श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
चतुर्दशोऽध्यायः


गङ्‌गायाः कृष्णपत्‍नीत्ववर्णनम्

नारद उवाच
लक्ष्मीः सरस्वती गङ्‌गा तुलसी विश्वपावनी ।
एता नारायणस्यैव चतस्रश्च प्रिया इति ॥ १ ॥
गङ्‌गा जगाम वैकुण्ठमिदमेव श्रुतं मया ।
कथं सा तस्य पत्‍नी च बभूवेति च न श्रुतम् ॥ २ ॥
श्रीनारायण उवाच
गङ्‌गा जगाम वैकुण्ठं तत्पश्चाज्जगतां विधिः ।
गत्वोवाच तया सार्धं प्रणम्य जगदीश्वरम् ॥ ३ ॥
ब्रह्मोवाच
राधाकृष्णाङ्‌गसम्भूता या देवी द्रवरूपिणी ।
नवयौवनसम्पन्ना सुशीला सुन्दरी वरा ॥ ४ ॥
शुद्धसत्त्वस्वरूपा च क्रोधाहङ्‌कारवर्जिता ।
तदङ्‌गसम्भवा नान्यं वृणोतीयं च तं विना ॥ ५ ॥
तत्रातिमानिनी राधा सा च तेजस्विनी वरा ।
समुद्युक्ता पातुमिमां भीतेयं बुद्धिपूर्वकम् ॥ ६ ॥
विवेश चरणाम्भोजे कृष्णस्य परमात्मनः ।
सर्वत्र गोलकं शुष्कं दृष्ट्वाहमगमं तदा ॥ ७ ॥
गोलोके यत्र कृष्णश्च सर्ववृत्तान्तप्राप्तये ।
सर्वान्तरात्मा सर्वेषां ज्ञात्वाभिप्रायमेव च ॥ ८ ॥
बहिश्चकार गङ्‌गा च पादाङ्‌गुष्ठनखाग्रतः ।
दत्त्वास्यै राधिकामन्त्रं पूरयित्वा च गोलकम् ॥ ९ ॥
प्रणम्य तां च राधेशं गृहीत्वात्रागमं प्रभो ।
गान्धर्वेण विवाहेन गृहाणेमां सुरेश्वरीम् ॥ १० ॥
सुरेश्वरेषु रसिको रसिकेयं समागता ।
त्वं रत्‍नं पुंसु देवेश स्त्रीरत्‍नं स्त्रीष्वियं सती ॥ ११ ॥
विदग्धया विदग्धेन सङ्‌गमो गुणवान् भवेत् ।
उपस्थितां स्वयं कन्यां न गृह्णातीह यः पुमान् ॥ १२ ॥
तं विहाय महालक्ष्मी रुष्टा याति न संशयः ।
यो भवेत्पण्डितः सो ऽपि प्रकृतिं नावमन्यते ॥ १३ ॥
सर्वे प्राकृतिकाः पुंसः कामिन्यः प्रकृतेः कलाः ।
त्वमेव भगवान्नाथो निर्गुणः प्रकृतेः परः ॥ १४ ॥
अर्धाङ्‌गं द्विभुजः कृष्णो योऽर्धाङ्‌गेन चतुर्भुजः ।
कृष्णवामाङ्‌गसम्भूता बभूव राधिका पुरा ॥ १५ ॥
दक्षिणांशः स्वयं सा च वामांशः कमला तथा ।
तेनेयं त्वां वृणोत्येव यतस्त्वद्देहसम्भवा ॥ १६ ॥
एकाङ्‌गं चैव स्वीपुंसोर्यथा प्रकृतिपूरुषौ ।
इत्येवमुक्त्वा धाता तां तं समर्प्य जगाम सः ॥ १७ ॥
गान्धर्वेण विवाहेन तां जग्राह हरिः स्वयम् ।
नारायणः करं धृत्वा पुष्पचन्दनचर्चितम् ॥ १८ ॥
रेमे रमापतिस्तत्र गङ्‌गया सहितो मुदा ।
गङ्‌गा पृथ्वीं गता या सा स्वस्थानं पुनरागता ॥ १९ ॥
निर्गता विष्णुपादाब्जात्तेन विष्णुपदीति च ।
मूर्च्छां सम्प्राप सा देवी नवसङ्‌गमलीलया ॥ २० ॥
रसिका सुखसम्भोगाद्‌रसिकेश्वरसंयुता ।
तां दृष्ट्वा दुःखिता वाणी पद्मया वर्जितापि च ॥ २१ ॥
नित्यमीर्ष्यति तां वाणी न च गङ्‌गा सरस्वतीम् ।
गङ्‌गा शशाप कोपेन भारते च हरिप्रिया ॥ २२ ॥
गङ्‌गया सह तस्यैव तिस्रो भार्या रमापतेः ।
सार्धं तुलस्या पश्चाच्च चतस्रश्चाभवन्मुने ॥ २३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे गङ्‌गायाः
कृष्णपत्‍नीत्ववर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥


गंगा व विष्णु यांचा विवाह -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणाले, "लक्ष्मी, सरस्वती, गंगा व विश्वाला पावन करणारी तुलसी या नारायणाच्या चार भार्या होत्या. गंगा वैकुंठी गेल्याचे मी ऐकले, पण गंगा नारायणाची पत्नी कशी झाली हे काही माझ्या ऐकण्यात नाही, ते सांगा."

श्री नारायण मुनी म्हणाले, "गंगा वैकुंठी गेल्यावर जगाचा निर्माताही तेथे जाऊन त्या जगदीश्वराला म्हणाला, "जी कृष्णाच्या अंशापासून द्रवरूपाने उत्पन्न झाली, जी नवयौवना आहे, सुशील, सुंदर शुद्धसत्त्वरूपा, क्रोध-अहंकार विरहित, अशी ती त्या कृष्णाच्या अंगापासून उत्पन्न झाल्यामुळे त्याच्याशिवाय ती कुणीही दुसर्‍याला वरणार नाही.

पण त्या ठिकाणी, ती मानिनी व सर्वश्रेष्ठ राधा बुद्धी पुरस्सर तिला पिऊन टाकण्याची इच्छा करू लागली. त्यामुळे भयभीत होऊन ही कृष्णाच्या चरणकमलात लय पावली. त्यामुळे सर्व गोलोक शुष्क झाल्याचे अवलोकन करून मी तेथील वृत्तांत समजून घेण्यासाठी तेथे गेलो. नंतर सर्व काही समजून आल्यावर त्या कृष्णाच्या पायाच्या अंगठयापासून गंगेला बाहेर काढले. तेथे तिला राधिका मंत्र दिला आणि त्या गंगेला घेऊन मी येथे आलो.

हे प्रभो, ह्या गंगेचा आता आपण गांधर्व विधीने स्वीकार करावा. हे देवाधिदेवा, तुजसारख्या रसिकाकडे ही रसिका आलेली आहे. हे देवेशा, तू सर्वश्रेष्ठ असे रत्न आहेस. तसेच सियामध्येही ही सती रत्न आहे म्हणून दोघेही स्त्रीपुरुष कुशल असल्यास समागम उत्तम होतो. स्वतः आलेल्या स्त्रीचा स्वीकार न करणार्‍या पुरुषाला महालक्ष्मीही रागाने सोडून जाते. कोणताही पंडित प्रकृतीचा अवमान करीत नाही.
सर्व पुरुष प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत. स्त्रिया त्या प्रकृतीच्या कला आहेत. हे भगवाना, तू सर्वांचा नाथ आहेस. तसेच तूही निर्गुण व प्रकृतीपर आहेस.

कृष्णाचे अर्धांग द्विभुज असून तो अर्धांगाने चतुर्भुज आहे. प्राचीन काळी कृष्णाच्या वाम अंगापासून राधिका उत्पन्न झाली. त्यानंतर ती स्वतः दक्षिण अंगरूपाने राहिली. तिची डावी बाजू कमला असून ती तुझी प्रार्थना करीत आहे. कारण ती तुझ्या देहापासून झालेली आहे."

असे सांगून ब्रह्मदेवांनी त्या भगवंताला गंगा अर्पण केली. त्या हरीनेही गांधर्व विवाहाने त्या गंगेचा स्वीकार केला. पुष्पे व चंदन यांनी चर्चित असा तिचा हात धरून रमापती नारायण गंगेसह आनंदाने रममाण झाला. पृथ्वीवर गेलेली गंगा याप्रकारे स्वस्थानी परत आली. विष्णूच्या पदकमलापासून उत्पन्न झाल्यामुळे तिला विष्णुपदी म्हणतात. या नवीन समागमात क्रीडेमुळे ती देवी देहभान विसरली.

रसिकेश्वराशी संगत झालेली ती रसिक गंगा सुखावह संभोगामुळे तृप्त झाली. पण तिला पाहून सरस्वतीला अतोनात दुःख झाले. लक्ष्मीने कितीही निवारण केले, तरी ती वाणी गंगेचा द्वेष करीत असे. पण गंगेने मात्र तिचा हेवा केला नाही. एकदा गंगेने अत्यंत क्रुद्ध होऊन त्या हरिप्रिय वाणीला भारतात जाण्याविषयी शाप दिला.

गंगेसह त्या रमापतीला तीन भार्या होत्या. पुढे तुलसीशी विवाह झाल्यामुळे त्याच्या चार भार्या झाल्या."


अध्याय चवदावा समाप्त

GO TOP