॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय तिसरा ॥

श्रीशिवराम गुरुवे नमः ॥
शौनकांदिकां म्हणे सूत । द्वितीयोऽध्याय जेव्हां संपत ।
तेव्हां श्रीराम प्रश्न करीत । जीवाच्या उपाया ॥ १ ॥
आतां अगस्ती उत्तर कोपोनी । देता होय रामा लागूनी ।
तुवां जीवाचें हित धरिलें मनीं । परी तें तया रुचे कैसें ॥ २ ॥


अगस्ति उवाच -
न गृण्हाति वचः पथ्यं कामक्रोधादिपीडितः ।
हितां न रोच्यते तस्य मुमूर्षोरिव भेषजम् ॥ १ ॥


काम क्रोध पीडित ज्याचें चित्त । हित परी तयासी न रुच्यत ।
सत्यचि वचन ग्रहण न होत । मरणारा औषध जेवीं ॥ ३ ॥
ज्या क्षणीं विरक्ति उपजे । त्या क्षणीं संचारा जाइजे ।
हें हितकर वचन ऐसें जें । जीवा गोड न लागे ॥ ४ ॥
प्रजार्थ ऋतुकाळीं गमन । पुत्र झालिया स्त्री माते समान ।
हें हितकर काय नव्हे वचन । परी ग्रहण कोण करी ॥ ५ ॥
जन्मतांचि इच्छा कामाची । मरणवरी न सोडिती साची ।
काम प्रतिबंधें उत्पत्ति क्रोधाची । तेथून मोहादिक होती ॥ ६ ॥
ऐसें काम क्रोधें जे पीडिलें । तेंही हितकर वचन त्यागिलें ।
यथेच्छ प्रवृत्ती प्रवाहीं पडिले । येथें उपाय काय येरांचा ॥ ७ ॥
मुमूर्षु मरावया लागला । औषधचि न घेववे तयाला ।
तरी नव जाय वांचविला । वैद्याचेनीही ॥ ८ ॥
अथवा तुजसी आम्हीं सांगितलें । कीं सख्यत्वें कांहीं नाहीं झालें ।
हें त्यागून त्वां रवावें उगलें । तें तुजसीही मानेना ॥ ९ ॥
नसतां सर्प मानूनी मरती । तेवीं कल्पनेस्तव जन्म सोसिती ।
तरी हें सोडून रहावें रघुपति । हें हितकर नव्हे काय वचन ॥ १० ॥
तुवां इच्छा जे धरिली मनीं । ते त्यागून राहशी जरी समाधानी ।
तरी सुखचि होय सुखदुःख त्यागुनी । परी तुजसी हें मानेना ॥ ११ ॥
विवेकीं असोन तुज न मानें । तरी ग्रहण केवीं कीजे जीवानें ।
ग्रहण न करितां सत्यवचनें । तरी सुटती कैसे ॥ १२ ॥
पाहें पाहें अति दुर्घट । नुल्लंघवेचि अज्ञान घाट ।
तो दुःसंपाद्य अति स्पष्ट । बोलेन अवधारीं ॥ १३ ॥


मध्येसमुद्रं या नीता सीता दैत्येन मायिना ।
आयास्यति नरश्रेष्ठ सा कथं तव संनिधिम् ॥ २ ॥


समुद्राचियेमध्यें नेली । सीता मायिक दैत्यें वेष्टून घेतली ।
ते तुझा सन्निध कैशी येईल वहिली । सांगे नरश्रेष्ठा ॥ १४ ॥
अज्ञन हा भवसागर । अंतचि नाहीं पर कीं अवर ।
त्यामध्यें देहलंकापूर । त्रिकुटाचल देहत्रयरूपें ॥ १५ ॥
आत्मनिष्ठ अपरोक्षानुभूति । पडली अहंकाररावणाहातीं ।
नेऊन बळाविली देहमति । तिहीं अवस्थेसी ॥ १६ ॥
अतिशय शोकीं अशोकवनीं । काम क्रोधादि असुरीं घेतलीं वेष्टूनी ।
परी शांतवृत्ति त्रिजटा कामिनी । तिच्या संगतीनें वांचली ॥ १७ ॥
आधींच दुर्धर सागर । जेथें मार्गचि नसे अणुमात्र ।
तेथें विवेकसंपन्न जे नर । न जाती कदां ॥ १८ ॥
नरश्रेष्ठ म्हणजे उत्तमपुरुष । जो क्षराक्षराहून भव विशेष ।
ऐसा तूं राम निर्दोष । सांग ते स्वानुभूती ये कैशी ॥ १९ ॥
अज्ञान सागरीं कोणें जावें । कामक्रोधादि कैसें वधावें ।
तुझिया सन्निध घेऊन यावें । स्वानुभूतीसी कैसें ॥ २० ॥
कामादि मायावी अत्यम्त । व्यक्ती नसतां उगेचि भासत ।
अहंकाराच्या बळें उन्मत्त । अनावर असती ॥ २१ ॥
आणिईक ऐके तयाची संपत्ति । बोलिजे ते यथामति ।
तो अहंकार रावण त्रिजगतीं । अजिंक्य असे ॥ २२ ॥


बध्यंते देवताः सर्वा द्वारि मर्कटयूथवत् ।
किं च चामरधारिण्यो यस्य संति सुरांगनाः ॥ ३ ॥


सर्व देवता मर्कटा परी । बांधिल्या असती थोवे द्वारीं ।
सुरांगना चामरें घेऊनि करीं । सदा वारिती जयासी ॥ २३ ॥
इंद्रादि हे इंद्रियदेवता । अहंकाराधीन असती समस्तां ।
जिकडे धांवे अहं ममता । तिकडे जाणें मर्कटापरी ॥ २४ ॥
श्रोत्रादि द्वारीं बांधोन घातलें । स्वतां जाईन म्हणतां असते अडकले ।
ऐसे देव कारागृहीं पडले । अहंकाररावणाच्या ॥ २५ ॥
आणि कामनादिकांच्या वृत्ति । अथवा इंद्रियांच्या क्रियाशक्ति ।
ह्याचि सुरांगना चामरें वारिती । जया अहंकारा वरी ॥ २६ ॥
तया वीण वृत्तीसी राहणेंन घडे । हींच चामरें वारिती कोडे ।
आणिकही राज्यभोग उघडे । तयाचे कैसे ते ऐकें ॥ २७ ॥


भुंक्ते त्रिलोकीमखिलां यः शंभुवरदर्पितः ।
निष्कण्टकं तस्य जयः कथं तव भविष्यति ॥ ४ ॥


शंभूच्या वरदर्पें मातला । त्रैलोक्य संपत्ति भोगिता झाला ।
त्या पासून जय कैसा तुजला । निष्कंटक होय ॥ २८ ॥
रुद्रवरें अहंकारदर्पित । म्हणजे रुद्रचि याचे अधिदैवत ।
त्या वरें हा मातला अत्यंत । कांपती इंद्रियदेव ॥ २९ ॥
इंद्रियांचे जे विषयभोग । आपणचि भोगितसे आंग ।
अथवा पाताळ मृत्युलोक स्वर्ग । तिहीं स्थळीं एकलाचि ॥ ३० ॥
दैव दैत्य राक्षस मानव । पशु पक्षी आणि गंधर्व ।
जंगम मात्र जितुका जीव् । अहंकारें नाहीं सोडिला ॥ ३१ ॥
बहु कासया बोलावें । येणें वृक्षादि व्यापिले आघवे ।
नेणिवेंत गोविले सर्वे । मूढत्व अभिमानें ॥ ३२ ॥
त्या पासून तूं जय इच्छिसी । तरी सांग बापा कैसा पावसी ।
निर्वैरपणें सुख भोगिसी । हा भरंवसा मज नाहीं ॥ ३३ ॥


इंद्रजिन्नाम पुत्रो यः तस्यास्ति ईश्वरोद्धतः ।
तस्यास्ते संगरे देवा बहुवारं पलायिताः ॥ ५ ॥


इंद्रजित नामें पुत्र त्याचा । ईश वरें वाढलासे साचा ।
त्याचे संग्रामीं बहुवार देवांचा । पराभव झाला ॥ ३४ ॥
रावण हा रज अहंकार । त्रिपुरींचें राज्य करी निर्वैर ।
इंद्रिजिन्नानें काम त्याचा प्त्र । अति विख्यात असे ॥ ३५ ॥
शिवें काम जेव्हां जाळिला । तोचि वर देऊनि सर्व देहीं ठेविला ।
तेणें वरें अत्यंत मातला । नावरे कोणा ॥ ३६ ॥
इंद्र देव पाणींद्रियाचा । हाचि राजा सर्व देवांचा ।
परी तो स्वाधीन असे कामाच्या । ग्रहण दान व्यापारीं ॥ ३७ ॥
ऐसा इंद्र जेणें जिंकिला । यास्तव इंद्रिजित नाम पावला ।
हाचि काम सदां भुकेला । बहु खाताअंही तृप्त नसे ॥ ३८ ॥
प्रेमभावादि सत्त्वात्मक देव । या कामापुढें मशक सर्व ।
बहुवार पावले पराभव । संग्रामीं ज्याचे ॥ ३९ ॥
आणिक त्या रजाहंकाराचे । बंधु दोघे असती साचे ।
कांहीं एक समर्थ्य तयांचें बोलोन जाऊण् ॥ ४० ॥


कुंभकर्णाव्हयो भ्राता यस्यास्ति सुरसूदनः ।
अन्यो दिव्यास्त्रसंयुक्त्ः चिरजीवी बिभीषणः ॥ ६ ॥


त्याचा धाकटा भाऊ कुंभकर्ण । तोही देवांचें करी निर्दळन ।
आणि त्याहून सान बिभीषण । तो ही संपन्न दिव्यास्त्रीं ॥ ४१ ॥
कुंभकर्ण तो तमअहंकार । तया पाहिजे निद्रा आहार ।
आणि नेणेचि कांहीं प्रकार । वृथा आयुष्य मात्र घालवी ॥ ४२ ॥
आलस्य निद्रा प्रमाद । याविरहित नसे छंद ।
परी करावया येती युद्धसंवाद । तया देवांही नाटोपे ॥ ४३ ॥
कोणी प्रवर्ततां श्रवण मननीं । धांवे आळस निद्रेचें मुख पसरूनी ।
सत्वादि इंद्रियवृत्तींसी ग्रासूनी । ढेंकरूं देतसे ॥ ४४ ॥
सत्वअहंकार बिभीषण । अज्ञानास्तव नाम भीषण ।
हा साह्य होय परमार्था लागून । परी तो वचनीं गोंवावा ॥ ४५ ॥
शमदमादि श्रवण मनन । या दिव्यास्त्रें असे तो संपन्न ।
हा साह्यमात्र व्हावा मुमुक्षु लागून । विचार द्वारां ॥ ४६ ॥
हा साह्य जरी नसतां । रज तम गुणाचे नव्हेचि घाता ।
हें असो दुर्जयत्व ऐकें आतां । दिढा श्लोकीं ॥ ४७ ॥


दुर्गं यस्यास्ति लंकाख्यं दुर्जेयं दैवदानवैः ।
चतुरंगबलं यस्य वर्तते कोटिसंख्यया ॥ ७ ॥
एकाकिना त्वया जेयः स कथं रघुनंदन ॥ ८.१ ॥


जयाचे दुर्गपुरी नामे लंका । ते दुर्जय देवदानवादिकां ।
कोटि संख्या चतुरंग कटका । असे पाहे जयापाशी ॥ ४८ ॥
सप्तावरणें जयेचे दुर्ग । ते मनोवृत्तीसी असे अभंग ।
तेथें देव दानव पावती भंग । सत्त्वतमाचे भाव ॥ ४९ ॥
ऐशिया देहलंकापुरीं राहूनी । अहंकार भोगी विषयालागुनी ।
जागृति स्वप्न सुषुप्तिस्थानीं । क्रीडे एकला ॥ ५० ॥
जागृती ये वहिर्भूवनीं । क्रीडतसे पंचविषयांलागूनी ।
तेथें नाम पावे विश्वाभिमानी । मी माझें म्हणतसे ॥ ५१ ॥
तोचि स्वप्नामाजीं मध्यस्थानीं । क्रीडतसे भासविषयां लागूनी ।
तेथें नाम पावे तैजसअभिमानी । कर्तृत्व भोक्तृत्व धरी ॥ ५२ ॥
तोचि सुषुप्तिंअंतर्भुवनीं । भोगी आनंदभोगा लागुनी ।
तेथें नाम पावे प्राज्ञाभिमानी । नेणीवरूपें ॥ ५३ ॥
मनाच्या वृत्ति इंद्रियव्यापार । कामादि वृत्ति वर्णादि प्रकार ।
या इतुक्यांसी एक अहंकार । वर्तवी सामर्थ्यें ॥ ५४ ॥
मनादिकांच्या वृत्ति हेचि रथी । कामादिक हेचि गजपति ।
इंद्रिय हे असती हयपति । पदाति वर्णधर्मादि ॥ ५५ ॥
ऐशी हे चतुरंग सेना । साह्य असे अहंकाररावणा ।
या सेनेची कोण करी गणना । अमुक कोटी म्हणोनी ॥ ५६ ॥
ऐसा बलाढ्य झला जो अति । अहंकाररावण देह लंकापति ।
तेथें जीवमात्र तृणप्राय होती । देव मान दानवादि ॥ ५७ ॥
ऐसें असतां तूं एकला । तो ससैन्य बलाढ्य उन्मत्त झाला ।
तरी सांग नृपनंदना तुज जिंकिला । जाय कैसेनी ॥ ५८ ॥
तूं प्रत्यगात्मा आत्माराम । तुरीयवृत्तिअरण्य तुझें धाम ।
स्वसुखजटा बांधोनि परम । गोसावी झालासी ॥ ५९ ॥
तुझी देहद्वयरूप जे सेना । ते साह्य झाली अहंकाररावणा ।
तस्मात् तूं एकाकी आणी मना । जिंकिसी कैसा ॥ ६० ॥


आकांक्षते करे धर्तुं बालश्चंद्रमसं यथा ॥ ८ ॥
तया त्वं काममोहेन जयं तस्याभिवांच्छसि ॥


बाळ जेंवी चंद्र धरूं पाहे । तैसाचि तूं कामाचेनि मोहें ।
वांछित अससी जय मी लाहें । त्या बलाढ्यापासूनी ॥ ६१ ॥
या जीवासी मी सोडवीन । हा काममोह झाला तुजलागून ।
तेणें ज्ञानदृष्टीस पडलें आच्छादन । स्वानुभूती वियोगें ॥ ६२ ॥
घटीं चंद्राचें बिंब पडलें । बाळ त्या धरावया धांविलें ।
तेवींच तुवां करूं आरंभिलें । जीवत्व खरें नसतांचि ॥ ६३ ॥
वृत्तिमाजीं जो प्रतिभास । तो नसून दिसे चिदाभास ।
त्या काढोन घेतला सोस । त्या बाळापरी ॥ ६४ ॥
तया आभासाचे तरंग । अहंकारादि देहांत सोंग ।
जिंकुं पाहसी तूं त्या असंग । हेंचि आश्चर्य वाटतें ॥ ६५ ॥
तस्मात् रामा तूं एक करी । सर्व आकांक्षा सांडोनि दूरीं ।
स्वसुखेंचि राहें निर्द्धारीं । आमुच्या वचना मान देईं ॥ ६६ ॥
ऐसें अगस्तीचें वचन ऐकतां । श्रीराम कोपून झाला बोलता ।
सूत म्हणे जीवाचिया हिता । ऐका कैसा ॥ ६७ ॥


श्रीराम उवाच -
क्षत्रियोऽहं मुनिश्रेष्ठ भार्या मे राक्षसा हृता ॥ ९ ॥
यदि ते न निहन्म्याशु जीवने मेऽस्ति किं फलम् ॥


हे मुनिश्रेष्ठा मी क्षत्रिय असे । माझी भार्या हरिली ज्या राक्षसें ।
जरी त्या न मारितां राहतां नसे । वांचून फळ कांहीं ॥ ६८ ॥
मुनिश्रेष्ठा तूं ब्रह्मवेत्ता । ब्राह्मण अज्ञानसागराचें पानकर्ता ।
आतापि संशयउदरा आतौता । भस्मचि केला ॥ ६९ ॥
ऐक्यबोधें वृत्तीसी ग्रासूनी । सुखें राहिला निरंजनवनीं ।
हें योग्य असे तुजलागूनी । दुर्बळ ब्राह्मणा ॥ ७० ॥
परी मी क्षत्रिय असें महावीर । नित्यमुक्त सर्वज्ञ ईश्वर ।
जीवरक्षणा धरिला अवतार । हें काय तूं नेणसी ॥ ७१ ॥
जरी म्हणसी मी अभिमान घेतां । जीवा ऐशी होय बद्धता ।
तरी पाहे माझी नित्यमुक्तता । अकृत्रिम असे ॥ ७२ ॥
म्यां पाप पुण्यात्मक जें जें केलें । तें मज कदांही नाहीं स्पर्शलें ।
जळाम्त असोनि कमळपत्र नसे ओलें । कवणेंही काळीं ॥ ७३ ॥
ऐसा अलिप्त सर्वज्ञ असोनी । माझी स्वानुभूती नेली हरूनी ।
तया अहंकारराक्षसा न वधूनी । जीवा जरी न सोडवी ॥ ७४ ॥
तरी म्यां अवतार घेऊनी । व्यर्थचि कष्टविली जननी ।
वांचुन मुख दाखवूं नयनीं । तिहीं लोकां कैसें ॥ ७५ ॥
आणि देवता ज्या बंदीं पडिल्या । त्या कैशा जातील सोडविल्या ।
श्रुति-स्मृति ब्रीद ज्या बोलिल्या । तें निष्फळ होईल कीं ॥ ७६ ॥
तुम्हीं दुर्घटत्व जें बोलिलें । तें अशक्य मज नाहीं वाटलें ।
तें तें सर्व पाहिजे कैकिलें । त्याची योजना कैशी ॥ ७७ ॥
वाट नसतां अज्ञानसागरीं । अभ्यासनळाचिये करीं ।
साधनसेतु बांधवीन निर्धारीं । शमदमसेना चालावया ॥ ७८ ॥
मज एकट अससी म्हणितलें तुम्ही । तैं सावध ऐकावें अंतर्यामीं ।
मनोवृत्ति आणि इंद्रियऊर्मि । साह्य करीन आपणा ॥ ७९ ॥
अभाववाळीशी मारून । भवसुग्रीवा राज्य देईन ।
त्या हातें सेना मेळवीन । शमदमादि वानर ॥ ८० ॥
विवेकप्रिय सखा मारुति । माझी प्रिय भार्या जे स्वानुभूती ।
तिची शुद्धी तयाचे हातीं । आणवीन क्षणार्धें ॥ ८१ ॥
अति कठीण जें लंकादुर्ग । शमदमादि हे वानर अभंग ।
क्षणमात्रें पावविती भंग । अति आवेशें करोनि ॥ ८२ ॥
सत्वगुण जो बिभीषण । त्या गांजितां अहंकाररावण ।
तो मजप्रति येईल शरण । तया देईन सर्व राज्य ॥ ८३ ॥
वैराग्य माझा बंधु लक्ष्मण । तो कामैंद्रजिताचें करील हनन ।
अतिकायादिक्रोधा मारवीन । वैराग्या हातीं ॥ ८४ ॥
कुंभकर्ण तमअहंकार । लयसाक्षी जो मी निर्धार ।
तो मी मारीन अतिसत्वर । जेणें देवां पीडा केली ॥ ८५ ॥
शेवटीं दृढ अपरोक्षज्ञानें । समाधानरूप एकाचि बाणें ।
अहंकाराचीं दहाहीं आननें । छेदून पाडीन मीच ॥ ८६ ॥
नंतर बिभीषणा राज्यीं स्थापून । स्वानुभूति सीता घेऊन ।
स्वसुख विमानारूढ होऊन । राज्य करीन अयोध्येचें ॥ ८७ ॥
अहो हे अगस्ती मुनि । मी एकबाणी एकवचनी ।
एकचि स्वानुभूति माझी पत्नी । तरी मी बोलिलें तें करीन ॥ ८८ ॥
तुम्हीं म्हणतां सर्व त्यागावें । एकस्वरूपीं सुखीं राहावें ।
तरी हे मजसी योग्य नव्हे । अहो हे ब्राह्मणा ॥ ८९ ॥


अतस्ते तत्त्वबोधेन न मे किंचित् प्रयोजनम् ॥ १० ॥
कामक्रोधादयः सर्व दहन्त्येते तनुं मम ॥


तुझिया तत्त्वबोधें कडून । कांहीं किंचित् नसे प्रयोजन ।
कामक्रोधादि सर्व दहन । माझी तनु करीरी ॥ ९० ॥
मज अहंकार वधाची असे शक्ति । आणि नित्यमुक्तत्वें बाधेना मजप्रति ।
सुखी रहावें जे तुमची उक्ति । मानेना सहसा ॥ ९१ ॥
मज वसिष्ठें उपदेशून । बाणविलें पूर्ण समाधान ।
आतां तुमचें तत्त्वज्ञान । मज उपेगा न ये ॥ ९२ ॥
तत्त्वज्ञान जे पुसों येती । उपदेश करावा तयांप्रती ।
मज अधिकार नसे निश्चितीं । उपदेशाचा ॥ ९३ ॥
कामक्रोधादि असुर । आणि देहबुद्धिचा अहंकार ।
हे दुष्ट मिळोनिया समग्र । तनु माझी जाळिती ॥ ९४ ॥
सर्वशक्तिमान् मी ईशानु । सर्व जगद्रूप हे माझी तनु ।
दुष्ट करीत असती दहनु । तरी मज सुखें कैसें रहावें ॥ ९५ ॥


अहंकारोऽपि मे नित्यं जीवनं हन्तुमुद्यतः ॥ ११ ॥


आणि माझाही अभिमान । करूं पाहे माझें हनन ।
तरी नुसधें तत्त्वज्ञान घेऊन । काय करणें मज ॥ ९६ ॥
सत्याचा जो साभिमान । तो जाणावा निरभिमान ।
हा निवृत्तिसी प्रयोजन । अखण्ड असे मजपाशीं ॥ ९७ ॥
हा आकल्प नित्यमुक्तत्वें राहे । यास्तव नित्य म्हणजेत आहे ।
हाही अभिमान जाळूं पाहे । जीवन माझें ॥ ९८ ॥
जीवन म्हणजे हा अवतार । सर्व जीवां रक्षणासी आधार ।
हा गेलिया करील उद्धार । कोण या जगाचा ॥ ९९ ॥
आणिकही मुनि चित्त देऊन । ऐका कांहीं माझें वचन ।
मज न सोसवेचि अपमान । अणुमात्रही ॥ १०० ॥


हृतायां निजकान्तायां शत्रुणाऽवमतस्य वा ।
यस्य तत्त्वबुभुत्सा स्यात् स् लोके पुरुषाधमः ॥ १२ ॥


शत्रूनें करून अपमान । निजकांता नेली हरून ।
तत्त्वभोग इच्छा करितां तेणें तो अधम पुरुष लोकीं ॥ १ ॥
तैशी माझी स्वानुभूति । पडिली दुष्ट अहंकारा हातीं ।
हा माझा अपमान निश्चितीं । नव्हे काय मुनिराया ॥ २ ॥
मज न सोसवे अपमान । यास्तव करणें मज प्रयत्न ।
सुखरूप तत्वभोग सेवून । मज न राहवे कैसें ॥ ३ ॥
माझा अपमान जरी झाला । तथापि साहणें असे मजला ।
परी बोलिलों प्रतिज्ञात्मक वचनाला । कीं सोडवीन जीवांतें ॥ ४ ॥
ऐशी जे प्रतिज्ञा केली । हे जरी सिद्धी नाहीं गेली ।
तरी म्यां पुरुषतनु नाहीं धरिली । केवळ अधभता येऊं पाहे ॥ ५ ॥
बोलिलें तेंचि सिद्धी न्यावें । तेणेंचि पुरुष ऐसें म्हणवावें ।
अन्यथा ते स्त्रीरूप जाणावें । अथवा षढ ॥ ६ ॥
पाहे पा स्त्रीरूप होऊनी । चूडाला नामें शिखिध्वज पत्नी ।
पतीसी बोधिलें हरप्रयत्नीं । परी प्रतिज्ञा सिद्धि नेली ॥ ७ ॥
स्त्री असोन वचन सिद्दी नेलें । मी पुरुष असोन बोलिलें नाहीं केलें ।
ऐसें हें हीनत्व सोसवलें । न जाय मज ॥ ८ ॥
हरिश्चंद्र माझा पूर्वज । तेणें स्वप्नीं दान दिल्हें राज्य ।
जागृतीमाजी बोलावून द्विज । सर्वस्वीं ओपिलें ॥ ९ ॥
आपणासी विकोन घेतलें । परी बोलिलें वचन सिद्धीस नेलें ।
ऐसे राजे उदंड मेले । एका वचना करितां ॥ ११० ॥
पाहे म्यां प्रतिज्ञा केली होती । त्यास्तव आलों वनाप्रति ।
अवघी सोडून राज्यसंपत्ति । सुरासुरी इच्छिजेते ॥ ११ ॥
चित्रकूटें भरतें येऊनी । न्यावयासी बहुत केली ग्लानी ।
परी मी राम एकवचनी । न जाय मागुता ॥ १२ ॥
तो मी राम प्रतिज्ञा करूनि । कीआं सोडवीन जीवांलागूनी ।
तो प्रयत्न अवघा सोडूनी । तत्त्व सेवोनि राहों जरी ॥ १३ ॥
राम दोनी वेळां बोले । तरी ते अवघेंही व्यर्थ गेलें ।
लोक म्हणतील कीं स्त्रीरूप धरिलें । आतां हें रामें ॥ १४ ॥
ऐसें पुरुषाधमत्व मज आलें । तरी म्यां अवतार धरून काय केलें ।
तस्मात् माझे मुखांतून जें निघालें । तें मी करीन निश्चयेंशीं ॥ १५ ॥
तरी मुनिराया एक करावें । अन्य कांहींच न बोलावें ।
जितुकें विनविलें स्वभावें । तयाचे साम्गावें उपाया ॥ १६ ॥
अहंकाररावण मरावा । मोक्षप्राप्ती व्हावी जीवां ।
स्वानुभूति माझी मज भेटवा । हरएक प्रयत्नें ॥ १७ ॥
हें माझें शेवटील बोलणें । निष्कर्षाचें जाणोन मुनीनें ।
माझा मनोरथ सिद्धी नेणें । दुजें कांहीं न बोलतां ॥ १८ ॥


तस्मात्तस्य वधोपायं लंघयित्वाम्बुधिं रणे ।
ब्रूहि मे मुनिशार्दूल अन्यो नान्योऽस्ति मे गुरुः ॥ १३ ॥


तस्मात् म्यां समुद्र लंघून जावें । तया अहंकारासी वधावें ।
मुनिशार्दूला उपाय सांगावे । तुजविण मज गुरु नसे अन्य ॥ १९ ॥
माझी प्रतिज्ञा सर्व ऐकिली । ते तुम्ही पाहिजे सिद्धि नेली ।
तस्मात् अहंवधोपायाची किल्ली । सांगावी गुरुराया ॥॥ २० ॥
भवरूप सागरा उल्लंघावें । अहंकारा मारून जीव सोडवावे ।
हेचि उपाय मुनिराया बोलावे । कृपा करोनी ॥ २१ ॥
माझिया मनोरथसिंहाचा । वध करणार तूं शार्दूळ साचा ।
तुजवीण गुरु मज दुजा कैंचा । या वनामाजी असे ॥ २२ ॥
ऐसें बोलून चरण धरिले । तेणें मुनिराज संतोषले ।
तेव्हां मग बोलों आरांभिलें । उपायासी ॥ २३ ॥


अगस्त्य उवाच -
एवं चेत् शरणं याहि पार्वतीपरिमव्ययम् ।
स चेत् प्रसन्नो भगवान् वांछितार्थं प्रदास्यति ॥ १४ ॥


ऐसें जरी तरी जाय शरण । अव्यय पारवतीपती लागून ।
तो जरी भगवान् होय प्रसन्न । तरी वांछितार्थ देईल ॥ २४ ॥
अहंकार निवटून जीव सुटावें । हें तुझ्या चित्तीं दृढ असें बरवें ।
तरी येच क्षणीं शरण जावें । पारवतीपतीसी ॥ २५ ॥
अव्यय परमात्मा निर्विकारु । ज्ञप्ति पार्वतेवर श्रीशंकरु ।
तोचि साकारतूपें सद्गुरु । सर्व जीवां सोडवितां ॥॥ २६
तो षड्गुणैश्वर्यसंपन्न भगवान् । जीवाच्या कणवें होय जरी प्रसन्न ।
वांछितार्थ उपदेश लक्षण । सदगुरुरूपें प्रगटवी ॥ २७ ॥
शिवसद्गुरुवीण उपदेश । करावया कवण अवकाश ।
ज्ञान उपदेशेंचि होय नाश । अज्ञानभवाचा ॥ २८ ॥
अज्ञान न जातां ज्ञानें कडून । जीव परब्रह्मीं होय अभिन्न ।
तेव्हांचि अहंकाराचें निर्दलन । हेचि वांछित प्राप्ति ॥ २९ ॥
अभेद ज्ञानाचा दाता । दुजा नसे शिवगुरु परता ।
जरी असती अन्य देवता । वरदमूर्ति ॥ १३० ॥
अहंकाराचें रुद्र दैवत । तेणें वरें हा जालासें उन्नत ।
अजिंक्य सर्वां देवांसी होत । शिवसद्गुरुवांचोनी ॥ ३१ ॥


देवैरजेयः शक्राद्यैः हरिणा ब्रह्मणापि वा ।
स ते वध्यः कथं वा स्यात् शंकरानुग्रहं विना ॥ १५ ॥


हरि ब्रह्मदेव इंद्रादिकांसी । हा अजेय असे सर्व देवांसी ।
तो वध्य होईल कैसा तुजसी । शंकर अनुग्रहा वांचुनी ॥ ३२ ॥
इंद्रादि देव तरी त्या आधिन । त्याचेनि अहंकारा नव्हे हनन ।
ब्रह्म विष्णु हे तरी सगुण । मायानिर्मित असती ॥ ३३ ॥
अहंकारा बळ अज्ञान मायेचें । त्या मायेचे निर्मित देव साचे ।
तेणें हनन अज्ञान अहंकाराचें । होय कैसेनी ॥ ३४ ॥
तस्मात् मायातीत जो सद्गुरु । अज्ञानग्रासक शिवशंकरु ।
अज्ञान जातां हा अहंकारु । नासे अपसया ॥ ३५ ॥
ऐसा जो ब्रह्मादिकां अजिंक्य । शंकरानुग्रहाविण एक ।
वध्य होईल निश्चयात्मक । तुजसी कैसा ॥ ३६ ॥
तरी त्या शिवगुरूची व्हावया प्राप्ति । अधिकार पाहिजे जीवाप्रति ।
त्या अधिकाराची तुजसी रीती । सांगेन ऐकें ॥ ३७ ॥
जीवासीच यावा अधिकार । तरीच ओळे गुरुशंकर ।
पाववील अज्ञानाचे परपार । उपदेशमात्रें ॥ ३८ ॥
जीवा सोडवीन जे प्रतिज्ञा केली । हे तुवां जीवाची स्वीकारिली वकिली ।
तरी ते विरजा दीक्षा पाहिजे घेतली । तुवांचि अंगें ॥ ३९ ॥
तूं करशील तें तें पाहून । जीवही करतील ऐसें साधन ।
तरी मी विरजा दीक्षा तुज देईन । ते स्वीकारीं रामा ॥ १४० ॥


अतस्त्वां दीक्षयिष्यामि विरजायोगमाश्रितः ।
तेन मार्गेन मर्त्यत्वं हित्वा तेजोमयो भव ॥ १६ ॥


विरजा दीक्षा जे योगयुक्त । तुज हातीं करवीन मी निश्चित ।
तया माग त्यागून मर्त्यत्व । तेजोमय होई ॥ ४१ ॥
रज तमादिक कार्य जितुकें । हें अविद्यामळें तितुकें ।
याचा नाश होतां बोलिलें जें निकें । विरजा दीक्षा तयासी ॥ ४२ ॥
हाचि नित्यानित्यविवेक । सत्य आणि निवडावें मायिक ।
आणि विरक्ति असावी इहामुष्मीक । हेही विरजादीक्षा बोलिजे ॥ ४३ ॥
शमदमादिक षट्क संपत्ति । मोक्षाची इच्छा संभवे चित्तीं ।
हे ही साधनें दीक्षांग असती । तरी हें करावें तुवां ॥ ४४ ॥
ऐशीं साधन चतुष्तय संपन्नता । हे दीक्षा यावी जीवाचे हातां ।
परी ते स्वीकारी तूंचि आतां । जीवाचे कणवें ॥ ४५ ॥
तया दीक्षेचेनि योगें । देहबुद्धि जाऊनिया वेगें ।
ज्ञानरूप होसी निजांगें । तेजोमय अहंकारवधा ॥ ४६ ॥
तेंचि कैसें पुढें बोलिलें । प्रस्तुत दीक्षेसी पाहिजे घेतलें ।
तेणें सर्व मनोरथ पुरले । जातील तुझे ॥ ४७ ॥


येन हत्वा रणे शत्रून् सर्वान् कामा अवाप्स्यसि ।
भक्त्वा भूमण्डले चान्ते शिवसायुज्यमाप्स्यसि ॥ १७ ॥


जेणें सर्व शत्रूंतें मारून । वांछित सर्व कामातें पावून ।
सर्व भूमंडळाचें राज्य भोगून । अंती शिवसायुज्य पावसी ॥ ४८ ॥
ऐसे शत्रु हे रणीं मेलिया । तूं पूर्णकाम होसी रामराया ।
मग कामना उरे कोठूनियां । ऐसा लब्धकाम होशी ॥ ५० ॥
कांहीं करणेंचि न उरतां । आणि सत्यत्वचि नसतां द्वैता ।
मग काय पावावें कोण अप्राप्तता । भूमंडळीं असे ॥ ५१ ॥
भू शब्दें जें जें उभवलें । तें तें आपणावीण सर्व फोलें ।
ऐसें त्रैलोकींचें प्राप्त झालें । जीवन्मुति सर्व राज्य ॥ ५२ ॥
एवं करावें तितुकें केलें । पावावयाचें तितुकें पावलें ।
यावत् प्रारब्ध तों काळ भोगिलें । पाहिजे मुक्तिसुख ॥ ५३ ॥
निर्वैर अजातशत्रु होऊनी । भोगिसी त्रैलोक्य राज्यालागूनी ।
तिहीं अवस्थेशीं मुक्तपणीं । विराजसी तूं ॥ ५४ ॥
प्रारब्ध तोंवरी जीवन्मुक्ति । कर्मांतीं विदेह कैवल्यप्राप्ति ।
हेंचि शिवसायुज्य निश्चितीं । पुनरावृत्ती वांचूनी ॥ ५५ ॥
घ्ट फुटतां आकाशीं आकाश । तेवीं कर्मक्षीणें अभिन्न अविनाश ।
उत्पत्ति लयावीण अखंडैकरस । उरसी तूं परब्रह्म ॥ ५६ ॥
ऐसा शिवसायुज्य पावसी अंती । अथवा ग्रंथिभेद होय जेव्हां निश्चिती ।
हेचि शिवसायुज्याची प्राप्ति । उपाधि असतां दृढबोधें ॥ ५७ ॥
तूम्चि पावसी ऐसें बोलिलें । हेंचि जीवाचें उपलक्षण केलें ।
परी सर्व जीव जाती पावले । शिवसद्गुरु प्रसादें ॥ ५८ ॥
तस्मात् साधक मुमुक्षु अधिकारीयासी । सूत विनवीतसे अति सायासीं ।
कीं श्रीराम तुष्टला जीवाचे हितासी । पुत्रासी जेवीं माता ॥ ५९ ॥
आपुलें नित्यमुक्त सुख त्यागुनी । जीवाच्या कणवें करी ग्लानी ।
ऐसा कोण पहा त्रिभुवनीं । श्रीरामा परता ॥ १६० ॥
केवळ पुसून नाहीम् राहिला । तैसें साधन अंगें करील वहिला ।
असो तुष्टून जें बोलता झाला । तेंचि ऐका सप्रेमें ॥ ६१ ॥


सूत उवाच -
अथ प्रणम्य रामस्तं दण्डवत् मुनिसत्तमम् ।
उवाच दुःखनिर्मुक्तः प्रहृष्टेतान्तरात्मना ॥ १८ ॥ ।


नंतर अगस्ति मुनिसत्तमा र्पति । दंडवत नमस्कारी श्रीरघुपति ।
खेद दुःख त्यागें हर्षोन चित्तीं । बोलता झाला ॥ ६२ ॥
अगा हे सर्वज्ञ जीवाचे कणवा । शिवसद्गुरूसी शरण जाई राघवा ।
ऐसा शब्द ऐकतांचि बरवा । अति हर्ष झाला रामा ॥ ६३ ॥
वहावा वहावा जी सद्गुरु । बोलोन साष्टांग घाली नमस्कारु ।
अगस्ती चरणीं झाला तत्परू । जेवीं किंकरु स्वामीसी ॥ ६४ ॥
मागें खेद जो झाला होता । तो सर्वही झाला विसरता ।
हर्ष जो झाला असे चित्ता । न सांगवे तो ॥ ६५ ॥
बहु काय बोलणें निश्चित । श्रीराम वनीं नाचूं लागत ।
वारंवार नमस्कार घालित । आणि प्रदक्षिणा ॥ ६६ ॥
ऐसा अत्यंत हर्षांतें पावूनी । श्रीराम बोलता झाला वचनीं ।
सूत म्हणे शौनका लागूनी । तेंच ऐका सावधान ॥ ६७ ॥


श्रीराम उवाच -
कृतार्थोऽहं मुने जातो वांछितार्थो ममागतः ।
पीताम्बुधिः प्रसन्नत्वं यदि मे किमु दुर्लभम् ॥ १९ ॥


मी सर्वस्वेंसी कृतार्थ झालों । हे मुनिराया वांच्छितार्थ पावलों ।
अमुक अलाभें नाहीं उरलों । सागरपानी प्रसन्न तूं ॥ ६८ ॥
तुमच्या वचनमात्रें म्यां सर्व केलें । आतां करणेंचि कांहीं नाहीं उरलें ।
वांच्छितार्थ सर्व पावलें । सद्बुरुप्रसादें ॥ ६९ ॥
तुवां प्राशिला भवसागरु । ऐसा प्रसन्न असतां सद्गुरु ।
मज अलभ्य काय असे दुष्करु । जीवाचिये सुटकेसी ॥ १७० ॥


अतत्वं विरजां देक्षां ब्रूहे मे मुनिसत्तम ॥


अगा हे मुनिराया सर्वोत्तमा । मी वांछितार्थ पावलों सर्व कामा ।
आतां विरजादीक्षा मज द्यावी नेमा । ते अनुष्ठीन यथाविधि ॥ ७१ ॥
विरजादीक्षा चतुष्टय साध्न । हें प्[राप्त व्हावें जिवालागून ।
तया अधिकारिया शिवसद्गुरु प्रसन्न । होय अति त्वरेशीं ॥ ७२ ॥
हें जीवानेंचि अनुष्ठावें । परी तें हित नेणती अघवे ।
यास्तव मजचि लागे करावें । म्यां केलिया ते करिती ॥ ७३ ॥
अपूर्व फळ बाळें पाहतां । खावें हें नकळें त्याचें चित्ता ।
स्वयें चाखवून दावितां पिता । झॊबून घेत हिरूनी ॥ ७४ ॥
तेवीं विरजा दीक्षेचें साधन । म्यां अंगें करितां अनुष्ठान ।
जीव करूं धांवतील अनुदिन । तरी मजप्रति सांगावें ॥ ७५ ॥
काझिये अंतरींचा होता हेतु । कीं जीवासी शिवसद्गुरु व्हावा प्राप्तु ।
तोचि बोलिलां तुम्ही अकस्मातु । हें इष्टचि मज अति ॥ ७६ ॥
आधीच शर्करेची आवडी । वैद्येंही दिधली तेचि पुडी ।
तरी विरजादीक्षा मज परवडी । द्यावी कैशी ते ॥ ७७ ॥
मज जीवाचे चिंतेचा रोग । लागला होता अंतरीं डाग ।
तो तूम् भेटलासी वैद्यराज अभंग । उपाय औषध द्यावया ॥ ७८ ॥
ऐशी ऐकोनिया वचनोक्ति । बोलता झाला मुनि अगस्ति ।
कीं पाशुपतव्रत रामा तुजप्रति । सांगेन तें करावें ॥ ७९ ॥


अगस्त्य उवाच -
शुक्लपक्षे चतुर्दश्यां अष्टम्यां वा विशेषतः ॥ २० ॥
एकादश्यां सोमवारे आर्द्रायां वा समारभेत् ।


शुक्लपक्षी चतुर्दशीसी । अष्टमी सोमवार एकादशी ।
आर्द्रायुक्त कोणतेही मासीं । दीक्षेसी आरंभ करावा ॥ १८० ॥
ध्यानधारणादि प्रकार । पुढें बोलणें असे सविस्तर ।
तयाशीच दीक्षा हें बोलिजे उत्तर । दीक्षित तोचि अधिकारी ॥ ८१ ॥
परी आरंभ सुमुहूर्तीं । आणि अधिकारीही त्रिप्रकारें होती ।
उत्तम मध्यम कनिष्ठ निश्चितीं । तेचि ऐकें वेगळाले ॥ ८२ ॥
पौर्णिमेसी उणी एक कळा । तेचि चतुर्दशी के केवळा ।
म्हणजे विचाररूप अरुणोदय वेळा । ज्ञनसूर्योदया पूर्वीं ॥ ८३ ॥
परोक्षत्वें सर्व कळलें । दृढा परोक्षा उणें राहिलें ।
हें उत्तम अधिकाराचें लक्षण बोलिलें । चतुर्दशीं रूपें ॥ ८४ ॥
विशेष शब्दें हें उत्तम । आतां अष्टमी तेचि मध्यम ।
म्हणजे अष्टधा प्रकृति होय सम । सधिकारियासी ॥ ८५ ॥
आतां कनिष्ठ तेचि एकादशी । निग्रह करून दशेंद्रियांसी ।
मेळवावें अकरावे मनासी । ध्यानारंभ समयीं ॥ ८६ ॥
शुक्लपक्ष अंतःकरण शुद्ध । त्यागावें सुखदुःखादि द्वंद्व ।
आर्द्रा सोमवार हे द्विविध । सप्रेमत्व आणि निष्परिग्रह ॥ ८७ ॥
हे तेन्हीही तिघां समान । पाहिजेति ध्याना लागून ।
हा मुख्यार्थ केला निरूपण । परमार्थ मार्गासी ॥ ८८ ॥
अथवा कर्मारंभप्रवृत्तीसी । तिथिरूप चतुर्दशी अष्टमीसी ।
एकादशी कोणतेही मासी । शुक्लपक्ष मात्र असावा ॥ ८९ ॥
परी आर्द्रा नक्षत्र सोमवार । तिहीं दिवसां पाहिजे साचार ।
हा कर्ममार्गाचा प्रकार । हाही ग्रहण असे ॥ १९० ॥
असो रामा तुज सुमुह्य़्र्तासी । सांगितलें असे ध्यानारंभासी ।
आतां ध्यान प्रकार सावध मानसी । ऐकें सांगिजेल ॥ ९१ ॥


यंवाममाहुर्यं रुद्रं शाश्वतं परमेश्वरम् ॥ २१ ॥
परात्परतरं चाहुः परात्परतरं शिवम् ॥


वामरुद्रादि नामसंकेत । परमेश्वर जो शाश्वत ।
परात्पर शिव बोलिजे ज्यातें । आणि परात्परतर ॥ ९२ ॥
ध्यान जयाचें करावें । परी ध्येय आधीं समजावें ।
रूपेंवीण नामचि ध्यावें । कोणे परी साधकें ॥ ९३ ॥
सर्वांसी अधःकरी या नांव वाम । रुद्र तो अस्ति भाति प्रिय परम ।
शाश्वत शब्दें जाताही रूप नाम । शिवस्वरूप उरे ॥ ९४ ॥
ध्यानासी व्हावा गोचर । या हेतू नामें परमेश्वर ।
त्रिपुटी वीण ध्यान प्रकार । न घडे साधकां ॥ ९५ ॥
त्रिपुटीरूप तेंचि मायिक । तेंचि परमेश्वराचें रूपक ।
परी हे सर्वपनासी दाहक । एकपणीं मेळवी ॥ ९६ ॥
पुढें क्रमेंचि ध्याता ध्यान । त्यागून ध्येयचि अंगें होणें ।
तोचि परात्पर शिव आपण । मायानिरासी ॥ ९७ ॥
ऐसा जो अपरोक्षत्वासी पावला । अभिन्नपणें अनुभव आला ।
हाही उभवीतसे त्रिपुटीला । अतिसूक्ष्म रूपें ॥ ९८ ॥
अनुभव होतां अनुभविता । अनुभाव्य रूप उमटे द्वैतता ।
हेंचि ज्ञान परी अद्वैतता । विज्ञान नव्हे ॥ ९९ ॥
अनिर्वाच्य जें समाधान । तेंचि विज्ञानाचें लक्षण ।
यास्तव परात्परतर हें वचन । बोलिलें असें ॥ २०० ॥
या श्लोकींचें निरूपण । केलेंचि करावें साधकें मनन ।
पुढें कैसें करावें बोलिजे ध्यान । ध्येयरूप येथें केलें ॥ १ ॥
आणिकही अर्ध श्लोकें करून । ध्येयचि निरूपिजे पूर्ण ।
तेंचि एक सावधान । ध्यान तें मग कैसें ॥ २ ॥


ब्रह्मणो जनकं विष्णोः वन्हेर्वायोः सदाशिवम् ॥ २२ ॥


ब्रह्मा विष्णु आदिकरून । वन्हि वायु जेथून निर्माण ।
यास्तव सर्वांचा जनक अधिष्ठान । सदाशिव रूपें ॥ ३ ॥
सर्वांचा जो उत्पत्तिकर्ता । जयासी नाम हें विधाता ।
परी तयासी उत्पन्नविता । तो सदाशिवचि ॥ ४ ॥
उत्पन्न झालें त्याचें पालन । विष्णुरूपें करीं आपण ।
तया विष्णूचें करी संरक्षण । तो हा सदाशिवचि ॥ ५ ॥
उत्पन्न झालें त्याचें पालन । विष्णुरूपें करीं आपण ।
तया विष्णूचें करी संरक्षण । तो हा सदाशिवचि ॥ ६ ॥
शेवटी रुद्र सर्वां संहारी । त्याचाही लय जेथें निर्धारीं ।
तोचि सदाशिव निर्विकारी । तिही कालीं अबाधित ॥ ६ ॥
वायु तेजादि पंचभुत । आणि भूतां पासूनि जे निर्मित ।
या इतुकियासी अधिष्ठानभूत । तो सदाशिवचे ॥ ७ ॥
माया अविद्येचा न लगे मळ । हेतू कल्याणरूप निर्मळ ।
तोचि सर्वांचें जन्मस्थळ । ध्याना योग्य सदाशिव ॥ ८ ॥
आतां ध्यान कैसें तें ऐकावें । अत्यादरें चित्त द्यावें ।
यथामती बोलिजे आघवें । श्लोकानुसार ॥ ९ ॥


ध्यात्वाऽग्निनावसथ्याग्निं विशोध्य च पृथक्पृथक् ।
पंचभूतानि संयम्य ध्यात्वा गुणविधिक्रमात् ॥ २३ ॥


बोलिल्या लक्षणें ध्येय पूर्ण । तयाचें अखण्ड राखून ध्यान ।
अग्नीनें अग्नी आटवून । भूतशुद्धि अवसथ्यादि मंत्रें ॥ २१० ॥
तया भूतशुद्द्जिचें लक्षण । आधीं करावें भूताम्चें शोधन ।
वेगळालें पंचभूतांचें नियमन । क्रमें गुणादि ध्यायिजे ॥ ११ ॥
केवळ शिवरूप बोलिलें । मागील श्लोकीं निरूपण झालें ।
तेंचि ध्यान चित्तासी लागलें ।सविशेषामाजींही ॥ १२ ॥
सविशेष म्हझजे जितुकें उत्पन्न । तितुकेंही पंचभूतीक जाण ।
पिंड ब्रह्मांडात्मक संपूर्ण । जड चंचल रूपें ॥ १३ ॥
जडी अस्तित्वरूप व्यापलें । चंचळी चिद्रूपत्व उमटलें ।
तेंचि अग्निस्वरूप बोलिलें । सर्वांमाजींही ॥ १४ ॥
तोचि अग्नि आपुलिया देही । ज्ञानरूप असे सर्वदांही ।
विचारें पाहतां अवस्था तिहीं । अनुभवा येत ॥ १५ ॥
एवं विचाररूप ज्ञानाग्नीनें । सर्वांतील सच्चिद्रूप ओळखणें ।
सर्वदां ध्यान कीजे स्मरणें । नामरूपें त्यागोनी ॥ १६ ॥
अवसथ्यादि वेदमंत्राचें । प्रमाण घेऊनियां साचें ।
शोधन करावें भूतांचें । पिंड ब्रह्माण्डीं वेगळाले ॥ १७ ॥
जड कठीण पृथ्वीचें रूप । मृदु क्लेदन असें आप ।
दाहक भासक प्रकाशरूप । तेज बोलिजे ॥ १८ ॥
वायू तो जाणिजे चंचळ । आकाश तेंचि जें असें निश्चळ ।
ऐशीं वेगळालीं भूतें सकळ । पिंडीही ओळखावीं ॥ १९ ॥
अस्थिमांसादि कठिण पृथिवीं । रक्त रेतादि आपाची ओळखी घ्यावी ।
क्षुधा तृषादि आघवी । तेजाची कार्यें ॥ २२० ॥
चलनवलनादि वायु प्रसिद्ध । आकाश कार्य हें कामक्रोद ।
तेवींच सूक्ष्म देहीं प्राणादि विशुद्ध । पंचभूतें वेगळालीं ॥ २१ ॥
यथा पंचभूतांचें नियमन । नाम रूपें सांडावीं दोन ।
अस्ति भाति प्रिय संपूर्ण । या नांव भूतशिद्धि ॥ २२ ॥
ऐसें न करितां अज्ञान । बळेंचि पीडूनियां घ्राण ।
रकार अग्निबीजेंकडून । भुतें जाळिलीं म्हणती ॥ २३ ॥
परी तीं न जळतां उगींच भावावीं । तरी मग नामरूपें कां न त्यागावी ।
नामरूप त्यागितां गोसावी । मिळे सच्चिदानंद ॥ २४ ॥
हा सविशेष ध्यानप्रकार । नामरूपीं ब्रह्म सच्चिन्मात्र ।
निरोपिला अल्पसा विचार ।विवेकयुक्त ॥ २५ ॥
पुरती भूताम्ची ओळख व्हावी । तरी क्रमेंचि गुणविधि जाणावी ।
पंच भूतें स्पष्ट ओळखावी । तन्मात्रायोगें ॥ २६ ॥


मात्रा पंच चतस्रश्च त्रिमात्राद्विस्ततः परम् ।
एकमात्रममात्रं च द्वादशान्तं व्यवस्थितम् ॥ २४ ॥


पृथिवी आदि क्रमेंकडून । पांच चार विषय तीन ।
दोन एक ईश मात्राहीन । परी जेथून द्वादश ॥ २७ ॥
शब्द स्पर्श रूप रस । गंधादिकां पृथ्वींत वास ।
कळे पांचा ज्ञानेंद्रियांस । ते पृथिवी ओळखावी ॥ २६ ॥
शब्द स्पर्श रूप रस चारी । असती जयाचिये माझारीं ।
श्रोत्रादि चहूंसी कळे निर्धरीं । तेंचि आप ॥ २९ ॥
शब्द स्पर्श रूप विषय तीन । श्रोत्र त्वचा चक्षूसी होय वेदन ।
या रीतीं जयाचें लक्षण । तेंचि तेज ओळखावें ॥ २३० ॥
शब्द स्पर्श जेथें मात्रा दोन । श्रोत्र त्वचेशी होय ज्ञन ।
हेंचि वायूचे लक्षण । साधकीं ओळखावें ॥ ३१ ॥
एक शब्द विषय असे जया । आणि एकाचि कळे श्रोत्रेंद्रिया ।
तें आकाश जाणिजे उपाया । परमार्थ पंथीं ॥ ३२ ॥
या पांचांहीमध्यें जो व्यापक । सत्चित्त् रूपें आत्मा एक ।
तोचि ईश्वर शबल मायिक । अमात्रात्मक ॥ ३३ ॥
तेथें गुणविषय कांहीं नसती । यास्तव गोचर नसे इंद्रियांप्रति ।
परी द्वादश तत्त्वांची उत्पत्ति । जेथून झाली ॥ ३४ ॥
दशेंद्रिय प्राण मन । हें द्वादश तत्त्वसंख्या गणन ।
उत्पन्न होतसें जेथून । लयही तेथेंचि ॥ ३५ ॥
एवं अनुक्रमें मात्रासहितें । ओळखावीं पंचमहाभूतें ।
अमात्रात्मक ईशरूप जें तें । भूतांमध्यें जाणावें ॥ ३६ ॥
नाम रूपाचा वृथा आरोप । अवघें ब्रह्म सत् चित् रूप ।
या ध्यानयोगें आपेंआप । साधक ते सिद्ध होती ॥ ३७ ॥
पाशुपतास्त्र तेंचि अभिन्नज्ञान । तयाचें पाशुपत व्रत हें साधन ।
चिरकाळ अभ्यासितां ऐसें ध्यान । वस्तुतंत्र ज्ञान होतें ॥ ३८ ॥


स्थित्यां स्थाप्यामृतो भूत्वा व्रतं पाशुपतं चरेत् ॥


ऐशा ध्यान स्थितीं स्थापून मन । निजांगें मोक्षरूप होऊन ।
करावें पाशुपत व्रत आचरण । मुख्य ज्ञान आकळे जों ॥ ३९ ॥
तिहीं अवस्थेमाजीं हा छंद । नुमटावा नामरूपाचा भेद ।
एकलें ब्रह्म सच्चिदानंद । मनें अखंड ध्यावें ॥ २४० ॥
जागर होतां पुन्हा झोंपेवरी । ध्यान हें असावें निर्धारी ।
द्वैत शंकाचि न व्हावी अंतरीं । ऐसें मन स्थापावें ध्यानीं ॥ ४१ ॥
बद्दतेची वार्ता सांडावी । सर्वदां मुक्तता स्फुरावी ।
ऐसा मोक्षरूप होऊन गोसावी । पाशुपत व्रत आचरो ॥ ४२ ॥
ध्यानामाजीं अखण्ड रत । हेंचि जाणिजे पाशुपतव्रत ।
येणेंचि अभिन्नज्ञान होईल प्राप्त । अल्पचि काळें ॥ ४३ ॥
आचरतां अजून प्राप्ति न होय । ऐसें कदाही आठवूं नये ।
निश्चयेंशीं धरावें धैर्य । तेंचि बोलिजे श्लोकीं ॥ ४४ ॥


इदं व्रतं पाशुपतं करिष्यामि समासतः ॥ २५ ॥
प्रातरेवं तु संकल्प्य निधायाग्निं स्वशाखया ॥


हें पाशुपत व्रत ऐसें । मी करीन निर्धारें अल्पसें ।
प्रातःकाळीं कल्पिजे मानसें । स्वशाखागत अग्नि ठेवूनि ॥ ४५ ॥
विचार अरुणोदय पाहांट फुटें । तेव्हां निर्धारचि मनीं उठे ।
कीं हें पाशुपतव्रत ध्यान गोमटें । प्राणांत झालिया न सोडीं ॥ ४६ ॥
होईल जेव्हां अपरोक्षज्ञान । तेव्हां आपेंआप गळे हें ध्यान ।
न होतां आलें जरी मरण । तरी पावेन जन्मांतरीं ॥ ४७ ॥
नध्यंतरी विघ्नें जरी येती । तरी मी सोडीना साधनसंपत्ति ।
यासी प्रमाणें बहुत असतीं । तरी केलें तें व्यर्थ न जाय ॥ ४८ ॥
भरत त्रिजन्मीं ज्ञान पावला । गर्भीं समाधान वामदेवाला ।
तरी मी अवसर न देतां कामादिकाला । यावत् प्राण करीन ॥ ४९ ॥
येथें कोणते असती सायास । यास्तव गोलिलें द्यान अल्पवस ।
ऐसा संकल्प करून मानसें । सदृढ ध्यान करावें ॥ २५० ॥
स्वशाखा महावाक्येंकडून । अर्थरूप ज्ञानाग्नि स्थापून ।
अखण्ड आरंभिलें ध्यान । बोलिल्या न्यायें ॥ ५१ ॥
या ध्यानरूप व्रतालागीं । नियमही आचरिजे अंगीं ।
तेंचि बोलिजे लागवेगीं । एका श्लोकीं ॥ ५२ ॥


उपोषितः शुचिः स्नातः शुक्लाम्बरधरः स्वयम् ॥ २६ ॥
शुक्लयज्ञोपवीतश्च शुक्लमाल्यानुलेपनः ॥


उपोषित सुद्ध असावें करून स्नान । स्वयें श्वेत वस्त्राचें परिधान ।
श्वेत पुष्प गंधानुलेपन । शुद्ध यज्ञोपवीत ॥ ५३ ॥
समयीं प्राप्त जें होईल अन्न । जाड्यरहित हलकें अल्प भोजन ।
साधनासी नव्हे विघ्न । आग्रहेवीण तो उपवास ॥ ५४ ॥
इंद्रिय निग्रह शुद्धता तो दम । मनोमल त्याग स्नाना नाम शम ।
श्वेतवस्त्र परिधान उपरम । शुद्धांतर्बाह्य ॥ ५५ ॥
या नांवे बोलिजे उपवीत । कीं कर्मे शुद्ध असावें चित्त ।
गंध पुष्प अनुलेप श्वेत । दुर्भाषणेंवीण सुवाणी ॥ ५६ ॥
ऐसें होत्साता श्रवण मनन । संतसंग असावा अनुदिन ।
पुढें करिजेल सुष्टु हवन । निदिध्यास रूपेण् ॥ ५७ ॥


जुहुयाद् विरजेमंत्रैः प्राणापानदिभिस्ततः ॥ २७ ॥
अनुवाकान्तमेकाग्रः समिदाज्यचरून्पृथक ॥


नंतर प्राणापानादिकें कडून । विरजा मंत्र आणि असमाप्तमन ।
एकाग्र चरु समिधा घृताधिकें येणें । हवन करावें ॥ ५८ ॥
श्रवणमनन झालियावरी । निदिध्यास धरावा अंतरीं ।
एकतान ध्येयमात्रीं । समरसावें ॥ ५९ ॥
सदां वैराग्ययुक्त जी उत्तरें । मलरहित जीं त्या विरजामम्त्रें ।
कामनारहित मनाचें उद्गारें । तृप्त असावें ॥ २६० ॥
हकार ऊर्ध्वगामी प्राण । सकार अधोगामी अपान ।
हीं अक्षरें विचारें करावीं समान । तें मी ब्रह्म म्हणोनि ॥ ६१ ॥
ऐशिये प्राणायामें कडून । ज्ञानाग्नि जो भेदा करी दहन ।
त्या माजीं सर्वदां कीजे हवन । आतां होम द्रव्य ऐकें ॥ ६२ ॥
देहत्रय समिधा घेऊन । चरु हा जितुकें दृश्य संपूर्ण ।
त्यांत चम्चळ तें आज्य मेळवून । ज्ञानागींत भस्म करावें ॥ ६३ ॥
अथवा रूप तेंचि समिधा सर्व । नाममात्र तें चरु अघवें ।
क्रिया आज्य त्यांत मेळवावें । अस्तित्वें उरावें जाळूनि ॥ ६४ ॥
एक अस्ति भाति प्रियावीण । अवस्था तिहीं न देखावें भिन्न ।
हें एकतान निदिध्यासन । चिरकाळ राखावें ॥ ६५ ॥
ग्रंथि भेद होणें तो अंतकाल । हें साधन राकावें तावत्काल ।
हेचि एकाग्रता बहुसाल । साक्षात्कारा पावेतों ॥ ६६ ॥
साक्षात्कार तो ब्र्अह्मात्मा एक । स्फुरूं लागे निश्चयात्मक ।
मग सवृत्तिकज्ञान अवश्यक । क्षीण होऊं लागे ॥ ६७ ॥


आत्मन्यग्निं समारोप्य याते अग्नेति मम्त्रतः ॥ २८ ॥
भस्मादायाग्निरित्याद्यैः विमृज्यांगानि संस्पृशेत् ॥


ऐक्यरूप आत्मत्वा माझारीं । याते अग्निभस्मादिया मंत्री ।
ज्ञानाग्नी सांठवून विज्ञानाउरी । भस्म तें हुडकून निजांगीं लावावें ॥ ६८ ॥
आत्मा ब्रअह्म हा अभिन्न । त्यांत समरसावें सवृत्तिक ज्ञान ।
याते अग्निमंत्रादि हे कवण । तेचि श्रवण करीं ॥ ६९ ॥
मी असंग केवळ परिपूर्ण । अज्ञान ज्ञाना वीण सघन ।
ऐसें जें वेदाचें वचन । सर्वदां स्मरावें ॥ २७० ॥
बंधचि ठायींचा असावा । तरी मोक्षही मिरवी नांवा ।
केवळ असंगासी मजसी गोंवा । ज्ञानाचा ही कोठें ॥ ७१ ॥
या रीतीं ज्ञनही मावळलें । यासाठीं यातें अग्नि हें बोलिलें ।
पुढें विज्ञानरूप भस्म उरलें । भस्मादायादि मंत्रें ॥ ७२ ॥
संशयचि अवघा निमाला । पाप पुण्याचा घोट भरला ।
नुसधा अनुभव स्वयंमात्र उरला । केवळ भस्मरूपें ॥ ७६ ॥
यासीच बोलिजे साक्षात्कार । परी हा सिद्धान्त नव्हे निर्धार ।
येथें द्वैत असे सूक्ष्म हेतुमात्र । तेव्हां अनिर्वाच्य कैसें ॥ ७४ ॥
अनिर्वाच्य जें समाधान । पुढें बोलावयाचें असे गहन ।
पाशुपतास्त्र वस्तुतंत्रज्ञान । तें शिवगुरूविण प्राप्त कैचें ॥ ७५ ॥
असो ऐसें वेदमंत्रांतूनि । सार रहस्य घेईंजे हुडकूनी ।
तेंचि भस्म अंगीं लावूनी । विराजमान असावें ॥ ७६ ॥
न व्हावा द्वैताचा उमस । बंधमोक्षातीत आपण अविनाश ।
हर्ष शोक रहित उल्हास । सर्वदा साधकासी ॥ ७७ ॥
एवं ऐसें हें भस्मलेपन । यथामती केलेंनिरूपण ।
तयाचि भस्माचें महिमान । अडीच श्लोकीं असे ॥ ७८ ॥


भस्मच्छनो भवेत् विद्वान् महाप्[आतकसंभवैः ॥ २९ ॥
पापैर्विमुच्यते नित्यं मुच्यते च न संशयः ।
वीर्यमग्नेर्यतो भस्म वीर्यवान् भस्मसंयुतः ॥ ३० ॥
भस्मस्नानरतो विप्रो भस्मशायी जितेन्द्रियः ।
सर्व पापविनिर्मुक्तः शिवसायुज्यमाप्नुयात् ॥ ३१ ॥


बोलिल्या रीती भस्मावच्छन्न । येणेंशी युक्त तोचि विद्वान ।
महापातकेंही घडतां तया लागून । निःसंशयें न स्पर्शती ॥ ७९ ॥
अभस्मी ते वीर्यभग्न । भस्मयुक्त तोचि सामर्त्य्ह्यवान ।
भस्मस्नानीं रत अनुदिन । जितेंद्रिय तो भस्मशायी ॥ २८० ॥
सर्वा पापापासून तो मोकळा । यादि देहीं आणि याचि डोळां ।
शिवसमान होय स्वलीळा । सहजीं सहजत्वें ॥ ८१ ॥
विज्ञानरूप अंगीं भस्म लावीं । कीं मी निजांगें ब्रह्मगोसावी ।
तोचि विद्वान जगतीं सर्वी । येर ते अविद्वांस ॥ ८२ ॥
त्यांचे संचित तरी दग्ध झालें । प्रारब्ध भोगितां क्रियमाण घडलें ।
तेही पापपुण्यात्मक नाहीं स्पर्शलें । अकर्तेपणें तय ॥ ८३ ॥
काय मी पुण्य न झालों आचरता । काय मी पापचि झालों कर्ता ।
ऐसा खरखराचि मनीं नसतां । अनायासें कर्में सोडिती तया ॥ ८४ ॥
विज्ञानभस्माचें सामर्थ्य एवढें । कीं क्रियमाणावरी बिंदुलें पडे ।
भवभय मारीतसे थापडे । आणि काळही कांपे थरथरा ॥ ८५ ॥
एवं भस्मवंतचें सामर्थ्य सबळ । भस्मरहित तेचि दुर्बळ ।
जरी झाले अजिंक्य सकळ । भूमंडळासी ॥ ८६ ॥
स्वात्मानुभव भस्म आंत । सर्वदां स्नान हे वृत्ति रत ।
तोचि बोलिजे इंद्रियजित । येर खात रदनासी ॥ ८७ ॥
सर्व इंद्रियें विषय घेती । परी भिन्नत्वें नामरूपा नसे स्फूर्ति ।
ज्ञात्याची हतवटी अज्ञान नेणती । व्यर्थ शिणती निग्रहें ॥ ८८ ॥
असो विज्ञनभस्माचें लेपनी । तो येणेचि देहें मुक्तीचा धणी ।
शिवासमान बैसला होऊनी । अलिप्तत्वें नित्यमुक्त ॥ ८९ ॥
मरणानंतर शिवसायुज्या प्रति । पाविजे म्हणती ते मंदमति ।
असो उधारातें विश्वासती । तैसी मुक्ती हे नव्हे ॥ २९० ॥
येचि देहीं येचि डोळां । न भोगिजे मुक्तीचा सोहळा ।
तरी साधन कचाटाचे मेळां । कासया पडावें ॥ ९१ ॥
असो रामा ध्यानापासून । जें जें बोलिले परमार्थसाधन ।
हें जीवानेंचि करावें अनुष्ठान । परी तूंचि करीं निजांगें ॥ ९२ ॥


एवं कुरु महाभाग शिवनामसहस्रकम् ।
इदं तु संप्रदास्यामि तेन सर्वार्थमाप्स्यसि ॥ ३२ ॥


बोलिल्या रीतीं करीं हें रामा । महद्भाग्या घेईं शिवसहस्र नामा ।
मी देत असे तुजसी नेमा । जेणें सर्वार्थ पावसी ॥ ९३ ॥
जीवाच्या कणवें त्वां मनीं धरिलें । कीं त्या बंधापासून पाहिजे सोडविलें ।
आणि स्वानुभूतीसी भेटविलें ।पाहिजे माझ्या मज ॥ ९४ ॥
तरी शिवसद्गुरु भेटती । या हेतू महाभाग्यवन् हे वचनोक्ति ।
हें घेईं देतसों तुजप्रति । शिवसहस्र नाम ॥ ९६ ॥
जे जे कामना त्वां मनीं धरिली । ते ते येणें जाय सर्व फळली ।
तस्मात् जितुकी साधनसंपत्ति बोलिली । त्या त्या रीतीं करीं अंगें ॥ ९७ ॥


सूत उवाच - इत्युक्त्वा पददौ तस्मै शिवनामसहस्रकम् ।
वेद साराभिधं नित्यं शिवप्रत्यक्षकारकम् ॥ ३३ ॥


सूत म्हणे ऐसे बोलोन अगस्ती । शिवसहस्रनाम देतसें रामाप्रति ।
जेणें प्रत्यक्ष शिव होऊन शिवा भेटती । वेदसाराख्य नाम जया ॥ ९८ ॥
शिवसद्गुरूची भाकितां करुणा । प्रत्यक्ष शिवगुरूचें होय दर्शना ।
ऐशिया सहस्रनामाच्या महिमाना । विस्तार पुढील अध्यायीं ॥ ९९ ॥
असो शिवसहस्रनाम देऊन । अगस्ती काय बोलता झाला वचन ।
तेंचि ऐका सावधान । शौनकादिकहो ॥ ३०० ॥


अगस्त्य उवाच -
उक्तं च तेन राम त्वं जप नित्यं दिवानिशम् ।
ततः प्रसन्नो भगवान् महापाशुपतास्त्रकम् ॥ ३४ ॥


अगस्ती बोले रामा तुवां । सहस्रनामीं शिव हा दिवानिशीं जपावा ।
प्रसन्न होऊन भगवान् तेव्हां । महापाशुपतास्र दे ॥ १ ॥
अगा रामा बोलिल्या न्यायें । शिवनाम युक्त साधन उपायें ।
करितां शिव हा प्रसन्न होय । जीवसृष्टी तारावया ॥ २ ॥
शिव सद्गुरु प्रसन्न होतां । काय जीवासी होईल देता ।
तेंचि ऐकें पाशुपता । अस्त्राचें रूप ॥ ३ ॥
स्वात्मानुभवाचा परिणाम । अनिर्वाच्य अभिन्न ब्रह्म ।
जेथें द्वैताचा कदां संभ्रम । उद्भवलाचि नाहीं ॥ ४ ॥
ऐसें अनिर्वाच्य समाधान । हेंचि पाशुपतास्त्र परम गहन ।
तया अस्त्राचें निरूपण । कांहीं एक करूं ॥ ५ ॥
गुरुमुखें वचनें वेदाचीं । श्रवण मननें कळे रुची ।
महावाक्य कीं ब्रह्म तूंचि । अर्थ प्रतीती लाहे ॥ ६ ॥
विश्वासें शब्दाचा अर्थ कळे । अर्थ कळतां स्वानुभव निवळे ।
त्याचि स्वानुभवें द्वैत उफाळे । त्रिपुटी रूप ॥ ७ ॥
तेथें अनुभव अनुभवितां विरे । अनुभाव्य मात्र नुसधें उरें ।
वेगळेपणेंसी त्रिपुटी ओसरे । तें केवळ अद्वैत ॥ ८ ॥
आपण निजांगें तरी ब्रह्म झाला । परी झालों हा आठवूण् नाहीं स्फुरला ।
अनिर्वाच्य समाधान तयाला । बोलावें बापा ॥ ९ ॥
झालें तें अनुभवासी न ये । मग बोलणें तरी कैसें होय ।
या नांव अनिर्वाच्य समाधान काय । बहु बोलोनी ॥ ३१० ॥
एवं ऐसें पाशुपतास्त्रक । सर्वही द्वैतासी दाहक ।
या समाधानावीण सार्थक । नव्हे नव्हेचि जीवा ॥ ११ ॥
तेचि ऐक गा सीतापती । तया समाधान अस्त्राची संपत्ति ।
प्राप्त होईल जीवा प्रती । शिवसद्गुरूच्या कृपें ॥ १२ ॥


तुभ्यं दास्यति तेन त्वं शत्रून् हत्वाऽऽप्स्यसि प्रियाम् ।
तसय्वास्त्रस्य माहत्मात् समुद्रं शोषयिष्यसि ॥ ३५ ॥


तें अस्त्र तुज सदाशिव । देईल जेणें मरती रिपु सर्व ।
मग तुझी प्रिया तुजला अपूर्व । पावेल अनायासें ॥ १३ ॥
तया अस्त्राचें माहात्म्यें कडून । समुद्र अवघा करिसी शोषण ।
हें सत्य सत्य त्रिवचन । अन्यथा नव्हे ॥ १४ ॥
तुज म्यां विरजादीक्षा हे दिधली । ते तुवां पाहिजे अनुष्टिली ।
ध्यान धारणा जितुकी बोलिली । हा तरी धर्म मनाचा ॥ १५ ॥
सहस्रनामें स्तुतिस्तवन । हें तरी वाणीचें अनुष्ठान ।
स्नान शौचादि उपोषण । हा नियम कायेचा ॥ १६ ॥
एवं मन वाणी आणि कायिक । दीक्षा आचरावी निश्चयात्मक ।
तुझी घेऊनिया वर्तणूक । जनही तैसें आचरती ॥ १७ ॥
मुख्य मनोधर्म आवडे गुरुशिवा । अत्यम्त प्रेमें प्रगटेल जीवा ।
परी करणें लागे कायिक सेवा । आणि वाणीचें भजन ॥ १८ ॥
हे एकमेका साह्यभूत । एकामुळें एक दृढ होत ।
तस्मात् अनुष्ठावें हें समस्त । बोलिल्या न्यायें ॥ १९ ॥
तूं जरी ऐसा दीक्षित होसी । अन्य व्यवहार सर्व त्यागिसी ।
तरी शंकरगुरू प्रसन्न तुजसी । होऊन वरु देईल ॥ ३२० ॥
आणि निज पाशुपतास्त्र आपुलें । जें समाधान पूर्व श्लोकीं बोलिलें ।
तें तुज समर्पील वहिलें । जेणें जीव मुक्त होती ॥ २१ ॥
कामक्रोधादिकां सहित । अहंकाररावण हा उन्मत्त ।
हे वैरी मरतील समस्त । या अस्त्राच्या दर्शनें ॥ २२ ॥
एवं हे शत्रु मेलियावरी । तुझी जे स्वानुभूती सुंदरी ।
प्राप्त होईल तुज झडकरी । येथें संदेह नाहीं ॥ २३ ॥
बहु कासया गा बोलणें । हा भवसागर अपार गहन ।
निमिष्यांत करिसी शोषण । या अभिन्न ज्ञानास्त्र सामर्थ्यें ॥ २४ ॥
या ज्ञानअस्त्राचें सामर्थ्य । तुजसी बोलेल यथार्थ ।
तेंचि ऐकतां पुरती मनोरथ । श्रोतयां वक्त्यांचे ॥ २५ ॥


संहारकाले जगतां अस्त्रं तत्पार्वतीपतेः ।


सर्व संहार जेव्हां वोडवे । तरी याचि अस्त्रयोगें सदाशिवें ।
हें जगत् सर्व ग्रासून समरसावें । आपणही निजरूपीं ॥ २६ ॥
जेवीं प्रकाश अंधकारासी । तेवी हें ज्ञान अज्ञान ग्रासी ।
उरोंचि नेदी कांहीं भेदासी । त्रिपुटी सहित ॥ २७ ॥
बद्धतेचा भरिला घोट । मोक्षालागींही तेचि वाट ।
द्वैताचे करी सरसपाट । आपणासहित ॥ २८ ॥
शिवानुभवें जीवासी ग्रासी । शेखीं उरोंचि नेदी ईश्वरासी ।
द्वैताद्वैत अखंडैकरसीं । बोलतांचि न ये ॥ २९ ॥
आहे नाहींशब्देंवीण । जें कांहीं उरे समाधान ।
तेथें अज्ञान ज्ञान विज्ञान । बोलतांचि न ये ॥ ३३० ॥
ऐसें आत्यंतिक प्रलयाचें लक्षण । होत असे अस्त्रें येणें ।
नामरूपादि द्वैतपण । उरोंचि नेदी सहसा ॥ ३१ ॥
आणि नित्यप्रलय महाप्रलय । येणेंचि अस्त्रें संहार होय ।
सर्व जगताचा करी क्षय । तम अहंकार ॥ ३२ ॥
मग आपणही स्वरूपीं समरसे । आहे तें असतचि असे ।
या अस्त्राचें माहात्म्य ऐसें । दुजें उरोंच नेदी ॥ ३३ ॥
महाप्रलयीं हरपती सारे । परी उत्पत्तीचें बीज उरे ।
तैसें हें ज्ञान नव्हे साचोकारें । अज्ञान बीज दग्ध करी ॥ ३४ ॥
सुषुप्तींत कामक्रोधादि मरती । परी जागृत होतांचि उद्भवती ।
कारण कीं अज्ञानाची समाप्ती । झाली नाहीं ॥ ३५ ॥
अज्ञान नासावया समर्थ ज्ञन । तेंचि पाशुपतास्त्र गहन ।
प्राप्त न होतां जीवालागून । दुजा उपाय कैंचा ॥ ३६ ॥


तदलाभे दानवानां जयस्तव सुदुर्लभः ॥ ३६ ॥
तस्माल्लब्धं तदेवास्त्रं शरणं याहि शंकरम् ।
इति श्रीपद्मपुराणे शिवगीतासू योगशास्त्रे अगस्ती
राघवसंवादे विरजादीक्षानिनाम तृतीयोऽध्यायः ॥


पाशुपतास्त्राचा जरी अलाभ । तरी राक्षसांसवें जय हा दुर्लभ ।
तस्मात् शंकरा शरण जाऊन स्वयंभ । लब्ध्वास्त्र होईं ॥ ३७ ॥
एवं सिद्धांताचें निरूपण । झालें जें पूर्ण समाधान ।
ऐशिये अभिन्नज्ञानावांचून । जय प्राप्त कैंचा ॥ ३८ ॥
कामक्रोधादि हे असुर । आणि तम रजादि अहंकार ।
मातले असती अतिदुर्धर । अज्ञान सागरीं ॥ ३९ ॥
बहु काय रामा तुज बोलावें । हें ज्ञान जरी प्राप्त नव्हे ।
तरी या पासून जय न पावावे । कदापिही तुवां ॥ ३४० ॥
तूम् जरी अंगें ईश्वर असतां । शिवगुरूची नव्हे प्रसन्नता ।
अज्ञान जिंकावयाची वार्ता । बोलोंचि नको ॥ ४१ ॥
हे सुतराम दुर्लभ असे । दुजा उपावचि येथें नसे ।
तरी शरण जाईं अति विश्वासें । स्जोवगुरूसी ॥ ४२ ॥
तया शिवग्रूच्या प्रसादें । ज्ञानास्त्र पावावें संवादें ।
तरी हे दुष्ट राक्षस वधून आनंदें । जीव हे मुक्त होती ॥ ४३ ॥
ज्ञानें अज्ञान नासतां । कामादि अहंकाराचे होय धाता ।
तुझी स्वानुभूती तुजसी सीता । प्राप्त होय अनायासें ॥ ४४ ॥
आतां पुढील अध्यायीं जीवांसाट्ही । राम करील साधन आटाटी ।
प्रगट होईल गुरु धूर्जटी । तरी अधिकारीहो सावध ॥ ४५ ॥
इति श्रीमद् वेदेश्वरी । शिवगीता पद्मपुराणांतरीं ।
अगस्ति राघव संवादानुकारीं । तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
ॐ ॐ ॐ
ओवी संख्या ३४५ ॥ श्लोक ३७ ॥