॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ चतुर्दशोऽध्यायः - अध्याय चवदावा ॥

श्रीराम उवाच -
भगवन्यदि ते रूपं सच्चिदानन्दविग्रहम् ।
निष्कलं निष्क्रियं शान्तं निरवद्यं निरञ्जनम् ॥ १ ॥
सर्वधर्मविहीनं च मनोवाचामगोचरम् ।
सर्वव्यापितयात्मानमीक्षते सर्वतः स्थितम् ॥ २ ॥
राम म्हणाला, हे भगवन् ! यद्यपि तुझे स्वरूप सच्चिदानंदात्मक, निरवयव, क्रियाशून्य, शांत, निर्दोष, निःसंग, सर्वधर्महीन, मनाला व वाणीला अगोचर असे आहे, तथापि तूं सर्वव्यापक असल्यामुळे, सर्वत्र असणार्‍या अशा तुला जीव आत्मत्वाने पाहतो. १-२.

आत्मविद्यातपोमूलं तद्ब्रह्मोपनिषत्परम् ।
अमूर्तं सर्वभूतात्माकारं कारणकारणम् ॥ ३ ॥
यत्तददृश्यमग्राह्यं तद्ग्राह्यं वा कथं भवेत् ।
अत्रोपायमजानानस्तेन खिन्नोऽस्मि शंकर ॥ ४ ॥
आत्मविद्या आणि तप हीच ज्याच्या प्राप्तीचीं साधनें व जे उपनिषदांचे मुख्य सार, अमूर्त, सर्व जीवांचा आकार असलेलें, सर्वांचे कारण, जी माया तिचे देखील कारण, अदृश्य व इंद्रियांनीं अग्राह्य ते ब्रह्म ग्राह्य कसें होईल ? अशा ब्रह्माचे ज्ञानाविषयी मला उपाय समजत नाही. यामुळे मी खेद पावत आहे. ३-४

श्रीभगवानुवाच -
शृणु राजन्प्रवक्ष्यामि तत्रोपायं महाभुज ।
सगुणोपासनाभिस्तु चित्तैकाग्र्यं विधाय च ॥ ५ ॥
स्थूलसौरांभिकान्यायात्तत्र चित्तं प्रवर्तयेत् ।
तस्मिन्नन्नमये पिण्डे स्थूलदेहे तनूभृताम् ॥ ६ ॥
जन्मव्याधिजरामृत्युनिलये वर्तते दृढा ॥ ७ ॥
आत्मबुद्धिरहंमानात्कदाचिन्नैव हीयते ।
आत्मा न जायते नित्यो म्रियते वा कथंचन ॥ ८ ॥
शंकर म्हणाले, हे महाबाहो ! नृपा, सांगतो ऐक. प्रथम सगुणमूर्तीची उपासना करून तिच्या योगानें चित्ताची एकाग्रता करून नंतर सौरांभिकान्यायानें [तृषार्त मनुष्याला मृगजल दाखवून हेंच उदक अशा प्रतारणेनें बरेच लांब नेऊन मग वास्तविक उदक दाखविणे] निर्गुणस्वरूपीं चित्ताची प्रवृत्ति करावी. तो प्रकार असा - अन्नाचाच पिंड, जन्म- व्याधि- जरा- मृत्यु यांचे केवळ घर अशा ह्या स्थूल देहावर प्राण्याची अहंभावाने आत्मबुद्धि दृढ झालेली आहे, ती कधीच नाहीशी होत नाहीं. आत्मा कधीं जन्माला येत नाही व मरतही नाहीं, तो नित्य एकरूप आहे. ५-८.

संजायतेऽस्ति विपरिणमते वर्धते तथा ।
क्षीयते नश्यतीत्येते षड्भावा वपुषः स्मृताः ॥ ९ ॥
उत्पन्न होणें, अस्तित्व पावणें, वाढणें, विशेष परिणाम पावणें, क्षीण होणे आणि नाश पावणें, या सहा अवस्था देहाला आहेत. ९.

आत्मनो न विकारित्वं घटस्थनभसो यथा ।
एवमात्मावपुस्तस्मादिति संचिन्तयेद्बुधः ॥ १० ॥
घटांतील आकाश जसे विकाररहित तसा आत्मा विकाररहित आहे. देह आणि आत्मा ह्यांचे धर्म परस्पर विरुद्ध असून, अज्ञजन अविद्येच्या योगाने देह मी असे मानतात. आत्मा स्थूलदेहाहून भिन्न आहे असेच शहाण्या माणसाने जाणावें. १०.

मूषानिक्षिप्तहेमाभः कोशः प्राणमयोऽत्र तु ।
वर्ततेऽन्तरतो देहे बद्धः प्राणादिवायुभिः ॥ ११ ॥
कर्मेन्द्रियैः समायुक्तश्चलनादिक्रियात्मकः ।
क्षुत्पिपासापराभूतो नायमात्मा जडो यतः ॥ १२ ॥
मुशीत रस करून ओतलेल्या सुवर्णासारखा हा प्राणमयकोश देहामध्ये प्राणादि वायूंनी बद्ध, कर्मेंद्रियांचे योगाने चलनादि क्रिया करणारा, क्षुधा व पिपासा [ तहान ] ह्या विकारांनी युक्त, जड आहे म्हणून हा आत्मा नव्हे. ११-१२.

चिद्रूप आत्मा येनैव स्वदेहमभिपश्यति ।
आत्मैव हि परं ब्रह्म निर्लेपः सुखनीरधिः ॥ १३ ॥
आत्मा चैतन्यरूप आहे, या आत्म्याने जीव देहाला पाहतो. आत्मा हा परब्रह्म, सर्वांपासून अलिप्त व सुखाचा समुद्र असा आहे. १३.

न तदश्नाति किंचैतत्तदश्नाति न कश्चन ॥ १४ ॥
हा जड कोश अर्थात् अविद्या कशालाही ग्रासू शकत नाहीं, ब्रह्म मात्र सर्वाला ग्रासूं शकतें. १४.

ततः प्राणमये कोशे कोशोऽस्त्येव मनोमयः ।
स संकल्पविकल्पात्मा बुद्धीन्द्रियसमायुतः ॥ १५ ॥
त्या प्राणमय कोशाच्या आंत मनोमयकोश आहे. तो संकल्पविकल्परूप आहे आणि बुद्धि व इंद्रिये यांनी युक्त आहे. १५,

कामः क्रोधस्तथा लोभो मोहो मात्सर्यमेव च ।
मदश्चेत्यरिषड्वर्गो ममतेच्छादयोऽपि च ।
मनोमयस्य कोशस्य धर्मा एतस्य तत्र तु ॥ १६ ॥
काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि मद हा अरिषड्वर्ग, तसेच ममत्व, इच्छा इत्यादि हे मनोमय कोशाचे धर्म होत, १६.

या कर्मविषया बुद्धिर्वेदशास्त्रार्थनिश्चिता ।
सा तु ज्ञानेन्द्रियैः सार्धं विज्ञानमयकोशतः ॥ १७ ॥
वेदशास्त्रादिकांचे ठायीं निश्चय पावलेली अशी जी कर्मविषयक बुद्धि आहे ती व ज्ञानेंद्रियें मिळून विज्ञानमयकोश होतो. १७.

इह कर्तृत्वाभिमानी स एव तु न संशयः ।
इहामुत्र गतिस्तस्य स जीवो व्यावहारिकः ॥ १८ ॥
ह्या विज्ञानमयकोशांत जीवाचा कर्तृत्वाभिमान वाहतो. त्यालाच इहपरलोकीं गति प्राप्त होते; त्यालाच व्यावहारिक जीव असे म्हणतात. १८.

व्योमादिसात्त्विकांशेभ्यो जायन्ते धीन्द्रियाणि तु ।
व्योम्नः श्रोत्रं भुवो घ्राणं जलाज्जिह्वाथ तेजसः ॥ १९ ॥
चक्षुर्वायोस्त्वगुत्पन्ना तेषां भौतिकता ततः ॥ २० ॥
( सप्तदश कलात्मक लिंगशरीर सांगतात-) आकाशादि पंचमहाभूतांच्या सात्विकांशांपासून ज्ञानेंद्रियें उत्पन्न झाली ती अशीं - आकाशापासून श्रोत्र, भूमीपासून घ्राण, उदकापासून जिव्हा, तेजापासून चक्षु, वायूपासून त्वचा, म्हणून हीं इंद्रियें पांचभौतिक आहेत. १९-२०.

व्योमादीनां समस्तानां सात्त्विकांशेभ्य एव तु ।
जायन्ते बुद्धिमनसी बुद्धिः स्यान्निश्चयात्मिका ॥ २१ ॥
सर्व भूतांचे सात्त्विकांश मिळून बुद्धि आणि मन हीं उत्पन्न होतात; त्यांत बुद्धि निश्चयात्मक व मन संशयात्मक आहे. २१.

वाक्पाणिपादपायूपस्थानि कर्मेन्द्रियाणि तु ।
व्योमादीनां रजोंऽशेभ्यो व्यस्तेभ्यस्तान्यनुक्रमात् ॥ २२ ॥
वाणी, हस्त, पाय, गुद आणि लिंग ही पांच कर्मेंद्रियें, आकाशादि भूतांच्या निरनिराळ्या रजोगुणांपासून उत्पन्न झाली. २२.

समस्तेभ्यो रजोंऽशेभ्यः पञ्च प्राणादिवायवः ।
जायन्ते सप्तदशकमेवं लिङ्गशरीरकम् ॥ २३ ॥
आणि सर्वांचे रजोगुण मिळून त्या रजोगुणांपासून प्राणादिं पांच वायु उत्पन्न झाले; याप्रमाणे पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेंद्रियें, पांच प्राण, मन व बुद्धि मिळून सतरा अवयवांचे लिंगशरीर आहे. २३.

एतल्लिङ्गशरीरं तु तप्तायःपिण्डवद्यतः ।
परस्पराध्यासयोगात्साक्षिचैतन्यसंयुतम् ॥ २४ ॥
तदानन्दमयः कोशो भोक्तृत्वं प्रतिपद्यते ।
विद्याकर्मफलादीनां भोक्तेहामुत्र स स्मृतः ॥ २५ ॥
हे लिंगशरीर, तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यासारखे आहे म्हणून, परस्पर अध्यास होऊन साक्षिचैतन्यानें युक्त होते तेव्हां त्याला आनंदमय कोश म्हणतात. तो कर्तृत्व पावतो; ज्ञान व कर्में ह्यांच्या कर्मफलांचा इहलोकीं व परलोकीं तोच भोक्ता आहे. २४-२५.

यदाध्यासं विहायैष स्वस्वरूपेण तिष्ठति ।
अविद्यामात्रसंयुक्तः साक्ष्यात्मा जायते तदा ॥ २६ ॥
जेव्हां निद्रावस्थेत हाच आत्मा लिंगशरीराचा अध्यास सोडून केवळ स्वस्वरूपाने अविद्यासंयुक्त असा रहातो, तेव्हां साक्षी ही संज्ञा पावतो. २६.

द्रष्टान्तःकरणादीनामनुभूतेः स्मृतेरपि ।
अतोऽन्तःकरणाध्यासादध्यासित्वेन चात्मनः ।
भोक्तृत्वं साक्षिता चेति द्वैधं तस्योपपद्यते ॥ २७ ॥
अंतःकरणादि इंद्रिये, तशाच त्या इंद्रियांच्या अनुभव आणि स्मृति या वृत्ति यांचा हाच जीव द्रष्टा आहे. म्हणून अंतःकरणाच्या अध्यासामुळे आत्म्याला साक्षित्व आणि भोक्तृत्व ही दोन्ही योग्य होतात. अंतःकरणाचा अध्यास असेल तेव्हां साक्षित्व आणि अंतःकरणाचा अध्यास नसेल तेव्हां भोक्तृत्व. २७.

आतपश्चापि तच्छाया तत्प्रकाशे विराजते ।
एको भोजयिता तत्र भुङ्क्तेऽन्यः कर्मणः फलम् ॥ २८ ॥
आतप [=प्रकाशरूप ईश्वर ] आणि छाया [=जीव ] हे दोन्ही ब्रह्मप्रकाशानेंच प्रकाशित आहेत; त्यांत ईश्वर हा जीवाकडून कर्मफलें भोगविणारा आणि जीव भोगणारा. २८,

क्षेत्रज्ञं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु ।
बुद्धिं तु सारथिं विद्धि प्रग्रहं तु मनस्तथा ॥ २९ ॥
क्षेत्रज्ञ-जीवात्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धि हा सारथि, मन हा लगाम आहे असे जाण. २९.

इन्द्रियाणि हयान्विद्धि विषयांस्तेषु गोचरान् ।
इन्द्रियैर्मनसा युक्तं भोक्तारं विद्धि पूरुषम् ॥ ३० ॥
इंद्रियें हे अश्व आणि शब्दादि विषय हे त्यांचे फिरण्याचे प्रदेश; आणि जेव्हां आत्मा इंद्रियांशी व मनाशीं युक्त होतो, तेव्हां तो भोक्ता होतो असे जाण. ३०.

एवं शान्त्यादियुक्तः सन्नुपास्ते यः सदा द्विजः।
उद्घाट्योद्घाट्यैकमेकं यथैव कदलीतरोः ॥ ३१ ॥
वल्कलानि ततः पश्चाल्लभते सारमुत्तमम् ।
तथैव पञ्चकोशेषु मनः संक्रामयन्क्रमात् ।
तेषां मध्ये ततः सारमात्मानमपि विन्दति ॥ ३२ ॥
याप्रमाणे शांत्यादि गुणांनी युक्त असा होऊन जो पंचकोशविवेकानें उपासन करील तो, जसे केळीचे एक एक सोप काढून टाकलें म्हणजे आंतील सार प्राप्त होते, तद्वत् अंतःकरणाने अन्नमयादिपंचकोशांचे अनुक्रमानें निराकरण केले म्हणजे, त्यांच्या आंत सारभूत जो आत्मा तो प्राप्त होतो. ३१-३२.

एवं मनः समाधाय संयतो मनसि द्विजः ।
अथ प्रवर्तयेच्चित्तं निराकारे परात्मनि ॥ ३३ ॥
ह्याप्रमाणे पंचकोशांचा विवेक झाल्यानंतर मनाचा व इंद्रियांचा निग्रह करून निराकार अशा परब्रह्माचे ठिकाणी मनाची योजना करावी. ३३.

ततो मनः प्रगृह्णाति परमात्मानमव्ययम् ।
यत्तदद्रेश्यमग्राह्यमस्थूलाद्युक्तिगोचरम् ॥ ३४ ॥
म्हणजे मन, वृत्तिरूपानें नाशरहित, अदृश्य, अग्राह्य, स्थूलत्वसूक्ष्मत्वादि धर्मविरहित अशा परमात्म्याचेच ग्रहण करते. ३४.

श्रीराम उवाच -
भगवञ्छ्रवणे नैव प्रवर्तन्ते जनाः कथम् ।
वेदशास्त्रार्थसम्पन्ना यज्वानः सत्यवादिनः ॥ ३५ ॥
राम म्हणाला, हे भगवन् ! वेदशास्त्रार्थसंपन्न, मोठमोठे यज्ञ करणारे, सत्यवादी असे लोकही श्रवणाविषयीं कां प्रवृत्त होत नाहींत ? ३५.

शृण्वन्तोऽपि तथात्मानं जानते नैव केचन ।
ज्ञात्वापि मन्वते मिथ्या किमेतत्तव मायया ॥ ३६ ॥
कित्येक श्रवण करूनही आत्मस्वरूप जाणत नाहींत, कित्येक जाणूनही खोटें मानतात. हे कसें ? ही तुझी माया की काय ? ३६.

श्रीभगवानुवाच -
एवमेव महाबाहो नात्र कार्या विचारणा ।
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ॥ ३७ ॥
शंकर म्हणाले, हे महाबाहो, तूं म्हणतोस तेच खरें, ह्यांत शंका नाहीं. मी जो देव, त्या माझी ही त्रिगुणात्मक माया उल्लंघन करणे फार कठिण आहे. ३७.

मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ।
अभक्ता ये महाबाहो मम श्रद्धा विवर्जिताः ॥ ३८ ॥
फलं कामयमानास्ते चैहिकामुष्मिकादिकम् ।
क्षयिष्ण्वल्पं सातिशयं यतः कर्मफलं मतम् ॥ ३९ ॥
तदविज्ञाय कर्माणि ये कुर्वन्ति नराधमाः ।
मातुः पतन्ति ते गर्भे मृत्योर्वक्त्रे पुनः पुनः ॥ ४० ॥
जे मलाच शरण येतात ते ह्या मायेला तरतात. हे महाबाहो, जे अभक्त, माझ्यावर ज्यांची श्रद्धा नाहीं, ते ऐहिक व पारलौकिक फलांची इच्छा करतात, ( परंतु ) कर्मफल स्वल्प कालांत नाश पावणारें, अल्प व ज्याच्याहून मोठी सुखे आहेत असे आहे हे न जाणून, जे नराधम कर्मेंच कारतात, ते पुनः पुनः मातेच्या गर्भात जातात व मृत्युमुखांत पडतात. ३८-४०.

नानायोनिषु जातस्य देहिनो यस्यकस्यचित् ।
कोटिजन्मार्जितैः पुण्यैर्मयि भक्तिः प्रजायते ॥ ४१ ॥
नानायोनीमध्ये जन्म पावणार्‍या त्या प्राण्यांपैकी एखाद्याची कोट्यवधि जन्मांमध्ये संपादन केलेल्या पुण्यकर्माचे योगाने माझ्या ठिकाणी भक्ति उत्पन्न होते. ४१.

स एव लभते ज्ञानं मद्‌भक्तः श्रद्धयान्वितः ।
नान्यकर्माणि कुर्वाणो जन्मकोटिशतैरपि ॥ ४२ ॥
आणि मग इतर सर्व कर्मांचा त्याग करून भक्तिपुरःसर नित्य माझेच आराधन करील, तर त्यालाच आत्मज्ञान प्राप्त होईल, मग एका जन्मानें प्राप्त होवो अथवा कोट्यवध जन्मांनी होवो. ४२.

ततः सर्वं परित्यज्य मद्‌भक्तिं समुदाहर ।
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ॥ ४३ ॥
म्हणून तूं सर्व सोडून माझी भक्ति कर, ( माझ्या भक्तीशी इतर कर्तव्यांचा जेव्हां विरोध येईल तेव्हां ) तूं ते सर्व धर्म सोडून दे आणि फक्त मला एकट्याला शरण ये. ४३.

अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ।
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ॥ ४४ ॥
यत्तपस्यसि राम त्वं तत्कुरुष्व मदर्पणम् ।
ततः परतरा नास्ति भक्तिर्मयि रघूत्तम ॥ ४५ ॥
म्हणजे मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. मी कसा मुक्त होईन ह्याविषयीं तूं शोक करू नकोस. हे रामा, तूं जें कांहीं कर्म करशील, जें खाशील, जें हवन करशील, जें दान करशील, जें तप करशील, ते सर्व मला अर्पण कर. हे रघूत्तमा, याहून अधिक श्रेष्ठ अशी माझी भक्ति दुसरी नाहीं. ४४-४५.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
पञ्चकोशोपपादनं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
॥ इति चतुर्दशोध्यायः ॥ १४ ॥

GO TOP