समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ३१ वा

भगवंताचे स्वधामगमन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेवजी सांगतात-
( अनुष्टुप )
जाताच दारुको, ब्रह्मा शिवही पार्वती सवे ।
इंद्रादी देवता आल्या मुनि नी ते प्रजापती ॥ १ ॥
सिद्ध गंधर्व पितरे विद्याधर नि नाग तै ।
यक्ष राक्षसही आले किन्नरे अप्सराहि त्या ॥ २ ॥
मैत्रेय गरुडो आदी द्विज चारण ते तिथे ।
प्रस्थान पाहण्या सर्व कृष्णाचे उत्सुके पहा ॥ ३ ॥
सर्वांनी गायिल्या लीला विमानें नभिं दाटली ।
भक्तिने भगवंताला फुलेही अर्पिली तये ॥ ४ ॥
ब्रह्मा नी विभुती सर्व कृष्णाने पाहिल्या तसे ।
आत्म्याला स्वरूपी केले स्थित नी नेत्र झाकिले ॥ ५ ॥
भक्तांसी अवतारोहा ध्यान मंगल आश्रय ।
म्हणोनी योगिया ऐसा योगे देह न जाळिला ॥
स्वशरीरे स्वधामाला भगवान पातले स्वयें ॥ ६ ॥
दुंदुंभी वाजल्या स्वर्गी आकाशे पुष्प वर्षिले ।
कृष्णाच्या पाठिशी सर्व धर्म कीर्ती नि श्रीहि ती ॥
या लोका मधुनी सारे गेले तेंव्हा निघोनिया ॥ ७ ॥
गति वाणीपराकृष्ण स्वधामात प्रवेशता ।
न दिसे देव देवांना विस्मयो जाहला बहू ॥ ८ ॥
मेघमंडल सोडोनी नभात वीज ती शिरे ।
न कळे मानवा जैसे देवांना जाहले तसे ॥ ९ ॥
परं योग गती ऐशी ब्रह्मादी पाहता तदा ।
विस्मयो पावता चित्ती स्वलोकी सर्व पातले ॥ १० ॥
( वसंततिलका )
घेती रुपास नट ते परि रूप भिन्न
     मायें तसेचि हरि तो प्रगटे नि लोपे ।
सृष्टी मध्येहि शिरुनी विचरे स्वयें तो
     संहार अंति करुनी स्वरुपी मिळे तो ॥ ११ ॥
मृत्यूमधून गुरुपुत्रहि आणिला तो
     देहो तुझाहि जळता हरि तोच रक्षी ।
तो व्याध मारि शर त्या दिधलाहि स्वर्ग
     का शक्य ना हरिसि ते चिरजीवनोही ॥ १२ ॥
निर्हेतुकेचि हरि ही करि सृष्टिखेळ
     तो शक्तिमंत असुनी नच देह रक्षी ।
नाही प्रयोजन तनू हरि दावि लोका
     तो आत्मनिष्ठ पुरुषां करि बोध ऐसा ॥ १३
( अनुष्टुप )
ऐकता गति कृष्णाची प्रातःकाली उठोनिया ।
भक्तिने कीर्तनी गाता हरिचे पद लाभते ॥ १४ ॥
दारुक द्वारकी येता वसुदेव उग्रसेनच्या ।
चरणी पडला तैसे धुतले पद अश्रुने ॥ १५ ॥
परीक्षित ! सावरोनिया दुःखानेच विनाश तो ।
वदता दुःख होवोनी लोक मूर्च्छित जाहले ॥ १६ ॥
कृष्णवियोग तो होता डोके बडवुनी तिथे ।
पातले भा‍उकी जेथे निष्प्राण सर्व जाहले ॥ १७ ॥
देवकी रोहिणी तैसे वसुदेवहि पुत्र ते ।
रामकृष्णा न पाहोनी शोके मूर्च्छित जाहले ॥ १८ ॥
हरीच्या विरहे त्यांनी सोडिले प्राणची तिथे ।
प्रेता आवळुनी स्त्रीया गेल्या कैक चितेत त्या ॥ १९
रामपत्न्या सुना सार्‍या पत्न्याही वसुदेवच्या ।
चितेत पातल्या सर्व प्रेताते ओळखोनिया ।
रुक्मिणी आदि त्या आठ ध्याने अग्नीत पातल्या ॥ २० ॥
कृष्णाच्या विरहे पार्थ व्याकूळ जाहला तसे ।
गीतेच्या उपदेशाते स्मरोनी सावरी स्वया ॥ २१ ॥
न जया पिंडदानाते उरला त्यास अर्जुने ।
क्रमाने विधिने श्राद्ध स्वयेंचि अर्पिले असे ॥ २२ ॥
द्वारकीं कृष्ण ना येता समुद्रे द्वारकापुरी ।
कृष्णमंदीर सोडोनी घेतली जलिं आपुल्या ॥ २३ ॥
आजही भगवान कृष्ण राहती सर्वदा तिथे ।
स्थान ते स्मरता हारी पाप नी ताप सर्वची ॥ २४ ॥
मुले वृद्धास घेवोनी इंद्रप्रस्थास अर्जुने ।
आणिता वसवोनिया पुत्र तो अनिरुद्धचा ॥
वज्र हा त्याजला केला राज्याचा अभिषेक तो ॥ २५ ॥
अर्जुनाकडुनी सर्वां संहार कळता असा ।
तुजला अभिषेकानी गेले ते त्या हिमालयी ॥ २६ ॥
देवाधिदेव कृष्णाच्या लीला मी वर्णिल्या पहा ।
श्रद्धेने कीर्तनी गाता जळते सर्व पाप ते ॥ २७ ॥
( वसंततिलका )
जो ऐकतो हरिलिला रुचिरा अशा या
     शौर्यो नि बालचरितो त‍इ अन्य गाथा ।
संकीर्तनात कथिता गुण त्या मनुष्या
     भक्ती परापरमहंसगती मिळे ती ॥ २८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकतिसावा अध्याय हा ॥ ॥ ११ ॥ ३१ ॥
॥ अकरावा स्कंध परिपूर्ण ॥
हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP