमाजीं मुगुटमणी । तो हा चतुर्भुज चक्रपाणि ।
दैवत असे व्यापकपणीं । अंतःकरणाचें ॥ ६६ ॥
ब्रह्माकार अनुसंधान । हें अंतःकरणवृत्तीचे आधीन ।
हाचि वर देतसे नारायण । अस्त्र नाम जया ॥ ६७ ॥
अहंकारदैत्य वधाची भारी । आवडी म्हणोनि तो दैत्यारी ।
तेणें वर देतां तरती अधिकारी । लीलामात्रें ॥ ६८ ॥
अंतःकरणवृत्ति अंतरीं जागे । बाहेर गुरुसेवा घडावी अंगें ।
या हेतू इंद्रदैवत देत वेगें । पाणींद्रियाचें ॥ ६९ ॥
हस्तें सेवासंवाहन नमस्कार । हेंचि ऐंद‌अस्त्र् महातीव्र ।
येणें अभिमान वाडतांही थोर । झिजणी लागे ॥ १७० ॥


ब्रह्मापि ब्रह्मदण्डास्त्रं आग्नेयास्त्रं धनंजयः ॥ २२ ॥
याम्यं यमोऽपि मोहास्त्रं रक्षोराजस्तथा ददौ ।


ब्रह्मदण्डास्त्र ब्रअह्मा देत । आग्नेयास्त्र अग्नि अर्पित ।
मोहास्त्र देतसे निर्‌ऋत । यम तो यमनास्त्र ॥ ७१ ॥
बुद्धि‌अधीन श्रवण मनन । साधकां घडावें तें ब्रह्मदण्डास्त्र पूर्ण ।
देता झाला चतुरानन । दैवत वुद्धिचें ॥ ७२ ॥
वैखरीवीण शब्दाचा उच्चार । नव्हे यास्तव तेजस्वी अग्निअस्त्र ।
देतसे वैश्वानर । दैवत वाचेचें ॥ ७३ ॥
यमनिर्‌ऋति दैवत पायूचें । विसर्गरूप कर्म दोहींचें ।
क्षालन व्हावें अविद्या मळाचें । यास्तव याम्य मोह‌अस्त्रें देती ॥ ७४ ॥


वरुणो वारुणं प्रादाद् वायव्यास्त्रं प्रभंजनः ॥ २३ ॥
कौबेरं च कुबेरोऽपि रौद्रमीशान एव च ।


वारुणास्त्र देत वरुण । वायव्यास्त्र प्रभंजन ।
कौवेरास्त्र दे कुबेर आपण । ईशान रौद्रास्त्र देतसे ॥ ७५ ॥
जिव्हेनें गुरुतीर्थ सेवावें । आणि ब्रह्मामृताचें पान व्हावें ।
हेंचि वारुणास्त्र जिव्हेच्या देवें द्यावें वरुणें ॥ ७६ ॥
जडजात जावें वितळून । हेंचि वायव्यास्त्र दे प्रभंजन ।
जो त्वगेंद्रियाचें दैवत पूर्ण । तेणें स्पर्श नासे ॥ ७७ ॥
कुबेर तोचि अश्विनौदेव । गंधाधिप तो द्रव्याधिप स्वयमेव ।
कौवेरास्त्र देतसे अपूर्व । ब्रह्मामोदसेवन घाणें ॥ ७८ ॥
ईशान तोचि दिशाधिपति । तो दैवर होय श्रोत्राप्रति ।
तेंचि रुद्रास्त्र श्रवणप्रीति । देतसे साधकां ॥ ७९ ॥


सौरमस्त्रं ददौ सूर्यं सौम्यं सोमश्च पार्वतम् ॥ २४ ॥
विश्वेदेवा ददुस्तमै वसवो वासवाभिधम् ।


सूर्य तो देतसे सौरास्त्र । आणि सौम्यास्त्र देतसे चंद्र ।
पर्वतास्त्र देती विश्वेदेव समग्र । वासवास्त्र अष्टवसु ॥ १८० ॥
सूर्य तो चक्षूचें दैवत । ईक्षण शक्ति सौरास्त्र देत ।
ज्याच्या योगें साधक प्रवर्तक होत । शुद्ध लक्ष्यांशा ॥ ८१ ॥
सर्व हें अनिर्वाच्य समजून । सौम्यास्त्रमनें धरावें मौन ।
हें साधकां द्त चंद्र आपण । दैवत मनाचें ॥ ८२ ॥
अहंकाराचें निर्दलन व्हावें यास्तव त्याच्या दैवताचें नांव न घ्यावें ।
रुद्रें वरदानास्त्र न द्यावें । या हेतू साधकां ॥ ८३ ॥
असो इंद्रियदैवतांनीं आपुलालीं । येणें रीतीं अस्त्रें दिधली ।
या विरहित बहिर्दैवतें उरलीं । तेही वरदानें देती ॥ ८४ ॥
वैश्वेदेव देता पवनास्त्रासी । जडजात व्हावें नामरूप वृत्तीशी ।
हेंचि अस्त्र देतसे साधकांसी । अतिप्रीति करूनिया ॥ ८५ ॥
अष्टवसु वासव नामाचें । देती तेंचि कैसें ऐका साचें ।
ढीग होतांही अष्टसृष्टीचे । वितुळती स्वानुभवें ॥ ८६ ॥
सर्व देवांचें ऐसें वरदान । कीं जेणें तुटे जीवांचें बंधन ।
हें श्रीरामें पाहतां हर्षून । प्रश्न करी शिवासी ॥ ८७ ॥


अथ तुष्ट प्रणम्येशं रामो दशरथात्महः ॥ २५ ॥
प्राञ्जलिः प्रणतो भूत्वा भक्तियुक्तो व्यजिज्ञपत् ।


तेव्हां अति संतोषून श्रीशिवासी । राम नमस्कारून जोडी हस्तासी ।
भक्तियुक्त सद्‌गदित मानसीं । विज्ञापना करीतसे ॥ ८८ ॥
देवीं सर्वीं वर दिधल्यावरी । संतोषला श्रीराम अति अंतरीं ।
कीं येणें साधनें भवसागरीं । तरती साधक ॥ ८९ ॥
परे शिवाचें ऐकिलें वचन । कीं स्वर्गस्थान जिंकवे अभिमान ।
मानवदेहींच त्याचें ज्ञानें होय हनन । सद्‌गुरुप्रसादें ॥ १९० ॥
मानव तरी अति दुर्बळ । अहंकार तरी दुष्ट खळ ।
तया आधीन कामादिक सकळ । तरी तो त्या जिंकवे कैसा ॥ ९१ ॥
ऐसा हा अंतरीं हेतू ठेवून । अति नम्रत्वें विनीत होऊन ।
श्रीराम करिता झाला प्रश्न । कैसा तो सादर ऐका ॥ ९२ ॥


श्रीराम उवाच -
भगवान् मानुषेणैव नोलंघ्यो लवआणांबुधिः ॥ २६ ॥
तत्र लंकाभिधं दुर्गं दुर्जयं देवदानवैः ।


हे भगवन् मनुष्य तरी पक्षहीन । तया क्षारसमुद्राचें नव्हे उल्लंघन ।
तेथें लंकादुर्ग अतिकठीण । देवदानवांही दुर्जय ॥ ९३ ॥
षड्‍गुण‍ऐश्वर्य तूं भगवान । वर दिधला कृपाळू होऊन ।
परी मानव तरी ज्ञानविहीन । लंघिती कैसा भवसागर ॥ ९४ ॥
ऐशिया मोहार्णव सागरीं । देहरूप त्रिपुर लंकापुरी ।
ते कठीण झाली वज्रापरी । देहबुद्धि योगें ॥ ९५ ॥
देवदानवां जें अवघड । तें मानवा कसिएनि सवघड ।
ऐसें मज वाटे हें कुवाड । तें उकलावें स्वामीनें ॥ ९६ ॥
दानवांसी असुरी संपत्ती । तरी दुर्जय असो दैत्यांप्रति ।
परी देवांसी असावी सुलभ गति । दैवी संपत्तिमुळें ॥ ९७ ॥
हेंही माझें साकडें फेडावें । आणिकही कांहीं दुर्घटत्व दिसे स्वभावें ।
तेंचि कैसें कैसें ऐकावें । विज्ञापना करूंजे ॥ ९८ ॥


अनेककोट्यस्तत्र राक्षसा बलवत्तराः ॥ २७ ॥
सर्व स्वाध्यायनिरतां शिवभक्ता जितेन्द्रियाः ।


ऐशिया देहलंकापुरी जाण । कामक्रोधादि राक्षसगण ।
ते अतिबळेंशीं माजले गहन कोटिसंख्या ॥ २०० ॥
आणि क मानवीं अज्ञान वसे । यथार्थ हित कोणी जाणत नसे ।
परी म्हणती आमुचा मार्ग उत्तम असे । मोक्षासी जावया ॥ १ ॥
एक म्हणती आम्ही वेदाध्ययनी । सहजीं जाऊं भवसागर लंघूनी ।
एक ते लागले पाषाणपूजनीं । शिवभक्त म्हणवोनिया ॥ २ ॥
मनासी तरी मोकळे सोडिती । बहिरिंद्रियां निग्रहीती ।
तया मिथ्याचारें म्हणविती । जितेंद्रिय आम्ही ॥ ३ ॥
ऐशीं अनेक साधनें करिती । तेथेंचि केली अए दृढमती ।
ते कैसे श्रवणमनना प्रवर्तती । तीं साधनें फोल वातोनी ॥ ४ ॥


अनेकमायासंयुक्ता बुद्धिमन्तोऽग्निहोत्रिणः ॥ २८ ॥
कथमेकाकिना जेया मया भ्राता च संयुगे ।


बुद्धिमंत आणि अग्निहोत्रिया । अनेक प्रकारीं ठाउकी माया ।
ते कैसे जिंकावें म्यां एकाकियां । एक बंधूसहित ॥ ५ ॥
एक म्हणती आम्ही अग्निहोत्री । सर्वांसी वंद्य पवित्रापवित्रीं ।
आमुचे आचारा ऐसा त्रिजगत्रीं । आचार नाहीं ॥ ६ ॥
उंच नीच हें अवघें जग । देव मानव नरक स्वर्ग ।
हें सत्यचि मानूनि अभंग । नाना सोंगें आणिती ॥ ७ ॥
हे परमेश्वराची माया । सत्य असे कदां न जाय लया ।
कोण म्हणेल इसी वांया । मिथ्या म्हणोनि ॥ ८ ॥
हे मिथ्याचि जरी असती । तरी दृष्टीस केवीं दिसती ।
आणि संचित क्रियमाणाची गति । प्रारब्धासहित सत्य ॥ ९ ॥
स्वधर्मकर्मादि बळें त्यागिती । मायेलागीं मिथ्या बोलती ।
ते आम्ही ज्ञाते म्हणविती । मैथुन आहारही ह चुकतां ॥ २१० ॥
ऐसें ज्ञानियां हेळसिती । आपुलें करणें श्रेष्ठ भाविती ।
ते कैसे परमार्थाकडे परतती । प्रवृत्ति सांडूनी ॥ ११ ॥
कामक्रोधादि दैत्य हे अंतरीं । वरपंगा आचार हा बाहेरी ।
यासी कोण परतवी निर्धारीं । विश्वासेंवीण ॥ १२ ॥
ब्रह्मदेव जरी बोधूं आला । तरी हेळसितील हे तयाला ।
तस्मात् हित नव्हेल मानवाला । परमार्थरूप ॥ १३ ॥
आत्मदर्शनें होय मुक्ति । परी मज प्रत्यगात्मया सर्व विसरती ।
श्रवणमननादिही न करिती । मज अवलोकावया ॥ १४ ॥
मी तरी असंग निरिंद्रिय । अमनस्क एकला अद्वय ।
निरंजनवनीं राहणार काय । सामग्री असे मजपाशीं ॥ १५ ॥
ऐसा मी एकला श्रीराम । हे सर्वही भ्रमें बळावले परम ।
तरी मजसी यांसी संग्राम । होतां जिंकिजे म्यां केवीं ॥ १६ ॥
एक बंधूम् माझा सल्क्षण । वैराग्यभाग्य नामें लक्ष्मण ।
तो कामादिकांचें करील हनन । परी येणें कोठें रहावें ॥ १७ ॥
अंतःकरणादि देहांत । प्रवृत्तीकडे मिळाला संघात ।
तरी वैराग्यें रहावें कोठें त्वरित । कामादिकां जिंकावया ॥ १८ ॥
तथापि वैराग्य स्थळ मिळालें । परी विवेक नसतां असून मेलें ।
तरी हे कैसे जातील जिंकिले । वैरी सर्व ॥ १९ ॥
मी प्रत्यगात्मा निर्विकारी । प्रगटतां अहंकारासी ये मारी ।
परी प्रगट होण्याची सामग्री । मजपाशीं कोठें ॥ २२० ॥
ऐशिया जीवाचिया अनर्था । चुकवील कोण गा शिवसमर्था ।
तेवीं पुरवील माझिया मनोरथा । तुजवीण कोण ॥ २१ ॥
सूत म्हणे या रीतीं विनवणी । करुणारूप श्रीरामाची ऐकुनी ।
बोलता झाला शूलपाणि । तेंचि अवधारा सर्व ॥ २२ ॥


श्रीमहादेव उवाच -
रावणस्य वधे राम रक्षसामपि मारणे ॥ २९ ॥
विचारो न त्वया कार्यः तस्य कालोऽयमागतः ।


अगा रामा तूं रावणवधाविशीं । आणि मारावें कैसें राक्षसासी ।
हा विचारही न करीं मानसीं । त्यांचा काळचि समीप आला ॥ २३ ॥
अहंकार हा दुष्ट रावण । कामादि हा राक्षसगण ।
मरती कैसे हा विद्चार तुजलागून । सर्वथा नको मी गुरु असतां ॥ २४ ॥
तुवां जे जे प्रश्न केले असती । ते ते फेडीन मी ऐक सुमति ।
अहंकारवध अशक्य वाटे तुझें चित्तीं । तरी याचें उत्तर ऐक आधीं ॥ २५ ॥
गुरुमुखें वेदान्त श्रवण । जो अधिकारी करी समनन ।
तयाचा अहंकार पावेल मरण । आपेंआप ॥ २६ ॥
तो वेदान्त म्हणसी कैसा । सांगिजे तुजसी कांहींसा ।
अवधारावा सावध मानसा । जीवाचे हितास्तव ॥ २७ ॥
तूं राम कूटस्थ प्रत्यगात्मा । मी शिव ब्रह्म परमात्मा ।
हे भिन्नभिन्न वाटती अंतर्यामा । उपाधीमुळें ॥ २८ ॥
अविद्या असे तुजसी । माया उपाधी असे मजसी ।
ह्या दोघी भ्रमेंचि आरोपित तुशीं मशीं । स्पर्शल्याचि नाहींत ॥ २९ ॥
देहत्रय अवस्था तीन । तिन्ही गुण तिन्ही अभिमान ।
इत्यादि हें अविद्येचें लक्षण । वाच्यभाग या बोलिजे ॥ २३० ॥
ब्रह्मांडादि देहत्रय । ब्रह्मादि अभिमानी समष्टिमय ।
हें माया उपाधीचें कार्य । हेंहि वाच्य बोलिजे ॥ ३१ ॥
वाच्य उपाधीमुळे ते किंचिज्ञ । तैसाचि शबल भागास्तव मी सर्वज्ञ ।
हे दोनीही त्यामागून लक्ष्यसंज्ञ । उभयां ऐक्य होय ॥ ३२ ॥
तूं प्रत्यगात्मा मी ब्अह्म तरी अद्वय । परी टाकावें लागें तूं मी हें वाच्यद्वय ।
उभयांचे लक्ष्य अभेदनिश्चय । सदृढ असे ॥ ३३ ॥
हा वेदांतविषय इतुका असे । ब्रह्म प्रत्यगात्मया भेद नसे ।
हेंचि अभेदज्ञान तुज ओंपिलेंसे । पाशुपतास्त्ररूपें ॥ ३४ ॥
हें उत्तम अधिकारिया श्रवणीं पडे । अभिन्नज्ञानस्फूर्ति जेव्हां उजेडे ।
तेव्हांचि अहंकाराचें मडें । भस्मूनि जाय ॥ ३५ ॥
तुझा माझा भेद उपाधीनें केला । त्याक्षणींच हा अहंकार जन्मला ।
तो भेद तुटतांचि जाईल मेला । उपाधीसहित ॥ ३६ ॥
याचा विचार तुज कासया । मी शिवगुरु आलोंसे पाचि कार्या ।
उपदेश करूनि अधिकारिया । अभेदज्ञान देईन ॥ ३७ ॥
मी निर्विकार निजांगें असतां । देह धरून कैलासीं झालों राहता ।
दुसरें कार्य कोणतें सांगें गा तत्त्वतां । मजसी असे ॥ ३८ ॥
ब्रह्मा ब्रह्माण्डोत्पत्ती करीत असे । विष्णु सर्वत्रां पाळितसे ।
मजवरी संहार आरोपिती तैसे । परी मी काय करी हातें ॥ ३९ ॥
नेणीवरूप तमोगुण । करीतसे सृष्टीचें हनन ।
मजसी संबंध नसे परिपूर्ण । असें तैसा मी असें ॥ २४० ॥
तस्मात् इतुकेंचि मार्य माझें साचें । असे केवळ देह धरण्याचें ।
उपदेश करून अधिकारियाचें । बंधन तोडावें ॥ ४१ ॥
शिष्याचें देहत्रय निरसावें । यास्तव त्रिपुरांतक म्यां म्हणवावें ।
भवविषही म्यांच प्राशन करावें । जें नव्हेचि येरां ॥ ४२ ॥
जो अह्दिकारी मज आथवी । तत्क्षणींच म्यां गुरुत्वें भेटी द्यावी ।
अज्ञानभ्रांति निपटून फेडावी । अभिन्नज्ञान देऊनि ॥ ४३ ॥
पाहें पा तुवांचि मनीं धरिलें । की हे जीव सोडवूं वहिले ।
मज आठवितांच माझें रूप प्रगटलें । प्रत्यक्ष या वनीं ॥ ४४ ॥
तेवीं सत्यत्वें म्यां सुटावें । गुरुदेवा मज धांवे धांवे ।
या परी करुणा भाकितां म्यां प्रगटावें । कांहीं विलंब न करितां ॥ ४५ ॥
तेणें आठवितां मी कैलासाहूनी । धांवून येईन हें न मानी ।
मी तेथेंचि असें व्यापकपणीं । आठवितांच प्रगटे ॥ ४६ ॥
भाव मात्र असे निश्चयात्मक । तरी मी दुरी नाहीं जगन्नायक ।
भाव असला जरी मायिक । महाठक मी त्यासी ॥ ४७ ॥
देहलोभार्थ मज भजती । द्रव्यपुत्रादि मज मागती ।
अर्चन करूनी शिवभक्त म्हणविती । परी मी तुष्ट नव्हे तयां ॥ ४८ ॥
परमार्थीं म्हणून मार्ग चुकले । नानामतीं साभिमानें पडिले ।
हे कैसे जातील परतले । ऐसें पुसिलें होतें त्वां ॥ ४९ ॥
तरी याचे ऐक उत्तर । बोलिजेतें सविस्तर ।
भाविक श्रोतयांचाही आदर । येथें असावा ॥ २५० ॥


अधर्में तु प्रवृत्तास्ते देवब्राह्मणपीडने ॥ ३० ॥
तस्मादायुः क्षयं यातं तेषां श्रीरपि सुव्रत ।


हे सुव्रत ते अधर्मीं प्रवर्तती । देवब्राह्मणां पीडा करिती ।
या कारणें त्यांची आयुष्यसंपत्ति । वाउगी क्षय पावे ॥ ५१ ॥
उत्तम प्रकारें तुझें आचरण । निघालें तें अन्यथा नव्हे वचन ।
रामा तूं एकपत्‍नी एकचिबाण । यास्तव नामें सुव्रत ॥ ५२ ॥
ऐके हें गा धर्मशीळ । जे पृथ्वीवरी उद्‍भवले सकळ ।
ते म्हणविती मात्र आचारशीळ । परी हे खळ ठायींचे ॥ ५३ ॥
आम्ही धर्मजिज्ञासुही म्हणविती । परी हे अधर्माचि प्रवृत्ति ।
कळत असतांही डोळे झांकिती । कर्में करिती आंधळे ॥ ५४ ॥
सकल धर्मांमध्ये धर्म । स्वरूपीं राहणें हा स्वधर्म ।
हें नेणोनि बापुडे अधर्म । न करणें तेंचि करिती ॥ ५५ ॥
श्रवण मनन दुरीं सांडिलें । संतसंगासी विसरले ।
कामबुद्धीनें करूं लागले । आवडे तैसें ॥ ५६ ॥
विषयास्तव जारणमारण । अंतरीं कपट वरी सुंदरपण ।
जैसें जातीचें कडू वृंदावन । ते अधर्मी खळ ॥ ५७ ॥
सकामें नाना यज्ञ करिती । सकामें अनुष्ठाना वैसती ।
सकामें पुरश्चरणें आचरई । तेही अधर्मी खळ ॥ ५८ ॥
सकामें नाना व्रतें उद्यापनें । सकामें नाना तीर्थें दानें ।
सकामें नाना होमहवनें । तेही अधर्मी खळ ॥ ५९ ॥
सकामें नाना संतर्पणें । सकामें ब्रह्मचर्य इंद्रियदमनें ।
सकामें फिरती वनोपवनें । तेही अधर्मी खळ ॥ २६० ॥
सकामें आसनें माळा घालिती । सकामें भजनही आदरें करिती ।
सकामें जनास उपदेश देती । तेही अधर्मी खळ ॥ ६१ ॥
सकामें शैववैष्णव धर्म । सकामें शाक्तादि नाना अधर्म ।
सकामें दाविती शमदम । तेही अधर्मी खळ ॥ ६२ ॥
सकामें अग्नीचें पूजन । सकामें मूर्तीचें अर्चन ।
सकामें स्तवन अथवा नमन । तेही अधर्मी खळ ॥ ६३ ॥
सकामें काया कष्टविती । सकामें योगधारणा धृति ।
सकामें सत्‌सेवाही करिती । तेही अधर्मी खळ ॥ ६४ ॥
सकामें करिती गुरुसेवा । सकामें भजती भूतीं सर्वां ।
सकामें भजती देवदेबा । तेही अधर्मी खळ ॥ ६५ ॥
असो हें किती बोलावें । अधर्मीच असती अघवे ।
शास्त्रसंपन्न जरी व्हावे । तरी ते व्याप्त भ्रमें ॥ ६६ ॥
सत्यासी असत्य ऐसें भाविती । असत्यासी सत्यत्वें कल्पिती ।
हे मुख्य अधर्माची स्थिती । तरी हेंचि केलें बळकट ॥ ६७ ॥
तयासी अधर्म ऐसें म्हणतां । काय गा भीति सांगें सुव्रता ।
जयाच्या मनें वरिली द्रव्यकांता । पशुप्राय ते नर ॥ ६८ ॥
ऐसें स्वतां आपण असो निखळ । देवब्राह्मणा निंदिती चांडाळ ।
जयाचें आचरण असें निर्मळ । निष्कामी ते नावडती ॥ ६९ ॥
सत्य मिथ्या तें निवडिलें । असत्यत्यागें सत्य जीवीं धरिलें ।
ब्रह्म‌अभिन्न स्वानुबह्वें झाले । ब्रह्मविद ते ब्राह्मण ॥ २७० ॥
तेणें निष्कामपणें कर्म त्यागिलें । यथासुखें जनीं वर्तूं लागले ।
तयाची निंदा आदरिती वहिले । म्हणती हा कर्मभ्रष्ट ॥ ७१ ॥
यासी स्नानसंध्या देव नलगे । आळसें कांहींच नाचरें अंगें ।
भोजन निद्रा तरी करणें लागे । तेव्हां हा साधु कैसा ॥ ७२ ॥
त्या ब्राह्मणा या रीतीं पीडिती । नाना आघातीं सत्त्व पाहती ।
तैसेचि देवासीही निंदिती । अधर्मी खळ ॥ ७३ ॥
एका देवा वरपंगें भजावें । सवेंचि अन्यासी निंदावें ।
ते कां अधर्मी न म्हणावे । भक्तिभावही दावितां ॥ ७४ ॥
जळो तयाचें सर्व करणें । जळो तयाचे पुण्याचरण ।
जळोत त्याचे उत्तम गुण । त्या पुण्याही आग लागो ॥ ७५ ॥
तया कालत्रयीं मोक्षसंपत्ति। वरीना कदां त्या अल्पमती ।
दिवसें दिवस क्षेण होत जाती । मंगल श्री दोनी त्याची ॥ ७६ ॥
र्तेणें नरदेहासी येऊनी । व्यर्थचि कष्टविली जननी ।
त्याचें आयुष्य वृथाचि जनीं । शतवरुषेंही वांचतां ॥ ७७ ॥
नेमिले तितुके सरतां श्वास । एक अधिक न मिळे करितां सायास ।
त्रिलोक्य दिधलें जरी पालटास । तरी तो श्वास न ये मागुता ॥ ७८ ॥
ऐसें अमोल हें आयुष्य असतां । नरदेह पावून झाला गमाविता ।
कांहींच केलें नाहीं स्वहिता । तरी ते व्यर्थ कां न म्हणावें ॥ ७९ ॥
ऐसे हे पाखंडी दुर्मत । यांसी सोडवूं इच्छी तुझें चित्त ।
तरी हे दुराग्रही समस्त । कएदां परततीना ॥ २८० ॥
जयाचें अनंत जन्मीचें निष्काम सुकृत । तयाचीच ज्ञानाविशीं प्रवृत्ति होत ।
येर हे जन्मती मरती समस्त । पापपुण्य कल्पोनी ॥ ८१ ॥
तूं म्हणसी म्यां प्रतिज्ञा केली । जीवां सोडवीन जीं नरदेहा असती पावलीं ।
परी राअमा स्वतः जीं स्वहिता मुकली । त्यासी तुवां काय करावें ॥ ८२ ॥
एकांतीं जाऊन करिती घात । आपुला त्यासी कोण निवारित ।
तैसे जीव हे जन्ममृत्यु पावत । आपुलाले क्रियेनें ॥ ८३ ॥
तुवां मोक्षमार्गीं सेतु बांधिला । जीव उद्धारार्थ प्रयत्‍न केला ।
कोणी पामर न जाती त्या मार्गाला । तरी तुवां रामा काय कीजे ॥ ८४ ॥
तुवां जेधवां रचिला उपाय । तेव्हांचि तुझी प्रतिज्ञा सिद्ध होय ।
हे जीव न तरती तरी तुझे काय । गेलें रामा ॥ ८५ ॥
तस्मात् अनधिकारिया त्यागून । अधिकारियासीच फळेल तुझा यत्‍न ।
अहंकारादि मरती निपटून । ज्ञान दृढ होताः ॥ ८६ ॥


राजस्त्रीकामनासक्तं रावणं निहनिष्यसि ॥ ३१ ॥
पापासक्तो रिपुर्जेतुः सुकरः समरांगणे ।


परदारारत खळ दुर्मति । तूं मारिशील निश्चयें रावणाप्रति ।
पापियाचा जय समरगती । अति सुलभ असे ॥ ८७ ॥
मागा अनधिकारिया बोलिलें । द्रव्यदारेचे जे विकले ।
तया पाखांडियातें त्यागिलें । पाहिजे तुवां ॥ ८८ ॥
परदारा दृष्टीशी देखतां । उंचवर्णाचीही न स्मरतां ।
राजस्त्री ब्राह्मणपत्‍नी हे माता । असतां भोग इच्छी ॥ ८९ ॥
आणि मदिरापानादि पापाचरण । तेणें मोहिलें ज्याचें मन ।
ते केवीं पाहतील सुटिकारूप ज्ञान । अथवा विचार ज्ञानाचा ॥ २९० ॥
तस्मात् दुर्मतियां समस्तांतें । त्यागचि करणें हें उचित ।
अधिकारी जे गुरुभजनीं रत । तयासीच प्रतिष्ठीं ज्ञान ॥ ९१ ॥
तयाच्या अहंकाराचा करणें जय । सुतराम् तुज कठीण न होय ।
आपेंआपचि होय क्षय । ज्ञानोदय होतां ॥ ९२ ॥
विज्ञान बाणतां अभिन्नपणीं । आपेंआप अहंकाराची हानि ।
तस्मात् रिपु मारणें चर्चा समरांगणीं । अति सुगम असे ॥ ९३ ॥
अथवा अहंकारचि हा दुर्मति । ज्याची देहबुद्धि परदारेशीं अखंडरति ।
तो मारिशील तूं निश्चित । तूं आत्मा प्रगट होतां ॥ ९४ ॥
रज्जू प्रगटतां सर्प लोपे । तेवीं आत्मा प्रगटतां चिद्‍रूपें ।
अहंकार मरेल सपडपेण् । परिवारासहित ॥ ९५ ॥
कामादि मोहमदिरा प्याले । त्यांत शमदमें निर्बळत्व पावले ।
जेधवां वैराग्यादि उठती वीर भले । तेधवां छिन्नभिन्न करिती ॥ ९६ ॥
तस्मात् याचें मारणें अतिसुगम । कठीण न मानी अगा हे राम ।
अधिकारियासी बोध परम । ब्रह्मात्मैक्य ज्ञान ॥ ९७ ॥
अनधिकारी खळ पाखण्डी । म्हणितले जे ते परते सांडी ।
तयाची कोण दशा परवडी । होईल ते सांगूं ॥ ९८ ॥


अधर्मे निरतः शत्रुः भाग्येनैव हि लभ्यते ॥ ३२ ॥
अधीतदह्र्मशास्त्रोऽपि सदा वेदरतोपि वा ।
विनाशकाले संप्राप्ते धर्ममार्गाच्च्युतो भवेत् ॥ ३३ ॥


सदां अधर्माच्या ठायीं तर । शत्रुत्वें भाग्य कैसा पावत ।
जरी तो झाला वेदशास्त्र अधीत । अथवा रत धर्मकर्मीं ॥ ९९ ॥
जोवरी संचिताची उन्नती । तों काळ प्रारब्ध भोगील नराकृति ।
जेधवां विनाशकालाची होय प्राप्ति । तेधवां च्युति सर्व धर्मा ॥ ३०० ॥
आपुला निजधर्म ब्रह्मानुभव । सांडून घेतला देहबुद्धिभाव ।
करितांही वर्णाश्रमाचार त्या नांव । अधर्म निश्चयेंशीं ॥ १ ॥
ते ज्ञानियाचे सदा मत्सरी । प्रवर्तती शत्रूचीये परी ।
तयासी मोक्षसंपत्ति कैशी वरी । दुर्मिळ भाग्यहीना ॥ २ ॥
जरी वेदशास्त्री संपन्न । ब्रह्मवार्तेचे ठायीं निपुण ।
त्यासी न चुके जन्ममरण । मोक्ष कल्पांती नव्हे ॥ ३ ॥
अथवा वर्णाश्रमधर्मीं रत । स्वाहा स्वधादि कर्में आचरत ।
परी ज्ञानेवीण तें व्यर्थ जात । स्वहित नव्हे ॥ ४ ॥
मनुष्ययोनीं असे जोंवरी । नानाप्रकारें कर्में करी ।
तो देह निमतां त्या बराबरी । धर्मही च्युत होय ॥ ५ ॥
नानायोनीसी जीव पावतां । वर्णधर्माची हे नसे वार्ता ।
तरी मह्ग निजधर्म मोक्षप्रदाता । दुरिच्या दुरी राहे ॥ ६ ॥
अथवा कल्पांत जरी प्राप्त जाहला । तेव्हां नाश होय सर्व जीवांला ।
परी अज्ञान उरतां नाहीं सुटला । उत्पत्तीकाळीं जन्मे ॥ ७ ॥
ऐसे निजधर्मा जे मुकती । तयां कैची ज्ञानप्राप्ती ।
भोगिल्याच भोगिती पुनरावृत्ति । अनंत कल्पवरी ॥ ८ ॥
ऐशियासी सोडवीन जें म्हणितलें । तें सांडी येच क्षणीं वहिलें ।
अधिकारी जे उत्तम असती भले । ते उपदेशिले पाहिजेती ॥ ९ ॥
तयासी उपदेशमात्रें ज्ञान होय । स्वरूपभिन्नता पावती निःसंशय ।
त्यांचा अहंकार मरेल उपाय । दुसरा न लगे ॥ ३१० ॥


पीड्यंते देवताः सर्वाः सततं येन पापिना ।
ब्राह्मणा ऋषयश्चैव तस्य नाशः स्वयं स्थितः ॥ ३४ ॥


अति दुष्टें या पापियानें । देव ब्राह्मणासी पीडा करणें ।
ऋषि तपस्वियां पीडितां होणें । स्वतांचि नाश याचा ॥ ११ ॥
अहंकार देवासी लागला । एकही ब्राह्मण नाही सोडिला ।
ऋषि तपस्वियां घोळसी वहिला । हटकून बळें ॥ १२ ॥
ऐशी या दुष्टाची करणी । चालत आली पूर्वींपासोनी ।
पाप पुण्य मार्गीं योजी सर्वांलागूनी । तरी हा शिरोमणी पापिया ॥ १३ ॥
याचा नाश म्यां पूर्वीच योजिला । कीं हा ज्ञानेंचि पावेल अवसानाला ।
तो प्रसंग आजि उभा राहिला । तुझे माझे संवादें ॥ १४ ॥
हा संवाद अधिकारिया श्रवणीं पडे । तत्क्षणीं अहंकाराचें होय मडे ।
जयाची कृती जे तयाचि पुढे । आपेंआप उभी राहिली ॥ १५ ॥
तस्मात् हा मरे कैसा अहंकारु । हा संशयचि कांहीं नको करूं ।
मी प्रसन्न झालिया शिवसद्‌गुरु । ज्ञान प्राप्ति साधकां ॥ १६ ॥
आणिकही तुवां होतें पुशिले । कीं कामादि मत्त केवीं जातील जिंकिले ।
कारण मी एकट बंधुसहित उगले । युद्धीं जय कैसे पावूं ॥ १७ ॥
तरी अवधारीं निश्चयेशीं । सर्व मनोरथ जाती सिद्धीसी ।
वर्तणूक करीं सांगेन तैशी । तरीं जय पावसी निश्चयें ॥ १८ ॥


किष्किंधानगरे राम देवानां अंश संभवाः ।
वानरा बहवो जाता दुर्जया बलवत्तराः ॥ ३५ ॥


अगा हे रामा किष्किंधानगरीं । देवांचे अंश उद्‍भवले निर्धारीं ।
बहुत वानरें झाली बलाढ्य भारी । दुर्जय एकाहून एक ॥ १९ ॥
किष्किंधा म्हणजे योगारूढता । जया साधकाचे उद्‍भवली चित्ता ।
तेथें प्रगटल्या सर्व देवता । ममाज्ञेंकडूनी ॥ ३२० ॥
दशेंद्रियांचे दहा देव । चतुष्ट्यांचे चार स्वभाव ।
ते बलाढ्य असती स्वयमेव । रजोगुणा नाटोपती ॥ २१ ॥
माझें आज्ञेने शमदमयुक्त । जे कदां कामादिकां नावरत ।
दुर्जय असती ते समस्त । विषयरहित सर्वदां ॥ २२ ॥
मुख्य सूर्य आत्मा जगाचा । जो का दैवत असे चक्षूचा ।
तोचि सुग्रीव भाव जयाचा । सर्वांचा राजा ॥ २३ ॥
पर्मार्था मुख्यचि भावचि पाहिजे । भावार्थेंचि साधकें परपार पाविजे ।
परी त्याचा बंधु अभाव वधिजे । अस्तित्वें प्रगटुनी तुवां ॥ २४ ॥
मग तया अधीन सर्व देव । परमार्थाचें साह्य करिती सदैव ।
तेंचि बोलिजे कांहीं अभिनव । साधकें चित्तीं धरावया ॥ २५ ॥
आणिक एक तुवां मागें । पुशिले होतें रामाअंगें ।
देवांशीं परमार्थ कां न घडे वेगें । मानव तनु वांचोनी ॥ २६ ॥
तरी रामा देव हे अवयवरहित । इच्छेसारिखे मात्र व्यक्ति धरिती समस्त ।
म्हणोनि यांसी रहावया सतत । स्थळ पाहिजे ॥ २७ ॥
नरतनू ऐसें जरी स्थळ मिळे । आणि भावार्थ सुग्रीवा राज्यपद सोहळे ।
तरी मग सर्व इंद्रियदेवतागण उफाळे । परमार्थाकडे ॥ २८ ॥
यास्तव नरदेहींच ज्ञान जोडे । गुरुशास्त्रविचार तेथेंचि आतुडे ।
देहावीण परमार्थ हा न घडे । या हेतू सर्वथा देवां ॥ २९ ॥
असो आतां देव साह्य करिती । अधिकारियाचा परमार्थ बळाविती ।
तेंचि ऐकें गा रामा सुमति । कांहीं एक बोलूं ॥ ३३० ॥


साहाय्यं ते करिष्यंति तैर्बध्वा च पयोनिधिम् ।
अनेकशैलसंबद्धे सेतौ यान्तु बलिमुखां ॥ ३६ ॥


ते तुझें सर्व साहाय करिती । अनेक पर्वतें पयोनिधी बांधिती ।
तये सेतूवरून जाती निगुती । सैन्यें वानरांची ॥ ३१ ॥
पाहें पा माझीच दुसरी प्रतिमा । विवेकसखा मारुती नामा ।
तो स्वानुभूतीची शिद्धि नेमा । आणिल मोहसागर लंघूनी ॥ ३२ ॥
प्रपंचाचें सत्यत्व जे सखया । हाचि अहंकाराचा पुत्र अखया ।
निजहस्तें पाववील क्षया । आत्मानात्म निवडितां ॥ ३३ ॥
पुढें संशय हाचि जंबुमाळी । मननीं खांदी त्याची मुळी ।
आळस प्रमादादि घालील पाताळीं । प्रधान पुत्रादि ॥ ३४ ॥
हा परमार्थदळीं महाशूर । या समान नाहीं दुजा वीर ।
परी यासी मिळाला पाहिजे सहोदर । वैराग्यरूपें लक्ष्मण ॥ ३५ ॥
दोघे वीर असतां गाढे । सर्व सैन्यासी बळ चढे ।
कामक्रोधाचें होईल मडें । यां देखतां क्षणीच ॥ ३६ ॥
अभ्यास हा नळ जिमूती । तो मार्ग करील मोहसागरावरुती ।
शास्त्रार्थ संमती नाना पर्वत मीनती । तितुके तरती त्या हातें ॥ ३७ ॥
नानामतवाद साधकां बुडविती । परी अभ्यासनळाहातें तरती ।
वृत्तीचे तरंग हे सान वानर आणिती । पर्वतनिरूपण भूवरिचें ॥ ३८ ॥
ऐसा साधनसेतु मोहसागरीं । सिद्धी जाईल अभ्यासा करीं ।
शमदमादि हे वानर महा भारी । त्यावरी गर्जत चालती ॥ ३९ ॥
बहुबोलणें कासया आतां । मी शिवगुरु साधकां प्रसन्न होतां ।
लहानसा वृत्तितरंगवानर उठतां । मारीन म्हणे अहंकारा ॥ ३४० ॥
असो ऐसे तुजला देव । साह्य होतील

ओव्या ३४१ ते ३६६ असलेले एक पान गहाळ आहे

ऐसा तूं मज भेटलासी । तरी मी अतिप्रसन्न असें तुजसी ।
आपुलें निगगुरुत्व सहजत्वेंशीं । दिधलें हें घेई ॥ ६२ ॥
अहंकार ज्या क्षणीं उत्पन्न झाला । त्या क्षणींच हा बोध म्यां निर्मिला ।
शिष्याकरितांचि गुरु नाम मजला । अनादीच असे ॥ ६३ ॥
या अहंकारा तरी मीच अधिष्ठान । मजहून कांहींच नसे भिन्न ।
आणि उत्पत्ति स्थिति लय आधीन । माझियाचि असे ॥ ६४ ॥


अथवा किं बहूक्तेन मयैवात्पादितं जगत् ।
मयैव पाल्यते नित्यं मया संर्‍हीयतेऽपि च ॥ ३९ ॥


अथवा बहु कासया बोलणें । म्यांचि जग सारे उत्पन्न करणें ।
म्यांचि स्थित्इकाळीं पाळणें । शेवटीं ग्रासणें म्यांचि तया ॥ ६५ ॥
मागां हें रूपकें वर्णन केलें । तेंचि पक्षांतरे स्पष्ट यथार्थ बोलूं वहिलें ।
यास्तव शब्दासी उच्चारिलें । हें रूपक पुरे आतां ॥ ६६ ॥
अथवा भिन्नभिन्न परोक्षरीती । व्यर्थचि विस्तारें बोलिल्या असती ।
हे पुरे आतां वचनोक्ति । रहस्य ऐक सांगूं ॥ ६७ ॥
अहंकारादि देहांत जग । आणि शिष्यगुरुत्व नामाचें सोंग ।
हें सर्व मीच असे अभंग । तिहींही काळीं ॥ ६८ ॥
ऊर्णनाभीच असे एकला । स्व‍इच्छेनें तंतु निर्माळ केला ।
आणि एकटचि वरी क्रीडता झाला । शेवटीं ग्रासून एकट उरे ॥ ६९ ॥
तेवीं म्यांचि आपले इच्छेंकडून । सर्व जडचंचळ केलें निर्माण ।
स्थिति सर्वांची माझिया आधीन । शेवटीं ग्रासून मीच उरें ॥ ३७० ॥
उत्पत्तिपूर्वीं मी परिपूर्ण । निर्विकार सच्चिदानंदघन ।
तोचि मायावशें झालों सगुण साकार जगरूपें ॥ ७१ ॥
मीच ब्रह्मरूपें उत्पत्तिकर्ता । विष्णुरूपें झालों पाळिता ।
रुद्ररूपें संहारिता । भिन्नभिन्न गुणांस्तव ॥ ७२ ॥
तस्मात् अहंकारादि चंचळ । जितुकीं तत्त्वेंही सकळ ।
मीच असें परिपूर्ण केवळ । अलंकारीं सुवर्ण जेवीं ॥ ७३ ॥
आणिक पंचभूतें चारीखाणीं । पिण्डब्रह्मांडरूप दिसती लोचनीं ।
देव दानव मानव मिळूनि । स्थावर जंगमही मीचि ॥ ७४ ॥
शिष्यगुरु जीवशिव । जितुकें उद्‍भवलें रूपनांव ।
तें तें मीच असे सर्व । अस्तिभाति प्रियरूपें ॥ ७५ ॥
जीवरूपा मज झालें अज्ञान । तेव्हां अहंकारादिकीं घेतलों वेष्टून ।
ऐसा शिष्य मी होतां निर्माण । गुरुत्वेंही मी प्रगटलों ॥ ७६ ॥
ज्ञानें अज्ञान निरसिलें । भेदरूपासी अभिन्नत्व दिधलें ।
तत्क्षणींच अहंकारादि मेले । माझिया बोधासरिसे ॥ ७७ ॥
तस्मात् अहंकारादि म्यां केले उत्पन्न । मीच देहबुद्धि तोंवरीं करीं पाळण ।
प्रबोध समयीं पावती मरण । माझिया हातें ॥ ७८ ॥
मजवरी अहंकाररावणादि मातले । तेव्हां आत्मा हें रामरूप म्यां धरिलें ।
माझिया स्वानुभूती सीतेसि हरिलें । दुष्ट अहंकारें ॥ ७९ ॥
तेथें शिवगुरु मीच प्रगटून । बोधास्त्रज्ञान हें प्रयोजून ।
अहंकारादि मारिले निपटून । मी स्वानुभूती पावून सुखी झालों ॥ ३८० ॥
ऐसा हा अनादीच खेळ । होत चालिला असे सकळ ।
आजि नवा करणें लागे केवळ । ऐसें नाहीं ॥ ८१ ॥


अहमेको जगन्मृत्युः मृत्योरपि महीपते ।
ग्रसेऽहमेव सकलं जगदेतत् चराचरम् ॥ ४० ॥


मीच मृत्यु जगाचे मृत्युचा । हे महीपते जाणसी तुं साचा ।
ग्रास करितसें चराचरांचा । जग हें जितुकें ॥ ८२ ॥
चराचररूपें जग निर्मिलें । यासी संहर्ते यमादि योजिले ।
अथवा नेणिवेसी नांव ठेविलें । मृत्यु म्हणोनि ॥ ८३ ॥
उत्पन्न होऊन रहावें अमुक वेळ । सरतां नासावें त्या नांव काळ ।
ऐसा हा जगाचा मृत्यु केवळ । त्यांचाही काळ मी असे ॥ ८४ ॥
तस्मात् यम नेणीव विलंब वेळ । मजमाजी लय पावती सकळ ।
म्हणोन काळाचाही महाकाळ । आणि मीच मृत्यूचा मृत्यु ॥ ८५ ॥
तेथें अहंकारादि हे बापुडें । कैसे उरतील जडत्वें मडें ।
अज्ञानासहित ज्ञान जाऊन रोकडे । पडती माझिया मुखीं ॥ ८६ ॥


मम बक्त्रगताः सर्वे राक्षसा युद्धदुर्मदाः ।
निमित्तमात्रं त्वं भूयाः कीर्तिमाप्स्यसि संगरे ॥ ४१ ॥
इति श्रीपद्‌मपुराणे शिवगीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
शिवराघवसंवादे रामदिव्यास्त्रप्राप्तिर्नाम पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥


अतियुद्धदुर्मद जरी झाले । हे राक्षस सर्व माझ्या मुखीं पडले ।
तरि तूं निमित्तमात्र होईं वहिलें । कीर्ति पावसी संग्रामीं ॥ ८७ ॥
हे अहंकारादि राक्षस । माझिया मुखींचा असती ग्रास ।
गिळिले कांहीं गिळीन यांस । उरों नेदी सर्वथा ॥ ८८ ॥
लयकाळ हेंचि माझें मुख । जडचंचळ पापपुण्य सुखदुःख ।
गिळीत असे मी अशेख । कांहीं उरो नेदी ॥ ८९ ॥
तस्मात् रामा म्यां हे मारिले । अतिदुर्मद जेहीं सर्वां पीदिलें ।
आतां प्रेतरूपें जे असती उरले । ते तूं मारीं निरूपणयुद्धीं ॥ ३९० ॥
शिष्यभूमि हे रणांगण । तेथें अहंकारादि दुष्ट दुर्जन ।
तुवां निरूपणमिषें मांडून ठाण । अभेदज्ञान‌अस्त्र योजीं ॥ ९१ ॥
ते आपण मडीं झाले ते भस्मतीं । तूं निमित्तमात्र घेईं कीर्ति ।
कीं जीवसंघ सोडविला निश्चितिं । श्रीरामें अवतरोनी ॥ ९२ ॥
येथें तुज नाहीं गा संकट । जय पावशील तूं अवीट ।
तरी बोलिल्या रीतीं करीं प्रगट । गुरुत्व अधिकारिया ॥ ९३ ॥
येथें कोणी शंका करिती । कीं निर्विकारचि विकारलें निश्चितीं ।
तरी विकाराचे सर्व धर्म लागती । । निर्विकारासी ॥ ९४ ॥
तरी अवधारा निश्चयेंशीं । विकार झाला नाहीं सत्यत्वेशीं ।
तरी ते विकारवार्ता लागे कैशी । निज परब्रह्मीं ॥ ९५ ॥
पाणियावरीच उमटतीं । ओआणिरूपचि तरंग असती ।
परी उद्‍भव लय आणि स्थिति । तरंगाची तरंगा ॥ ९६ ॥
उद्‍भवतां पाणी नाहीं जन्मलें । राहतां पाणी नाहीं राहिलें ।
निमतां पाणी नाहीं मेलें । तैसेंचि असे ॥ ९७ ॥
तेवीं मजवरी भासलें जग । जग तेंचि माझें निजांग ।
परी जग विकाराचें सोंग । मज नाहीं स्पर्शलें ॥ ९८ ॥
जग उद्‍भवें मी उद्‍भवेंना । स्थितीकाळीं मज स्थिती असेना ।
लय होतां तरी नासेना । असें तैसा असें ॥ ९९ ॥
चराचराचा मी नाशकर्ता । ऐसें हें निरूपिलें असतां ।
येथेंही कोणी होईल शंकिता । कीं हत्त्या लागे सर्वांची ॥ ४०० ॥
तरी अवधारा एकाग्रमना । मी काय मारीतसें हातें कवणा ।
ते आपणचि पावती मरणा । स्वकीयकर्में ॥ १ ॥
अथवा म्यां स्वहस्तें जरी मारिले । तरी मज पाप नाहीं घडलें ।
हें सर्व उत्पन्न जरी केलें । तरी पुण्य नातळें ॥ २ ॥
पापपुण्या नातळें मी एक ईश्वर । ऐसें नव्हे नातळती ज्ञाते नर ।
अलिप्त मानवी ज्ञाते येर । तरी मज लिप्तता कोठोनी ॥ ३ ॥
जयाशीं सर्वत्रीं मिथ्यादृष्टि । अस्तिभातित्वें देखे सृष्टी ।
तेथें अहंतेवीण कर्तृत्वाची गोष्टी । बोलोंचि नये ॥ ४ ॥
हे मरती यांतें मी मारिता । ऐसें दृढ झालें ज्याचें चित्ता ।
तोचि पापपुण्याचा विभागी तत्त्वतां । चोरी न करितां दंड पावे ॥ ५ ॥
ज्ञानियासी जग हें सारें । स्वप्न जागरींही न दिसे खरें ।
जेवीं भिंतीवरील चित्रें । पुशितां पाप कैचें ॥ ६ ॥
ब्राह्मण गायी आदि करूनी । भिंतीशीं काढितां पुण्य कोण मानी ।
तरी पुशितां सत्यत्वें पापालागूनी । अधिकारी होय ॥ ७ ॥
तेवीं जग जरी सत्यत्वें असावें । तरी तें मरेल येणें मारावें ।
असो ज्ञात्यासीही क्रियमाण न संभवें । मज ईश्वरा कैचें ॥ ८ ॥
तस्मात् अहंकारादि देहांत । झालेंचि नाहीं हें किंचित ।
नामरूपासी कल्पिलें द्वैत । तें तरी नासत ज्ञानमात्रें ॥ ९ ॥
जागें करितां कवणा एकासी । स्वप्नसृष्टी संहारे आपैशी ।
तैसें अधिकारियां ऐक्यत्वें बोधिशी । अहंकारादि अम्रती तेव्हांचि ॥ ४१० ॥
रज्जु ज्याक्षणीं ओळखिला । तेधवांचि सर्प मरण पावला ।
ऐक्यज्ञानें जो पूर्ण बोधिला । तेथें द्वैत कदां नुरे ॥ ११ ॥
तस्मात् रामा हें उत्पन्न नाहीं झालें । झालें वाटे तें प्रेतरूप फोलें ।
हेंचि मारी प्रबोधून वहिलें । निमित्तमात्रे होईं ॥ १२ ॥
ऐशी हे शिवगुरूची वाणे ऐकतां । राम म्हणे कृतकार्य झालों आतां ।
सिद्धी गेलें सर्व मनोगता । पावावयाचें पावलों ॥ १३ ॥
यास्तव साष्टांग करी दण्डवत । सफळ झाला जी मनोगत ।
सहस्रनामेंशीं असे स्तवीत । वारंवार नमीतसे ॥ १४ ॥
सूत म्हणे शौनकादिकांसी । सावधान असा कीं कथेसी ।
राम कष्टला ज्या कारणासी । तो मनोगत सिद्ध झाला ॥ १५ ॥
केवळ रामाचा हा मनोगत । ऐसें न माना सहसा चित्तांत ।
सर्व जीवांशी मोक्ष प्राप्त होत । शिवगुरु प्रसादें ॥ १६ ॥
एवं हें रूपकेंशीं वर्णन केलें । पंचाध्यायाचें निरूपण झालें ।
ऐसें हें जया साधकांसी घडलएं । ते रामरूप होती ये देहीं ॥ १७ ॥
तस्मात् रामाचें करणें असें हितुकें । तें दृष्टांनीं करूनियां साधकें ।
अध्यात्मसाधन निश्चयात्मकें । अंगें अभासावें ॥ १८ ॥
तेंचि बोलिजेल कांहींसें । सावधान असावें दृढ मानसें ।
जेणें निरूपणें पुन्हा अनुवाद होतसे । पंचाध्यायाचा ॥ १९ ॥
राम जेवीं सूर्यवंशीं अवतरला । तैसाचि हा जीव नरदेहीं जन्मला ।
राम पित्याचि आज्ञा पाळिता झाला । तेवीं वेदाज्ञा मानावी ॥ ४२० ॥
रामें जेवीं राज्य त्यागिलें । तेवीं प्रपंचा पाहिजे नातळलें ।
रामें भरतासी राज्य समर्पिले । तेवी कीजे प्रारब्धाधीन ॥ २१ ॥
राम वनासी जैसा निघाला । तेवीआं एकांत पाहिजे सेविला ।
रामें ताटकेचा घोट भरिला । तेवी आशा हे मारावी ॥ २२ ॥
रामें केलें म्खरक्षण । तेवीं रक्षावें धर्माचरण ।
ऋषिसंघामाजी रामाचें वर्तन । तेवीं सत्संग धरावा ॥ २३ ॥
रामाची सीता रावणें हरिली । जीवाची स्वानुभूति अहंकारें नेली ।
रामें सीतावियोगाची खंती केली । तेवी असावी तळमळ ॥ २४ ॥
राम अगस्तीची करी प्रार्थना । तेफ़्वीं शरण जावें साधूजना ।
अगस्ति कथिता झाला साधना । तेवीं संतखुणा सांगती ॥ २५ ॥
रामासी साह्य असे लक्ष्मण । साधकें वैराग्याचें संरक्शण ।
रामें जेवीं केलें अनुष्ठान । तेवीं साधनचतुष्टय व्हावें ॥ २६ ॥
रामें जैसा निग्रह केला । तेवीं निश्चय पाहिजे दृढ धरिला ।
रामें स्वकीय देह कष्टविला । तेवीं कायेनें गुरुसेवा ॥ २७ ॥
राम सहस्रनामातें उच्चारी । तेवीं गुरुभजन अहोरात्रीं ।
राम शिवध्यानीं तत्पर अंतरीं । तेवीं ध्यान गुरूचें ॥ २८ ॥
कष्टांती रामा शिव भेटला । तेवीं सद्‌गुरु साधकां मिळेल वहिला ।
शिव रामासी अभय देता झाला । तेवीं गुरु अभय देती ॥ २९ ॥
शिवाच्या कृपें पाशुपतास्त्र । राम पावलासे स्वतंत्र ।
तेवीं अभेदज्ञान वस्तुतंत्र । गुरुमुखें पावावें ॥ ४३० ॥
सर्व देवीं रामा अस्त्रें दिधलीं । तेवीं इंद्रियें पाहिजेत्ति साह्य झालीं ।
रामास्तव देव वानरें जन्मलीं । तेवीं शमदमादि प्राप्ति ॥ ३१ ॥
सुग्रीव सखा झाला रामासी । तेवीं भाव असावा साधकांसी ।
रामें बाणें निवटिलें वाळीसी । तेवीं मनें वधावा अभाव ॥ ३२ ॥
सीताशुद्धी मारुती हातीं । तेवीं विवेकें ठायीं पाडावी स्वानुभूति ।
राम वानरेंशीं दक्षिणे चालती । तेवीं प्रत्यगावृत्ति साधकां ॥ ३३ ॥
रामासी बिभीषण शरण आला । तेवीं सत्वगुण पाहिजे साह्य झाला ।
रावणवधाच्या खुणा सांगेल वहिला । तेवीं साधनमार्ग दावील ॥ ३४ ॥
सेतु बांधिला नळाचे हातीं । तेवीं अभ्यासें दृढ व्हावी साधन संपत्ति ।
राम उतरला समुद्राप्रति । तेवीं मोहाचे पार जावें ॥ ३५ ॥
रामासी युद्ध करावें हे दिनरातीं । तेवीं श्रवणमननीं असावी दृढमति ।
राम उठावला त्रिकुटावरुती । तेवी देहत्रया जिंकावें ॥ ३६ ॥
हेवीं शिष्टाई केली अंगदें । तेवीं अहंकारा बोधावें संवादें ।
राम वानराच्या वर्ते छंदें । तेवीं वृत्ती असावी परमार्थीं ॥ ३७ ॥
देवांतक नरांतकादि वधावे । रेवीं अधैर्यादि उरों न द्यावें ।
अतिकाया वधिला आधीं स्वभावें । तेवीं लोभ आधी निवटावा ॥ ३८ ॥
राम कुंभकर्नाचा करी संहार । तेवीं न द्यावा तम अहंकार ।
कुंभ निकुंभ मारिले त्याचे पुत्र । तेवीं आळस प्रमाद दवडावे ॥ ३९ ॥
इंद्रजित मेला लक्ष्मणा हातीं । तेवीं वैराग्यें कामाची समाप्ती ।
त्रिशिरासी मारीतसे मारुती । तेवी क्रोधासी विवेक ॥ ४४० ॥
रावणश्कति मारील लक्ष्मणा । तेवीं वैराग्य जरी पावे अवसाना ।
मारुती आणिता झाला गिरीद्रोणा । तेवी विवेक जीववी ॥ ४४१ ॥
रामें वधिला जेवीं रावण । तेवीं रज अहंकाराचें निर्दळण ।
बिभीषणासी राज्य दे आपण । तेवीं सत्त्वगुणा प्रतिष्ठिजे ॥ ४२ ॥
रामासी सीता प्राप्त झाली । तेवीं स्वानुभूति आत्मया मीनली ।
रामासी कृतकार्यता वाटली । तेवीं साफल्यता साधकां ॥ ४३ ॥
राम पुष्पक विमानीं बैसला । तेवीं अपरोल्षारूढ साधक झाला ।
राम अयोध्येसी पावला । तेवीं अभयपदीं साधक ॥ ४४ ॥
रामाचें अवतारकृत्य संपलें । तेवीं साधकाचें साधन गळालें ।
कृतकृत्य पावावयाचें पावले । उभयतांही ॥ ४५ ॥
रामें निष्कंटक राज्य केलें । तेवीं साधकें जीवन्मुक्तिसुख भोगिलें ।
राम जेवीं निजधामाप्रति गेले । गेवीं विदेह कैवल्य साधकां ॥ ४६ ॥
ऐसी रामाची हे देहक्रिया । जगदोद्धारचि असेधिया ।
आचरेल जो साधक त्याची माया । देशधडी होय ॥ ४७ ॥
तस्मात् रामाचा जो अवतार । लोकहितार्थचि निर्धार ।
जेवीं प्रतिदिनीं भ्रमें दिनकर । लोकोपकारास्तव ॥ ४८ ॥
तो राम सीता हरिली म्हणोनी । शोक करीत हिंडे वनीं ।
प्रसन्न करूनिया शूलपाणी । रावणवध इच्छी कैसा ॥ ४९ ॥
कोठें सीता कोणें नेली । हें स्वप्नींहीं रामा न पडे भुली ।
म्हणावें सीतेप्रीत्यर्थ साधना केली । तरी रावणवध काय अशक्य ॥ ४५० ॥
रामायणरूप क्रिया वाल्मीक । भविष्य बोलिलासे निश्चयात्मक ।
तें तें संभवेलचि अवश्यक । तया प्रयत्‍न कासया ॥ ४१ ॥
पिष्टपेषणचि करावें । कीं झालें तएं पुनः संपादावें ।
साध्य तेंचि कासया साधावें । तें आधींच सिद्ध ॥ ५२ ॥
तस्मात् सीतेचें करूनि निमित्त । राम हा जगदोद्धार असे करीत ।
पाशुपतास्त्र करून घेतलें प्राप्त । शिवप्रसन्नत्वें प्रसाद ॥ ५३ ॥
ज्या अभेदज्ञानाची होतां प्राप्ति । अहंकारादि स्वयेंचि नासती ।
आत्मयाची स्वकीय अनुभूती । लब्फ़्ध होय ॥ ५४ ॥
तस्मात् रूपकेंशी जें वर्णिकें । हें युक्तचि असे जाणावें वहिलें ।
अन्यथा नव्हे नव्हे पाउलें । साक्षी श्रीगुरूचीं ॥ ५५ ॥
भस्म तेंचि पूर्ण विज्ञन । पाशुपता नाम अभेद ज्ञान ।
यासी पुसेल कोणी प्रमाण । तरी अवधारा ॥ ५६ ॥
श्रुति अनुभूति आणि युक्ति । येणें प्रमाणें बोलतां काय भीति ।
अन्यथा केवीं होईल मुक्ति । भस्म चर्चनें ॥ ५७ ॥
भस्म चर्चनेंचि मोक्ष होय । त्री ’ज्ञानादेव’ श्रुति हे वायां जाय ।
भस्में मुक्त झाला या अनुभूती काय । आणि युक्तीही नाढळे ॥ ५८ ॥
ज्ञानादेव कैवल्यप्राप्ति । ज्ञात्वादेवं सर्वपाशान् भिन्नत्ति ।
ऐशा अनंत असती श्रुति । तस्मात् ज्ञानेंचि मोक्ष ॥ ५९ ॥
आपण ब्रह्म ज्याक्षणीं कळलें । त्याक्षणीं अज्ञान सकार्य नासलें ।
हें जीवन्मुक्तिसुख प्रत्यया आलें । बहू ज्ञात्याच्या ॥ ४६० ॥
सर्प झाला होता जो अंधारीं । तो दिवा लावून ओप्ळखितां दोरी ।
नासला मेला हे युक्ति खरी । दुजा उपाय या नाहीं ॥ ६१ ॥
भस्मेंचि जरी मोक्ष झाला । तरी या तिहीं प्रतीतीसी बाध आला ।
अमुक प्रमाण असतांही भस्माला । अर्थवाद म्हणावे ॥ ६२ ॥
तैसें जें हें रूपक वर्णिकें । याशी अर्थवाद कवण बोले ।
तिहीं प्रतीतीनें घेतलें । तें अन्यथा नव्हे ॥ ६३ ॥
भस्मचि विज्ञान या प्रमाणही नसतां । बाध नसे रूपक वर्णितां ।
स्वानुभूतीसी म्हणतां सीता । तरी वांकडें काय ॥ ६४ ॥
प्रतीतीवीण अर्थ केले । सप्रमाण दशधा घेतले ।
परी तें पांडित्यचि होतसे फोलें । स्वानुभवापुढें ॥ ६५ ॥
असो तृप्ति पावावी करितां भोजन । नामजप तो कासया शीण ।
बोलिलें रूपकेंशीं जें निरूपण । येणें सुटती जीव ॥ ६६ ॥
बोलिल्या परी जे जे युक्ति । आचरतील जीव स्वानुभव प्रतीती ।
ते रामचि निजांगें होती । सुख भोगिती मुक्तीचें ॥ ६७ ॥
ऐसें पंचमाध्यायाचें निरूपण । याचि नांवें अध्यात्म रामायण ।
अध्यात्म म्हणजे आपुलें कथन । आत्मरूपाचें ॥ ६८ ॥
राम कोणी एक अवतरला । तेणें समुद्र उल्लंघून रावण मारिला ।
ऐशिया परोक्षज्ञानाला । अध्यात्म न मानिती संत ॥ ६९ ॥
आपणचि राम निजांगें व्हावें । अहंकारा वधून स्वानुभूतीस आणावें ।
याचि नांवें अध्यात्म बोलावें । हें ठावें ज्ञानियां ॥ ४७० ॥
असो येरांशीं आम्हां नाही चाड । शब्दशास्त्राची नसे भीड ।
या बोबडिया बोलाचें कोड । संतसद्‍गुरूसी ॥ ७१ ॥
अथवा साधक मुमुक्षु भले । जे परमार्थ मार्गासी लागले ।
तेचि या अवलोकिती उगले । विश्वास ठेवूनी ॥ ७२ ॥
शिवेंचि आपण वर दिधला । जो का गुरुपदीं विश्वासला ।
तोचि ज्ञानद्वारां पावे मोक्षाला । येथें संशयो नाहीं ॥ ७३ ॥
असो पंचाध्यायाचें निरूपण । रूपकेंशींच असे हें कथन ।
हेंचि अध्यात्म रामायण । श्रवण करिती साधक ॥ ७४ ॥
रामें केलें साधकांकरितां । साधक करील जो रामचरिता ।
तो रामचि असे संशयापरता । शिवगुरुप्रसादें ॥ ४७५ ॥
इति श्रीमद्‌वेदेश्वरी । शिवगीता पद्‍मपुराणांतरीं ।
शिवराघव संवादानुकारी । पंचमोध्यायः ॥ ५ ॥
श्रीसद्‍गुरुचरणारविन्दार्पणमस्तु ॥ श्रीशिवंभवतु ॥ ॐ ॥ ॐ ॥ ॐ ॥