श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
अष्टमः स्कन्धः
द्वितीयोऽध्यायः


धरण्युद्धारवर्णनम्

श्रीनारायण उवाच
एवं मीमांसतस्तस्य पद्मयोनेः परन्तप ।
मन्वादिभिर्मुनिवरैर्मरीच्याद्यैः समन्ततः ॥ १ ॥
ध्यायतस्तस्य नासाग्राद्विरञ्चेः सहसानघ ।
वराहपोतो निरगादेकाङ्गुलप्रमाणतः ॥ २ ॥
तस्यैव पश्यतः खस्थः क्षणेन किल नारद ।
करिमात्रं प्रववृधे तदद्‌भुततमं ह्यभूत् ॥ ३ ॥
मरीचिमुख्यैर्विप्रेन्द्रैः सनकाद्यैश्च नारद ।
तद्‌ दृष्ट्वा सौकरं रूपं तर्कयामास पद्मभूः ॥ ४ ॥
किमेतत्सौकरव्याजं दिव्यं सत्त्वमवस्थितम् ।
अत्याश्चर्यमिदं जातं नासिकाया विनिःसृतम् ॥ ५ ॥
दृष्टोऽङ्गुष्ठशिरोमात्रः क्षणाच्छैलेन्द्रसन्तिभः ।
आहोस्विद्‍भगवान्किं वा यज्ञो मे खेदयन्मनः ॥ ६ ॥
इति तर्कयतस्तस्य ब्रह्मणः परमात्मनः ।
वराहरूपो भगवाञ्जगर्जाचलसन्निभः ॥ ७ ॥
विरञ्चिं हर्षयामास संहतांश्च द्विजोत्तमान् ।
स्वगर्जशब्दमात्रेण दिक्प्रान्तमनुनादयन् ॥ ८ ॥
ते निशम्य स्वखेदस्य क्षयितुं घुर्घुरस्वनम् ।
जनस्तपःसत्यलोकवासिनोऽमरवर्यकाः ॥ ९ ॥
छन्दोमयैः स्तोत्रवरैर्ऋक्सामाथर्वसम्भवैः ।
वचोभिः पुरुषं त्वाद्यं द्विजेन्द्राः पर्यवाकिरन् ॥ १० ॥
तेषां स्तोत्रं निशम्याद्यो भगवान् हरिरीश्वरः ।
कृपावलोकमात्रेणानुगृहीत्वाऽऽप आविशत् ॥ ११ ॥
तस्यान्तर्विशतः क्रूरसटाघातप्रपीडितः ।
समुद्रोऽथाब्रवीद्देव रक्ष मां शरणार्तिहन् ॥ १२ ॥
इत्याकर्ण्य समुद्रोक्तं वचनं हरिरीश्वरः ।
विदारयञ्जलचराञ्जगामान्तर्जले विभुः ॥ १३ ॥
इतस्ततोऽभिधावन्सन् विचिन्वन्पृथिवीं धराम् ।
आघ्रायाघ्राय सर्वेशो धरामासादयच्छनैः ॥ १४ ॥
अन्तर्जलगतां भूमिं सर्वसत्त्वाश्रयां तदा ।
भूमिं स देवदेवेशो दंष्ट्रयोदाजहार ताम् ॥ १५ ॥
तां समुद्धृत्य दंष्ट्राग्रे यज्ञेशो यज्ञपूरूषः ।
शुशुभे दिग्गजो यद्वदुद्धृत्याथ सुपद्मीनीम् ॥ १६ ॥
तं दृष्ट्वा देवदेवेशो विरञ्चिः समनुः स्वराट् ।
तुष्टाव वाग्भिर्देवेशं दंष्ट्रोद्धतवसुन्धरम् ॥ १७ ॥
ब्रह्मोवाच
जितं ते पुण्डरीकाक्ष भक्तानामार्तिनाशन ।
खर्वीकृतसुराधार सर्वकामफलप्रद ॥ १८ ॥
इयं च धरणी देव शोभते वसुधा तव ।
पद्मिनीव सुपत्राढ्या मतङ्गजकरोद्धृता ॥ १९ ॥
इदं च ते शरीरं वै शोभते भूमिसङ्गमात् ।
उद्धृताम्बुजशुण्डाग्रकरीन्द्रतनुसन्निभम् ॥ २० ॥
नमो नमस्ते देवेश सृष्टिसंहारकारक ।
दानवानां विनाशाय कृतनानाकृते प्रभो ॥ २१ ॥
अग्रतश्च नमस्तेऽस्तु पृष्ठतश्च नमो नमः ।
सर्वामराधारभूत बृहद्धाम नमोऽस्तु ते ॥ २२ ॥
त्वयाहं च प्रजासर्गे नियुक्त: शक्तिबृंहितः ।
त्वदाज्ञावशतः सर्गं करोमि विकरोमि च ॥ २३ ॥
त्वत्सहायेन देवेशा अमराश्च पुरा हरे ।
सुधां विभेजिरे सर्वे यथाकालं यथाबलम् ॥ २४ ॥
इन्द्रस्त्रिलोकीसाम्राज्यं लब्धवांस्तन्निदेशत: ।
भुनक्ति लक्ष्मीं बहुलां सुरसंघप्रपूजित: ॥ २५ ॥
वह्निः पावकतां लब्ध्वा जाठरादिविभेदतः ।
देवासुरमनुष्याणां करोत्याप्यायनं तथा ॥ २६ ॥
धर्मराजोऽथ पितॄणामधिपः सर्वकर्मदृक् ।
कर्मणां फलदातासौ त्वन्नियोगादधीश्वरः ॥ २७ ॥
नैर्ऋतो रक्षसामीशो यक्षो विघ्नविनाशन: ।
सर्वेषां प्राणिनां कर्मसाक्षी त्वत्तः प्रजायते ॥ २८ ॥
वरुणो यादसामीशो लोकपालो जलाधिपः ।
त्वदाज्ञाबलमाश्रित्य लोकपालत्वमागतः ॥ २९ ॥
वायुर्गन्धवह: सर्वभूतप्राणनकारणम् ।
जातस्तव निदेशेन लोकपालो जगद्‌गुरुः ॥ ३० ॥
कुबेरः किन्नरादीनां यक्षाणां जीवनाश्रयः ।
त्वदाज्ञान्तर्गतः सर्वलोकपेषु च मान्यभूः ॥ ३१ ॥
ईशान: सर्वरुद्राणामीश्वरान्तकरः प्रभुः ।
जातो लोकेशवन्द्योऽसौ सर्वदेवाधिपालकः ॥ ३२ ॥
नमस्तुभ्यं भगवते जगदीशाय कुर्महे ।
यस्यांशभागाः सर्वे हि जाता देवाः सहस्रशः ॥ ३३ ॥
नारद उवाच
एवं स्तुतो विश्वसृजा भगवानादिपूरुष: ।
लीलावलोकमात्रेणाप्यनुग्रहमवासृजत् ॥ ३४ ॥
तत्रैवाभ्यागतं दैत्यं हिरण्याक्षं महासुरम् ।
रुन्धानमध्वनो भीमं गदयाताडयद्धरि: ॥ ३५ ॥
तद्‌रक्तपङ्कदिग्धाङ्गो भगवानादिपूरुषः ।
उद्धृत्य धरणीं देवो दंष्ट्रया लीलयाप्सु ताम् ॥ ३६ ॥
निवेश्य लोकनाथेशो जगाम स्थानमात्मनः ।
एतद्‌भगवतश्चित्रं धरण्युद्धरणं परम् ॥ ३७ ॥
शृणुयाद्य: पुमान् यश्च पठेच्चरितमुत्तमम् ।
सर्वपापविनिर्मुक्तो वैष्णवीं गतिमाप्नुयात् ॥ ३८॥


पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवंताचा वराह अवतार -

नारायणमुनी नारदाला पुढे म्हणाले, "हे निष्पाप नारदा, त्यावेळी ब्रह्मदेवाच्या भोवती ब्रह्मपुत्र मनू व इतरही मरिच्यासारखे श्रेष्ठ ऋषी बसले होते आणि बुडालेल्या पृथ्वीच्या उद्धाराचे बाबतीत ब्रह्मदेव विचार करीत होते. त्या कमलोद्भव ब्रह्मदेवाने अशाप्रकारे डोळे मिटून विचार करीत त्या श्रीहरी भगवंताचे ध्यान करण्यास सुरुवात केली. तोच त्यांच्या नासाग्रापासून अकस्मात रीतीने एक अंगुलीच्या मापाचे एक वराहाचे पिलू निर्माण झाले आणि ते अवकाशात एकाएकी स्थिर झाले. हा चमत्कार पाहून सर्वजण आश्चर्ययुक्त झाले. सर्वजण एकाग्र होऊन त्या वराह शिशूकडे पाहू लागले. इतक्यात आकस्मिकरीत्या ते हत्तीएवढे मोठे झाले. हा फारच मोठा चमत्कार आहे असे वाटून, हे नारदा, तो मनू व मरिची ऋषी वगैरे सर्वांसह ब्रह्मदेवदेखील त्या वराहाकडे पाहू लागले. सनकादि इतर ब्राह्मणश्रेष्ठही विस्मयाने त्या वराहाकडे पाहू लागले. ते वराह हत्तीएवढे वाढल्यावर हे खरोखर सूकर आहे असे सर्वांना आढळून आले. हे ब्रह्मदेवाच्या नासिकेपासून निघाल्यामुळे सर्वांनाच अत्यंत आश्चर्य वाटले. त्यांना वाटले, हे वराहरूपी एखादे महाभयानक भूत तर नसेल ना ! खरोखरच ही अलौकिक घटना आहे !

जो तो विचार करू लागला, "अहो, हे उत्पन्न झाले तेव्हा अवघे केवळ अंगुष्ठाएवढेच होते आणि एकाएकी हे सारखे वाढत जाऊन पर्वताएवढे कसे झाले ? ब्रह्मदेवाला वाटले, माझ्या मनाला आनंद देणारा हा साक्षात भगवान यज्ञ तर नसेल ना ?"

अशाप्रकारे तो कमलोद्‌भव ब्रह्मदेव उलट सुलट विचार करू लागला. तो निरनिराळे तर्क करू लागला, तोच त्या वराहरूपी भगवंताने प्रचंड गर्जना केली. त्याची ती भयंकर गर्जना ऐकून सर्व विस्मित झाले. त्या गर्जनेने दाही दिशा दुमदुमून गेल्या आणि नंतर तेथे जमलेल्या त्या ज्ञानी ब्राह्मणांना आणि ब्रह्मदेवाला त्या वराहरूपी भगवंताने आनंदित केले.

खरोखरच आपल्या सर्वांच्या दुःखाचा नाश करणारा असा तो आवाज ऐकून सर्व देव, ऋषी, ब्राह्मण आपल्या स्थानापासून बाहेर पडले. त्या जप, तप व सत्य लोकात वास करणारे सर्व देवश्रेष्ठ सर्वोत्‌कृष्ट अशा छंदबद्ध स्तोत्रांनी भगवंताची स्तुति करू लागले. ते सर्वब्राह्मणश्रेष्ठ ऋग्वेद, सामवेद व अथर्ववेद यांनी युक्त असलेल्या वाणीने त्या भगवंताची आराधना करू लागले.

त्या देवांनी केलेली स्तुति ऐकून सर्वांचे कारण असलेला सर्व त्रैलोक्याचा नियंता, सर्वांच्या संकटांचे निवारण करण्यास सर्वदा तत्पर असलेला असा तो भगवंत त्याने सर्वांकडे एकवार आपली कृपादृष्टी टाकली व सर्वांना संतुष्ट केले. सर्वांवर अनुग्रह करून त्या भगवंतरूपी वराहाने त्वरेने त्या भयंकर उदकात प्रवेश केला.

सुसाट वेगाने उदकात प्रवेश केल्यामुळे त्या वराहाच्या शरीरावरील सर्व केस ताठ उभे राहिले होते, त्यामुळे समुद्राला अत्यंत पीडा होऊ लागली. तो अत्यंत दुःखी होऊन वराहरूपी भगवंताला म्हणाला, "हे भगवन् आपण दयाळू असून जे भक्त आपल्याला शरण येतात त्यांच्या दुःखांचा आपण नाश करता असा आपला लौकिक आहे. तेव्हा हे देवाधिदेव, आपण सांप्रत माझे रक्षण करा."

हे समुद्राचे बोलणे ऐकून देवकार्यासाठी सिद्ध झालेला तो सर्वांचा नियंता विभु, हरी, जलचरांचा नाश करीत करीत उदकात घुसला आणि सर्वत्र हिंडू लागला. सर्वांना आधार असलेली ती पृथ्वी कोठे गेली याचा तो शोध करू लागला. प्रत्येक वेळी नाकाने तो पुनःपुन्हा हुंगून पृथ्वीचा वेगाने शोध करीत होता. अखेर तो सर्वेश्वर भगवान अशारीतीने शोध घेत घेत हळूच पृथ्वीच्या अगदी जवळ येऊन पोहोचला.

नंतर त्या देवाने, सर्व प्राण्याचा आधार असलेली ती पृथ्वी लीलेने आपल्या दाढेत धरली व तिला अलगद वर उचलले. अशाप्रकारे तो सर्व यज्ञाचा ईश्वर व प्रत्यक्ष यज्ञपुरुषच असा तो भगवान, त्याने त्या पृथ्वीला आपल्या दंतांच्या आराने वर उचलून धरले. ज्याप्रमाणे एखाद्या पृष्टकमलिनीला सोंडेने सहजतेने उपटून वर उचलून धरल्यावर एखादा मस्त दिग्गज शोभून दिसतो त्याचप्रमाणे दंताग्रावर पृथ्वी तोलून धरलेला तो भगवान विष्णु अत्यंत शोभून दिसू लागला.

मनू, मरीची, ब्रह्मदेव, सर्व देवश्रेष्ठ आणि ऋषिमुनी हे दृश्य आश्चर्ययुक्त नजरेने पाहात होते. त्या देवाधिदेव व स्वयंप्रकाशरूप विष्णूने दाढेने अवाढव्य पृथ्वीचा उद्धार केला. त्या भगवान विष्णूची सर्वजण देववाणीने स्तुती करू लागले.

ब्रह्मदेव म्हणाला, "कमलपत्राक्षा, हे भक्तसंकटनाशका, खरोखर स्वर्गालाही असणारी सर्व मनोरथे आपण पूर्ण करीत असता त्यांचे फल प्राप्त करून देणारे आपण आहात. हे ईश्वरा, आपण सर्व काही जिंकून घेतले आहे. हे देवा, सर्व द्रव्याचे निधान असलेली ती सुंदरी पृथ्वी सांप्रत तुझ्या दाढेत असून जसे हत्तीने कमलिनी सोंडेत उचलून धरल्यावर शोभून दिसते तसे तुझ्या दाढेत ही पृथ्वी शोभून दिसत आहे.

खरोखर भूमीशी संगत झाल्यामुळे हे भगवंता तुझे शरीर सोंडेने कमल उपटणार्‍या हत्तीच्या शरीरासारखे आज अत्यंत शोभायमान झाले आहे. हे देवाधिपते, तुला नमस्कार असो. आम्ही तुला शरण आहोत.

हे प्रभो, तूच सृष्टी निर्माण करणारा असून संहारही तूच करतोस. तसे उन्मत्त दानवांच्या नाशासाठी तूच निरनिराळी रूपे धारण करून सर्वांचे तारण करतोस. हे प्रभो, तुला माझे वंदन असो.

हे प्रभो, तुला अग्रतः म्हणजे पुढील बाजूस नमस्कार असो. तसेच पृष्ठतः म्हणजे मागील बाजूने आमचा वारंवार नमस्कार असो. हे देवा, सर्व देवांचा तूच आधार असून तुझे वसतीस्थान अत्यंत मोठे आहे. हे भगवन् तुला माझा प्रणाम असो.

हे देवश्रेष्ठा, तूच प्रजा उत्पन्न करण्यासाठी माझी नियुक्ती केली आहेस. तसेच ही सर्व सृष्टी निर्माण करण्याची शक्तीही तूच मला दिली आहेस. हे भगवंता, खरोखरच तुझ्या आज्ञेवरूनच मी ही सर्व सृष्टी निर्माण करीत असतो व प्रलयकाली तिचा नाशही करतो.

हे हरे, पूर्वी केवळ तुझ्याच सहाय्याने इंद्रासह सर्व देवेश्वर अग्नी वगैरे अमर झाले. त्यांनी योग्य काली स्वसामर्थ्याप्रमाणे अमृताचे वाटप केले. हे देवा, तुझ्या आज्ञेमुळे हा इंद्र सर्व त्रैलोक्याच्या साम्राज्याचा अधिपती झाला व तो सांप्रत तुझ्याच कृपेने सर्व देवांना अत्यंत पूज्य होऊन सर्व ऐश्वर्य व संपत्तीचा उपभोग घेत आहे. हे विष्णो, तुझ्याच कृपेमुळे अग्नीला पावकता आली आहे. जाठर इत्यादि विभागात तुझ्यामुळेच अग्नी पावक होत असतो आणि तो देव, असूर व मानव या सर्वांनाही तृप्त करू शकतो. तो यमही केवळ तुझ्याच कृपाज्ञेने युक्त होऊन सर्वकर्मसाक्षी झाला आहे. तो पितरांचा मुख्य असून योग्यतेप्रमाणे कर्माचे फल देणारा झाला आहे. तुझ्या कृपेनेच तो मर्त्य प्राण्यांचा नियंता झाला आहे.

हे देवाधिदेव, हे लक्ष्मीपते, तू कृपा केलीस म्हणून तो नेॠत्य हा राक्षसांचाही अधिपती होऊ शकला. तसेच तुझ्या प्रसादामुळेच यक्ष हा विघ्नांचा नाश करण्यास समर्थ झाला. हे सर्वजण प्राण्यांच्या कर्माचे साक्षी होण्यास केवळ तूच कारण आहेस.

हे भगवन्, ज्याला जलचरांचा नियंता किंवा जलचरांची देवता म्हणून संबोधतात तो देवेश्वर वरुण, त्यालासुद्धा तुझ्या आज्ञारूपी बलाचाच आश्रय प्राप्त झाला. म्हणून तर तो लोकपाल म्हणून विख्यात झाला. त्याला लोकपालत्वाची प्राप्ती झाली.

तो गंधास वाहून नेणारा वायु तुझ्या तो कृपाज्ञेनेच जगात श्रेष्ठ झाला आहे आणि लोकपाल व सर्व भूतमात्रांचे प्राणतारणास तो कारण झाला. त्या कार्यास तो समर्थ झाला. किन्नर व यक्ष ज्याच्या आश्रयाने वास्तव्य करीत असतात असा तो कुबेरही तुझी आज्ञा प्राप्त झाल्यामुळेच या सर्वही लोकपालामध्ये अत्यंत आदरणीय व पूज्य झाला आहे.

हे ईशन्, हा ईशान, हा शंकरही सर्व रुद्रांचे नियमन करण्यास आणि नाश करण्यास समर्थ झाला आहे. हा प्रभू सर्व लोकपालांना वंद्य होऊन सर्व देवदेवांचा मुख्य पालक झाला आहे, तेही तुझ्या दयेमुळेच.

हे भगवन् हे जगदीश्वरा, तुला आम्ही नमस्कार करतो. हे भगवान, तुझ्या अंशाच्याही अंशापासून हे सहस्रावधी देव निर्माण झाले आहेत हे मला पटले. सारांश, हे सर्व देवही तुझेच सूक्ष्म अंश आहेत हे निश्चित." अशाप्रकारे ब्रह्मदेव भगवान विष्णूची स्तुती करू लागला.

नारायणमुनी म्हणतात, "अशाप्रकारे त्या सृष्टीच्या निर्मात्या ब्रह्मदेवाने त्या आदिपुरुषाची अपार स्तुती केली. तेव्हा त्या स्तुतीमुळे संतुष्ट होऊन त्या वराहरूपी भगवानाने त्या देवाकडे लीलेने आपली कृपादृष्टी फिरवली व त्याच्यावर अनुग्रह केला.

हे नारदा, अशा स्वरूपात दंतावर पृथ्वी धारण करून भगवान विष्णु जलातून वर येऊ लागले तेव्हा वाटेतच तो महाभयंकर दुष्ट असा हिरण्याक्ष नावाचा राक्षस, तो महाबलाढय दितीपुत्र आडवा आला. त्याने रागाने विष्णूचा मार्ग रोखून धरला. त्यामुळे हरीला त्याचा नाश करणे अवश्य वाटले. म्हणून त्याने गदेने अत्यंत लीलया त्या महासुरावर प्रचंड आघात केला.

हे महर्षे, त्या राक्षसाच्या रक्तरूपी चिखलाने त्या भगवंताचे शरीर माखून गेले. अशा स्थितीतही त्या आदिदेवाने सहजगत्या आपल्या दाढांच्या योगाने पृथ्वी तोलून तिचा उद्धार करून त्या पृथ्वीला उदकावर आणून ठेवले व तेथेच तिला स्थिर करून तो सर्व लोकपालांचा पालक देवाधिदेव जनार्दन त्वरेने स्वस्थानी निघून गेला. अशारीतीने अत्यंत उकृष्ट प्रकारे त्या भगवंतांनी पृथ्वीचा आपल्या विचित्र लीलेने सत्वर उद्धार केला ही कथा जो श्रवण करतो व जो पुरुष ह्या उत्तम चरित्राचे वाचन- पठण करतो तो सर्व पापराशींपासून सत्वर मुक्त होतो. अखेरीस वैष्णवी गती प्राप्त करून घेतो. त्याला विष्णुलोक प्राप्त होतो."


इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेअष्टादशसाहस्र्यां
संहितायामष्टमस्कन्धे धरण्युद्धारवर्णनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
अध्याय दुसरा समाप्त

GO TOP