समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ३० वा

यदुकुळाचा संहार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजा परीक्षिताने विचारिले -
( अनुष्टुप )
जधी महाभागवते उद्धवे वन सेविले ।
कृष्णे तैं द्वारकेमाजी केल्या काय लिला पुन्हा ॥ १ ॥
ब्रह्मशाप मिळे तेंव्हा कृष्णाने आपुला प्रिय ।
दिव्य श्रीविग्रहो कैसा सावरीला असे पुन्हा ॥ २ ॥
( मंदाक्रांता )
स्त्रियांचे ते नयन भिडता दृष्टि ना ती चळेची ।
     कानीं ऐको तरिहि मनि ना संतलीला त्यजीती ॥
युद्धी ज्यांनी तनुहि त्यजिली त्यास दे मुक्ति कृष्ण ।
     ऐशा लीला हरिच करितो सावरी रूप कैसा ? ॥ ३ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
( अनुष्टुप )
उत्पात पाहता कृष्णे आकाशी पृथीवी वरी ।
सुधर्मा या सभे मध्ये यदुवंशास बोलले ॥ ४ ॥
पहा या द्वारके माजी मोठे उत्पात होत की ।
अनिष्ट सूचको सर्व न येथ थांबणे मुळी ॥ ५ ॥
मुले स्त्रिया नि वृद्धांना शंखोद्धारासि पाठवा ।
प्रभास क्षेत्रि त्या जाऊ पश्चिमीं सर्व आपण ॥ ६ ॥
स्नान घेवोनिया तेथे पवित्र हो‍उनी तदा ।
एकाग्रे चंदनादिंनी देवता पूजुया पहा ॥ ७ ॥
करु या स्वस्ति पाठाते गो भूमी स्वर्ण वस्त्र नी ।
रथ हत्ती तसे घोडे द्विजांना दान दे‍उया ॥ ८ ॥
अमंगल यये नाशे सर्वत्र मंगलो घडे ।
वीरांनो पूजिता लाभ देवता गायि विप्र ते ॥ ९ ॥
वृद्धांनी मान्य ते केले भगवान कृष्ण बोलता ।
त्वरेचि बैसले नावीं पुढे यात्रेस त्या रथें ॥ १० ॥
शांतिपाठ तिथे झाला कृष्णाने बोधिला तसा ।
श्रद्धेने मंगलो कृत्य केले सर्वचि ते तिथे ॥ ११ ॥
केले सर्वेचि हे सारे पै देवे मति हारिली ।
भ्रष्टले मदिरापाने गोड ती सर्वनाशक ॥ १२ ॥
तीव्र त्या मदिरापाने सर्वची लढु लागले ।
खरे तो कृष्ण मायेने मूढ सर्वचि जाहले ॥ १३ ॥
क्रोधाने भरले सारे लढती ते परस्परा ।
बाण खड्‍गे तसे ऋष्टी भाले तोमर नी गदा ॥
घेवोनी शस्त्रे अस्त्राते भिडले सागरतटीं ॥ १४ ॥
( इंद्रवज्रा )
ते मत्त सारे रथ अश्व हत्ती
     नी उंट रेडे खर खेचरांच्या ।
नी माणसांच्याहि बसून स्कंधी
     आले लढाया अन दात खाती ।
रथध्वजा त्या फडकोनि आल्या
     नी पैदळोही उसळोनि आले ॥ १५ ॥
प्रद्युन्म सांबा नि अक्रूर भोजा
     त्या सात्यकीला अनिरुद्ध मारी ।
संग्रामजितला भिडला सुभद्र
     गदो उसीला सुरथा सुमित्र ॥ १६ ॥
सहस्त्रजित नी निषठो नि भानु
     उल्मूक तैसा शतजीत आदी ।
ते सर्वची यादव गुंतले तै
     माया नशेने बहु अंध झाले ॥ १७ ॥
दाशार्ह वृष्ण्यंधक भोज सात्वतो
     मधूनि अर्बूद नि शूरसेनो ।
कुकूर माथूर नि कुतिवंशी
     स्नेही भुलोनी लढु लागले की ॥ १८ ॥
पित्यास पुत्रो नि बंधू द्वयात
     मामास भाचा अन नातु आज्या ।
चाचा भतीजे नि सगोत्र सारे
     मूढत्वि तेंव्हा करितात खून ॥ १९ ॥
( अनुष्टुप )
सर्वांचे संपले बाण तुटली धनु सर्व ती ।
चूर्णाने मुसळाच्या त्या लोहाळे जन्मले तिथे ॥
मारिती उपटोनिया आपसात परस्परे ॥ २० ॥
हातात तृण ते येता वज्राच्या परि जाहले ।
आवेशे मारिती वीर विपक्षा लक्षुनी तदा ॥ २१ ॥
कृष्ण नी बलरामाने वीरांना रोधिता तयां ।
मानिती शत्रु मूढत्वे माराया धावती पहा ॥ २२ ॥
रामकृष्णहि क्रोधाने फिरती युद्धभूमिसी ।
लोहाळे उपटोनीया इतरां मारिती द्वय ॥ २३ ॥
मायेने ब्रह्मशापाने मोहाने वंश नष्टला ।
घासता वेळुसी वेळु अग्नीत बेट जै जळे ॥ २४ ॥
संहार यदुवंशाचा जाहला पूर्ण कृष्ण तो ।
पाहता टाकितो श्वास कार्य पूर्णचि जाहले ॥ २५ ॥
समुद्रतटि बैसोनी बळीने ध्यान लाविले ।
आत्मरूपी निमाले नी मनुष्यदेह सोडिला ॥ २६ ॥
रामाची सद्‍गती ऐशी कृष्णाने पाहता स्वय ।
अश्वत्थवृक्ष पाहोनी बैसले भूमिसीच ते ॥ २७ ॥
चतुर्भुज रुपो दिव्य कृष्णाने धारिले तदा ।
स्वच्छ त्या अग्निच्या ऐसे प्रकाशमान जाहले ॥ २८ ॥
घनश्याम अशा देही दैदीप्य ज्योत पातली ।
श्रीवत्स चिन्ह ती वस्त्रे रूप मोठेचि मंगल ॥ २९ ॥
नीलिमा शोभली गाली सुहास्य मुखपद्‍म नी ।
कमलापरि ते नेत्र मकराकार कुंडले ॥ ३० ॥
ब्रह्मसूत्र कटीसूत्र किरीट कंकणे तसे ।
बाजुबंद तसे हार अंगठ्या कौस्तुभो मणी ॥ ३१ ॥
वनमाला गदा चक्रशंखादी आयुधे करीं ।
उजव्या गुडघ्याशी तो डावा पायहि ठेविला ॥
रक्तकमलशी शोभा तळव्यां दिसते पहा ॥ ३२ ॥
जरा नामक तो व्याध मुसळीतुकडा तये ।
घासोनी लाविला बाणा तळवा लाल पाहता ॥
खरेचि मृग मानोनी तयाने वेध घेतला ॥ ३३ ॥
आला नी पाहिले त्याने अरे रे रूप साजिरे ।
घाबरे चरणापाशी कंपीत पडला असे ॥ ३४ ॥
अजाणता असे झाले पाप हे मधुसूदना ।
क्षमावे अपराधाला तुम्ही तो निर्विकारची ॥ ३५ ॥
तुमच्या स्मरणे नष्टे अज्ञान संत बोलती ।
केले अनिष्ट ऐसे मी खेदाची गोष्ट जाहली ॥ ३६ ॥
पापी मी हरिणा मारी नाथ मारा मला त्वरे ।
मरता मम हाताने न घडे पाप हे असे ॥ ३७ ॥
( वसंततिलका )
तो आत्मयोग रचिला जरि ब्रह्मयाने
     रुद्रादि तेहि नच जाणिति योग तूझा ।
मायेत तेहि रमती तुझिया हरी रे
     मी पापयोनि विषयी मग काय जाणी ॥ ३८ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले- ( अनुष्टुप )
हे जरा न भियी ऊठ माझ्या इच्छेंचि हे घडे ।
घे आज्ञा स्वर्गि जा राहा पुण्यवंतास दुर्लभ ॥ ३९ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात-
भगवंत स्व‍इच्छेने घेतसे देह रे नृपा ।
प्रदक्षिणा करोनीया विमानी व्याध बैसला ॥ ४० ॥
अंदाज बांधुनी आला दारुक सारथी तिथे ।
तुलसी गंध जाणोनी आलासे माग काढिता ॥ ४१ ॥
( इंद्रवज्रा )
दारुक पाही आसनस्थ कृष्णा
     असह्य तेजी करि आयुधे ती ।
रथातुनी धावत तैचि आला
     नी कृष्ण पायी पडला तसा तो ॥ ४२ ॥
अस्तासि जाता शशि तो निशेसी
     स्थिती जशी हो पथिका वनासी ।
न दर्शनाने मज तैचि झाले
     न ज्ञान शांती हृदयात कांही ॥ ४३ ॥
( अनुष्टुप )
परीक्षित दारुके ऐसे कृष्णाला प्रार्थिले तदा ।
घोड्यांसह नभामध्ये उडाला सध्वजा रथ ॥ ४४ ॥
पाठोपाठ तयाच्या ते आयुधे उडले तसे ।
आश्चर्य दारुका वाटे भगवान बोलले तया ॥ ४५ ॥
दारुका द्वारकी जावे वंश संहार हा असा ।
स्वधाम मम यात्रा नी बळीची सांगणे तिथे ॥ ४६ ॥
न राहा द्वारके माजी परिवारा सवे तिथे ।
न जाता द्वारकी मी तो समुद्र बुडवेल ती ॥ ४७ ॥
सर्व लोक धना तैसे मम माता पिता ययां ।
इंद्रप्रस्थासि त्या न्यावे आश्रया अर्जुनासि त्या ॥ ४८ ॥
तू घ्यावा भागवद्धर्म ज्ञाननिष्ठचि हो‍उनी ।
उपेक्षी सर्व ही माया मनात शांत हो पहा ॥ ४९ ॥
दारुके ऐकता केली भगवंता परिक्रमा ।
पुनः पुन्हा नमोनिया उदास पातला पुरां ॥ ५० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ ३० ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP