[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
उद्धवजी म्हणाले -( अनुष्टुप )
भक्ती ज्ञान क्रिया योग त्यजोनी चित्त चंचले ।
भोगिती भोग जे नित्य तया भव न तो टळे ॥ १ ॥
अधिकार अनुसारे धर्मनिष्ठादि ते गुण ।
उलटे वागणे दोष वस्तुनिष्ठ न कांहिही ॥ २ ॥
समान असुनी वस्तु अशुद्ध शुद्ध ही असी ।
नियंत्रित करायाते प्रवृत्ती सर्व आपुल्या ॥ ३ ॥
धर्मसंपादिणे तेणे निर्वाह सुविधाहि हो ।
धर्माचा वाहती बोजा मनु आदीस बोध हा ॥ ४ ॥
पंचभूतादि नी ब्रह्म्यापासुनी सर्व जीव ते ।
समान शरिरी सर्व सर्वां आत्माहि एकची ॥ ५ ॥
वासना खंडिण्या सर्व वर्णाश्रम श्रुती वदे ।
असुनी देह तो एक भेद तो बोलिला असे ॥
आपुले गुण जाणोनी साधण्या पुरुषार्थ ते ॥ ६ ॥
देशकालादि भावांना गुण दोष विधान हे ।
वदलो नच हो भंग जनीं सीमा म्हणोनिया ॥ ७ ॥
विप्र नी कृष्णसारो जैं न तो देश पवित्र ना ।
संतभूमी सदा शुद्ध कीट वस्ती अशुद्धची ॥
पडीक वांझ ती भूमी अपवित्रचि मानणे ॥ ८ ॥
पवित्र समयो तोची जेंव्हा सामग्रि कर्म हो ।
न घडे कार्य ती वेळ अशुद्ध माणणे पहा ॥ ९ ॥
शुद्ध अशुद्ध ते द्रव्य संस्कार वचते तसे ।
महत्व अथवा काले अल्पत्वात घडे पहा ॥ १० ॥
शक्ति अशक्ति बुद्धी नी वैभवो वय स्थान नी ।
व्यव्हार जाणुनी सर्व अशुद्ध शुद्ध ही असे ॥ ११ ॥
धान्य लाकूड नी सुत रस तेजस चर्म ते ।
कालाग्नि वायु मातीने करणे शुद्ध ते पहा ॥ १२ ॥
अशुद्ध लागता कांही घासोनी मळ काढिणे ।
पूर्वरूप मिळे गंध तेंव्हा ते शुद्ध होतसे ॥ १३ ॥
वय स्नान तपे दाने बले संस्कार कर्म नी ।
स्मरता मम रूपाते चित्ताची शुद्धि होतसे ।
ययांनी शुद्ध होवोनी आश्रमी धर्म आचरा ॥ १४ ॥
मंत्रे बोधे करा चित्त शुद्ध नी अर्पिणे मला ।
षट्कर्म शुद्ध ते केंव्हा दोषाचा गुण तो कधी ॥ १५ ॥
गुणाचा दोष तो केंव्हा दोषाचा गुण तो कधी ।
घडतो करिता कर्म भेद ते कल्पनाच की ॥ १६ ॥
पतिता पाप ना दोष श्रेष्ठांना त्याज्य तेच हो ।
पत्निसंग न ते पाप संन्याश्या घोर पाप ते ॥
भूमिसी झोपता खाली पडेल कोण तो कसा ।
तसाचि पतिता नोव्हे पापकर्मात दोष तो ॥ १७ ॥
उपरती मिळे चित्ता त्या कर्म बंध ते तुटे ।
मनुष्या धर्म तो क्षेम मिटवी भय शोक तो ॥ १८ ॥
गुण ते विषयी ध्याता आसक्ती वाढते मनी ।
आसक्तीत बसे इच्छा इच्छापूर्तीत भांडणे ॥ १९ ॥
कलही वाढतो क्रोध क्रोध बोध न तो कळे ।
सारासार विचारांची त्वरेचि शक्ति संपते ॥ २० ॥
स्मृति ती संपते तेंव्हा मनुष्यपण संपते ।
शून्यवत पशुवत होतो प्रेमवत्जीवनोचि ते ॥
न स्वार्थ परमार्थोही घडतो त्याजला पुन्हा ॥ २१ ॥
ध्यासाने विषयी होतो होई जड तरूपरी ।
आत्मा वंचित तो होतो भाता जैं व्यर्थ श्वास तो ॥ २२ ॥
वर्णीं फलश्रुती वदे न म्हणे परमार्थ त्यां ।
रुची कर्मासि तो दावी गुळात औषधी जशी ॥ २३ ॥
जगींचे सर्वची लोक आसक्त जन्मताच की ।
आत्मोन्नतीस ती बाधा अनर्थकारि ती असे ॥ २४ ॥
न जाणी पुरुषार्था त्यां स्वर्गादींचे प्रलोभन ।
कळता सरतो स्वर्ग ज्ञाते त्यां नच इच्छिती ॥ २५ ॥
दुर्बुद्धि कर्मवादी ते अभिप्राय न जाणुनी ।
रमती कल्पना विश्वीं वेद तैसे न सांगती ॥ २६ ॥
वासनेत फसे लोभी मुग्ध कर्मींच होत ते ।
स्वर्गादी लाभ ते त्यांना निजधाम न त्यां मिळे ॥ २७ ॥
कर्मची साधना त्याची फल इंद्रियतृप्ति ती ।
विषयी धुंदिने नेणे मी वसे ईश त्या हृदीं ॥ २८ ॥
वाढे अभक्षणीं क्रोध संकोचार्थ यजा तया ।
अपूर्व नच ते कर्म संध्यावंदन जै असे ॥ २९ ॥
परोक्षज्ञान नेणोनी इंद्रिया तोषिण्यास ते ।
करिती यज्ञ आदी ते देवनावेचि ढोंग की ॥ ३० ॥
स्वर्गादी फळ ते खोटे ऐकण्या गोड वाटते ।
संकल्प करितो भोगां मुद्दला गमवी पहा ॥ ३१ ॥
रजोगुणादि सांभाळी तशा त्या देवता पुजी ।
तेवढे कष्ट लावोनी मजला नच तो पुजी ॥ ३२ ॥
वदती पुष्पवाणीने यज्ञाने स्वर्ग मेळवू ।
भोगूत दिव्य ते भोग जन्मता उच्च जन्म हो ॥ ३३ ॥
महाली त्या कुटुंबात तेथेही मिळवू सुखा ।
गर्व होई असा त्यांना माझी गोष्टहि नावडे ॥ ३४ ॥
बोलती वेद त्रीकांडी ब्रह्मात्मा एकता अशी ।
मंत्रात गुप्त ठेवोनी इष्ट ते मीच बोलणे ॥ ३५ ॥
शब्दब्रह्म सुदुर्बोध प्राण वाणी मनास ती ।
गंभीर नि अथांगो ती असीम उदधीपरी ॥ ३६ ॥
अनंत शक्ति संपन्न अनंत ब्रह्म मी असे ।
माझीच वेदवाणी ती अनाहत रुपी गमे ॥ ३७ ॥
हिरण्यगर्भ भगवन अमृतमय वेद ते ।
प्राणाने जाणणे त्यांना कळती ते अनाहती ॥ ३८ ॥
कीट जै निर्मिती जाळे गिळिती स्वयची मुखे ।
स्पर्शादी वर्ण संकल्पे मन रुप निमित्त ते ॥ ३९ ॥
हृदयाकाश मार्गाने प्रगटे वेदवैखरी ।
सूक्ष्म ओंकार तेथोनी प्रगटे लीन हो तिथे ॥
अभिव्यक्त तसा स्पर्श अंतःस्थ स्वर ऊष्म ते ।
चार चार असे वर्ण वाढती छंद ते तिथे ॥
विचित्रा रूप भाषेने विस्तार जाहला असे ॥ ४० ॥
गायत्री उष्णिक बृहती अनुष्टुप जगती त्रिष्टुप ।
अंत्यष्टि अतिछंदो नी अतीजगति नी विराट ॥ ४१ ॥
कर्म ते काय ती सांगे देवता कोणत्या तसे ।
विकल्प ज्ञान ते सारे रहस्य मीच जाणतो ॥ ४२ ॥
स्पष्ट मी सांगतो सारे सर्वची श्रुति त्या मम ।
विधान वदती कर्मीं उपास्य देवता रुपीं ॥
माझेचि वर्णिती रूप आरोप नि निषेधही ।
माझ्याच आश्रयी सार्या माझाच भेद सांगती ॥
मायेने भाष्य ते होते निषेध करुनी पुन्हा ।
माझ्यात शांत होवोनी शेवटी शेष मी उरे ॥ ४३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकविसावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ २१ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥