श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
अष्टमः स्कन्धः
तृतीयोऽध्यायः


भुवनकोशविस्तारे स्वायम्भुवमनुवंशकीर्तनम्

श्रीनारायण उवाच
महीं देव: प्रतिष्ठाप्य यथास्थाने च नारद ।
वैकुण्ठलोकमगमद्‌ ब्रह्मोवाच स्वमात्मजम् ॥ १ ॥
स्वायम्भूव महाबाहो पुत्र तेजस्विनांवर ।
स्थाने महीमये तिष्ठ प्रजाः सृज यथोचितम् ॥ २ ॥
देशकालविभागेन यज्ञेशं पुरुषं यज ।
उच्चावचपदार्थैश्च यज्ञसाधनकैर्विभो ॥ ३ ॥
धर्ममाचर शास्त्रोक्तं वर्णाश्रमनिबन्धनम् ।
एतेन क्रमयोगेन प्रजावृद्धिर्भविष्यति ॥ ४ ॥
पुत्रानुत्पाद्य गुणतः कीर्त्या कान्त्यात्मरूपिणः ।
विद्याविनयसम्पन्नान् सदाचारवतां वरान् ॥ ५ ॥
कन्याश्च दत्त्वा गुणवद्यशोवद्‌भ्यः समाहितः ।
मन: सम्यक् समाधाय प्रधानपुरुषे परे ॥ ६ ॥
भक्तिसाधनयोगेन भगवत्परिचर्यया ।
गतिमिष्टां सदा वन्द्यां योगिनां गमिता भवान् ॥ ७ ॥
इत्याश्वास्य मनुं पुत्र पद्मयोनिः प्रजापति: ।
प्रजासर्गे नियम्यामुं स्वधाम प्रत्यपद्यत ॥ ८ ॥
प्रजाः सृजत पुत्रेति पितुराज्ञां समादधत् ।
स्वायम्भुवः प्रजासर्गमकरोत्पृथिवीपतिः ॥ ९ ॥
प्रियव्रतोत्तानपादौ मनुपुत्रौ महौजसौ ।
कन्यास्तिस्रः प्रसूताश्च तासां नामानि मे शृणु ॥ १०
आकूतिः प्रथमा कन्या द्वितीया देवहूतिका ।
तृतीया च प्रसूतिर्हि विख्याता लोकपावनी ॥ ११
आकूतिं रुचये प्रादात्कर्दमाय च मध्यमाम् ।
दक्षायादात्प्रसूतिं च यासां लोक इमाः प्रजाः ॥ १२
रुचेः प्रजज्ञे भगवान् यज्ञो नामादिपूरुषः ।
आकूत्यां देवहूत्यां च कपिलोऽसौ च कर्दमात् ॥ १३
सांख्याचार्यः सर्वलोके विख्यातः कपिलो विभुः ।
दक्षात्प्रसूत्यां कन्याश्च बहुशो जज्ञिरे प्रजाः ॥ १४
यासां सन्तानसम्भूता देवतिर्यङ्नरादयः ।
प्रसूता लोकविख्याता सर्वे सर्गप्रवर्तकाः ॥ १५
यज्ञश्च भगवान् स्वायम्भुवमन्वन्तरे विभुः ।
मनुं ररक्ष रक्षोभ्यो यामैर्देवगणैर्वृतः ॥ १६
कपिलोऽपि महायोगी भगवान् स्वाश्रमे स्थितः ।
देवहूत्यै परं ज्ञानं सर्वाविद्यानिवर्तकम् ॥ १७
सविशेषं ध्यानयोगमध्यात्मज्ञाननिश्चयम् ।
कापिलं शास्त्रमाख्यातं सर्वाज्ञानविनाशनम् ॥ १८
उपदिश्य महायोगी स ययौ पुलहाश्रमम् ।
अद्यापि वर्तते देवः सांख्याचार्यो महाशयः ॥ १९
यन्नामस्मरणेनापि सांख्ययोगश्च सिद्ध्यति ।
तं वन्दे कपिलं योगाचार्यं सर्ववरप्रदम् ॥ २०
एवमुक्तं मनोः कन्यावंशवर्णनमुत्तमम् ।
पठतां शृण्वतां चापि सर्वपापविनाशनम् ॥ २१
अतः परं प्रवक्ष्यामि मनुपुत्रान्वयं शुभम् ।
यदाकर्णनमात्रेण परं पदमवाप्नुयात् ॥ २२
द्वीपवर्षसमुद्रादिव्यवस्था यत्सुतैः कृता ।
व्यवहारप्रसिद्ध्यर्थं सर्वभूतसुखाप्तये ॥ २३
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
भुवनकोशविस्तारे स्वायम्भुवमनुवंशकीर्तनं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥


मनूचा कन्यावंश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारायण मुनी नारदाला म्हणाले, "हे नारदा, याप्रमाणे त्या वराहरूपी भगवंताने पृथ्वीची योग्य ठिकाणी स्थापना करून तिला स्थिर केले आणि नंतर तो लोककल्याण करणारा देवाधिदेव आपल्या स्वस्थानी म्हणजे वैकुंठाला निघून गेला. भगवान विष्णु स्वस्थानी गेल्याचे अवलोकन करून ब्रह्मदेव आपल्या श्रेष्ठ पुत्रास म्हणाला, "हे महाशूरा, हे अत्यंत तेजस्वी पुरुषा, हे पुत्रश्रेष्ठा, आता तू पृथ्वीवर जाऊन तुला योग्य वाटेल ते स्थान शोधून काढ व त्याच ठिकाणी नित्य वास्तव्य करून तू आता सत्वर प्रजा निर्माण कर."

तसेच हे विभो, पृथ्वीवरील विभाग, देश व काल यांना अनुसरून यज्ञ-साधनांनी युक्त अशा उच्च व नीच पदार्थांच्या योगाने तू त्या महान यज्ञेश्वर पुरुषाचे नित्य यजन करीत जा. तसेच ब्राह्मणासारखे श्रेष्ठवर्ण व ब्रह्मचर्य यांना उपयुक्त होईल असे आचरण ठेवून धर्माचे अनुष्ठान करीत जा. अशा पद्धतीने तू उत्तम अनुष्ठाने केलीस तर उत्तम प्रजेची वृद्धी होईल.

गुणांत सर्वश्रेष्ठ, कीर्तिमान, कांतीयुक्त पुरुषा तुझ्यासारख्या योग्य अशा पुत्रांचा व कन्यांचा तुला लाभ होईल. ते सर्वजण विद्येने परिपूर्ण होतील. तसेच अत्यंत विनयशील राहून ते पुत्र व कन्या सदाचरणी होतील. नंतर त्या सत्वशील कन्यांना तू योग्य वर शोधून काढून त्यांना अर्पण कर, गुणवान व यशश्रेष्ठ पुरुषांना तू आपल्या कन्या दे आणि नंतर मन शांत ठेवून त्या सर्वश्रेष्ठ अशा प्रधान पुरुषाचे ठिकाणी तू मन स्थिर ठेव आणि अपार भक्ती करून त्याची आराधना करून त्या कृपाळु भगवंताची सेवा करीत रहा म्हणजे तुला अशी सर्वश्रेष्ठ गती मिळेल की ती योग्यांनाही वंद्य व सदा इष्ट असेल.

अशाप्रकारे कमलोद्भव प्रजापती ब्रह्मदेवाने आपल्या पुत्रास सुयोग्य आशीर्वाद देऊन कर्माचरण कसे करावे याबद्दल सूचना दिल्या आणि त्याला प्रजासृष्टी कार्यामध्ये नियुक्त करून तो ब्रह्मदेव सत्वर आपल्या वसतीस्थानी परत गेला.

हे नारदा, ब्रह्मदेवाने जाताना आपल्या पुत्रास आज्ञा दिली की, "हे पुत्रा, आता प्रजा उत्पन्न कर."

प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा मिळाल्यावर त्या ब्रह्मपुत्र स्वयंभुव मनूने प्रजा उत्पन्न करण्यास सुरूवात केली. पुढे मनुला प्रियव्रत व उत्तानपाद या नावाचे दोन महाबलाढय व उत्तम पुत्र झाले. त्यानंतर त्याला सुशील अशा तीन कन्या झाल्या. त्या कन्यांची नावे, हे नारदा, आता मी तुला सांगतो. तू श्रवण कर. मनूची पहिली कन्या आकूति या नावाने प्रसिद्ध आहे. त्यानंतरची दुसरी देवहूती या नावाने विख्यात झाली व तिसरी प्रसिद्ध कन्या प्रसूति या नावाने संबोधली जाते. ही प्रसूति सर्व लोकांना पावन करणारी अशी आहे.

मनूने आकूति या कन्येचा विवाह रुचि या पुरुषश्रेष्ठाशी केला. कर्दमाला देवहूती अर्पण केली आणि प्रसूतीचा दक्षाशी विवाह लावून दिला. सांप्रतच्या लोकातील संपूर्ण प्रजा ही त्यांपासूनच निर्माण झालेली आहे.

रुचीपासून मनुकन्या आकूतीला यज्ञ नावाचा साक्षात भगवान आदिपुरुषच पुत्र झाला. देवहूतीच्या पोटी कर्दमापासून कपिल मुनीश्रेष्ठ जन्मास आले. तोच कीर्तिमान विभु मुनीश्रेष्ठ कपिल सांख्याचार्य या नावाने सर्व लोकात प्रसिद्ध आहे.

दक्षापासून मनुकन्या प्रसूतीच्या पोटी अनेक कन्यारत्ने जन्मास आली. त्या कन्यांपासून पुढे देव उत्पन्न झाले. तसेच पशु व पक्ष्यांप्रमाणे इतर निरनिराळे प्राणी व मनुष्य त्यांपासून निर्माण झाले. हे सर्वजण अत्यंत प्रसिद्ध सृष्टीच्या निर्मितीस भर घालतील असेच होते.

त्या भगवान व विभु यज्ञाने याम नावाच्या देवगणांसह स्वायंभुव मन्वंतरामध्ये मनूचे सर्व राक्षसांपासून रक्षण केले.

त्या महान मुनीश्रेष्ठ कपिल महामुनींनीसुद्धा आपल्या आश्रमामध्ये राहून सर्व अविद्यांचे निर्मुलन होईल असे उत्कृष्ट ज्ञान देवहूतीला सांगितले. तेच ज्ञान वैशिष्ट्यपूर्ण अशा ध्यानयोगाचा बोध करून देऊन अध्यात्म ज्ञानाचा निश्चय करणारे व सर्व अज्ञानाचा नाश करणारे असून ते कपिलशास्त्र या नावाने प्रसिद्ध आहे. त्या कपिल शास्त्राचा मातेला उपदेश करून तो महायोगी पुलहाश्रमास गेला. अजूनही तो महात्मा सांख्याचार्य तेथे वास्तव्य करून आहे. ज्याच्या केवळ नामस्मरणानेही मुनी सांख्ययोगी सिद्ध पुरुष बनतो त्या योगाचार्य व सर्व इष्ट वर देणार्‍या कपिल मुनीस मी नित्य वंदन करीत असतो. हे नारदा, अशाप्रकारे मनूपासून उत्पन्न झालेल्या वंशातील कन्यांचे वर्णन मी तुला सांगितले. ही सर्व कथा श्रवण केली असता अथवा पठण केली असता सर्व पाप नष्ट होते.

आता मनूच्या पुत्रांचा पवित्र वंश मी तुला कथन करतो. त्याच्या केवळ श्रवणानेच प्राण्याला परम पदाची प्राप्ती होते. मनुपुत्रांनी लोकव्यवहार उत्तम रीतीने चालावा म्हणून आणि सर्व प्राण्यांना सुख प्राप्ती व्हावी या हेतूने सर्व पृथ्वीचे द्वीपे, वर्षे, समुद्र इत्यादि विभाग केले. त्यांची उत्तमप्रकारे व्यवस्था केली.


अध्याय तिसरा समाप्त

GO TOP