समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २२ वा

तत्वांची संख्या व पुरुष-प्रकृति-विवेक -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

उद्धवजी म्हणाले -
( अनुष्टुप )
विश्वेशा किति ते तत्व संख्येने ऋषि सांगती ।
अठ्ठावीस तशी तत्त्वे आत्ताच ऐकिली प्रभो ॥ १ ॥
सव्वीस बोलती कोणी सात वा पंचवीस नी ।
नऊ वा चार वा कोणी बारा संख्येत सांगती ॥ २ ॥
सतरा वदती कोणी सोळा तेराहि ते कुणी ।
एवढी भिन्नता कैसी कृपया सांगणे प्रभो ॥ ३ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
वेदज्ञ व्दिज ते याचे सांगती सर्व युक्त ते ।
एकमेकात ते तत्व मायेने दिसती पहा ॥ ४ ॥
तू खोटा सत्य मी बोले विवाद चालतो असा ।
सत्त्व रज तमो वृत्ती दुसर्‍यां लादिती पहा ॥ ५ ॥
कल्पिती सर्वची खोटे वादाचा विषयो नसे ।
चित्तशांतीत निवृत्ती मग तो वादही मिटे ॥ ६ ॥
मिळता तत्त्व तत्त्वात वक्त्याच्या कल्पनेत ते ।
कार्यकारण संख्येने करितो सिद्ध तेवढे ॥ ७ ॥
कितेक तत्त्व एकाशी दिसती बंधनो नसे ।
माती सूत घट पटीं पट घटो दिसती कधी ॥
कार्य कारणभावाने अंतर्भाव असे असा ॥ ८ ॥
वादी नी प्रतिवादी ते संख्या जी ती स्विकारिती ।
युक्त संगतची होते कार्य-कारण भेद तो ॥ ९ ॥
सव्वीस तत्त्व जे घेती वदती जीव अज्ञ ते ।
न तो जाणी स्वताला तै गुरु त्यास हवाच तो ॥ १० ॥
पंचेवीस जया मान्य जीवात्मा एक मानिती ।
भेदाची कल्पना व्यर्थ ज्ञान ते प्रकृती गुणो ॥ ११ ॥
प्रकृती गुणसाम्याचि आत्म्याचे गुण ना तसे ।
गुणात हेतु सृष्टी घे न आत्म्याचे असे दिसे ॥ १२ ॥
सत्व ज्ञान रजो कर्म तमो अज्ञान ते असे ।
गुणक्षोभी तसा काल महत्तत्त्व स्वभाव तो ॥ १३ ॥
पुरूष प्रकृती वायु महत्तत्त्व नि ते जल ।
अहंकार नि आकाश तेज पृथ्वी नऊ असे ॥
मी तो हे वदलो पूर्वी मोजोनी तत्त्व हे पहा ॥ १४ ॥
नाक कान त्वचा डोळे रसना ज्ञान‍इंद्रिय ।
वाणी हात तसे पाय उपस्थ पायु कर्मिचे ॥
मन ते अकरावे ही जाहले आणखी पहा ।
शब्द स्पर्श रुप गंध रस हे विषयो तया ॥ १५ ॥
अकरा न‍उ नी तीन पाच हे तत्त्व जाहले ।
अठ्ठाविस असे झाले चालणे बोलणे तसे ॥
मलत्याग असे तत्त्व वाढती त्यात ते पुन्हा ।
कर्मेंद्रिय असे त्यांना मानणे युक्त होतसे ॥ १६ ॥
प्रारंभी प्रकृती जन्मी कार्य कारण रूपिणी ।
सत्त्वादि गुण साह्याने अवस्था सृष्टिसी मिळे ॥
अव्यक्त पुरुषो होतो एकटा साक्षिमात्र तो ॥ १७ ॥
महत्तत्वादि धातुंना विकार मिळती तदा ।
ईक्षणीशक्ति ती घेता एकमेकात मेळती ॥
प्रकृतीच्याच आधारे बले ब्रह्मांड निर्मिती ॥ १८ ॥
पंचभूते नि आत्मा नी सातवा जीव हे असे ।
मानिती कोणि ते तैसे अन्या ना मानिती पहा ॥ १९ ॥
पंचभूते नि तो आत्मा सहावा मानिती कुणी ।
पंचभूतेचि हा देह जीव आत शिरे तयां ॥ २० ॥
मानिती चार जे तत्व आत्म्याने तेज पृथ्वि नी ।
जळ निष्पन्न ते होते याच्यात सर्व ते पहा ॥ २१ ॥
सतरा मानिती जे ते भूत तन्मात्र इंद्रिय ।
एकेक मन नी आत्मा संख्येचा मेळ लाविती ॥ २२ ॥
आत्म्यात मेळिता चित्त कोणी सोळास मानिती ।
भूते इंद्रिय नी चित्त आत्मा जीवे त्रयोदश ॥ २३ ॥
एकादशत्वि आत्मा नी भूते इंद्रिय मानिती ।
नवात मनऽहंकार भूते पुरुष बुद्धिही ॥ २४ ॥
ऋषिंनी भिन्न ते तत्त्व यापरी मोजिली पहा ॥
सर्वांचे सांगणे युक्त तत्त्वज्ञा मान्य सर्व ते ॥ २५ ॥

उद्धवजी म्हणाले -
प्रकृती पुरुषो दोघे एकरूपचि जाहले ।
न भिन्न वाटती तैसे भिन्नता जाणणे कशी ॥ २६ ॥
असा हा पुंडरीकाक्षा महान संशयो हृदी ।
युक्त शब्दे निवारावा सर्वज्ञ तुम्हि तो असा ॥ २७ ॥
कृपेने मिळते ज्ञान मायेने नष्टते पहा ।
न कळे तव ती माया समर्थ तुम्हि बोधिण्या ॥ २८ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
पुरुष प्रकृती यात अत्यंत भेद तो असे ।
विकारे भरली सृष्टी क्षोभाची पुत्रि ती पहा ॥ २९ ॥
( इंद्रवज्रा )
ममांग प्रकृती गुण कैक दावी
     विकल्प बुद्धी भ्रम निर्मिते ती ।
विस्तार मोठा तरि तीन भागी
     अध्यात्म दैवी अधिभूत झाली ॥ ३० ॥
अध्यात्म नेत्रो अधिभुत रूप
     ती दृष्टिशक्ती अधिदैव आहे ।
तिघास आधार परस्परांचा
     आकाशिचा सूर्य विमुक्त सिद्ध ।
आत्मा तसाची नित मुक्त साक्षी
     प्राकाशको तो मुळ सिद्ध आहे ।
नेत्रात ते जे त्रय भेद होती
     त्वचादिं चित्ती त‍इ ही तसेच ॥ ३१ ॥
या प्रकृतीचेच महान तत्व
     त्याचा अहंकार गुणेचि क्षोभे ।
विकार होता प्रकृतीहि जन्मे
     गुणेचि होते विविधा रुपाने ॥ ३२ ॥
आत्मा परिज्ञानमयी न वाद
     नाही नि आहे मुळि दृष्टि भेद ।
विवाद सारा मुळि व्यर्थ आहे
     वादात मुक्तीनच त्या अभक्ता ॥ ३३ ॥
उद्धवजीने विचारिले -
( अनुष्टुप )
कर्मस्वरूप जीवा त्या योनी ही नव लाभते ।
आता तो उरला प्रश्र आत्मा तो नव त्या तनीं ।
शिरतो ते कसे शक्य अकर्ताहि असोनिया ॥ ३४ ॥
गोविंदा अज्ञ ते लोक ज्ञाते त्यां नच भेटती ।
भ्रमात पडले सारे रहस्य सांगणे मला ॥ ३५ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
कर्म संस्कारि ते चित्त इंद्रिया भुलवी पहा ।
लिंगदेह तया नाम मरता अन्य लोकिं ये ॥
आत्मा तो वेगळा त्याच्या परी तो गुंततो तयीं ।
अहंकार करोनीया येतो जातो गमे तसा ॥ ३६ ॥
आधीन मन त्या कर्मीं विषया चिंतिते सदा ।
स्मृति नी अनुसंधान तदा ते नष्ट होत की ॥ ३७ ॥
देवादी शरिरी होतो तल्लीन स्मृति नष्टते ।
शरिरा विसरे त्याचा मृत्यु तोचि असे पहा ॥ ३८ ॥
जीव तनूस मानी मी तदाचि जन्म पावतो ।
स्वप्नीच्या अभिमानाने स्वप्न जैं घडते मनीं ॥ ३९ ॥
वर्तमान अशा देहा पूर्वदेह न आठवे ।
स्वप्नात पडता स्वप्न पूर्वीचा देह नाठवे ॥ ४० ॥
इंद्रियाश्रित तो आत्मा त्रिविधा भासतो पहा ।
अभिमाने दिसे भेद दुष्ट पुत्र अरी जसा ॥ ४१ ॥
काळाची गति ती सूक्ष्म साधरण न त्या दिसे ।
प्रतिक्षण तनू नाशी न जाणी मृत्यु जन्म तो ॥ ४२ ॥
कालप्रवाहि ती ज्योत नद्यांचाही प्रवाह तो ।
अवस्था वृक्षिच्या सार्‍या शरिरा स्थिति होतसे ॥ ४३ ॥
दीपाची ज्योत नी जैसा नदीचातो प्रवाहही ।
समजणे जसे मिथ्या देहा आयुष्य ते तसे ॥ ४४ ॥
आत्म्याला भ्रांति ना कर्म तसा तो अमरोअसे ।
दिसे काष्ठातुनी अग्नी पुन्हा जै नष्ट होतसे ॥ ४५ ॥
गर्भाधान तशी वृद्धी जन्म बाल्य कुमार नी ।
तरूण पोक्त नी वृद्ध मृत्यु या देहिच्या स्थिती ॥ ४६ ॥
जीव देह असे भिन्न उंच नीच मनोरथ ।
अज्ञाने भ्रमती सारे विवेके त्यजितीहि तो ॥ ४७ ॥
पित्याने पुत्र जन्माने पुत्राने पितृमृत्यु तो ।
आपुला अनुमानावा आत्म्याला नच मृत्यु तो ॥ ४८ ॥
उगवे पेरिता धान्य पकता कापणीच हो ।
किसान वेगळा तैसा आत्मा देहास साक्षि तो ॥ ४९ ॥
अज्ञानी नेणती सारे विषया मानिती सुख ।
म्हणोनी जन्म मृत्युच्या फेर्‍यात भ्रमती पहा ॥ ५० ॥
सत्त्व कर्म ऋषीजन्म राजसे नर -राक्षस ।
तमाने पशु नी भूत इत्यादी योनि लाभती ॥ ५१ ॥
पाहोनी नाच गाणी ती नाचे गायी तसा नर ।
निष्क्रीय असुनी बाध्य होवोनी वागतो तसा ॥ ५२ ॥
नदीत पाहता झाडे दिसती डौलतीहि ते ।
देहासी मारिता फेरी पृथिवी फिरता दिसे ॥ ५३ ॥
स्वप्निचे भोग ते व्यर्थ संसार व्यर्थ हा तसा ।
आत्मा तो शुद्ध नी बुद्ध स्वभावे मुक्तची असे ॥ ५८ ॥
असत्य विषया चिंती भव ना सोडि त्या कधी ।
स्वप्नीची संकटे जैशी उठल्या विण जात ना ॥ ५५ ॥
म्हणोनी विषया दुष्ट इंद्रियीं नच भोगणे ।
भेद भाव भ्रमो सारा अज्ञाने दिसते तसे ॥ ५६ ॥
गचांडी दिधली कोणी अपमानित बोलले ।
निंदा मार तसे बद्ध थुंके वा लघवी करी ॥ ५७ ॥
न चळे तरि तो साधू अज्ञानी जीव जाणतो ।
विवेके रक्षिणे आत विपत्ति सर्व मोडिणे ॥ ५८ ॥
उद्धवजी म्हणाले -
वक्ताशिरोमणी देवा दुर्जने व्देषिले तदा ।
असह्य जाहले तेणे समजावू कसा मना ॥
पचवू उपदेशाते कसा ते सांगणे मला ॥ ५९ ॥
प्रेमाने भागवद्धर्मीं तुझ्या पायासि राहाती ।
अशा संता विना कोणी न साही त्रास या जगी ॥ ६० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बाविसावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ २२ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP