श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
अष्टमः स्कन्धः
पञ्चमोऽध्यायः


भुवनलोकवर्णने द्वीपवर्षविभेदवर्णनम्

श्रीनारायण उवाच
देवर्षे शृणु विस्तारं द्वीपवर्षविभेदतः ।
भूमण्डलस्य सर्वस्य यथा देवप्रकल्पितम् ॥ १ ॥
समासात्सम्प्रवक्ष्यामि नालं विस्तरतः क्वचित् ।
जम्बुद्वीपः प्रथमतः प्रमाणे लक्षयोजनः ॥ २ ॥
विशालो वर्तुलाकारो यथाब्जस्य च कर्णिका ।
नव वर्षाणि यस्मिंश्च नवसाहस्रयोजनैः ॥ ३ ॥
आयामैः परिसंख्यानि गिरिभिः परितः श्रितैः ।
अष्टाभिर्दीर्घरूपैश्च सुविभक्तानि सर्वतः ॥ ४ ॥
धनुर्वत्संस्थिते ज्ञेये द्वे वर्षे दक्षिणोत्तरे ।
दीर्घाणि तत्र चत्वारि चतुरस्रमिलावृतम् ॥ ५ ॥
इलावृतं मध्यवर्षं यन्नाभ्यां सुप्रतिष्ठितः ।
सौवर्णो गिरिराजोऽयं लक्षयोजनमुच्छ्रितः ॥ ६ ॥
कर्णिकारूप एवायं भूगोलकमलस्य च ।
मूर्ध्नि द्वात्रिंशत्सहस्रयोजनैर्विततस्त्वयम् ॥ ७ ॥
मूले षोडशसाहस्रस्तावतान्तर्गतः क्षितौ ।
इलावृतस्योत्तरतो नीलः श्वेतश्च शृङ्गवान् ॥ ८ ॥
त्रयो वै गिरयः प्रोक्ता मर्यादावधयस्त्रिषु ।
रम्यकाख्ये तथा वर्षे द्वितीये च हिरण्मये ॥ ९ ॥
कुरुवर्षे तृतीये तु मर्यादां व्यञ्जयन्ति ते ।
प्रागायता उभयतः क्षारोदावधयस्तथा ॥ १० ॥
द्विसहस्रपृथुतरास्तथा एकैकशः क्रमात् ।
पूर्वात्पूर्वाच्चोत्तरस्यां दशांशादधिकांशतः ॥ ११ ॥
दैर्घ्य एव ह्रसन्तीमे नानानदनदीयुताः ।
इलावृताद्दक्षिणतो निषधो हेमकूटकः ॥ १२ ॥
हिमालयश्चेति त्रयः प्राग्विस्तीर्णाः सुशोभनाः ।
अयुतोत्सेधभाजस्ते योजनैः परिकीर्तिताः ॥ १३ ॥
हरिवर्षं किम्पुरुषं भारतं च यथातथम् ।
विभागात्कथयन्त्येते मर्यादागिरयस्त्रयः ॥ १४ ॥
इलावृतात्पश्चिमतो माल्यवान्नामपर्वतः ।
पूर्वेण च ततः श्रीमान् गन्धमादनपर्वतः ॥ १५ ॥
आनीलनिषधं त्वेतौ चायतौ द्विसहस्रतः ।
योजनैः पृथुतां यातौ मर्यादाकारकौ गिरी ॥ १६ ॥
केतुमालाख्यभद्राश्ववर्षयोः प्रथितौ च तौ ।
मन्दरश्च तथा मेरुमन्दरश्च सुपार्श्वकः ॥ १७ ॥
कुमुदश्चेति विख्याता गिरयो मेरुपादकाः ।
योजनायुतविस्तारोन्नाहा मेरोश्चतुर्दिशम् ॥ १८ ॥
अवष्टम्भकरास्ते तु सर्वतोऽभिविराजिताः ।
एतेषु गिरिषु प्राप्ताः पादपाश्चूतजम्बुनी ॥ १९ ॥
कदम्बन्यग्रोध इति चत्वारः पर्वताः स्थिताः ।
केतवो गिरिराजेषु एकादशशतोच्छ्रयाः ॥ २० ॥
तावद्विटपविस्ताराः शताख्यपरिणाहिनः ।
चत्वारश्च ह्रदास्तेषु पयोमध्विक्षुसज्जलाः ॥ २१ ॥
यदुपस्पर्शिनो देवा योगैश्वर्याणि विन्दते ।
देवोद्यानानि चत्वारि भवन्ति ललनासुखाः ॥ २२ ॥
नन्दनं चैत्ररथकं वैभ्राजं सर्वभद्रकम् ।
येषु स्थित्वामरगणा ललनायूथसंयुताः ॥ २३ ॥
उपदेवगणैर्गीतमहिमानो महाशयाः ।
विहरन्ति स्वतन्त्रास्ते यथाकामं यथासुखम् ॥ २४ ॥
मन्दरोत्सङ्गसंस्थस्य देवचूतस्य मस्तकात् ।
एकादशशतोच्छ्रायात्फलान्यमृतभाञ्जि च ॥ २५ ॥
गिरिकूटप्रमाणानि सुस्वादूनि मृदूनि च ।
तेषां विशीर्यमाणानां फलानां सुरसेन च ॥ २६ ॥
अरुणोदसवर्णेन अरुणोदा प्रवर्तते ।
नदी रम्यजला देवदैत्यराजप्रपूजिता ॥ २७ ॥
अरुणाख्या महाराज वर्तते पापहारिणी ।
पूजयन्ति च तां देवीं सर्वकामफलप्रदाम् ॥ २८ ॥
नानोपहारबलिभिः कल्मषघ्न्यभयप्रदाम् ।
तस्याः कृपावलोकेन क्षेमारोग्यं व्रजन्ति ते ॥ २९ ॥
आद्या मायातुलानन्ता पुष्टिरीश्वरमालिनी ।
दुष्टनाशकरी कान्तिदायिनीति स्मृता भुवि ॥ ३० ॥
अस्याः पूजाप्रभावेण जाम्बूनदमुदावहत् ॥ ३१ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
भुवनलोकवर्णने द्वीपवर्षविभेदवर्णनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥


भुवन लोकाचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद नारायण मुनीचे शब्द एकाग्र चित्ताने ऐकत होता. नारायण मुनी पुढे म्हणाले, "हे देवर्षे, आता हे सर्व विभाग प्रत्यक्ष देवांनीच कल्पिलेले आहेत. म्हणून आता द्वीप, वर्षे याविषयी मी तुला सांगतो ते श्रवण कर. ही गोष्ट संपूर्ण विस्ताराने कथन करणे अशक्य आहे. म्हणून मी तुला ती संक्षेपाने निवेदन करतो.

पहिले जे जंबूद्वीप त्याचे क्षेत्रफळ एक लक्ष योजने आहे. कमलातील केंद्र वर्तुळाप्रमाणे हे द्वीप अत्यंत विशाल व वर्तुळाकार आहे. त्यात नऊ वर्षे आहेत. ती सर्व पर्वतराजींनी वेढलेली आहेत. त्यातील प्रत्येक वर्षे नऊ हजार योजनेपर्यंत प्रचंड आहे असे मोजमाप करून ठेवलेले आहे. त्यात समुद्राच्या टोकापर्यंत पोहोचलेले आठ अत्यंत विस्तृत असे पर्वत आहेत. त्यामुळे त्या द्वीपाचे सर्वच बाजूंनी विभाग केलेले आहेत. दक्षिण व उत्तर ही दोन्ही वर्षे धनुष्याच्या आकृतीप्रमाणे आहेत हे तू लक्षात घे. बाकीच्यातील चार वर्षे लांब असून इलावृत्त चौकोनी आकाराचे आहे. इलावृत्त हे मध्य वर्ष आहे. त्याच्यामध्ये अत्यंत मोठा असा पर्वत असून तो सुवर्णाप्रमाणे चमकत आहे. त्याची उंची एक लक्ष योजने असून तो अत्यंत शोभायमान आहे, भूगोलरूपी कमलाची जणू काय कर्णरेषाच असा हा पर्वत आहे. याचा माथ्यावरील भाग बत्तीस हजार योजने इतका मोठा आहे तर याचे पायथ्याचे क्षेत्रफळ सोळा हजार योजने असून रुंद आहे. तो तितकाच भूमीमध्ये खोलवर रुजला आहे. इलावृत्ताच्या उत्तरेला नील, श्वेत, शृंगवान हे तीन पर्वत आहेत. हे तिन्ही पर्वत विख्यात असून ते तीन वर्षांच्या मर्यादा दर्शवितात. म्हणून त्यांना त्यांच्या सीमा म्हणतात.

पहिल्या वर्षाच्या या सीमेला रम्यक असे नाव आहे. दुसर्‍या वर्षाची सीमा हिरण्मय नावाने प्रसिद्ध आहे. तिसर्‍या वर्षाच्या सीमेला करुवर्ष असे नाव दिलेले आहे. यांच्या दोन्ही बाजूला पूर्व दिशेला अनुसरून दोन खारट पाण्याचे समुद्र आहेत. हे समुद्र म्हणजे आणखी दोन पर्वतांची मर्यादा होय. हे दोन्ही पर्वतही तसेच विस्तृत आहेत. ते दोन हजार योजने विस्तृत आहेत.

हे सर्व पर्वत पूर्वेकडून उत्तरेकडे जसजसे क्रमाने पसरले आहेत तसतसे त्यांचे विशालत्व दहा अंशापेक्षाही जास्त अंशांनी कमी कमी होत गेले आहे. ही गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे.

ह्या सर्व पर्वतांवर विविध नद्या असून मोठमोठे नदही तेथे आहेत. इलावृत्ताच्या दक्षिणेकडे हिमालय, हेमकूट व निषध या नावांनी प्रसिद्ध असलेले अतिशय विस्तृत असे प्रचंड पर्वतराज उभे आहेत. हे पूर्वेकडे विस्तीर्ण होत गेलेले असून ते अत्यंत शोभायमान दिसत असतात. हे तिन्ही पर्वत फारच उंच म्हणजे त्यांची उंची एक हजार योजनांहून अधिक आहे असे सांगितलेले आहे.

या सर्व विभागांमुळे हरिवर्ष, किंपुरुष, भारत या तीन वर्षाची मर्यादा हे पर्वत अनुक्रमे निषध, हेमकूट व हिमालय दर्शवित असतात. इलावृत्ताच्या पश्चिमेला माल्यवान नावाचा पर्वत असून त्याच्याही पूर्व दिशेला गंधमादन पर्वत आहे. हा पर्वत कांतीमान असल्याने तळपत असतो. हे दोन्ही पर्वत नील व निषद या पर्वतापर्यंत जाऊन पोहोचले आहेत.

माल्यवान व गंधमादन ह्या पर्वतांचा विस्तार दोन हजार योजने असून हे पर्वत सर्वत्र प्रसिद्ध आहेत. केतुमाल व भाद्राश्व या दोन वर्षांची सीमा माल्यवान आणि गंधमादन हे पर्वत दर्शवीत असतात.

मेरु वर्षाच्या चोहो दिशांना चार पर्वत उभे आहेत. ते सर्व हजार योजने असून त्यांची नावे आता तुला सांगतो. मंदर, मेरुमंदर, सुपार्श्वक आणि कुमुद हेच ते चार पर्वत म्हणजे मेरुवर्षाचे चार पायच होत. हे सर्व पर्वत मेरूला प्रत्यक्ष सहाय्य करीत असतात. चारी बाजूंनी ते परिवेष्टीत असल्यामुळे अत्यंत शोभून दिसतात.

या पर्वतांमध्ये पुन्हा आणखी पर्वत आहेत. ते त्यांचेच लहान भाग असून त्यांची नावे आता ऐक. चूत, जंबू कदंब, न्यग्रोध हे चारही पर्वत निरनिराळ्या वृक्षराजींनी परिपूर्ण आहेत. त्या चार मोठया पर्वताचे हे चार पर्वत म्हणजे चार ध्वजच आहेत. त्यांची उंची अकराशे योजने आहे. त्यांचे क्षेत्रफळ शंभर योजने आहे आणि शंभर योजने सर्वत्र वृक्ष उभे आहेत.

त्या पर्वतांवर अत्यंत सुंदर अशी सरोवरे आहेत. पयोर्‍हद, मधुर्‍हद, इक्षुरसर्‍हद या नावांनी ती सरोवरे प्रसिद्ध आहेत. त्या सरोवरांच्या रसाला देवांनी स्पर्श केल्यास त्यांना ऐश्वर्य प्राप्त होते अशी त्यांची थोरवी आहे.

तेथे देवांना आनंद व सुख प्राप्त करून देणारी चार अत्यंत रमणीय उद्याने आहेत. ती चारही उद्याने नंदन, चैत्ररभ, वैभ्राज व सर्वभद्रक या नावांनी ओळखली जातात. ती उद्याने स्त्रियांना परम सुख देणारी आहेत. गंधर्वांप्रमाणे सर्व उपदेव आपापल्या स्त्रियांसह तेथे क्रीडा करण्याकरता येतात. त्यांनीदेखील त्या उद्यानांच्या सौंदर्याची मुक्त कंठाने स्तुती केली आहे. हे सर्व सुरगण मनसोक्त आणि स्वच्छंदपणाने तेथे यथेच्छ क्रीडा करीत असतात. तेथील सुखोपभोगाचा ते भरपूर आस्वाद घेतात. येथेच विहार करण्यात ते आपला काल घालवितात. मंदार पर्वताच्या माथ्यावर आम्रवृक्ष आहेत. ते देव-वृक्ष असून विशाल आहेत. त्या वृक्षांच्या वरून म्हणजे अकराशे योजने उंचीवरून पर्वताच्या शिखराएवढी मोठी असलेली नदी उगम पावली आहे. तिचे उदक अमृततुल्य आहे. तिचे उदक अत्यंत मधुर असून पिकलेल्या फळातून फुटल्यावर जसा रस वाहतो किंवा अरुणोदयाचे वेळी जसा सूर्यबिंबाचा रंग असतो तशा वर्णाचे तिचे उदक असून त्या नदीला अरुणोदा नदी म्हणतात. तिचे पाणी फारच रमणीय आहे. त्यामुळे देव व दैत्य दोघांनाही ती नदी अत्यंत प्रिय आहे. म्हणून जणू ती सर्वमान्य झालेली आहे. अरुणा नावाचे पाप ह्या नदीमुळे धुऊन जाते, म्हणून ती पापहारिणी आहे. हिचा उगम त्या देवीपासून झालेला आहे.

ती देवी इष्ट फल देणारी म्हणून प्रसिद्ध असून सर्व देव त्या देवीची नित्य पूजा करीत असतात. तिला विविध प्रकारचे उपाहार अर्पण करतात. तसेच निरनिराळे बली तिला अर्पण करतात. त्यामुळे ती देवी सर्व दुरितांचे निवारण करते व सर्वांना निर्भय करते. म्हणून देव तिला वेगवेगळ्या मार्गांनी संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीत असतात.

त्या देवीची अशी आराधना केली असता ती देवी तृप्त होते व आपले कृपाकटाक्ष टाकून सर्वांना निश्चिंत करते. त्यामुळे सर्वांना सुख आणि आरोग्य प्राप्त होते. भूलोकावरील पुरुष तिला विविध नावांनी संबोधतात. हे नारदा, त्यातील काही नावे आता श्रवण कर. त्या देवीला आद्या, माया, तूला, अनंता, पृष्ठी, ईश्वरमालिनी, दुष्टनाशकरी, कांतिदायिनी अशी नावे आहेत. या नावांचे अर्थ असे की, ईश्वरमालिनी म्हणजे ईश्वरालाही शोभा प्राप्त करून देणारी. दुष्टनाशकारी म्हणजे दुष्टांचा नाश करणारी आणि कांतिदायिनी म्हणजे सर्वांना कांतीने युक्त करणारी अथवा शोभायमान करणारी अशी ही देवी आहे. तिची पूजा केल्यावर सुवर्ण उत्पन्न होते.


अध्याय पाचवा समाप्त

GO TOP