[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
भगवान श्रीकृष्ण सांगतात-
( अनुष्टुप )
द्रष्टानी दृश्य भेदाने पुरुष प्रकृती जरी ।
दिसती वेगळे दोन सर्वांत एक मी असे ॥
शांत घोर तसे मूढां न वंदो नच निंदिणे ।
अद्वैत दृष्टि ती नित्य साधके ठेविणे असे ॥ १ ॥
स्तविता निंदिता अन्यां परमार्थ सुटे त्वरे ।
द्वैत सत्त्यत्व निषधो साधनो करिते पहा ॥
निंदिता स्तविता वाढे सत्यतेचाच तो भ्रम ॥ २ ॥
इंद्रिया राजसी कार्य झोपता स्मृति ना उरे ।
आत्मरूपा भुले जीव अज्ञानी फसतो पहा ॥ ३ ॥
द्वैताचे नावची नाही मग ते सत्यची कसे ।
अनित्य म्हणूनी सारे मिथ्या सर्वचि माणणे ॥ ४ ॥
छाया प्रतिध्वनी शिंपी मिथ्या भासचि कंपितो ।
देहादी भास ही मिथ्या मूढाला भेडवी तसा ॥ ५ ॥
आत्मा ही एकची वस्तू परोक्ष अपरोक्षही ।
तोचि हो विश्व नी रक्षी लयही तोच पावतो ॥ ६ ॥
विश्वाच्या भिन्न तो आत्मा न वस्तु त्याचिया विना ।
तिन्हिही प्रतिती व्यर्थ तरी त्या दिसती खर्या ॥ ७ ॥
ज्ञान विज्ञान हे ऐसे न निंदी ज्ञानि ना स्तवी ।
समभावे वसे नित्य सूर्याच्या परि तो जगीं ॥ ८ ॥
सिद्ध अनित्य हे विश्व असंग राहणे तयीं ।
प्रत्यक्ष अनुमानाने शास्त्र वा अनुभूतिने ॥ ९ ॥
उद्धवजीने विचारिले-
स्वयंप्रकाश आत्मा तो देह हा जडची असे ।
भव तो नच दोघांना तर तो भव हो कसा ॥ १० ॥
अप्राकृतचि तो आत्मा देह प्राकृत हा असे ।
आत्मा अग्नि तनू काष्ठ हा भव तो कसा ॥ ११ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात-
संसारा नच अस्तित्व इंद्रिया भ्रांत ती असे ।
अविवेकी अशा लोका सत्यची देह भासतो ॥ १२ ॥
स्वप्नीची संकटे सारी जागे होताच नष्टती ।
विषया चिंतिता नित्य निवृत्ती नच ती मिळे ॥ १३ ॥
स्वप्नीची संकटे सर्व उठता सर्व संपत्ती ।
न उरे कारणो त्याचे विकार मोह ना उरे ॥ १४ ॥
शोक हर्ष भयो क्रोध लोभ मोह स्पृहा तसे ।
जन्म मृत्यूहि ते सारे अहंकारेचि भासती ॥ १५ ॥
( इंद्रवज्रा )
देहेंद्रियप्राणमनात आत्मा
माझे म्हणोनी स्थित राहिला की ।
त्या जीव नामो , अतिसूक्ष्म मूर्ती
कर्मेचि लाभे तइ लिंगदेह ॥ १६ ॥
अमूलही तो बहुरूपी तोची
मने नि वाचे तनु प्राण कर्मे ।
ज्ञानी अहंचेमुळ छेदितात
निर्द्वंद्व होता जगिं हिंडतात ॥ १७ ॥
आत्मा अनात्मा कळताचि ज्ञाने
ते द्वंद्व जाता श्रुति ऐकणे ती ।
ती ऐकिल्याने मुळरूप लाभे
त्याच्या विना ना जगि कांहि वस्तू ॥ १८ ॥
त्या कंकणाचे जयि ते सुवर्ण
आधी मधे नी उरतेहि अंती ।
तसा जगी आधि नि मध्य अंती
मी सत्य तत्त्वे असतो तयात ॥ १९ ॥
मनास होती नित त्या अवस्था
त्रैगुण्य ते भेद नि दोष तीन ।
त्रिविध सत्ता असते जिवाला
नी ब्रह्म तत्त्वो उरतेच अंती ॥ २० ॥
जे पूर्वि ना ना उरतेहि अंती
त्यां नाममात्रे मुळि कल्पनाची ।
जेणेचि वस्तू घडते नि भासे
ते रूप सत्यो परमार्थ सत्ता ॥ २१ ॥
ही राजसी सृष्टि विकार भास
ही होय ब्रह्मेचि स्वयं प्रकाश ।
या इंद्रियी नी विषयीं मनात
जे भासते ते रुप ब्रह्म होय ॥ २२ ॥
हे ब्रह्म आहे मुळि साधनोची
सहाय्य होती गुरुदेव जीवा ।
त्या माध्यमे तोचि निषेध व्हावा
स्वानंदि व्हावे त्यजुनीच इच्छा ॥ २३ ॥
त्या देवता नी नच इंद्रिये तो
आत्मा तया पोषितसेहि अन्न ।
न बुद्धि चित्तो विषयो गुणो नी
त्या आत्मरूपी जड वस्तु सर्व ॥ २४ ॥
ज्यां लाभले ज्ञान स्वरुपि माझे
वृत्तीत त्याला नच लाभ कांही ।
वृत्तीत राही तरि हानि नाही
न सूर्य झाके कधि त्या ढगांनी ॥ २५ ॥
नभास वायू सुकवू शकेना
न अग्नि जाळी भिजवी न पाणी ।
तसेचि आत्म्या नच कर्म स्पर्शी
सत्त्वादिकाने भटके जगात ॥ २६ ॥
तथापि संगा त्यजिणे हवेच
माया गुणी निर्मित कर्म सारे ।
रजोगुणाचा मळ संपताच
भक्तीत माझ्या रमतेच चित्त ॥ २७ ॥
ना रोग जातो विण त्या निदाना
पुनःपुन्हा तो सतवी मनुष्या ।
तसाचि मोहो नच नष्ट होता
त्या साधकाला करि योगभ्रष्टा ॥ २८ ॥
त्या देवतांनी जरि विघ्न केले
त्या पुत्र शिष्यां कडुनीहि संता ।
येवोनि मार्गा तरि योग ध्यावा
कर्मादिकांची नच वृत्ति व्हावी ॥ २९ ॥
जन्मे मरे कर्मचि साधताना
विषाद हर्षीं बुडती सदाचे ।
त्या ज्ञान लाभे नच मोह होतो
स्वानंद योग्या नच आस तृष्णा ॥ ३० ॥
झाला स्वरूपी स्थित संत त्याला
न भाव राही बसला कि चाले ।
तो जेवतो वा मल मूत्र त्यागी
ब्रह्मस्थिताला नच ते कळे की ॥ ३१ ॥
नारायणे त्या विषयोचि होती
न सिद्ध होती विषयो प्रमाणे ।
त्या स्वप्नभंगीं फळ ते असत्य
तसा न मानी विषयाहि सत्य ॥ ३२ ॥
अज्ञान योगे गुणकर्म देह
आत्म्याहुनी ते गमती विभिन्न ।
निवृत्ति येते निजज्ञान होता
न घेइ वृत्ती नच त्यागि आत्मा ॥ ३३ ॥
अंधारपाटा जइ सूर्य नष्टी
ना तो करी वेगळी वस्तु कांही ।
तसेचि होते मम ज्ञान जीवा
अज्ञानपाटा हटवोनि तेथे ॥ ३४ ॥
आत्मा असे तो अपरोक्ष ऐसा
ना शोधणे होय कुठे कसा तो ।
निवृत्त होता मग शून्य लाभे
प्रवर्तको तो समजोनि घेण्या ॥ ३५ ॥
( अनुष्टुप )
मानिता भिन्न त्या वस्तू भ्रमाने मोह तो पडे ।
भ्रमा आधार तो आत्मा सर्वसत्ताधिशोहि तो ॥ ३६ ॥
विद्वान म्हणती कोणी पाच भौतिक भेद ते ।
दाविती रूप नी नामा म्हणोनी सत्य ते असे ॥
ढोंगी ती मानणे वाणी न सिद्ध होतसे तसे ॥ ३७ ॥
योगाच्या पूर्वि त्या योग्या रोगाने पीडता तये ।
उपचार करावे नी पुन्हाच योग साधिणे ॥ ३८ ॥
द्वारा त्या चंद्र सूर्याच्या ऊष्णा शीतासि टाळिणे ।
आसने तप नी मंत्रे औषधे विघ्न टाळणे ॥ ३९ ॥
नामसंकीर्तने काम क्रोधादी नष्टिणे तसे ।
संतसेवा करोनिया मद दंभादि नष्टिणे ॥ ४० ॥
मनस्वी योगि ते कोणी शरीरा दृढ ठेविती ।
सिद्धी प्राप्त करायाते स्वताच योग साधिती ॥ ४१ ॥
प्रयास व्यर्थ तो होतो बुद्धिमंतेचि जाणणे ।
फळांच्या परि हा देह अवश्य नासतो पहा ॥ ४२ ॥
आदरे करिता योग शरीरा दृढता मिळे ।
तदा संतुष्ट ना व्हावे नित्य हो मम भक्ति ती ॥ ४३ ॥
माझी सेवा करोनीया करी जो योग साधने ।
न येती मुळि त्या विघ्ने आत्मानंदचि लाभतो ॥ ४४ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठ्ठाविसावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ २८ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥