समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २४ वा

सांख्ययोग -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

भगवान श्रीकृष्ण सांगतात -
( अनुष्टुप )
आता मी सांख्यशास्त्राच्या निर्णया सांगतो पुढे ।
पूर्वी निश्चय तो झाला ऋषिंचा श्रेष्ठ हा असा ॥ १ ॥
आदि सत्ययुगा मध्ये विवेकपूर्ण लोक ते ।
द्रष्टा दृश्य जग्गजीव ब्रह्मपूर्णचि पाहती ॥ २ ॥
विकल्पहीन ते ब्रह्म केवलो एक सत्य ते ।
न गावे वाणि वित्ताला जीव हे प्रतिबिंब की ॥ ३ ॥
प्रतिबिंब असे विश्व कार्यकारणरूप ते ।
ज्ञानस्वरूप दुसरे पुरुष म्हणणे तया ॥ ४ ॥
जीवांचे कर्म जाणोनी प्रकृती क्षुब्ध केलि मी ।
सत्त्व रज तमो ऐसे जाहले गुण तीन ते ॥ ५ ॥
तयातुनि क्रियासूत्र नि ज्ञानशक्ति जाहली ।
विकारे त्यातुनि व्यक्त अहंकारचि मोह तो ॥ ६ ॥
सत्त्व रज तमो तीन तयाचे भेद हे असे ।
तयाचे पंचतन्मात्रे इंद्रिये मन जाहले ॥ ७ ॥
तमऽहंकार तन्मात्रे पाचभूतेही जाहली ।
रजाच्या पासुनी तैसी इंद्रिये जाहली पहा ॥
अधिष्ठात्रे असे देव इंद्रिये सत्वि जाहले ॥ ८ ॥
माझ्याचि प्रेरणेने ते पुन्हा एकत्र जाहले ।
ब्रह्मांड अंड ते झाले मम उत्तम गेह जे ॥ ९ ॥
जळात स्थिरल्या अंडी नारायण विराजलो ।
नाभीच्या विश्वपद्मात ब्रह्मा तो प्रगट पुन्हा ॥ १० ॥
ब्रह्म्याने तप ते केले प्रसाद मम लाभता ।
त्रिलोक लोकपालांना तयाने निर्मिले पुन्हा ॥ ११ ॥
देवता राहती स्वर्गी अंतरिक्षात भूत ते ।
भुमीसी माणसे तैसे सिद्धांचे अन्य लोकही ॥ १२ ॥
नाग नी असुरां तेणे सात पाताळ निर्मिले ।
कर्माने गति ती लाभे त्रिलोकी राहण्या तशी ॥ १३ ॥
तपस्या योग संन्यासे महर्जन तपास नी ।
वैकुंठ मम ते धाम माझ्या भक्तीत लाभते ॥ १४ ॥
कर्मयुक्त जगत सर्व काळ मी फळ देतसे ।
प्रवाही बुडतो जीव कधी येतो वरी तसा ॥ १५ ॥
सान थोर असे सर्व काळ मी फळ देतसे ।
प्रवाही बुडतो जीव कधी येतो वरी तसा ॥ १६ ॥
आदी मध्ये नि अंती जे राहते सत्य ते असे ।
विकार कल्पनामात्र सत्य माती घटीं जशी ॥ १७ ॥
अहंकारादि तत्त्वाने जन्मते सृष्टि सर्वही ।
आदी अंती उरे तत्त्व म्हणोनी सत्य ते असे ॥ १८ ॥
प्रकृतीने मिळे सृष्टी काळ हा निर्मितो तिला ।
व्यव्हार काल नी तत्त्व मीही शुद्धचि ब्रह्म ते ॥ १९ ॥
परमात्मा जधी पाही तदा तो सर्व रक्षितो ।
पिता पुत्रादि रूपाने सृष्टिचे चक्र हे फिरे ॥ २० ॥
विराट रंगभूमी ही सर्व लोकांस लाभली ।
संकल्पी प्रलया मी तै विनाशा सर्व पावती ॥ २१ ॥
प्राण्यांचे देह ते अन्नी अन्न बीजात लोपते ।
बीज भूमीत भूमी ती गंधात लोप पावते ॥ २२ ॥
पाण्यात मिसळे गंध रसाळ जळ ते मिळे ।
रस तेजीं तसे तेज रूपात लीन होतसे ॥ २३ ॥
वायूत रूप नी वायू स्पर्शात स्पर्श तो पुन्हा ।
आकाशी लीन होवोनी शब्दी आकाश लीन हो ॥
इंद्रीय देवतां मध्ये राजसी मिळती पुन्हा ॥ २४ ॥
रज सत्त्वमनीं येई शब्दादी तामसी मिळे ।
अहंकार त्रयो मोह महत्तत्त्वात तो मिळे ॥ २५ ॥
ज्ञानशक्ति क्रिया शक्ती गुणात लीन होतसे ।
गुण ते प्रकृती मध्ये अविनाशात प्रकृती ॥ २६ ॥
मायामय जिवी काल जीव आत्म्यात तो शिरे ।
आत्मा ना लीन तो होई स्वरूपीं स्थित राहतो ॥
सृष्टी लया अधिष्ठान तसाचि अवधीहि तो ॥ २७ ॥
विवेक पाहता चित्ता प्रपंच भेद तो न हो ।
हृदयीं नच तो थांबे नष्टे सूर्ये तमो जसा ॥ २८ ॥
साक्षी मी कारणा कार्या सृष्टी नी लय ही तसा ।
बोललो विधि सांख्याचा संदेह तुटतो यये ॥
पुरुष आपुल्या रूपी स्थित नित्यचि होतसे ॥ २९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चोविसावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ २४ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP