समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २९ वा

भागवतधर्माचे निरुपण व उद्धवजीचे बदरिकाश्रमगमन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

उद्धवजी म्हणाले- ( अनुष्टुप )
जयाला वश ना चित्त योग त्याला कठिणची ।
सोपे कांही असे सांगा सहजी तरण्या भवी ॥ १ ॥
जाणता पुंडरिकाक्षा योगी चित्तास रोधिती ।
न मिळे यश ते त्यांना पुन्हा ते दुःख पावती ॥ २ ॥
( इंद्रवजा )
पदांबुजे ही तव देति मोद
     म्हणोनि येती चतुरो पदासी ।
जे घेत ना आश्रय या पदाचा
     गर्वेचि त्याची मति कुंठते की ॥ ३ ॥
( वसंततिलका )
सर्वं हितैषि सुहृदो नवलाव नाही
     तू तो बळीसि अथवा वनजास मित्र ।
ब्रह्मादि घेति पद हे शिरि आपुलिया
     आणीक ते रगडती अति प्रेमभावे ॥ ४ ॥
आत्मा नि स्वामी प्रिय तू शरणागताला
     इच्छील ते पुरविता पद कोण त्यागी ।
गर्ती फसोनि विषया मग कोण इच्छी
     आम्ही पदास भजता न मिळेल काय ? ॥ ५ ॥
आत्मा रुपात हृदयीं गुरुरूपि बाह्य
     तू पाप ताप हरिशी अवतार घेशी ।
ब्रह्म्यास शक्य नच ते उतराय होणे
     तो आठवी उपकृता अन हर्ष पावे ॥ ६ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
( इंद्रवज्रा )
तो देव देवो मुळि कृष्ण एक
     ब्रह्मा शिवो नी हरि तोच होतो ।
हा ऐकता प्रश्नचि उद्धवाचा
     हसोनि बोले मग प्रेमभावे ॥ ७ ॥
श्री भगवान म्हणाले -
( अनुष्टुप )
आता मी सांगतो माझा धर्म जो की सुमंगल ।
श्रद्धेने आचरिता हा भवाचे भय ना उरे ॥ ८ ॥
भक्ताने सर्व ती कर्मे मज अर्पोनिया स्मरे ।
मद्रूप मन तैं होते आत्माही रमतो मसी ॥ ९ ॥
भक्त पवित्र ज्या स्थानी राहती राहणे तिथे ।
अनन्य वागती भक्त तसेचि वागणे पहा ॥ १० ॥
पर्वाला मिळुनि वृंदीं अथवा एकटाहि तो ।
महाराजा अशा थाटे गावो नाचो महोत्सवी ॥ ११ ॥
मी एक सर्व प्राण्यात आत बाहेर पाहणे ।
पहावा हृदयी मीच आकाशी सर्व दाटला ॥ १२ ॥
साधके सर्व प्राण्यात पदार्थीं पाहणे मला ।
माझेचि रूप मानोनी सत्कार तसा ॥ १३ ॥
द्विजचांडाळ वा चोर सूर्य वा ठिणगी तसे ।
कृपाळू क्रूर ही सर्व पाही जो सम ज्ञानि तो ॥ १४ ॥
नर नारीत मी नित्य पाहता होड लोपते ।
ईर्षा द्वेष अहंकार पळती आदि दोष ते ॥ १५ ॥
दुर्लक्षा हासती त्यांना लोकलज्जेस त्यागिणे ।
कुत्रा चांडाळ वा गाय गाढवा दंडवत नमा ॥ १६ ॥
भगवद्‍भावना ऐशी माझी सर्वत्र होई तो ।
मन वाणी शरीराने संकल्पे मजला भजा ॥ १७ ॥
सर्व ब्रह्मात्मकी बुद्धी ध्याताचि ब्रह्मरूप हो ।
संदेह मिटतो सारा मग तो मुक्तची असे ॥ १८ ॥
साधने मम प्राप्तीची त्यात हे सर्व श्रेष्ठची ।
मन वाणी पदार्थात देह वृत्तीत मी पहा ॥ १९ ॥
हा माझा भागवद्धर्म न बाधा मुळि त्यात ये ।
निष्काम धर्म हा ऐसा मानितो निर्गुणीच मी ॥ २० ॥
न त्रुटी त्यात की राही रडणे पडणे असे ।
मजला अर्पिता सर्व तोच धर्म घडे पहा ॥ २१ ॥
कष्टाने ज्ञान ज्ञान्याचे चातुर्य चतुरे असे ।
लावावे नी विनाशी या देहाने सत्त्व जोडणे ॥ २२ ॥
संपूर्ण ब्रह्मविद्येचे सार मी वदलो तुम्हा ।
रहस्य कळणे याचे देवतानाहि दुर्लभ ॥ २३ ॥
युक्तियुक्त असे ज्ञान वर्णिले मी पुनःपुन्हा ।
मर्म जाणोनिया गाठी तोडिता मुक्तता मिळे ॥ २४ ॥
उत्तरा बोललो पूर्ण आमुचे प्रश्न उत्तरे ।
विचारे धारिता सर्व वेदांचे ते रहस्यही ।
ब्रह्मसनातनो त्याला लाभते नच संशय ॥ २५ ॥
माझ्या भक्तास हा धर्म जो देई समजावुनी ।
ज्ञान दात्यासि मी ऐशा माझेचि रूप देतसे ॥ २६ ॥
संवाद हा पवित्रोची दुजांना शुद्ध हा करी ।
दुजाला ज्ञानदीपो हा रोजची दाविता शुची ॥ २७ ॥
एकाग्र करुनी चित्त श्रद्धेने रोज ऐकता ।
पराभक्ति तया लाभे कर्मबंधनही तुटे ॥ २८ ॥
कळाले का तुला माझे ब्रह्मरूप सख्या प्रिया ।
चित्ताचा मोह नी शोक झाला का नष्ट तो तुझ्या ? ॥ २९ ॥
अभक्ता उद्धटा तैसे दांभिका ठक नास्तिका ।
धर्म हा नच त्यां द्यावा अश्रद्धाला कधीच की ॥ ३० ॥
दोषरहित या ऐशा द्विजभक्ता नि प्रेमिका ।
शुद्ध चारित्र्य त्यालाची भागवद्धर्म हा वदा ॥
प्रेमीभक्त अशा शूद्रा स्त्रियांना उपदेशिणे ॥ ३१ ॥
दिव्य अमृतपानाने न पिणे कांहि राहते ।
जिज्ञासूला तसे योगे जाणणे नच ते उरे ॥ ३२ ॥
ज्ञान कर्म तसे योगे वाणिज्ये नृप दंडिता ।
मोक्ष धर्म तसे काम अर्थ हे फळ लाभते ॥
परी अनन्य भक्ताला सर्व ते फळ मीच की ॥ ३३ ॥
( इंद्रवज्रा )
समस्त कर्मा त्यजुनी मला जो
     आत्माहि अर्पी मज मान्य तो हो ।
जीवत्त्व सोडी अन मोक्ष दे मी
     तदाचि होतो मम रूप भक्त ॥ ३४ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात-
हा योगमार्ग परिपूर्ण बोध
     त्या उद्धवाला मिळताच नेत्री ।
ते अश्रू आले अन कंठ दाटॆ
     जोडोनि हाता नच कांहि बोले ॥ ३५ ॥
उचंबळे चित्तचि प्रेम भावे
     धैर्येचि रोधी स्वय नी पुन्हा तो ।
सौभाग्य मानी अन वंदि कृष्णा
     स्पर्शोनि पाया स्तवि प्रार्थना ही ॥ ३६ ॥
उद्धवजी म्हणाले-
तू ब्रह्ममाया मुळ कारणो नी
     मी या भवाच्या तमि हिंडलो नी ।
तुझ्याचि संगे तम नाशला तो
     त्या अग्निपासी तम थंडि कैसी ? ॥ ३७ ॥
त्या मोहिनीने मम ज्ञान दीप
     नेला परी तू दिधला कृपेने ।
महान बोधे मज बोधिले तू
     ऐशा पदाला मग कोण सोडी ॥ ३८ ॥
दाशार्ह वृष्णी अन अंधको नी
     त्या सात्वता यादव या सवे त्या ।
मायेत होते मज बद्ध केले
     नी आज बोधे हरिल्यास ग्रंथी ॥ ३९ ॥
( अनुष्टुप )
महायोगेश्वरा कृष्णा तुजला प्रणिपात हा ।
आज्ञापा मजला ऐसे अनन्य भक्ति जैं मिळे ॥ ४० ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले-
आता माझ्याच आज्ञेने बद्रिकाश्रमि जा मम ।
गंगाजळे तिथे न्हाता प्राशिता शुद्ध हो तिथे ॥ ४१ ॥
नष्टेल पाप नी ताप लेवोनी वल्कले तिथे ।
भक्षावी कंद मूळे नी निवृत्त धुंद राहणे ॥ ४२ ॥
साहिणे सुख दुःखांना सौ‍म्य नी संयतेंद्रिय ।
मम या स्वरूपी शांत डुंबोनी मोद पावणे ॥ ४३ ॥
बोध मी दिधला जो हा एकांती अनुभावणे ।
वाणी चित्त मला लावी भागवद्धर्मिची रमा ॥
निर्गुणा पावशी तेणे परमार्थचि तो मिळे ॥ ४४ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
( इंद्रवज्रा )
श्री उद्धवो ते मग मुक्त होता
     प्रदक्षणोनी हरिपाद वंदी ।
निर्द्वंद्व झाले पद स्पर्शिता ते
     नी आसवांनी धुतले पदाला ॥ ४५ ॥
दुस्त्यज्य स्नेहे तनु कंपली नी
     न सोडवे ते पद श्रीहरीचे ।
मूर्च्छीत झाले पदपादुकांशी
     प्रस्थान केले नमुनीहि कृष्णां ॥ ४६ ॥
ती दिव्य ज्योती हृदयी धरोनी
     तपास आले बदरीवनासी ।
तो एक मात्रोचि हितैषि कृष्ण
     बोधानुसारे गति लाभली त्यां ॥ ४७ ॥
श्रीशंकरादी हरि सेवितात
     त्या श्रीहरीने निज बोध केला ।
महोदधी ज्ञानचि सार हा तो
     यां सेविता मुक्तचि विश्व होते ॥ ४८ ॥
( मालिनी )
मधुकर मधु जैसा पुष्पसारोचि घेई
     भवभय हरण्याते तैं हरी बोध देई ।
अमररस स्व भक्ता पीववी मंथनाचे
     पुरुषचि हरि कृष्णो सारविश्वा नमी मी ॥ ४९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणतिसावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ २९ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP