श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
सप्त‌विंशोऽध्यायः


हरिश्चन्द्राख्यानश्रवणफलवर्णनम्

सूत उवाच -
ततः कृत्वा चितां राजा आरोप्य तनयं स्वकम् ।
भार्यया सहितो राजा बद्धाञ्जलिपुटस्तदा ॥ १ ॥
चिन्तयन्परमेशानीं शताक्षीं जगदीश्वरीम् ।
पञ्चकोशान्तरगतां पुच्छब्रह्मस्वरूपिणीम् ॥ २ ॥
रक्ताम्बरपरीधानां करुणारससागरम् ।
नानायुधधरामम्बां जगत्पालनतत्पराम् ॥ ३ ॥
तस्य चिन्तयमानस्य सर्वे देवाः सवासवाः ।
धर्मं प्रमुखतः कृत्वा समाजग्मुस्त्वरान्विताः ॥ ४ ॥
आगत्य सर्वे प्रोचुस्ते राजञ्छ्रुणु महाप्रभो ।
अहं पितामहः साक्षाद्धर्मश्च भवगान्स्वयम् ॥ ५ ॥
साध्याः सविश्वे मरुतो लोकपालाः सचारणाः ।
नागाः सिद्धाः सगन्धर्वा रुद्राश्चैव तथाश्विनौ ॥ ६ ॥
एते चान्येऽथ बहवो विश्वामित्रस्तथैव च ।
विश्वत्रयेण यो मैत्रीं कर्तुमिच्छति धर्मतः ॥ ७ ॥
विश्वामित्रः स तेऽभीष्टमाहर्तुं सम्यगिच्छति ।
धर्म उवाच -
मा राजन् साहसं कार्षीर्धर्मोऽहं त्वामुपागतः ॥ ८ ॥
तितिक्षादमसत्त्वाद्यैस्त्वद्‌गुणैः परितोषितः ।
इन्द्र उवाच -
हरिश्चन्द्र महाभाग प्राप्तः शक्रोऽस्मि तेऽन्तिकम् ॥ ९ ॥
त्वयाद्य भार्यापुत्रेण जिता लोकाः सनातनाः ।
आरोह त्रिदिवं राजन् भार्यापुत्रसमन्वितः ॥ १० ॥
सुदुष्प्रापं नरैरन्यैर्जितमात्मीयकर्मभिः ।
सूत उवाच -
ततोऽमृतमयं वर्षमपमृत्युविनाशनम् ॥ ११ ॥
इन्द्रः प्रासृजदाकाशाच्चितामध्यगते शिशौ ।
पुष्पवृष्टिश्च महती दुन्दुभिस्वन एव च ॥ १२ ॥
समुत्तस्थौ मृतः पुत्रो राज्ञस्तस्य महात्मनः ।
सुकुमारतनुः स्वस्थः प्रसन्नः प्रीतमानसः ॥ १३ ॥
ततो राजा हरिश्चन्द्रः परिष्वज्य सुतं तदा ।
सभार्यः स्वश्रिया युक्तो दिव्यमालाम्बरावृतः ॥ १४ ॥
बभूव तत्क्षणादिन्द्रो भूपं चैवमभाषत ॥ १५ ॥
सभार्यस्त्वं सपुत्रश्च स्वर्लोकं सद्‌गतिं पराम् ।
समारोह महाभाग निजानां कर्मणां फलम् ॥ १६ ॥
हरिश्चन्द्र उवाच -
देवराजाननुज्ञातः स्वामिना श्वपचेन हि ।
अकृत्वा निष्कृतिं तस्य नारोक्ष्ये वै सुरालयम् ॥ १७ ॥
धर्म उवाच -
तवैवं भाविनं क्लेशमवगम्यात्ममायया ।
आत्मा श्वपचतां नीतो दर्शितं तच्च पक्कणम् ॥ १८ ॥
इन्द्र उवाच -
प्रार्थ्यते यत्परं स्थानं समस्तैर्मनुजैर्भुवि ।
तदारोह हरिश्चन्द्र स्थानं पुण्यकृतां नृणाम् ॥ १९ ॥
हरिश्चन्द्र उवाच -
देवराज नमस्तुभ्यं वाक्यं चेदं निबोध मे ।
मच्छोकमग्नमनसः कौसले नगरे नराः ॥ २० ॥
तिष्ठन्ति तानपास्यैवं कथं यास्याम्यहं दिवम् ।
ब्रह्महत्या सुरापानं गोवधः स्त्रीवधस्तथा ॥ २१ ॥
तुल्यमेभिर्महत्पापं भक्तत्यागादुदाहृतम् ।
भजन्तं भक्तमत्याज्यं त्यजतः स्यात्कथं सुखम् ॥ २२ ॥
तैर्विना न प्रयास्यामि तस्माच्छक्र दिवं व्रज ।
यदि ते सहिताः स्वर्गं मया यान्ति सुरेश्वर ॥ २३ ॥
ततोऽहमपि यास्यामि नरकं वापि तैः सह ।
इन्द्र उवाच -
बहूनि पुण्यपापानि तेषां भिन्नानि वै नृप ॥ २४ ॥
कथं सङ्घातभोज्यं त्वं भूप स्वर्गमभीप्ससि ।
हरिश्चन्द्र उवाच -
भुङ्क्ते शक्र नृपो राज्यं प्रभावात्प्रकृतेध्रुवम् ॥ २५ ॥
यजते च महायज्ञैः कर्म पूर्तं करोति च ।
तच्च तेषां प्रभावेण मया सर्वमनुष्ठितम् ॥ २६ ॥
उपदादान्न संत्यक्ष्ये तानहं स्वर्गलिप्सया ।
तस्माद्यन्मम देवेश किञ्चिदस्ति सुचेष्टितम् ॥ २७ ॥
दत्तमिष्टमथो जप्तं सामान्यं तैस्तदस्तु नः ।
बहुकालोपभोज्यं च फलं यन्मम कर्मगम् ॥ २८ ॥
तदस्तु दिनमप्येकं तैः समं त्वप्रसादतः ।
सूत उवाच -
एवं भविष्यतीत्युक्त्वा शक्रस्त्रिभुवनेश्वरः ॥ २९ ॥
प्रसन्नचेता धर्मश्च विश्वामित्रश्च गाधिजः ।
गत्वा तु नगरं सर्वे चातुर्वर्ण्यसमाकुलम् ॥ ३० ॥
हरिश्चन्द्रस्य निकटे प्रोवाच विबुधाधिपः ।
आगच्छन्तु जनाः शीघ्रं स्वर्गलोकं सुदुर्लभम् ॥ ३१ ॥
धर्मप्रसादात्सम्प्राप्तं सर्वैर्युष्माभिरेव तु ।
हरिश्चन्द्रोऽपि तान्सर्वाञ्जनान्नगरवासिनः ॥ ३२ ॥
प्राह राजा धर्मपरो दिवमारुह्यतामिति ।
सूत उवाच -
तदिन्द्रस्य वचः श्रुत्वा प्रीतास्तस्य च भूपतेः ॥ ३३ ॥
ये संसारेषु निर्विण्णास्ते धुरं स्वसुतेषु वै ।
कृत्वा प्रहृष्टमनसो दिवमारुरुहुर्जनाः ॥ ३४ ॥
विमानवरमारूढाः सर्वे भास्वरविग्रहाः ।
तदा सम्भूतहर्षास्ते हरिश्चन्द्रश्च पार्थिवः ॥ ३५ ॥
राज्येऽभिषिच्य तनयं रोहिताख्यं महामनाः ।
अयोध्याख्ये पुरे रम्ये हृष्टपुष्टजनान्विते ॥ ३६ ॥
तनयं सुहृदश्चापि प्रतिपूज्याभिनन्द्य च ।
पुण्येन लभ्यां विपुलां देवादीनां सुदुर्लभाम् ॥ ३७ ॥
सम्प्राप्य कीर्तिमतुलां विमाने स महीपतिः ।
आसाञ्चक्रे कामगमे क्षुद्रघण्टाविराजिते ॥ ३८ ॥
ततस्तर्हि समालोक्य श्लोकमन्त्रं तदा जगौ ।
दैत्याचार्यो महाभागः सर्वशास्त्रार्थतत्त्ववित् ॥ ३९ ॥
शुक्र उवाच -
अहो तितिक्षामाहात्म्यमहो दानफलं महत् ।
यदागतो हरिश्चन्द्रो महेन्द्रस्य सलोकताम् ॥ ४० ॥
सूत उवाच -
एतत्ते सर्वमाख्यानं हरिश्चन्द्रस्य चेष्टितम् ।
यः शृणोति च दुःखार्तः स सुखं लभतेऽन्वहम् ॥ ४१ ॥
स्वर्गार्थी प्राप्नुयात् स्वर्गं सुतार्थी सुतमाप्नुयात् ।
भार्यार्थी प्राप्नुयाद्‌भार्यां राज्यार्थीं राज्यमाप्नुयात् ॥ ४२ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
सप्तमस्कन्धे हरिश्चन्द्राख्यानश्रवणफलवर्णनं नाम सप्तविंशोऽध्यायः ॥ २७ ॥


हरिश्‍चंद्राला स्वर्गप्राप्ति -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अखेर शेवटी राजाने एक विस्तृत चिता तयार केली. त्या चितेवर जड अंतःकरणाने आपल्या पुत्राला ठेवले. आपल्या भार्येसह आपले हात जोडून तो त्या आदिशक्ती परमेश्‍वरीचे, त्या शताक्षौचे मनात स्मरण करू लागला.

जी भगवती या जगाचे नियमन करते, जी पाचही कोशांच्या आत वास्तव्य करते आणि आनंदमय कोशाचे पुच्छ जे ब्रह्मा, तत्स्वरूपिणी, रक्तवस्त्र परिधान करणारी, कारुण्याचा जणू सिंधूच आणि नानाप्रकारची आयुधे धारण करून जगाचे तत्परतेने पालन करते, ती भगवती अंबादेवी, तिचे राजाने मनःपूर्वक स्मरण केले.

अशाप्रकारे अग्निप्रवेशास सिद्ध होऊन त्या परममंगल जगदंबेचे राजा स्मरण करू लागताच इंद्रादिदेव सत्त्वर धर्माला पुढे घेऊन तेथे आले. तेथे येऊन ते क्रमाक्रमाने राजाला म्हणू लागले -

प्रथम ब्रह्मदेव राजासमोर येऊन म्हणाला, "हे महाप्रभावशाली राजा, ऐक आता. मी साक्षात् पितामह असून हा येथे उभा आहे. तो स्वतः भगवान धर्मच आहे. आम्ही दोघेही येथे मुद्दाम आलो आहोत. आमच्याबरोबर विश्‍वदेव व मरुद्‌गणांसह सिद्ध तसेच लोकपाल चारणासह येथे प्राप्त झाले आहेत. नाग, सिद्ध, गंधर्व यांच्यासह वर्तमान हा एकादश रुद्र येथे येऊन पोहोचला आहे. तसेच हे अश्‍विनीकुमार, हा इंद्र असे हे सर्व देवेश्‍वर या ठिकाणी आलेले आहेत.

तसेच धर्माच्या सहाय्याने जो या त्रिभुवनाशी मैत्री करण्याची नित्य इच्छा धरीत असतो तो हा महातपस्वी विश्‍वामित्रदेखील येथे उपस्थित आहे. सांप्रत हा विश्‍वामित्र मुनी संतुष्ट होऊन तुला इच्छित असा योग्य वर देण्याची इच्छा धरून येथे आला आहे."

भगवान धर्म म्हणाला, "राजा, आता हे साहस तू करू नकोस. तुझ्या अंगी असलेली शीतोष्णादि सर्व दुःखे सहन करण्याची शक्ती (तितिक्षा), दम (इंद्रिय निग्रह) आणि सत्त्व या सर्व गुणांनी तू युक्त असल्याने मी अत्यंत तृप्त होऊन तुजकडे आलो आहे."

यानंतर देवराज इंद्र पुढे आला आणि म्हणाला, "हे महाभाग्यवान हरिश्‍चंद्रा, हे राजेश्‍वरा, मी साक्षात इंद्र तुला भेटण्यासाठी त्वरेने येथे आलो आहे. खरोखरच राजा, तू तुझी प्रिय भार्या आणि लाडका पुत्र यांनी या सर्व अविनाशी लोकांची मने, तुझ्या संजीवक कृतीमुळे जिंकली आहेस. म्हणूनच हे राजा, आज तू तुझ्या भार्येसह आणि पुत्रासह निःशंक मनाने स्वर्गलोकी गमन कर. कारण पुरुषांना दुर्लभ अशा वस्तु तू तुझ्या सत्कर्मामुळे जिंकून घेतल्या आहेस. तू आता स्वर्गही पराक्रमाने जिंकला आहेस."

असे बोलून इंद्राने चितेवर ठेवलेल्या पुत्रावर आकाशातूनच अमृत सिंचन केले. त्यामुळे अपमृत्यूचा नाश होऊन त्या महात्म्या राजाचा पुत्र सजीव झाला आणि चितेतून खडबडून उठला. राजाला आकाशातून पुष्पवृष्टी झाली. स्वर्गात दुंदुभी वाजू लागल्या. राजाच्या स्वागतासाठी सर्व सज्ज झाले. राजपुत्राचे शरीर सचेतन होऊन सुंदर व सुकुमार झाले. तो पुत्र अत्यंत शांत व आनंदी दिसत होता. त्याच्या मुखचर्येवरील तेजाने तो सुप्रसन्न दिसत होता. राजा आवेगाने पुढे आला. त्याने आपल्या पुत्राला प्रेमाने दृढ आलिंगन दिले.

राजाचा व राणीचा देहही पूर्ववत कांतीने झळकू लागला. दोघेही सतेज दिसू लागले. राजा पहिल्याप्रमाणे दिव्य पुष्पे आणि वस्त्रे यांनी विभूषित झाला. शोकाचे मूळ कारणच नष्ट झाले, त्यामुळे राजाचे चित्त स्वस्थ प्रसन्न झाले.

त्या दानशूर मनाच्या राजाची आनंदमय अवस्था पाहून इंद्र सत्त्वर राजाला म्हणाला, "हे राजेंद्रा, तू आपल्या सत्‌कृत्याने स्वर्गावरही विजय मिळविला आहेस, म्हणून तू आता आपली भार्या व पुत्र यांना घेऊन स्वर्गाप्रत चल."

त्यावर हरिश्‍चंद्र राजा नम्रतापूर्वक म्हणाला, "देवेंद्रा, सांप्रत चांडाळ हा माझा धनी आहे. मी त्याचे द्रव्य घेतले आहे. त्यामुळे त्याचा मी दास आहे. त्याची आज्ञा घेतल्यावाचून अथवा त्याच्या ऋणाची फेड केल्यावाचून मी त्या सुरमंदिरात येणे अशक्य आहे. ऋणमुक्त झाल्याशिवाय मी स्वर्गारोहण करणार नाही."

राजाचे धर्मतत्पर भाषण ऐकून समस्त देव प्रसन्न झाले आणि अत्यंत समाधानी झाले. तृप्त होऊन धर्म म्हणाला, "हे राजा, मी आता खरेच सांगतो. तुला पहाण्यासाठी माझ्या मायेने मीच चांडाळ झालो होतो आणि मायेने उत्पन्न केलेला तो चांडाळवाडा तुला दाखविला व तेथे वास्तव्य करावयास लावले."

इंद्र सत्वर म्हणाला, "हे राजेश्‍वरा, आता विलंब लावू नकोस. इहलोकी पुण्याचरणाने परमपवित्र होऊन सर्व लोक ज्या श्रेष्ठ स्थानाची इच्छा करतात, ते स्थान प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना करतात, त्या सर्व सुखमय अशा स्थानावर हे हरिश्‍चंद्रा, आता तू आरूढ हो."

इंद्राच्या भाषणाने समाधान पावून राजा म्हणाला, "हे देवाधिदेवा, मी आपणाला नम्रतापूर्वक नमस्कार करीत आहे. आपण माझी एक प्रार्थना आग्रहपूर्वक श्रवण करावी. माझ्या वियोगामुळे आणि मला प्राप्त झालेल्या अपार दुःखामुळे सर्व अयोध्यावासियांचे मन अत्यंत उद्विग्न झालेले आहे. माझ्या दुःखामुळे अत्यंत दुःखी होऊन ते तेथे नाईलाजाने वास्तव्य करीत आहेत. त्यांना मी कसे अंतर देऊ ? माझ्या सुखासाठी त्यांना येथे सोडून मी एकटा स्वर्ग लोकी कसा बरे येऊ ? हे देवा, मजवर त्यांची परम भक्ती आहे. त्या माझ्या एकनिष्ठ भक्तांचा त्याग केल्याने मला फार मोठे पाप लागेल. कारण हे धर्मज्ञा, भक्ताचा त्याग केल्याने ब्रह्महत्येप्रमाणे महादोष लागतो. सुरापान, गोवध, स्त्रीवध ही दुष्कृत्ये जशी महापातकांचे कारण आहेत, तसेच भक्तांचा त्याग करून मी सुखी कसा होणार ? तेव्हा हे सुरेश्‍वरा, माझ्याबरोबर आपण त्यांनाही जर सुरलोकी नेण्यास तयार असाल तरच मी आपणाबरोबर त्यांच्यासह स्वर्गारोहण करीन आणि त्यांना पूर्वकर्मामुळे नरक प्राप्त होणार असेल तर हे देवा, मी आनंदाने त्यांच्यासह नरकयातना भोगण्यास तयार आहे."

राजाचे हे निग्रहाचे शब्द ऐकून इंद्र विचारात पडला. राजाची समजूत घालण्यासाठी तो म्हणाला, "हे राजा, हे भूपाला, अरे, प्रत्येक स्त्री-पुरुषाची पापपुण्ये निरनिराळी असतात. त्यामुळे त्यांना एकच गति कशी प्राप्त होणार ? तू त्यांच्या पापपुण्यांचा वेगवेगळा विचार कर. प्रत्येकाचे कर्म वेगळे असते. त्यामुळे त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणेच गति प्राप्त होते. तेव्हा भिन्न प्रकृतीच्या जनांनी स्वर्गाचा सर्रास उपभोग घ्यावा असे तुझे म्हणणे तुला तरी योग्य वाटते का ? सर्वांना तू सारखाच स्वर्गवास मिळावा म्हणून इच्छा तरी कशी करतोस ?"

हरिश्‍चंद्राने इंद्राचे भाषण शांत चित्ताने श्रवण केले व पूर्ण विचार करून तो निष्ठेने म्हणाला, "हे इंद्रा, राजा जो राजैश्‍वर्य भोगतो, तो केवळ प्रजेच्या प्रभावानेच. राजाचा सुखोपभोग हा प्रजेवरच अवलंबून असतो हे निर्विवाद आहे. केवळ प्रजेच्याच प्रभावामुळे राजाला मोठमोठे यज्ञ करणे शक्य होते. तळी बांधणे, विहिरी खोदणे इत्यादी पुण्यकर्म तो प्रजेच्या प्रभावानेच पूर्ण करीत असतो. हे इंद्रा मीसुद्धा आजवर केलेले पुण्यकर्म हे प्रजाजनांच्या प्रभावामुळेच केले आहे, असे तू निश्‍चित समज. म्हणून राजाला द्रव्य पुरविणार्‍या त्या प्रजाजनांना केवळ स्वर्गलालसेच्या स्वार्थाने मी अंतर देणार नाही. हे देवाधिदेवा, जे काही इष्ट, दत्त, जप यामुळे मला मिळालेले सुकृत असेल ते आम्हा सर्वांना समान गति देवो. हे देवा, मला जर माझ्या कर्मामुळे दीर्घकाल स्वर्ग मिळणार असेल तर तो त्या सर्वांसह समान वाटणी करून मिळो. जर मला एकच दिवस मिळणे शक्य असेल तर एकच दिवस आम्हा सर्वांना स्वर्गोपभोग घेऊ दे."

अखेर इंद्र राजाच्या बोलण्यावर काही बोलू शकला नाही. तो एवढेच म्हणाला, "तर मग ठीक आहे, तसेच होईल."

असे सांगून तो देवेंद्र प्रसन्न झालेला भगवान धर्म आणि गाधिसुत विश्‍वामित्र असे सर्वजण सत्वर चारी वर्णाच्या व सर्व जातींच्या जनांनी व्याप्त असलेल्या अयोध्या नगरीत आले.

तेथे सर्वजण एकत्र आल्यावर तेथील जनतेला देवेंद्र म्हणाला, "हे अयोध्यानगरवासी लोकहो, आता तुम्ही सर्वजण अत्यंत दुर्लभ अशा स्वर्गलोकी निघण्यास तयार व्हा. कारण ह्या धर्मात्म्या राजाच्या सुकृताने व त्याच्या कृपेने, भगवान धर्माच्या महाप्रसादाने तुम्हां सर्वांना स्वर्गप्राप्ती होत आहे. तेव्हा तुम्ही सत्वर चला."

धर्माचे निधान असलेला तो सत्त्वशील हरिश्‍चंद्र म्हणाला, "हे प्रिय नागरिकांनो, आता तुम्ही सर्वजण स्वर्गलोकी चला."

आपल्या आवडत्या राजाचे व देवेंद्राचे भाषण श्रवण करून प्रजाजन संतुष्ट झाले. प्रजाजनांपैकी जे संसाराला कंटाळून गेले होते त्यांनी सर्व संसाराचा कारभार आपल्या पुत्रांवर सोपविला आणि अशा रीतीने मुक्त होऊन ते राजाबरोबर स्वर्गलोकी जाण्यास सिद्ध झाले. स्वर्गोत्सुक जनांची शरीरे एकदम दैदीप्यमान झाली आणि ते एका उत्कृष्ट विमानात आरूढ झाले.

स्वर्गारोहण करण्यापूर्वी सर्वांनी अत्यंत आनंदभरित होऊन राजा हरिश्‍चंद्राचा महाबुद्धिमान पुत्र रोहित याचा सालंकृत राज्याभिषेक केला. त्यामुळे त्या सुंदर अयोध्या नगरीत राहिलेले उरलेले प्रजाजन अत्यंत समाधानी व सुखी होऊन आनंदाने राहू लागले.

आपला पुत्र, आपले आप्तेष्ट, आपले प्रिय मित्र यांचा योग्यतेप्रमाणे राजाने सत्कार केला आणि सर्वांना आनंदी केले.

अशाप्रकारे हरिश्‍चंद्राने देवांनाही न मिळणारी अशी अमाप कीर्ति संपादन केली आणि तो धर्मात्मा राजा हरिश्‍चंद्र आपल्या प्रजेसह बारीक घंटांनी सुशोभित अशा दिव्य व इच्छेप्रमाणे गमन करणार्‍या अद्‌भुत विमानात बसला, अत्यंत परमदुर्लभ आनंदाने व्याप्त होऊन त्याने आपल्या प्रिय पत्‍नीसह स्वर्गलोकी प्रयाण केले.

हा सर्व प्रकार पाहून महाभाग्यवान व सर्व शास्त्रांच्या अर्थाचे रहस्य जाणणार्‍या त्या दैत्यगुरूने एक श्‍लोकरूपी मंत्र म्हटला. तो पुढीलप्रमाणे,

शुक्र उवाच:-

अहो तितिक्षामहात्म्यमहो दानफलं महत् ।

यदागतो हरिश्‍चंद्रो महेंद्रस्य सलोकताम् ॥

अहो, खरोखरच त्या सहनशीलतेचे केवढे मोठे महात्म्य आहे. हरिश्‍चंद्रही त्यामुळेच इंद्रलोकी गेला. (तसेच त्याच्या स्वर्गगमनावरून) दानाचे फलही फारच महान आहे. (हेच सिद्ध होते.)

सूत म्हणाले, "मुनिश्रेष्ठांनो, आता मी तुम्हाला दानाचे सर्वोत्कृष्ट फल कोणते ते सांगितले आहे. त्या दानशूर हरिश्‍चंद्राचे संपूर्ण चरित्र मी तुम्हाला निवेदन केले आहे. हे हरिश्‍चंद्राचे चरित्र जो दुःख जर्जर प्राणी नित्य श्रवण करील त्याला सुखप्राप्ती होईल. जो स्वर्गाची इच्छा धरतो तो त्याच्या श्रवणाने स्वर्गाला जातो. ज्याला पुत्रप्राप्तीची आशा असते, त्यालाही या श्रवण लाभामुळे पुत्रप्राप्ती होते. ज्याला भार्येची इच्छा आहे त्याला भार्या मिळते. जो राज्याची इच्छा धरतो त्याला राज्यप्राप्ती होते.अध्याय सत्ताविसावा समाप्त

GO TOP