श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
त्रयोविंशोऽध्यायः


हरिश्चन्द्रोपाख्यानवर्णनम्

व्यास उवाच -
तमेवमुक्त्वा राजानं निर्घृणं निष्ठुरं वचः ।
तदादाय धनं पूर्णं कुपितः कौशिको ययौ ॥ १ ॥
विश्वामित्रे गते राजा ततः शोकमुपागतः ।
श्वासोच्छ्वासं मुहुः कृत्वा प्रोवाचोच्चैरधोमुखः ॥ २ ॥
वित्तक्रीतेन यस्यार्तिर्मया प्रेतेन गच्छति ।
स ब्रवीतु त्वरायुक्तो यामे तिष्ठति भास्करः ॥ ३ ॥
अथाजगाम त्वरितो धर्मश्चाण्डालरूपधृक् ।
दुर्गन्धो विकृतोरस्कः श्मश्रुलो दन्तुरोऽघृणी ॥ ४ ॥
कृष्णो लम्बोदरः स्निग्धः करालः पुरुषाधमः ।
हस्तजर्जरयष्टिश्च शवमाल्यैरलङ्कृतः ॥ ५ ॥
चाण्डाल उवाच -
अहं गृह्णामि दासत्वे भृत्यार्थः सुमहान्मम ।
क्षिप्रमाचक्ष्व मौल्यं किमेतत्ते सम्प्रदीयते ॥ ६ ॥
व्यास उवाच -
तं तादृशमथालक्ष्य क्रूरदृष्टिं सुनिर्घृणम् ।
वदन्तमतिदुःशीलं कस्त्वमित्याह पार्थिवः ॥ ७ ॥
चाण्डाल उवाच -
चाण्डालोऽहमिह ख्यातः प्रवीरेति नृपोत्तम ।
शासने सर्वदा तिष्ठ मृतचैलापहारकः ॥ ८ ॥
एवमुक्तस्तदा राजा वचनं चेदमब्रवीत् ।
ब्राह्मणः क्षत्रियो वापि गृह्णात्विति मतिर्मम ॥ ९ ॥
उत्तमस्योत्तमो धर्मो मध्यमस्य च मध्यमः ।
अधमस्याधमश्चैव इति प्राहुर्मनीषिणः ॥ १० ॥
चाण्डाल उवाच
एवमेव त्वया धर्मः कथितो नृपसत्तम ।
अविचार्य त्वया राजन्नधुनोक्तं ममाग्रतः ॥ ११ ॥
विचारयित्वा यो ब्रूते सोऽभीष्टं लभते नरः ।
सामान्यमेव तत्प्रोक्तमविचार्य त्वयानघ ॥ १२ ॥
यदि सत्यं प्रमाणं ते गृहीतोऽसि न संशयः ।
हरिश्चन्द्र उवाच -
असत्यान्नरके गच्छेत्सद्यः क्रूरे नराधमः ॥ १३ ॥
ततश्चाण्डालता साध्वी न वरा मे ह्यसत्यता ।
व्यास उवाच -
तस्यैवं वदतः प्राप्तो विश्वामित्रस्तपोनिधिः ॥ १४ ॥
क्रोधामर्षविवृत्ताक्षः प्राह चेदं नराधिपम् ।
चाण्डालोऽयं मनस्थं ते दातुं वित्तमुपस्थितः ॥ १५ ॥
कस्मान्न दीयते मह्यमशेषा यज्ञदक्षिणा ।
राजोवाच -
भगवन्सूर्यवंशोत्थमात्मानं वेद्मि कौशिक ॥ १६ ॥
कथं चाण्डालदासत्वं गमिष्ये वित्तकामतः ।
विश्वामित्र उवाच -
यदि चाण्डालवित्तं त्वमात्मविक्रयजं मम ॥ १७ ॥
न प्रदास्यसि चेत्तर्हि शप्स्यामि त्वामसंशयम् ।
चाण्डालादथवा विप्राद्देहि मे दक्षिणाधनम् ॥ १८ ॥
विना चाण्डालमधुना नान्यः कश्चिद्धनप्रदः ।
धनेनाहं विना राजन्न यास्यामि न संशयः ॥ १९ ॥
इदानीमेव मे वित्तं न प्रदास्यसि चेन्नृप ।
दिनेऽर्धघटिकाशेषे तत्त्वां शापाग्निना दहे ॥ २० ॥
व्यास उवाच -
हरिश्चन्द्रस्ततो राजा मृत्ववच्छ्रितजीवितः ।
प्रसीदेति वदन्पादौ ऋषेर्जग्राह विह्वलः ॥ २१ ॥
हरिश्चन्द्र उवाच -
दासोऽस्म्यार्तोऽस्मि दीनोऽस्मि त्वद्‌भक्तश्च विशेषतः ।
प्रसादं कुरु विप्रर्षे कष्टश्चाण्डालसङ्करः ॥ २२ ॥
भवेयं वित्तशेषेण तव कर्मकरो वशः ।
तवैव मुनिशार्दूल प्रेष्यश्चित्तानुवर्तकः ॥ २३ ॥
विश्वामित्र उवाच -
एवमस्तु महाराज ममैव भव किङ्करः ।
किंतु मद्वचनं कार्यं सर्वदैव नराधिप ॥ २४ ॥
व्यास उवाच -
एवमुक्तेऽथ वचने राजा हर्षसमन्वितः ।
अमन्यत पुनर्जातमात्मानं प्राह कौशिकम् ॥ २५ ॥
तवादेशं करिष्यामि सदैवाहं न संशयः ।
आदेशय द्विजश्रेष्ठ किं करोमि तवानघ ॥ २६ ॥
विश्वामित्र उवाच -
चाण्डालागच्छ मद्दासमौल्यं किं मे प्रयच्छसि ।
गृहाण दासं मौल्येन मया दत्तं तवाधुना ॥ २७ ॥
नास्ति दासेन मे कार्यं वित्ताशा वर्तते मम ।
व्यास उवाच -
एवमुक्ते तदा तेन स्वपचो हृष्टमानसः ॥ २८ ॥
आगत्य सन्निधौ तूर्णं विश्वामित्रमभाषत ।
चाण्डाल उवाच -
दशयोजनविस्तीर्णे प्रयागस्य च मण्डले ॥ २९ ॥
भूमिं रत्‍नमयीं कृत्वा दास्ये तेऽहं द्विजोत्तम ।
अस्य विक्रयणेनेयमार्तिश्च प्रहता त्वया ॥ ३० ॥
व्यास उवाच -
ततो रत्‍नसहस्राणि सुवर्णमणिमौक्तिकैः ।
चाण्डालेन प्रदत्तानि जग्राह द्विजसत्तमः ॥ ३१ ॥
हरिश्चन्द्रस्तथा राजा निर्विकारमुखोऽभवत् ।
अमन्यत तथा धैर्याद्‌विश्वामित्रो हि मे पतिः ॥ ३२ ॥
तत्तदेव मया कार्यं यदयं कारयिष्यति ।
अथान्तरिक्षे सहसा वागुवाचाशरीरिणी ॥ ३३ ॥
अनृणोऽसि महाभाग दत्ता सा दक्षिणा त्वया ।
ततो दिवः पुष्पवृष्टिः पपात नृपमूर्धनि ॥ ३४ ॥
साधु साध्विति तं देवाः प्रोचुः सेन्द्रा महौजसः ।
हर्षेण महताऽऽविष्टो राजा कौशिकमब्रवीत् ॥ ३५ ॥
राजोवाच -
त्वं हि माता पिता चैव त्वं हि बन्धुर्महामते ।
यदर्थं मोचितोऽहं ते क्षणाच्चैवानृणीकृतः ॥ ३६ ॥
किं करोमि महाबाहो श्रेयो मे वचनं तव ।
एवमुक्ते तु वचने नृपं मुनिरभाषत ॥ ३७ ॥
विश्वामित्र उवाच -
चाण्डालवचनं कार्यमद्यप्रभृति ते नृप ।
स्वस्ति तेऽ‍स्विति तं प्रोच्य तदादाय धनं ययौ ॥ ३८ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
सप्तमस्कन्धे हरिश्चन्द्रोपाख्यानवर्णनं नाम त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥


चांडाळाने हरिश्‍चंद्राला विकत घेतले ! -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अत्यंत कठोर शब्दात बोलून तो निष्ठूरतेने वागून विश्‍वामित्राने राजाजवळून सर्व धन नेले आणि शिवाय त्याचा रागही कायमच राहिला. विश्‍वामित्राने राजाच्या शोकाची पर्वा केली नाही. तो निघून गेल्यावर राजा फारच दुःखी झाला. इतकी भयंकर परिस्थिती होऊन तो द्विजश्रेष्ठाच्या ऋणातच राहिला. त्याने वारंवार दीर्घ उसासे सोडले. आपल्या नेत्रातून वाहणारे अश्रू तो सारखे पुसत होता. शेवटी पुन्हा अधोवदन होऊन राजा रस्त्याच्या भर चौकात मध्यभागी उभा राहिला. तो उच्च स्वराने म्हणाला, "सभ्य जनहो ! आता मी प्रेतवत झालो असून माझ्यासारख्या प्रेताला जर कुणी विकत घेण्यास तयार असेल तर त्याने सूर्यास्तापूर्वी येथे यावे व मला विकत घ्यावे."

थोडयाच अवधीत अत्यंत क्रूर अशा चांडाळाचे रूप घेऊन विश्‍वामित्र वेगाने तेथे प्राप्त झाला. तो यमधर्मच भासत होता. त्याच्या सर्वांगाला दुर्गंधी येत होती. छाती अवास्तव विशाल होती. दाढी भयंकर वाढली असून त्याचे दात पुढे आले होते. तो वर्णाने काळा होता. त्याचे पोट फारच सुटलेले होते. त्याचे सर्वांग तेलाने लडबडलेले होते तो अत्यंत राकट व भेसूर होता. त्याने आपल्या शरीरावर प्रेतावरली फुले घातली होती. असा तो प्रति कृतांतकाळच हातात मोडकी काठी घेऊन तेथे आला. तो चांडाळ खरोखरच खुनशी दिसत होता. तो सत्वर राजाजवळ आला व म्हणाला,

"हे महाभाग्यवान पुरुषा, सांप्रत मला चाकराची फारच आवश्यकता आहे. त्यासाठी मी तुला सेवक म्हणून विकत घेण्यास तयार आहे. तेव्हा तुझी योग्य किंमत असेल ती सांग. मी ती सत्वर देईन."

अशाप्रकारचे भाषण ऐकून राजाने वर मान केली. दुष्ट बुद्धीच्या त्या क्रूर, निर्दय, दुरात्म्या चांडाळाकडे त्याने पाहिले व त्याला विचारले, "हे पुरुषश्रेष्ठा, तू आहेस तरी कोण ?"

चांडाळ म्हणाला, "राजराजेश्‍वरा, मी चांडाळ असून येथे प्रवीर या नावाने प्रसिद्ध आहे. मला योग्य अशा सेवकाची जरुर आहे. मी तुला प्रेतांची वस्त्रे आणण्याचे काम देईन. तेच काम करून माझा दास होऊन तू माझ्या आज्ञेत रहावेस."

राजा विचार करून व अगतिक होऊन म्हणाला, "हे डोंबा, तू म्हणतोस ते ठीक. पण माझी अशी इच्छा आहे की मला एखाद्या ब्राह्मणाने अथवा क्षत्रियाने विकत घ्यावे. कारण उत्तमाचा उत्तम, मध्यमाचा मध्यम व अधमाचा अधम अशा योग्यतेप्रमाणे धर्म असतो असे प्राज्ञ पंडित सांगतात. म्हणून मी उत्तम अवस्थेतला असल्यामुळे तुझ्यासारख्या अधमाकडे माझा धर्म कसा बरे पाळला जाईल ?"

चांडाळ म्हणाला, "हे राजा, तुझे धर्मतत्त्वज्ञान योग्य आहे व ते खरेही आहे. पण तू हे भाषण आता योग्य असे केले नाहीस. माझ्यासमोर आता अविचाराने भाषण केलेस. हे निष्पापा, अविचाराने भाषण करणारा मनुष्य कधीही समाधानी नसतो. त्याचे मनोरथ कधीही पूर्ण होत नसतात. तू मघाशी बोलला होतास की "मला कोणीही विकत घ्या." हे तुझे शब्द आहेत. हे उदार, तुझे शब्द जर तुला सत्य करायचे असतील, तू जर सत्यवचनी असशील तर मीच यावेळी तुला सत्वर विकत घेतले आहे. असे तू निश्‍चित समज."

त्यावेळी हरिश्‍चंद्र गलितगात्र होऊन म्हणाला, "हे चांडाळा, तू योग्य तेच बोललास. असत्य भाषणाने अधर्म होऊन पुरुष घोर नरकाप्रत जातात. म्हणून मला वाटते हे चांडाळ मीही चांडाळत्व पत्करण्यास तयार आहे. पण माझे शब्द असत्य न होवोत."

राजाचे हे भाषण संपताच तो तपोनिधी विश्‍वामित्र अकस्मात तेथे येऊन पोहोचला आणि रागाने लाल होऊन विस्फारीत नेत्रांनी तो राजाला म्हणाला, "हे पुरुषश्रेष्ठा, हे राजा, हा चांडाळ तुला हवे असेल तेवढे द्रव्य देण्यास सांप्रत सिद्ध झाला आहे. पण अविचाराने म्हण अथवा माझी यज्ञदक्षिणा व दानदक्षिणा तुला देण्याची इच्छा नाही म्हणून म्हण, तू या चांडाळाचा दास होण्यास तयार नाहीस असे मला वाटते. तुला माझी फसवणूक करायची आहे काय ?"

राजा म्हणाला, "हे महाभाग्यवान मुनीश्रेष्ठा, आपण सर्वज्ञ आहा. मी सूर्यकुलोत्पन्न असतानाही केवळ द्रव्यलोभाने या चांडाळाचे दास्यत्व पत्करण्यास सिद्ध व्हावे हे विपरीत नव्हे काय ?"

विश्‍वामित्र म्हणाला, "हे राजा, स्वतःच्या कुळाचा अभिमान धरून जर तू स्वतःला या चांडाळाला विकत नसशील व माझे द्रव्य सत्वर देण्यास तयार नसशील तर मी आता निश्‍चित तुला शापभ्रष्ट करीन. हे राजा, तू कोणाकडून धन घ्यावेस हे मी सांगत नाही. तू ते द्रव्य चांडाळाकडून घे अथवा ब्राह्मणाकडून घे. माझी संपूर्ण दक्षिणा तू मला दे म्हणजे माझे काम झाले. आता यावेळी तरी तुला धन देणारा या चांडाळाशिवाय कोणीही येथे प्राप्त झालेला नाही. मी माझे धन घेतल्याशिवाय सांप्रत येथून जाणार नाही. कारण हे राजा, आता फक्त अर्धी घटिका शिल्लक आहे. एवढया थोडयाशा वेळात तू मला द्रव्य प्राप्त करून दिले नाही तर मी तुला शापाग्नीत जाळून टाकल्यावाचून कधीही राहणार नाही हे तू सत्य समज."

विश्‍वामित्राचे हे बोलणे ऐकून राजा हरिश्‍चंद्र अधिक विव्हल झाला. कसेबसे उसने अवसान आणून त्याने त्या महर्षीचे पाय धरले व तो अगतिकतेने म्हणाला, "महाराज, यावेळी मजवर दया करा, हे तापसा, मी आपल्या चरणांचा सेवक आहे. मी आज पीडित झालो आहे. माझी दीन अवस्था होऊन गेली आहे. मी आपला परम भक्त आहे. म्हणून आपण आज माझ्यावर कृपा करा. महाराज, चांडाळासमवेत काळ काढणे मला फारच कष्टप्रद भासत आहे. म्हणून महाराज, मला जे आपले शिल्लक देणे आहे त्यासाठी मला आपण आपलाच दास करून घ्या. हे मुनिश्रेष्ठा, मी तुमच्या आज्ञेत रहाणारा व मनाप्रमाणे नित्य वागणारा असा दास होऊन राहीन. पण मजवर दया करा."

विश्‍वामित्र म्हणाले, "राजा, तुझे म्हणणे मी मान्य करतो. हे भूपेंद्रा, तू माझा दास होऊन रहा. पण हे राजा, तू नित्य माझे वचन पाळलेच पाहिजेस."

विश्‍वामित्राचे बोलणे ऐकून राजाला अतिशय हर्ष झाला. आपण एका दिव्यातून पार पडलो असेच त्याला वाटले. जणू काय आज आपला पुनर्जन्म झाला आहे असा त्याला भास झाला व तो नतमस्तक होऊन ब्राह्मणाला म्हणाला, "हे ब्राह्मणश्रेष्ठा, मी आपली आज्ञा नित्य मान्य करीन. हे निष्पापा, हे ब्राह्मणा, सांप्रत मी आपली काय सेवा करू ते सांगा."

तेव्हा राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण चांडाळाला म्हणाला, "हे चांडाळा, वास्तविक मला दासाची काहीही आवश्यकता नाही. तेव्हा याला घेऊन मी काय करू ? म्हणून मी या दासाला विकण्यास तयार आहे. या माझ्या आज्ञेत वागणार्‍या दासाची किती किंमत तू मला देशील ते सांग आणि मला धनाची जरूरी असल्याने मला द्रव्य देऊन तू याला विकत घे. तू सत्वर याचा स्वीकार कर."

विश्‍वामित्राचे ते भाषण ऐकून चांडाळाला अतिशय आनंद झाला. तो सत्वर विश्‍वामित्राजवळ आला व त्यांना म्हणाला, "हे ब्राह्मणश्रेष्ठा, या प्रयाग क्षेत्राच्या आसमंतात माझी दहा योजने भूमी आहे. ती संपूर्ण रत्‍नमय करून मी तुला अर्पण करतो. ती रत्‍नमय विस्तीर्ण भूमी घेऊन त्याच्या किंमतीत तू मला हा दास विकत दे. आज ह्याला विकत देऊन तू माझी एक घोर चिंतेतून मुक्तताच केली आहेस. म्हणून मी तुला बहुमोल द्रव्य देतो."

शेवटी चांडाळाने दिलेली हजार रत्‍ने, विपुल सुवर्ण, असंख्य हिरे, अगणित मोत्ये वगैरे द्रव्य त्या ब्राह्मणाने स्वीकारले व ते घेऊन त्याने चांडाळाला हरिश्‍चंद्र विकून टाकला. आपला स्वामी ब्राह्मणच आहे त्याची आज्ञा मानून चांडाळाची सेवा करायची असे मनाचे समाधान केल्यामुळे हरिश्‍चंद्रासही थोडेसे समाधान वाटले व दुःख जरा कमी झाले. तो ब्राह्मण हाच आपला स्वामी आहे. असेच मनात म्हणू लागला व स्वामी सांगतील ते कार्य आपण केले पाहिजे ह्या कर्तव्यबुद्धीने तो आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्‍न करू लागला.

इतक्यात अचानकपणे आकाशातून वेगाने आलेले शब्द त्याच्या कानावर आले.

"हे महाभाग्यशाली राजा हरिश्‍चंद्रा, तू वचन दिल्याप्रमाणे आज ऋणमुक्त झाला आहेस. खरोखरच तू शब्दाप्रमाणे कृती करून ब्राह्मणाची दक्षिणा पूर्णपणे दिली आहेस."

हे शब्द आकाशातून आकाशवाणी होऊन सर्वांनी ऐकले व देवांनीही, "शाब्बास शाब्बास" म्हणून राजाची प्रशंसा केली. हरिश्‍चंद्रावर आकाशातून पुष्पवृष्टि झाली. हा सर्व चमत्कार पाहून राजाला अत्यंत हर्ष झाला व उत्साहाने तो विश्‍वामित्राला म्हणाला, "हे महामुने ब्राह्मणश्रेष्ठा, खरोखरच एकाच क्षणात आपण मला ऋणमुक्त केले आहेत. म्हणून आपणच माझी माता आहात. माझा पिता व बंधू आपणच आहात. म्हणून हे वीरश्रेष्ठ व महाबुद्धिमान ब्राह्मणश्रेष्ठा, मी आता आपणासाठी काय प्रिय करू ते सांगा. आपले शब्द मला कल्याणप्रद वाटतात."

राजाच्या बोलण्यावर विश्‍वामित्र म्हणाले, "हे राजेंद्रा, तुझे शुभ कल्याण असो. आता आजपासून तू या चांडाळाच्या आज्ञेत राहून तो सांगेल ते कार्य कर."

असे राजास सांगून तो महाकपटी विश्‍वामित्र ते चांडाळाने दिलेले विपुल धन घेऊन त्वरेने तेथून निघून गेला.अध्याय तेविसावा समाप्त

GO TOP