[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
( अनुष्टुप )
प्रत्येक व्यक्तिच्या अंगी वेगळे गुण तेज हो ।
स्वभाव भेद तो तेणे भेद ते ऐक सांगतो ॥ १ ॥
शम दमो तितिक्षा नी विवेक तप सत्य नी ।
दया तपो नि संतोष त्याग श्रद्धा नि लाज ती ॥
अनिच्छा दान विनयो सरलो आत्मरम्यता ।
वृत्ती या गुण सत्त्वाच्या उद्धवा प्रवरा पहा ॥ २ ॥
काम यत्न मदो तृष्णा धारिष्ट्य द्रव्य मेळिणे ।
भेदबुद्धी नि ते भोग युद्धोत्साह नि प्रेम नी ॥
पराक्रम तसे हास्य उद्योग रजवृत्ति त्या ॥ ३ ॥
क्रोध लोभ तसे खोटे हिंसा पाखंड नी श्रम ।
याचना कलहो शोक विषाद मोह दीनता ॥
अकर्म भय नी आशा तमोवृत्ति अशा पहा ॥ ४ ॥
सत्त्व रज तमो वृत्ती वेगळ्या असती अशा ।
वृत्तीं या मेळ तो होता वृत्ति त्या ऐकणे कशा ॥ ५ ॥
मीपणात तिन्ही वृत्ती मन शब्द नि इंद्रिय ।
प्राणांच्या कारणे सर्व तिन्हिच्या वृत्ति होत त्या ॥ ६ ॥
धर्मार्थ रमता कामी सत्त्वे श्रद्धे रजो गुणे ।
रति आणि तमे द्रव्य लाभतीगुण मिश्रित ॥ ७ ॥
सकामनिष्ठ पुरुषा गृहस्थाश्रम प्रीय त्यां ।
तिन्हीही गुण मेळाने लाभले मानणे असे ॥ ८ ॥
शांत जितेंद्रियो सत्त्वी कामना ठेविता मनी ।
रज मिश्रण ते होय क्रोध हिंसे तमो पहा ॥ ९ ॥
नर नारी असो कोणी नैमित्तिक नि नित्य त्या ।
कर्माने मजला ध्याता मानणे गुण सत्त्व तो ॥ १० ॥
सकामे मजला ध्याता रजो गुणचि तो असे ।
शत्रूचा मृत्यु साधाया भजता तम तो असे ॥ ११ ॥
गुणां रज तमा सत्त्वा कारणी चित्त ते असे ।
संबंध मम ना तेथे मोहाने बंध ते पडे ॥ १२ ॥
सत्त्व प्रकाशको शांत स्वच्छ तो झाकतो रजें ।
तमाने वाढतो तेंव्हा सुख धर्म विभागती ॥ १३ ॥
रजाने बुद्धिचा भेद आसक्ती हा स्वभाव तो ।
तमाने दबता सत्त्व वाढे रजगुणो तदा ॥
दुःख कर्म यशो लक्ष्मी संपन्न जीव होतसे ॥ १४ ॥
तयाचे रूप अज्ञान आलस्य मूढता तयी ।
दाबता रज नी सत्त्वा हिंसा शोकात तो बुडे ॥ १५ ॥
जधी चित्त प्रसन्नो नी निवृत्त शांतइंद्रियी ।
सत्त्वाची वृद्धि ती जाणा ते तत्त्व मज मेळिण्या ॥ १६ ॥
चंचलो नि असंतुष्ट विकारी मन भ्रांत तो ।
अस्वस्थ शरिरी ऐसा रजाने ग्रासिला असे ॥ १७ ॥
शब्दादी न कळे ज्याला खिन्न लीनचि जाहला ।
अज्ञान खेद तो वाढे समजा तम वाढता ॥ १८ ॥
देवता सत्त्ववृद्धीने असूर रज वाढता ।
तमे त्या राक्षसां शक्ती क्रमाने वाढते तशी ॥ १९ ॥
सत्त्वाने जागृती होय रजाने स्वप्न वाढती ।
तमे सुषुप्ति ती वाढे तुरियीं सारखे तिन्ही ॥
एकरस असा आत्मा जाणावा शुद्ध तोच की ॥ २० ॥
वेदज्ञ द्विज सत्त्वाने वरच्या लोकि पातती ।
तमे वृक्षादि त्या योनी मनुष्य योनि त्या रजें ॥ २१ ॥
सत्त्वात मरता स्वर्ग रजी त्या नरदेह हा ।
तमात मरता नर्क गुणातीतास मुक्ति ती ॥ २२ ॥
निष्काम करिता कर्म सात्वीक परि जो फळा ।
इच्छितो रज तो जाणा कर्म नाशी असा तम ॥ २३ ॥
कैवल्य सात्विको ज्ञान कर्ता राजस मानिती ।
शरीर तामसी मानी निर्गुणी रूप ते मम ॥ २४ ॥
वनीं सात्विक तो राही गावात राजसी तसा ।
जुगारीं तमि तो राही मंदिरी निर्गुणा वसे ॥ २५ ॥
अनासक्त अशा भावे सात्वीक कर्म ते करी ।
कामना धरुनी चित्ती राजसी कर्म ते करी ॥
तोडी परंपरा कर्मीं तामसी जाणणे तसा ।
माझ्याचि प्राप्तिच्या साठी निर्गुणी कर्म ते करी ॥ २६ ॥
श्रद्धा तो आत्म ज्ञानाची सात्विको मानणे पहा ।
कर्म श्रद्धा रजाची नी अधर्मीं तामसी असे ॥
माझ्या सेवेत ज्या श्रद्धा श्रद्धा निर्गुण ती असे ॥ २७ ॥
पवित्र सात्त्विकी अन्न राजसी रुचियुक्त ते ।
दुःखदायी अपवित्र आहार तामसी असे ॥ २८ ॥
आत्मचिंतनि ते सौख्य सात्त्विकी मानणे पहा ।
विषयी राजसी सौख्य दीन-अज्ञान तामसां ॥
माझ्या भेटीत ज्या सौख्य गुणातीतचि मानणे ॥ २९ ॥
द्रव्य देश फलो काल अवस्था ज्ञान कर्म नी ।
कर्ता मनुष्य नी देव तनू त्या त्रिगुणात्मकी ॥ ३० ॥
पुरुष प्रकृती मध्ये आश्रीत सर्वभाव ते ।
गुणयुक्त तसे सर्व बुद्धिने कळती पहा ॥ ३१ ॥
जीवांच्या गति नी योनी गुण कर्मेचि लाभती ।
चित्ताने गुण ते सर्व त्यजोनी मजला भजे ॥
तयासी मम हे रूप मोक्ष हा मिळतो पहा ॥ ३२ ॥
दुर्मीळ माणुसी देह ज्ञान विज्ञान मेळि हा ।
म्हणोनी त्यजिणे मोह भजणे नित्य ते मला ॥ ३३ ॥
सात्त्विकें जिंकिणे दोन्ही रज नी तम या गुणा ।
आसक्ति त्यजुनी सर्व भजणे नित्यची मला ॥ ३४ ॥
योगाने जिंकिणे सत्व जीवाभावास सोडिणे ।
शांतवृत्ती अशी होता मिळे तो मजला पहा ॥ ३५ ॥
एकतत्त्व धरी चित्ता त्यजोनी लिंगदेहही ।
ब्रह्मरूप असा आत्मा विषया नच ये कधी ॥ ३६ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंचविसावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ २५ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥