समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २६ वा

पुरुरव्याची वैराग्योक्ती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

भगवान श्रीकृष्ण सांगतात-
( अनुष्टुप )
स्वरूप ज्ञानप्राप्तीचे नरदेहचि साधन ।
लाभता भजि तो प्रेमे स्वानंदा तोच पावतो ॥ १ ॥
गुणमयी गती योनी ज्ञानाने मुक्त पावणे ।
दिसती त्रैगुणी रूप माया ती फसवी पहा ॥
ज्ञान होता न बाधी ती तिच्यात राहुनी तसे ।
गुणांची नच ती सत्ता वास्तवीक तशी मुळी ॥ २ ॥
संग त्या कधि ना व्हावा शिश्न पोटासि ध्यायि जो ।
अंधाचा आसरा घेता अंध चाले दुजा जसा ॥ ३ ॥
उर्वशी विरहे शुद्ध हारवे तो पुरूरवा ।
शोक संपोनि वैराग्य लाभता गीत गायिला ॥ ४ ॥
उर्वशी त्यजिते तेंव्हा नागवा हा पिशापरी ।
विव्हल धावुनी बोले निष्ठूर देवि थांब तू ॥ ५ ॥
आकर्षिले तिने चित्त न तृप्त नृप जाहला ।
विषयीं बुडला नित्य रात्रीच्या रात्रि संपल्या ॥ ६ ॥
पुरुरवा म्हणाला-
हाय मी मूढ हा कैसा कामाने चित्त दोषिले ।
वर्षच्या वर्ष ते गेले विस्मृतीलाहि ती सिमा ॥ ७ ॥
तिनेच लुटिले हाय उदयास्त न तो कळे ।
खेदकी आयुचे कैक वर्ष ते सरले कसे ॥ ८ ॥
आश्चर्य वाढला मोह नरेंद्र चक्रवर्ति मी ।
सम्राटा तरि त्या स्त्रीने केले हो खेळणे असे ॥ ९ ॥
मर्यादारक्षिता मी नी नागडा धावलो कसा ।
रडलो पडलो तैसा हाय जीवन हे असे ॥ १० ॥
गाढवी परि त्या लाथा खावोनी पाठि लागलो ।
प्रभाव तेज सामर्थ्य उरले कायसे मला ॥ ११ ॥
व्यर्थ विद्या तपो त्याग श्रुतिचा लाभ काय तो ।
एकांत मौनही व्यर्थ स्त्रियेने चित्त चोरिता ॥ १२ ॥
हानि ना कळली चित्ता मानितो तरि पंडित ।
धिक्कार मूर्ख मी हाय वृषभा परि गुंतलो ॥ १३ ॥
उर्वशी‍ओठिचे मद्य पिलो मी वर्ष वर्ष ते ।
न झाला काम तो तृप्त तुपे अग्नि न तो शमे ॥ १४ ॥
चोरिले चित्त वेश्येने आत्मारामा विना मला ।
स्वामी तो सोडवी कोण अशा या चिखलातुनी ॥ १५ ॥
तिने तो श्रुतिच्या शब्दे मजला समजाविले ।
परी ना नष्टला मोह हद्द माझीच संपली ॥ १६ ॥
न जया कळला दोष तयाला भीति वाटते ।
तिचे ते चुकले काय इंद्रियी मीच गुंतलो ॥ १७ ॥
दुर्गंधयुक्त तो देह पुष्पोचित गुणो कुठे ।
अज्ञाने घाणिला मी तो सौं‍दर्य मानिले असे ॥ १८ ॥
पित्रांचा लाडका मी का पत्नीचे धन देह हा ।
कुत्र्याचे भोजनो हा का मित्रांचा नच ते कळे ॥ १९ ॥
अपवित्र असा देह मरता सडतो तसा ।
लट्टू ते वदती रूप आ हा ! हास्य कसे पहा ॥ २० ॥
त्वचा मास नि रक्ताचे मज्जा स्नायू नि मेद नी ।
अस्थि पू मलमूत्राने कृमीने देह व्यापिला ॥ २१ ॥
हित इच्छि तये ज्ञातें स्त्रियांचा संग त्यागिणे ।
विषयेंद्रिय संयोग विकारे मन ते पहा ॥ २२ ॥
न ऐकिली न देखे जी तिचा मोह न तो घडे ।
विषया इंद्रिये सोडी तयाचे मन शांत हो ॥ २३ ॥
तदा वाणी मने कर्णे स्त्रियेसी संग ना घडो ।
मी तो क्षुद्र, मुनी ज्ञानी यांचाही चित्त घात घे ॥ २४ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणतात -
( इंद्रवज्रा )
बोलोनि राजेश्वर चित्ति ऐसे
     त्या उर्वशीचा परित्याग केला ।
ज्ञानोदयाने मिटलाहि मोह
     आत्मस्वरूपी मग शांत झाला ॥ २५ ॥
( अनुष्टुप )
म्हणोनि बुद्धिमंतांनी कुसंग त्यजिणे सदा ।
संतांच्या सह राहोनी आसक्ति सर्व तोडिणे ॥ २६ ॥
निरपेक्षिच तो संत माझ्यात चित्त लाविता ।
प्रशांत समदर्शी तो अहिंसा स्पर्शिना तया ॥ २७ ॥
संतांचे भाग्य ते काय सदा लीलेस गाति ते ।
सेविता हितची होते पाप नी ताप नष्टते ॥ २८ ॥
भावे जे कीर्तनी गाती ऐकती अनुमोदिती ।
प्रेमभक्ती मिळे त्याला अनन्य मम ती अशी ॥ २९ ॥
आश्रयो गुण कल्याणी केवलानंद शुद्ध मी ।
ब्रह्म मी मजला ध्याता संतो कर्म न ते उरे ॥ ३० ॥
त्या संता शरणी जाता भय अज्ञान संपते ।
आश्रया अग्निच्या जाता न थंडी नच तो तम ॥ ३१ ॥
भवात बुडला त्याला शांत संतचि आश्रय ।
जशी त्या बुडत्या लागी जळात नाव तारिते ॥ ३२ ॥
अन्न जै रक्षिते प्राण्यां तसा दुःख्यासि रक्षि मी ।
परलोकी धनो धर्म तसे संत जगीं जना ॥ ३३ ॥
सूर्य जै दृष्टि दे लोकां संत तै देव दाविती ।
संत देव सखे तेची आत्मा नी मीहि त्या रुपी ॥ ३४ ॥
साक्षात्कार नृपां होता न स्पृही उर्वशीस तो ।
आसक्ति नष्टुनी हिंडे स्वानंदे पृथिवी वरी ॥ ३५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सव्विसावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ २६ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP