॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ पञ्चदशोऽध्यायः - अध्याय पंधरावा ॥

श्रीराम उवाच -
भक्तिस्ते कीदृशी देव जायते वा कथंचन ।
यया निर्वाणरूपं तु लभते मोक्षमुत्तमम् ।
तद् ब्रूहि गिरिजाकान्त मयि तेऽनुग्रहो यदि ॥ १ ॥
राम म्हणाला, हे गिरिजाकांता देवा, तुझी भक्ति कोणत्या प्रकारची आहे व ती कशी घडेल ? जिच्या योगाने निर्वाणरूपी उत्तम मोक्ष मिळतो ती भक्ति तुझा माझ्यावर अनुग्रह आहे याकरितां सांग. १.

श्रीभगवानुवाच -
यो वेदाध्ययनं यज्ञं दानानि विविधानि च ।
मदर्पणधिया कुर्यात्स मे भक्तः स मे प्रियः ॥ २ ॥
शंकर म्हणाले, जो वेदाध्ययन, यज्ञ, नानाप्रकारची दानें मदर्पण बुद्धीने करतो तो माझा भक्त व तो मला प्रिय आहे. २.

नर्यभस्म समादाय विशुद्धं श्रोत्रियालयात् ।
अग्निरित्यादिभिर्मन्त्रैरभिमन्त्र्य यथाविधि ॥ ३ ॥
उद्धूलयति गात्राणि तेन चार्चति मामपि ।
तस्मात्परतरा भक्तिर्मम राम न विद्यते ॥ ४ ॥
अग्निहोत्राचे पवित्र भस्म अग्निहोत्र्याच्या घरांतून आणून 'अग्निरिति भस्म' इत्यादि मंत्रांनीं यथाविधि अभिमंत्रण करून त्याने आपले शरीर उद्वर्तन करून, त्या भस्मानेच जो माझे अर्चन करतो, त्याहून हे रामा, श्रेष्ठ अशी माझी दुसरी कोणतीच भक्ति नाहीं. ३-४.

सर्वदा शिरसा कण्ठे रुद्राक्षान्धारयेत्तु यः ।
पञ्चाक्षरीजपरतः स मे भक्तः स मे प्रियः ॥ ५ ॥
जो नित्य मस्तकीं व कंठांत रुद्राक्ष धारण करून, 'नमः शिवाय' ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप करण्यांत रममाण असतो, तो माझा भक्त व तोच मला प्रिय आहे. ५.

भस्मच्छन्नो भस्मशायी सर्वदा विजितेन्द्रियः ।
यस्तु रुद्रं जपेन्नित्यं चिन्तयेन्मामनन्यधीः ॥ ६ ॥
स तेनैव च देहेन शिवः संजायते स्वयम् ।
जपेद्यो रुद्रसूक्तानि तथाथर्वशिरः परम् ॥ ७ ॥
कैवल्योपनिषत्सूक्तं श्वेताश्वतरमेव च ।
ततः परतरो भक्तो मम लोके न विद्यते ॥ ८ ॥
भस्म लावून, भस्मांत बसून, सर्वदा जितेंद्रिय, रुद्रजप करीत होत्साता, जो अनन्य बुद्धीनें सर्वदा माझे चिंतन करील, तो त्याच देहानें शिवरूप होतो. जो रुद्रसूक्तांचा जप करतो, तसेच अथर्वशीर्ष, कैवल्योपनिषत् आणि श्वेताश्वतरसूक्त यांचा जप करतो त्याहून इहलोकीं माझा दुसरा श्रेष्ठ भक्त नाहीं. ६-८.

अन्यत्र धर्मादन्यस्मादन्यत्रास्मात्कृताकृतात् ।
अन्यत्र भूताद्‌भव्याच्च यत्प्रवक्ष्यामि तच्छृणु ॥ ९ ॥
जें धर्माहून विलक्षण व अधर्माहूनही विलक्षण, जें कार्य नव्हे वे कारणही नव्हे, जे भूतकाली झालेले नव्हे व पुढे होणारे असेही नव्हे, ते तुला सांगतों ऐक. ९.

वदन्ति यत्पदं वेदाः शास्त्राणि विविधानि च ।
सर्वोपनिषदां सारं दध्नो घृतमिवोद्धृतम् ॥ १० ॥
जे पद वेद व सर्व शास्त्रे वर्णितात, दह्यापासून काढलेले लोणी तसे जें सर्व उपनिषदांचे सार, ज्या प्राप्तीच्या इच्छेनें ऋषि नित्य ब्रह्मचर्य आचरण करीत आहेत, ज्या पदाला ॐ असे म्हणतात. ते तुला मी संक्षेपाने सांगतो. १०-११.

यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति मुनयः सदा ।
तत्ते पदं संग्रहेण ब्रवीम्योमिति यत्पदम् ॥ ११ ॥
एतदेवाक्षरं ब्रह्म एतदेवाक्षरं परम् ।
एतदेवाक्षरं ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते ॥ १२ ॥
हेच अक्षर [ =अविनाशी] ब्रह्म, हेच परब्रह्म; हें अक्षर ब्रह्म जाणल्याने जीव ब्रहालकीं महत्त्व पावतो. १२.

छन्दसां यस्तु धेनूनामृषभत्वेन चोदितः ।
इदमेव पतिः सेतुरमृतस्य च धारणात् ॥ १३ ॥
ह्यालाच वेदरूप धेनूचा वृषभ, असे वेदांत सांगितले आहे. हाच सर्वांचा नियामक, ह्यापासून मोक्ष प्राप्त होतो, म्हणून हाच संसारसमुद्राचा सेतु आहे. १३.

मेधसा पिहिते कोशे ब्रह्म यत्परमोमिति ॥ १४ ॥
चतस्रस्तस्य मात्राः स्युरकारोकारकौ तथा ।
मकारश्चावसानेऽर्धमात्रेति परिकीर्तिता ॥ १५ ॥
पूर्वत्र भूश्च ऋग्वेदो ब्रह्माष्टवसवस्तथा ।
गार्हपत्यश्च गायत्री गङ्गा प्रातःसवस्तथा ॥ १६ ॥
ते काय ? तर मेदानें आच्छादित अशा कोशांत [ हृदयाकाशांत ] जे ओंकाररूप ब्रह्म तें त्याच्या चार मात्रा आहेत, अकार, उकार, मकार, आणि अंती अर्धमात्रा. पहिल्या अकाररूप मात्रेंत, भूर्लोक ऋग्वेद, ब्रह्मदेव, अष्टवसु, गार्हपत्य अग्नि, गायत्रीछंद, गंगानदी, आणि प्रातःसवन या आठ देवता राहतात. १४-१६.

द्वितीया च भुवो विष्णू रुद्रोऽनुष्टुब्यजुस्तथा ।
यमुना दक्षिणाग्निश्च माध्यन्दिनसवस्तथा ॥ १७ ॥
दुसर्‍या उकार मात्रेंत भुवर्लोक, विष्णु, रुद्र, अनुष्टुपछंद, यजुर्वेद, यमुना, दक्षिणाग्नि आणि माध्यंदिनसवन या देवता रहातात. १७.

तृतीया च सुवः सामान्यादित्यश्च महेश्वरः ।
अग्निराहवनीयश्च जगती च सरस्वती ॥ १८ ॥
तृतीयं सवनं प्रोक्तमथर्वत्वेन यन्मतम् ।
चतुर्थी यावसानेऽर्धमात्रा सा सोमलोकगा ॥ १९ ॥
तिसर्‍या मकार मात्रेंत स्वर्लोक, सामवेद, आदित्य, महेश्वर, आहवनीय अग्नि, जगतीछंद, सरस्वती नदी, तृतीयसन आणि अथर्ववेद ही आहेत. जी अंती मकाररूप अर्धमात्रा आहे ती सोमलोकीं असते. १८-१९.

अथर्वाङ्गिरसः संवर्तकोऽग्निश्च महस्तथा ।
विराट् सभ्यावसथ्यौ च शुतुद्रिर्यज्ञपुच्छकः ॥ २० ॥
तींत अथर्वांगिरसगाथा, संवर्तक नांवाचा प्रलय कालाचा अग्नि, महर्लोक, विराट छंद, सभ्य व आवसथ्य अग्नि आणि शुतुद्रिनदी आणि अखेरचा यज्ञ या देवता आहेत. २०.

प्रथमा रक्तवर्णा स्याद् द्वितीया भास्वरा मता ।
तृतीया विद्युदाभा स्याच्चतुर्थी शुक्लवर्णिनी ॥ २१ ॥
पहिली मात्रा रक्तवर्ण, दुसरी भास्वर, तिसरी विद्युद्वर्ण आणि चवथी शुभ्रवर्ण आहे. २१.

सर्वं जातं जायमानं तदोङ्कारे प्रतिष्ठितम् ।
विश्वं भूतं च भुवनं विचित्रं बहुधा तथा ॥ २२ ॥
सर्व उत्पन्न झालेले व पुढे होणारे, विचित्र, अनेक प्रकारचें हे सर्व जगत् ॐकारांत प्रतिष्ठित आहे. २२.

जातं च जायमानं यत्तत्सर्वं रुद्र उच्यते ।
तस्मिन्नेव पुनः प्राणाः सर्वमोङ्कार उच्यते ॥ २३ ॥
भूत व भविष्य सर्व रुद्ररूप आहे, त्या रुद्ररूपामध्ये प्राण आणि प्राणाचे ठायीं ओंकार म्हणून, रुद्र आणि ओंकार ह्यांत भेद नाहीं. २३.

प्रविलीनं तदोङ्कारे परं ब्रह्म सनातनम् ।
तस्मादोङ्कारजापी यः स मुक्तो नात्र संशयः ॥ २४ ॥
ते सनातन श्रेष्ठ ब्रह्म ओंकारांत लीन झालेलें आहे म्हणून जो निरंतर ओंकाराचा जप करतो तो मुक्त होतो यांत संदेह नाहीं, २४,

त्रेताग्नेः स्मार्तवह्नेर्वा शैवाग्नेर्वा समाहृतम् ।
भस्माभिमन्त्र्य यो मां तु प्रणवेन प्रपूजयेत् ॥ २५ ॥
तस्मात्परतरो भक्तो मम लोके न विद्यते ॥ २६ ॥
श्रौताग्नीचें, स्मार्ताग्नीचे अथवा शैवाग्नीचे भस्म घेऊन प्रणवाने अभिमंत्रण करून त्या भस्मानें जो माझें पूजन करील, त्यासारखा इहलोकीं माझा दुसरा भक्त नाहीं. २५-२६.

शालाग्नेर्दाववह्नेर्वा भस्मादायाभिमन्त्रितम् ।
यो विलिम्पति गात्राणि स शूद्रोऽपि विमुच्यते ॥ २७ ॥
गृहाग्नीचें अथवा दावाग्नीचें भस्म आणून, प्रणवाने अभिमंत्रण करून, त्यानें जो सर्वशरीराला लेप करतो, तो शूद्र असला तरी मुक्त होता. २७.

कुशपुष्पैर्बिल्वदलैः पुष्पैर्वा गिरिसंभवैः ।
यो मामर्चयते नित्यं प्रणवेन प्रियो हि सः ॥ २८ ॥
दर्भांकुर, बिल्वपत्रें किंवा वनांतील पुष्पें, ह्यांनी जो ॐकारमंत्राने नित्य माझी पूजा करतो तो मला प्रिय होतो. २८.

पुष्पं फलं समूलं वा पत्रं सलिलमेव वा ।
यो दद्यात्प्रणवैर्मह्यं तत्कोटिगुणितं भवेत् ॥ २९ ॥
अहिंसा सत्यमस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः ।
यस्यास्त्यध्ययनं नित्यं स मे भक्तः स मे प्रियः ॥ ३० ॥
पुष्प, फल, मूल, पत्र किंवा उदक जो प्रणवानें मला अर्पण करील ते त्याचे कोटिगुणित होते. प्राणिमात्रांची हिंसा न करणारा, सत्यभाषी, चोरी न करणारा, बाह्याभ्यंतरशौचयुक्त, इंद्रियनिग्रह करणारा, नित्य वेदाध्ययन करणारा असा असेल तोच माझा भक्त व तोच मला प्रिय. २९-३०.

प्रदोषे यो मम स्थानं गत्वा पूजयते तु माम् ।
स परं श्रियमाप्नोति पश्चान्मयि विलीयते ॥ ३१ ॥
प्रदोषकालीं माझ्या मंदिरात जाऊन जो माझी पूजा करतो तो अतुलसंपत्ति भोगतो आणि अंती माझ्या स्वरूपीं लीन होतो. ३१.

अष्टम्यां च चतुर्दश्यां पर्वणोरुभयोरपि ।
भूतिभूषितसर्वांगो यः पूजयति मां निशि ॥ ३२ ॥
कृष्णपक्षे विशेषेण स मे भक्तः स मे प्रियः ॥ ३३ ॥
अष्टमी, चतुर्दशी पौणिमा आणि अमावास्या ह्या तिथीस विशेषतः कृष्णपक्षांत, जो सर्वांगाला भस्म चर्चून, प्रदोषकाली माझी पूजा करतो, तो माझा भक्त व तोच मला प्रिय आहे. ३२-३३.

एकादश्यामुपोष्यैव यः पूजयति मां निशि ।
सोमवारे विशेषेण स मे भक्तो न नश्यति ॥ ३४ ॥
एकादशीचे दिवशीं उपोषण करून, जो माझी प्रदोषपूजा करतो, तसाच सोमवारी उपोषण करून प्रदोषपूजा करतो, तो माझा भक्त कधीं नाश पावत नाहीं. ३४.

पञ्चामृतैः स्नापयेद्यः पञ्चगव्येन वा पुनः ।
पुष्पोदकैः कुशजलैस्तस्मान्नन्यः प्रियो मम ॥ ३५ ॥
जो पंचामृतानें, पंचगव्याने, पुष्पांनीं, उदकानें अथवा कुशोदकानें मला स्नान घालतो त्याहून मला दुसरा कोणी प्रिय नाहीं. ३५.

पयसा सर्पिषा वापि मधुनेक्षुरसेन वा ।
पक्वाम्रफलजेनापि नारिकेरजलेन वा ॥ ३६ ॥
गन्धोदकेन वा मां यो रुद्रमन्त्रं समुच्चरन् ।
अभिषिञ्चेत्ततो नान्यः कश्चित्प्रियतरो मम ॥ ३७ ॥
दुधानें, घृतानें, मधूनें, इक्षुरसाने, पिकलेल्या आंब्यांच्या रसाने, नारळाच्या पाण्याने किंवा गंधोदकानें जो रुद्रमंत्राचा जप करीत माझ्यावर अभिषेक करील, त्याहून अधिक प्रिय असा मला कोणी नाहीं. ३६-३७.

आदित्याभिमुखो भूत्वा ऊर्ध्वबाहुर्जले स्थितः ।
मां ध्यायन् रविबिम्बस्थमथर्वांगिरस जपेत् ॥ ३८ ॥
प्रविशेन्मे शरीरेऽसौ गृहं गृहपतिर्यथा ।
बृहद्रथन्तरं वामदेव्यं देवव्रतानि च ॥ ३९ ॥
तद्योगयाज्यदोहांश्च यो गायति ममाग्रतः ।
इह श्रियं परां भुक्त्वा मम सायुज्यमाप्नुयात् ॥ ४० ॥
जो बाहु वर उभारून, सूर्याभिमुख होत्साता, उदकांत उभा राहून, सूर्यबिंबस्थ माझ्या स्वरूपाचें ध्यान करून, अथर्वांगिरस मंत्राचा जप करतो, तो जसा गृहस्वामी आपल्या घरांत प्रवेश करतो, तसा माझ्या स्वरूपांत प्रवेश करतो. तसेच बृहद्रथंतर, वामदेव्य आणि देवव्रत हीं सामें, आणि त्यांतील योगयाज्य मंत्र ह्यांचा जो माझ्यापुढे जप करील, तो इहलोक संपत्ति भोगून परलोक माझे सायुज्य पावेल. ३८–४०.

ईशावास्यादि मन्त्रान् यो जपेन्नित्यं ममाग्रतः ।
मत्सायुज्यमवाप्नोति मम लोके महीयते ॥ ४१ ॥
तसेच ईशावास्यादि उपनिषदांचे मंत्र जो नित्य माझ्या अग्रभागी पठन करील, तो माझे सायुज्य पावेल; माझ्या लोकीं मोठे पद मिळवील. ४१.

भक्तियोगो मया प्रोक्त एवं रघुकुलोद्‌भव ।
सर्वकामप्रदो मत्तः किमन्यच्छ्रोतुमिच्छसि ॥ ४२ ॥
हे रघुकुलोद्‌भवा, ह्याप्रमाणे हा सर्व मनोरथ पूर्ण करणारा भक्तियोग मी तुला सविस्तर वर्णन केला, आणखी माझ्यापासून काय श्रवण करण्याची इच्छा आहे ? ४२.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
भक्तियोगो नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥
॥ इति पंचदशोऽध्यायः ॥ १५ ॥





GO TOP