॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ त्रयोदशोऽध्यायः - अध्याय तेरावा ॥

सूत उवाच -
एवं श्रुत्वा कौसलेयस्तुष्टो मतिमतां वरः ।
पप्रच्छ गिरिजाकान्तं सुभगं मुक्तिलक्षणम् ॥ १ ॥
सूत म्हणाला, हे श्रवण करून परम बुद्धिमान् असा रामचंद्र अत्यंत संतुष्ट होऊन पुनः पार्वतीपतीप्रत मुक्तीचे उत्तम लक्षण विचारिता झाला. १.

श्रीराम उवाच -
भगवन्करुणाविष्टहृदय त्वं प्रसीद मे ।
स्वरूपलक्षणं मुक्तेः प्रब्रूहि परमेश्वर ॥ २ ॥
राम म्हणाला, हे भगवन् ! तुझे हृदय करुणेने भरलेले आहे, तूं मला प्रसन्न हो आणि हे परमेश्वरा, मुक्तीचे स्वरूप मला सांग. २.

श्रीभगवानुवाच -
सालोक्यमपि सारूप्यं सार्ष्ट्यं सायुज्यमेव च ।
कैवल्यं चेति तां विद्धि मुक्तिं राघव पञ्चधा ॥ ३ ॥
भगवान् शंकर म्हणाले, है राघवा, सालोक्य, सारूप्य, सार्ष्ट्य [ समानैश्वर्य ], सायुज्य आणि कैवल्य अशी पांच प्रकारची मुक्ति आहे. ३.

मां पूजयति निष्कामः सर्वदा ज्ञानवर्जितः ।
स मे लोकं समासाद्य भुङ्क्ते भोगान्यथेप्सितान् ॥ ४ ॥
जो सर्वदा ज्ञानरहित असून केवळ निष्काम बुद्धीनें माझी पूजा करतो तो माझ्या लोकीं जाऊन ईप्सित भोग भोगतो [ सालोक्य पावतो ]. ४.

ज्ञात्वा मां पूजयेद्यस्तु सर्वकामविवर्जितः ।
मया समानरूपः सन्मम लोके महीयते ॥ ५ ॥
जो माझे स्वरूप जाणून, निष्कामबुद्धीनें मला भजेल, तो माझ्याशी समान असे स्वरूप पावून माझ्या लोकीं जाऊन श्रेष्ठता पावतो [ सारूप्य पावतो ]. ५.

इष्टापूर्तादि कर्माणि मत्प्रीत्यै कुरुते तु यः ।
यत्करोति यदश्नाति यज्जुहोति ददाति यत् ॥ ६ ॥
यत्तपस्यति तत्सर्वं यः करोति मदर्पणम् ।
मल्लोके स श्रियं भुङ्क्ते मत्तुल्यं प्राभवं भजेत् ॥ ७ ॥
जो इष्टापूर्तादि कर्मे मत्प्रीत्यर्थ करतो, तसेच जें करतो, जें भक्षितो, जें अग्नींत हवन करतो, जे देतो, जें तप करतो, ते सर्व मला अर्पण करतो तो माझ्या सारखें ( जगत्कर्तृत्वादिव्यतिरिक्त ) ऐश्वर्य पावून माझ्या लोकीं वैभव भोगतो. ६-७.

यस्तु शान्त्यादियुक्तः सन्मामात्मत्वेन पश्यति ।
स जायते परं ज्योतिरद्वैतं ब्रह्म केवलम् ।
आत्मस्वरूपावस्थानं मुक्तिरित्यभिधीयते ॥ ८ ॥
जो शांत्यादिकांनी युक्त होऊन मला आत्मरूप पाहतो, तो अद्वैत, स्वप्रकाश असें जें ब्रह्म तद्‌रूप होतो. हे आत्मस्वरूपावस्थान होय, यालाच मुक्ति असे म्हणतात. ८.

सत्यं ज्ञानमनन्तं सदानन्दं ब्रह्मकेवलम् ।
सर्वधर्मविहीनं च मनोवाचामगोचरम् ॥ ९ ॥
सत्य, ज्ञान, अनंत, आनंद इत्यादि लक्षणयुक्त असे ब्रह्म (आहे असे पूर्वी वर्णन केले परंतु ) वस्तुतः तें सर्वधर्मविहीन आहे. ते मनाला व वाणीला अगोचर आहे. ९.

सजातीयविजातीयपदार्थानामसंभवात् ।
अतस्तद्व्यतिरिक्तानामद्वैतमिति संज्ञितम् ॥ १० ॥
ब्रह्माचे ठायीं सजातीय अथवा विजातीय पदार्थांचा असंभव असल्यामुळे, तद्‌व्यतिरिक्त वस्तूंचा अभावच आहे, म्हणून ब्रह्माला अद्वैत ही संज्ञा आहे. १०.

मत्वा रूपमिदं राम शुद्धं यदभिधीयते ।
मय्येव दृश्यते सर्वं जगत्स्थावरजङ्गमम् ॥ ११ ॥
हे रामा ! हें जें शुद्ध ब्रह्मरूप वर्णिलें, हें आत्मत्वाने जाणलें म्हणजे ब्रह्मरूप होतो. हे स्थावरजंगमात्मक संपूर्ण जगत् माझ्या स्वरूपींच दिसत आहे. ११.

व्योम्नि गन्धर्वनगरं यथा दृष्टं न दृश्यते ।
अनाद्यविद्यया विश्वं सर्वं मय्येव कल्प्यते ॥ १२ ॥
जसे आकाशांत गंधर्वनगर दिसत असूनही त्याच्याविषयीं मिथ्यात्वप्रतीति आहे, तद्वत् अनादि अविद्येचे योगानें सर्व विश्वाची माझे ठिकाणीं कल्पना केली जाते. १२.

मम स्वरूपज्ञानेन यदाऽविद्या प्रणश्यति ।
तदैक एव वर्त्तेऽहं मनोवाचामगोचरः ॥ १३ ॥
जेव्हां माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाने अविद्या नाश पावते, तेव्हां मनाला व वाणीला अगोचर असा एकच मी राहतो. १३.

सदैव परमानन्दः स्वप्रकाशश्चिदात्मकः।
न कालः पञ्चभूतानि न दिशो विदिशश्च न ॥ १४ ॥
मदन्यन्नास्ति यत्किञ्चित्तदा वर्त्तेऽहमेकलः ॥ १५ ॥
मी सर्वदा परमानंद, स्वप्रकाश, चैतन्यरूप असाचे आहे. काल, पंचभूते, दिशा, विदिशा, अथवा इतर कांहींही माझ्याहून भिन्न असे नसते, तेव्हा माझ्या केवळ स्वरूपाचीच प्रतीति येते. १४-१५.

न संदृशे तिष्ठति मे स्वरूपं
    न चक्षुषा पश्यति मां तु कश्चित् ।
हृदा मनीषा मनसाभिक्लृप्तं
    ये मां विदुस्ते ह्यमृता भवन्ति ॥ १६ ॥
माझे स्वरूप दृष्टीला गोचर असे नाहीं, चर्मचक्षूने कोणी मला पहावयास समर्थ नाहीं. मनावर ताबा चालविणार्‍या [ मनीषा ] हृदयाचे ठिकाणी असलेल्या बुद्धीने [हृदा] मननाचे योगाने [ मनसा ] मी प्रकाशित होतो. जे मला जाणतात ते अमृतत्व [ जन्ममृत्युरहितत्व] पावतात. १६.

श्रीराम उवाच -
कथं भगवतो ज्ञानं शुद्धं मर्त्यस्य जायते ।
तत्रोपायं हर ब्रूहि मयि तेऽनुग्रहो यदि ॥ १७ ॥
पुनः राम म्हणाला, हे हरा ! ईश्वराच्या ब्रह्मरूपाचे शुद्ध ज्ञान मनुष्याला कशाने होते ? तुझा जर माझ्यावर अनुग्रह आहे तर तो उपाय मला सांग. १७.

श्रीभगवानुवाच -
विरज्य सर्वभूयेभ्य आविरिंचिपदादपि ।
घृणां वितत्य सर्वत्र पुत्रमित्रादिकेष्वपि ॥ १८ ॥
शंकर म्हणाले, सर्वभूतांचे ठायीं विरक्ति पावून ब्रह्मलोकपर्यंत सर्व दिव्यलोक हे नश्वर आहेत; म्हणून, त्यांच्या सर्वांविषयी निरिच्छ व्हावे; पुत्र, मित्र, इत्यादिकांविषयी अनासक्ति धरावी. १८.

श्रद्धालुर्भक्तिमार्गेषु वेदान्तज्ञानलिप्सया ।
उपायनकरो भूत्वा गुरुं ब्रह्मविदं व्रजेत् ॥ १९ ॥
वेदान्त ज्ञानाच्या इच्छेने या मोक्षमार्गा विषयीं श्रद्धायुक्त होऊन, काहीं तरी हातांत ( समिधादि ) उपायन घेऊन ब्रह्मवेत्या गुरूला शरण जावें. १९.

सेवाभिः परितोष्यैनं चिरकालं समाहितः ।
सर्ववेदान्तवाक्यार्थं शृणुयात्सुसमाहितः ॥ २० ॥
चिरकाल, समाधानयुक्त होऊन सेवनाने गुरूला संतुष्ट करून, त्यापासून सर्व वेदांतवाक्यांचा अर्थ, अंतःकरण एकाग्र करून, श्रवण करावा. २०.

सर्ववेदान्तवाक्यानां मयि तात्पर्यनिश्चयम् ।
श्रवणं नाम तत्प्राहुः सर्वे ते ब्रह्मवादिनः ॥ २१ ॥
सर्व वेदांतवाक्यांचे तात्पर्य मत्परच अहे असा निश्चय करणे ह्यालाच ब्रह्मवादी श्रवण असे म्हणतात. २१.

लोहमण्यादिदृष्टान्तयुक्तिभिर्यद्विचिन्तनम् ।
तदेव मननं प्राहुर्वाक्यार्थस्योपबृंहणम् ॥ २२ ॥
त्या श्रवण केलेल्या अर्थाचे, लोहचुंबकादिकांच्या दृष्टांतादि युक्तिंनीं जें चिंतन करणे त्यालाच मनन असें म्हणतात. हे मनन केल्याने वाक्यार्थ स्पष्ट होतो. २२.

निर्ममो निरहंकारः समः संगवर्जितः।
सदा शान्त्यादियुक्तः सन्नात्मन्यात्मानमीक्षते ॥ २३ ॥
यत्सदा ध्यानयोगेन तन्निदिध्यासनं स्मृतम् ॥ २४ ॥
सर्वकर्मक्षयवशात्साक्षात्कारोऽपि चात्मनः ।
सर्वसंगपरित्याग करून, अहंता व ममता सोडून, सर्वत्र समान बुद्धि करून, शांत्यादि साधनसंपन्न होऊन, निरंतर ध्यानयोगानें आत्मस्वरूपींच आत्म्याचे ध्यान करणे, ह्याचे नांव निदिध्यासन. २३-२४.

कस्यचिज्जायते शीघ्रं चिरकालेन कस्यचित् ॥ २५ ॥
असे निदिध्यासन केले म्हणजे सर्व कर्मांचा क्षय होऊन आत्मसाक्षात्कार होतो. तो कोणाला त्वरित होतो व कोणाला चिरकालाने होतो इतकाच भेद. २५.

कूटस्थानीह कर्माणि कोटिजन्मार्जितान्यपि ।
ज्ञानेनैव विनश्यन्ति न तु कर्मायुतैरपि ॥ २६ ॥
कूटस्थ-संचित-कर्में हीं कोट्यवधि जन्मांत संपादन केलेली असली तथापि, ती ज्ञानानें तत्काल नाश पावतात. तीं लक्षावधि कर्मांनी देखील नाश पावत नाहींत २६.

ज्ञानादूर्ध्वं तु यत्किञ्चित्पुण्यं वा पापमेव वा ।
क्रियते बहु वाल्पं वा न तेनायं विलिप्यते ॥ २७ ॥
ज्ञानप्राप्तीनंतर हा जें कर्म करील ते पुण्य असो वा पाप असो, अल्प असो किंवा बहुत असो, त्यानें हा मुळीच लिप्त होत नाहीं. २७.

शरीरारम्भकं यत्तु प्रारब्धं कर्म जन्मिनः ।
तद्‌भोगेनैव नष्टं स्यान्न तु ज्ञानेन नश्यति ॥ २८ ॥
परंतु ज्या कर्माने हा विद्यमान देह प्राप्त झाला आहे, ते प्रारब्ध कर्म ज्ञानाने नाश पावत नाहीं. भोगानेच त्याचा नाश व्हावयाचा. २८.

निर्मोहो निरहंकारो निर्लेपः संगवर्जितः ।
सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
यः पश्यन्संचरत्येष जीवन्मुक्तोऽभिधीयते ॥ २९ ॥
जो मोहरहित झाला, देहावर ज्याचा अहंकार नाहीं, कोठेच ज्याच्या अंतःकरणाची आसक्ति नाहीं, भार्या पुत्रादिकांचा संग ज्याने सोडला, सर्व भूतीं आत्मा व सर्व भूतें आत्मस्वरूपीं आहेत असे जाणून केवळ प्रारब्धकर्माच्या क्षयाची वाट पहातच जो रहातो त्याला जीवन्मुक्त म्हणतात. २९.

अहिनिर्ल्वयनी यद्वद्द्रष्टुः पूर्वं भयप्रदा ।
ततोऽस्य न भयं किंचित्तद्वद्द्रष्टुरयं जनः ॥ ३० ॥
मग, सर्पाची कात सर्पाच्या शरीरावर असतां पहाणाराला भयदायक असते, तीच सर्पाच्या शरीरापासून मुक्त झाली म्हणजे जशी मुळीच भयप्रद होत नाहीं तसा हा जीवन्मुक्त पूर्वीं ज्यांना भयदायक होता त्यांनाही आतां भयदायक नाहीसा होतो. ३०.

यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येऽस्य वशं गताः ।
अथ मर्त्योऽमृतो भवत्येतावदनुशासनम् ॥ ३१ ॥
जेव्हा हृदयांतील संपूर्ण कामवासना नष्ट होऊन, मनुष्य वैराग्यसंपन्न होतो तेव्हांच तो अमृत [ मुक्त ] होतो. हेच मुख्य शिक्षण. ३१.

मोक्षस्य न हि वासोऽस्ति न ग्रामान्तरमेव वा ।
अज्ञानहृदयग्रन्थिनाशो मोक्ष इति स्मृतः ॥ ३२ ॥
मोक्ष म्हणून कांहीं लोक नाहीं, किंवा मोक्ष प्राप्तीला ग्रामांतरी जावे लागत नाही, तर अज्ञानाचा आणि हृदयाचा जो दृढ ग्रंथी झालेला असतो त्याचा नाश हाच मोक्ष. ३२.

वृक्षाग्रच्युतपादो यः स तदैव पतत्यधः ।
तद्वज्ज्ञानवतो मुक्तिर्जायते निश्चितापि तु ॥ ३३ ॥
वृक्षावर चढलेल्याचा पाय वृक्षावरून सुटला म्हणजे तो जसा तत्काल खाली पडतो तसें ज्याला ज्ञान प्राप्त झाले [=संसारवृक्षावरून ज्याचा पाय सुटला] तो निश्चयाने मुक्त होतो. ३३.

तीर्थं चाण्डालगेहे वा यदि वा नष्टचेतनः ।
पएरित्यजन्देहमिमं ज्ञानादेव विमुच्यते ॥ ३४ ॥
असा जीवन्मुक्त उत्तम तीर्थीं देहत्याग करो, अथवा चांडालाच्या घरीं देहत्याग करो, देहावसान झाल्याबरोबर ज्ञानाच्या बलानेच त्याला मुक्ति प्राप्त होते. ३४.

संवीतो येन केनाश्नन्भक्ष्यं वाभक्ष्यमेव वा ।
शयानो यत्र कुत्रापि सर्वात्मा मुच्यतेऽत्र सः ॥ ३५ ॥
मग तो जीवन्मुक्त, कसलेही वस्त्र परिधान करो (अथवा नग्न राहो), भक्ष्य अथवा अभक्ष्य कांहीं भक्षण करो, पाहिजे त्या ठिकाणी शयन करो, सर्वत्र आत्मभाव पहाणारा तो इहलोकींच मुक्त झालेला आहे. ३५.

क्षीरादुद्धृतमाज्यं तत्क्षिप्तं पयसि तत्पुनः ।
न तेनैवैकतां याति संसारे ज्ञानवांस्तथा ॥ ३६ ॥
जसे दुधांतून नवनीतरूपानें तूप निराळे काढले म्हणजे ते पुनः जरी त्यांत टाकलें तरी त्याचे मिश्रण कधी होत नाहीं, तसा ज्ञानी एकदा संसारापासून विरक्त झाला म्हणजे पुनः कधीच त्याच्या ठिकाणी आसक्त होत नाहीं, ३६.

नित्यं पठति योऽध्यायमिमं राम शृणोति वा ।
स मुच्यते देहबन्धादनायासेन राघव ॥ ३७ ॥
हे रघुकुलोत्पन्ना रामा ! जो हा अध्याय नित्य पठण करील अथवा श्रवण करील तो अनायासाने देहबंधनापासून मुक्त होईल. ३७.

अतः संयतचित्तस्त्वं नित्यं पठ महीपते ।
अनायासेन तेनैव सर्वथा मोक्षमाप्स्यसि ॥ ३८ ॥
म्हणून हे नृपा, नियतचित्त होत्साता तूं या अध्यायाचा नित्य पाठ कर, म्हणजे अनायासानें एवढ्याच साधनानें तूं खचित मुक्त होशील. ३८.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
मोक्षयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
॥ इति त्रयोदशोऽध्यायः १३ ॥





GO TOP