श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
अष्टमः स्कन्धः
चतुऽर्थोध्यायः


भुवनकोशविषये प्रियव्रतवंशवर्णनम्

श्रीनारायण उवाच
मनोः स्वायम्भुवस्यासीज्ज्येष्ठः पुत्रः प्रियव्रतः ।
पितुः सेवापरो नित्यं सत्यधर्मपरायणः ॥ १ ॥
प्रजापतेर्दुहितरं सुरूपां विश्वकर्मणः ।
बर्हिष्मतीं चोपयेमे समानां शीलकर्मभिः ॥ २ ॥
तस्यां पुत्रान्दश गुणैरन्वितान्भावितात्मनः ।
जनयामास कन्यां चोर्जस्वतीं च यवीयसीम् ॥ ३ ॥
आग्नीध्रश्चेध्मजिह्वश्च यज्ञबाहुस्तृतीयकः ।
महावीरश्चतुर्थस्तु पञ्चमो रुक्मशुक्रकः ॥ ४ ॥
घृतपृष्ठश्च सवनो मेधातिथिरथाष्टमः ।
वीतिहोत्रः कविश्चेति दशैते वह्निनामकाः ॥ ५ ॥
एतेषां दशपुत्राणां त्रयोऽप्यासन्विरागिणः ।
कविश्च सवनश्चैव महावीर इति त्रयः ॥ ६ ॥
आत्मविद्यापरिष्णाताः सर्वे ते ह्यूर्ध्वरेतसः ।
आश्रमे परहंसाख्ये निःस्पृहा ह्यभवन्मुदाः ॥ ७ ॥
अपरस्यां च जायायां त्रयः पुत्राश्च जज्ञिरे ।
उत्तमस्तामसश्चैव रैवतश्चेति विश्रुताः ॥ ८ ॥
मन्वन्तराधिपतय एते पुत्रा महौजसः ।
प्रियव्रतः स राजेन्द्रो बुभुजे जगतीमिमाम् ॥ ९ ॥
एकादशार्बुदाब्दानामव्याहतबलेन्द्रियः ।
यदा सूर्यः पृथिव्याश्च विभागे प्रथमेऽतपत् ॥ १० ॥
भागे द्वितीये तत्रासीदन्धकारोदयः किल ।
एवं व्यतिकरं राजा विलोक्य मनसा चिरम् ॥ ११ ॥
प्रशास्ति मयि भूम्यां च तमः प्रादुर्भवेत्कथम् ।
एवं निवारयिष्यामि भूमौ योगबलेन च ॥ १२ ॥
एवं व्यवसितो राजा पुत्रः स्वायम्भुवस्य सः ।
रथेनादित्यवर्णेन सप्तकृत्वः प्रकाशयन् ॥ १३ ॥
तस्यापि गच्छतो राज्ञो भूमौ यद्‌रथनेमयः ।
पतितास्ते समुद्राख्यां भेजिरे लोकहेतवे ॥ १४ ॥
जाताः प्रदेशास्ते सप्त द्वीपा भूमौ विभागशः ।
रथनेमिसमुत्थास्ते परिखाः सप्त सिन्धवः ॥ १५ ॥
यत आसंस्ततः सप्त भुवो द्वीपा हि ते स्मृताः ।
जम्बुद्वीपः प्लक्षद्वीपः शाल्मलीद्वीपसंज्ञकः ॥ १६ ॥
कुशद्वीपः क्रौञ्चद्वीपः शाकद्वीपश्च पुष्करः ।
तेषां च परिमाणं तु द्विगुणं चोत्तरोत्तरम् ॥ १७ ॥
समन्ततश्चोपक्लृप्तं बहिर्भागक्रमेण च ।
क्षारोदेक्षुरसोदौ च सुरोदश्च घृतोदकः ॥ १८ ॥
क्षीरोदो दधिमण्डोदः शुद्धोदश्चेति ते स्मृताः ।
सप्तैते प्रतिविख्याताः पृथिव्यां सिन्धवस्तदा ॥ १९ ॥
प्रथमो जम्बुद्वीपाख्यो यः क्षारोदेन वेष्टितः ।
तत्पतिं विदधे राजा पुत्रमाग्नीध्रसंज्ञकम् ॥ २० ॥
प्लक्षद्वीपे द्वितीयेऽस्मिन्द्वीपेक्षुरससंप्लुते ।
जातस्तदधिपः प्रैयव्रत इध्मादिजिह्वकः ॥ २१ ॥
शाल्मलीद्वीप एतस्मिन्सुरोदधिपरिप्लुते ।
यज्ञबाहुं तदधिपं करोति स्म प्रियव्रतः ॥ २२ ॥
कुशद्वीपेऽतिरम्ये च घृतोदेनोपवेष्टिते ।
हिरण्यरेता राजाभूत्प्रियव्रततनूजनिः ॥ २३ ॥
क्रौञ्चद्वीपे पञ्चमे तु क्षीरोदपरिसंप्लुते ।
प्रैयव्रतो घृतपृष्ठः पतिरासीन्महाबलः ॥ २४ ॥
शाकद्वीपे चारुतरे दधिमण्डोदसंकुले ।
मेधातिथिरभूद्‌राजा प्रियव्रतसुतो वरः ॥ २५ ॥
पुष्करद्वीपके शुद्धोदकसिन्धुसमाकुले ।
वीतिहोत्रो बभूवासौ राजा जनकसम्मतः ॥ २६ ॥
कन्यामूर्जस्वतीनाम्नीं ददावुशनसे विभुः ।
आसीत्तस्यां देवयानी कन्या काव्यस्य विश्रुता ॥ २७ ॥
एवं विभज्य पुत्रेभ्यः सप्तद्वीपान् प्रियव्रतः ।
विवेकवशगो भूत्वा योगमार्गाश्रितोऽभवत् ॥ २८ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
भुवनकोशविषये प्रियव्रतवंशवर्णनं नाम चतुर्थेऽध्यायः ॥ ४ ॥


प्रियव्रत राजाची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारायणमुनी नारदाला म्हणाले, हे महर्षे, हे नारदा, त्या सर्वात श्रेष्ठ अशा ब्रह्मपुत्र मनूचा प्रियव्रत नावाचा एक सर्वात जेष्ठ असा पुत्र होता. तो नेहमी आपल्या पित्याच्या सेवेत मग्न असे. तो एकाग्र चित्ताने सत्यधर्माची अनुष्ठाने करीत असे.

विश्वकर्मा प्रजापतीची कन्या बर्हिष्मती या नावाने प्रसिद्ध असलेल्या कन्येशी प्रियव्रताचा विवाह झाला होता. ती बर्हिष्मती शीलाने व कर्माच्या आचरणात सत्त्वशील होती. ती प्रियव्रताला अत्यंत अनुरूप अशी होती. ती रूपाने सर्वात सुंदर होती. प्रियव्रताला तिच्यापासून दहा पुत्र झाले व सर्वात धाकटी अशी कन्या झाली. तिचे नाव उर्जस्वती असे होते. प्रियव्रताचे हे दहाही पुत्र सर्व सद्‍गुणांनी परिपूर्ण व अंतःकरणाने अत्यंत उदार होते. सर्वजण पित्याच्या आज्ञेत रहात असत व सेवा करीत असत.

पहिला पुत्र अग्नीध्र, दुसरा इध्मजिव्ह, तिसरा पुत्र यज्ञबाहू चवथा पुत्र महावीर, पाचवा पुत्र हिरण्यरेता सहावा धृतपुष्ठ पुत्र, सातवा पुत्र सवन, आठवा पुत्र मेधातिथी, नववा वितिहोत्र व दहावा पुत्र कवि या नावांनी ते प्रसिद्ध होते. या सर्वही दहा व महावीर हे तिघेही जण पुत्रांपैकी कवि, सवन अत्यंत विरक्त होते. तसेच आत्मविद्येमध्ये अत्यंत निपुण होते. ते उर्ध्वरेते व अत्यंत निःस्पृह होते. त्यांनी मोठ्या समाधानाने परमहंसदीक्षेचा स्वीकार केला होता व चतुर्थाश्रम धारण करून ते राहिले होते.

प्रियव्रताला आणखी एक दुसरी पत्नी होती. तिच्यापासून त्याला तीन पुत्र झाले. ते तिघेजण उत्तम, तामस व रैवत या नावांनी अतिशय प्रसिद्ध होते. हे पुत्र अत्यंत महापराक्रमी निघाले व आपल्या बलावर तेच मन्वंतरांचे अधिपति झाले.

ज्याचे बल श्रेष्ठ होते व इंद्रिये अकुंठित होऊन राहिली होती अशा त्या महाराजाधिराज प्रियव्रताने अकरा अर्बुद वर्षे म्हणजे ११०००००००० वर्षेपर्यंत या पृथ्वीचा उपभोग घेतला.

पृथ्वीच्या एका विभागात सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा सहजगत्याच नियमाप्रमाणे दुसरा विभाग अंधःकारमय होतो असा हा प्रकार पाहून त्या राजाने त्याचा प्रतिकार करण्याचे ठरविले. त्याने यावर खूप विचार केला. तो स्वतःशी म्हणाला, "मी एवढा पराक्रमी असून सर्व भूमीचे राज्य करीत आहे. अशा या माझ्या राज्यात अंधःकार कसा उत्पन्न होतो ? नियमाप्रमाणे एकेक भाग आलटून पालटून अंधःकारात कसा जातो ? खरोखरच योगसामर्थ्याच्या बलावर मी याचे जरूर निवारण करीन."

अशाप्रकारे त्याने कृतनिश्चय केला आणि त्या ब्रह्मपुत्र मनूचा तो सर्वोत्कृष्ट पुत्र प्रियव्रत राजा त्या कार्याला आरंभ करता झाला. त्याने सत्वर सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणार्‍या दिव्य रथावर आरोहण केले आणि जगाला उत्तम प्रकाश देत त्याने सात वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली. अशाप्रकारे तो राजा लोककल्याणाचा क्रम चालवीत असता त्याच्या रथांच्या चक्रांच्यामुळे पृथ्वीवर खोलवर चर्‍या पडल्या. त्या चर्‍यांनाच समुद्र हे नाव प्राप्त झाले आणि त्या समुद्रामुळे पृथ्वीचे विभाग झाले. ते सात विभाग म्हणजेच सात द्वीपे होय आणि रथांच्या धावेमुळे जे सात खंदक निर्माण झाले तेच प्रसिद्ध असलेले सप्त समुद्र होत.

ज्या अर्थी सात समुद्र निरनिराळ्या ठिकाणी निर्माण झाले त्या अर्थी त्यांच्या मध्यभागी सहा प्रदेश उत्पन्न झाले व मध्यभागी सातवा प्रदेश झाला हे सात प्रदेश म्हणजे सात द्वीपे होत असे शास्त्रात सांगितले आहे. त्या द्वीपांची नावे पुढीलप्रमाणे - जंबुद्वीप, प्लक्षद्वीप, शाल्मलीद्वीप, कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाकद्वीप व पुष्करद्वीप अशी सात सुंदर द्वीपे निर्माण झाली. उत्तरोत्तर त्यांचे परिणाम द्विगुणितच होत आहे.

समुद्राच्या बाह्य बाजूस सभोवार वर सांगितलेल्या द्वीपांच्या अनुक्रमाने ही सातही द्वीपे आहेत. क्षारोद, इक्षुरसोद, सुरोद, धृतोदक, क्षीरोद, दधिमंडोद, शुद्धोद अशी ही त्या सातही समुद्रांची नावे प्रसिद्धच आहेत. हे सातही समुद्र ह्या पृथ्वीवर अत्यंत विख्यात आहेत.

हे नारदा, क्षारोद म्हणजे खारट. तेव्हा क्षारोदाने सभोवताली वेष्टित झालेले असे जे पहिले द्वीप तेच जंबुद्वीप होय. प्रियव्रत राजाने आपल्या अग्नीध्र नावाच्या प्रतापी पुत्राला त्या द्वीपाचा अधिकार केला.

इक्षुरसाने जे उदक परिपूर्ण होते त्याने वेढलेल्या प्लक्षद्वीप नावाच्या दुसर्‍या द्वीपाचा अधिपती प्रियव्रताचा आणखी एक पुत्र इध्मजिव्ह हा झाला. जे द्वीप सुरोदश्रीने परिलुप्त होते त्या द्वीपाचा म्हणजे शाल्मलीद्वीपाचा अधिपती यज्ञबाहू नावाच्या एका पुत्राला प्रियव्रत्याने नेमले. धृत समुद्राने सर्वबाजूंनी वेष्टित असलेल्या अत्यंत रमणीय असलेल्या कृशद्वीपामध्ये प्रियव्रतपुत्र हिरण्यरेता हा धर्मशील राजा झाला.

क्षीरोदधीने परिवेष्टित असलेल्या पाचव्या क्रौंचद्वीपावर धृतपुष्ठ नावाचा आणखी एक बलाढय प्रियव्रत पुत्र राज्य करू लागला. दधिमंडल समुद्राने वेढलेले सुंदर शाकद्वीपात प्रियव्रताचा उत्तम पुत्र मेधातिथी म्हणून होता तो राज्य चालवू लागला आणि जे पुष्करद्वीप शुद्धोदकाने परिव्याप्त होते त्या द्वीपाचा पितृमान्य वीतिहोत्र नावाचा पुत्र स्वामी झाला.

या पराक्रमी मनुपुत्राने म्हणजे प्रियव्रताने आपली ऊर्जस्वती नावाची कन्या शुक्राला अर्पण केली. तिच्यापासून शुक्राला देवयानी नावाची सुंदर कन्या झाली. ती अत्यंत तेजस्वी होती व फार विख्यात होती. अशाप्रकारे प्रियव्रताने आपल्या सातही पुत्रांना ती सात द्वीपे वाटून दिली आणि नंतर तो राजा विवेकवश होऊन विरक्त झाला. शेवटी योगश्रमाच्या आश्रयाने तो राहू लागला.


अध्याय चवथा समाप्त

GO TOP