समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २० वा

ज्ञानयोग ,कर्मयोग आणि भक्तियोग -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

उद्धवजी म्हणाले -
( अनुष्टुप )
कर्माचा विधि नी कांही कर्माचा तो निषेध ही ।
वेद आज्ञा तुझी कृष्णा गुण दोषास शोधिण्या ॥ १ ॥
वर्ण आश्रम हे भेद यातींचे वर्णसंकर ।
द्रव्य देशायु कालो नी स्वर्ग नर्क कळे तये ॥ २ ॥
न संशय तुझी वाणी विधि नी निषधो परी ।
जरि ना ती तशी होय भद्र जीवास ती कशी ॥ ३ ॥
पितृ देव मनुष्यांना वेद दृष्टीच ईश्वरा ।
तेणेचि स्वर्ग नी मोक्ष अदृष्ट बोध होतसे ॥
कुणाचे कार्य नि साध्य नीर्णयो कळतो तये ॥ ४ ॥
तुझी वाणी तसे भेद सांगावे प्रश्र हा पडे ।
विरोधे भ्रमते चित्त कृपया निरसा भ्रम ॥ ५ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
अधिकारास जाणोनी वदलो तीन योग ते ।
ज्ञान कर्म तशी भक्ती तरण्या तीन मार्ग की ॥ ६ ॥
विरक्त फल कर्मी जे ज्ञानयोगास पात्र ते ।
वैराग्य नच ज्या झाले कर्म योगास पात्र ते ॥ ७ ॥
न विरक्त विशेषो नी आसक्त तेवढा नसे ।
माझ्या कीर्तीत ज्या गोडी भक्तियोगात सिद्धि त्यां ॥ ८ ॥
वैराग्य होय पर्यंत अथवा मम कीर्तनी ।
भाव तो होय पर्यंत विधिने कर्म ते करा ॥ ९ ॥
वर्ण आश्रमि राहोनी यज्ञात यजिता मला ।
निष्काम करिता पुजा नर्क वा स्वर्ग ना मिळे ॥ १० ॥
धर्मनिष्ठ असोनीया निषिद्ध कर्म त्यागिता ।
रागादी त्यजिता पूर्ण तत्त्वभक्ति मिळे तया ॥ ११ ॥
कर्माचा अधिकारो नी निषेध विधि लाभण्या ।
दुर्लभो माणुषो देह स्वर्गीचे देव इच्छिती ॥
भक्ती ज्ञान मिळे तेंव्हा स्वर्ग वा नर्क ना मिळे ॥ १२ ॥
चतुरे नच इच्छावा स्वर्ग वा नरको तसा ।
न इच्छा पुढती देह प्रमाद वाढतो पुन्हा ॥ १३ ॥
नर देह जरी मर्त्य तरी हा मोक्षदायक ।
सावधान त्वरे व्हावे साधना योजिणे पहा ॥ १४ ॥
शरीर वृक्ष नी जीव खोप्यात राहतो तसा ।
अनासक्त असा पक्षी उडोनी मोक्ष पावतो ॥
काळ तो तोडितो वृक्षा आसक्ता दुःख लाभते ॥ १५ ॥
क्षणे क्षणे ग्रसी काळ कळता भय वाटते ।
आसक्ति सोडिता जीव स्वतात शांत होतसे ॥ १६ ॥
( इंद्रवज्रा )
हा दुर्लभो देह मिळोनि गेला
     जाताचि पायी गुरुच्या तसेची ।
नी भक्ति माझी करिताच मोक्ष
     न जो तरे तो बहु आत्मघाती ॥ १७ ॥
( अनुष्टुप )
दिसता आपुले दोष उद्‌विग्ने योग साधुनी ।
आत्म्याशी अनुसंधावे माझ्या रूपी स्थिरावणे ॥ १८ ॥
मन चंचल ते होता त्वरेचि सावधान हो ।
समजावुनिया खूप आपुल्या वश ठेविणे ॥ १९ ॥
इंद्रीय प्राण नी चित्ता क्षण ना मुक्त सोडणे ।
सत्वसंपन्न बुद्धीने मनाला रोधिणे हळू ॥ २० ॥
घोडेस्वार जसा घोडा चाल जाणोनि चालवी ।
तसेचि आपुल्या चित्ता चुचकारुनि आकळा ॥
चित्ताला ठेविणे शांत श्रेष्ठची योग हा असे ॥ २१ ॥
सांख्यशास्त्रे जसा देह सृष्टीचा क्रम बोलिला ।
तयाचा लय चिंतावा जो वरी चित्त ना स्थिर ॥ २२ ॥
विरक्त जाहला तेणे बोधाने ज्ञान चिंतिणे ।
सुटते ममता तेणे चित्तही ते स्थिरावते ॥ २३ ॥
यमादी योग मार्गाने आत्मविंद्ये स्मरा मला ।
कर्म ज्ञान नि भक्तीच्या विण ना मार्ग अन्य तो ॥ २४ ॥
निंद्य कर्म जसा योगी न करी परि तो कधी ।
प्रमादे वागता तैसे योगाने पाप जाळितो ॥
कृच्छ्र्चंद्रायणादींनी कधी ना धुविणे तया ॥ २५ ॥
आपुल्या अधिकाराच्या निष्ठा त्या गुण ते पहा ।
त्यजिणे विषयासक्ती तोचि विधि निषेध की ॥
जात्त्या अशुद्ध ते कर्म नियमी शास्त्र ते तया ।
शक्य तो त्या प्रवृत्तींचा संकोच करणे बरे ॥ २६ ॥
माझ्या कथेत श्रद्धा ज्यां वासना दुःख जाणितो ।
अशक्य विषयी त्याग तयाने भोग भोगिणे ॥ २७ ॥
स्वताला निंदिणे त्याने दुःखे दुर्भाग्य मानणे ।
सुटण्या योजिणे युक्ती श्रद्धेने भजनी रमो ॥ २८ ॥
भजता नित्य भावाने मी वसे हृदयीं तया ।
वसता मी हृदीं त्याच्या संस्कारे गुण नष्टती ॥ २९ ॥
साक्षात्कार तया होतो हृदींच्या ग्रंथि नष्टती ।
संशयो मिटती सारे वासना क्षीण होत त्या ॥ ३० ॥
भक्तियुक्त असा योगी चिंतनी मग्न राहता ।
नसता ज्ञान वैराग्य तरी तो मज पावतो ॥ ३१ ॥
ज्ञान कर्म तपे योगे वैराग्य ज्ञानधर्म या ।
साधनीं मिळतो स्वर्ग अपवर्ग नि धामही ॥ ३२ ॥
भक्तीयोग प्रभावाने माझ्या भक्तास सर्व ते ।
सहजी लाभते सत्य इच्छा ती करिता तशी ॥ ३३ ॥
अनन्य प्रेमि जे संत इच्छिता सर्व देइ मी ।
मोक्ष कैवल्यहि देतो अन्य ते काय सांगणे ॥ ३४ ॥
निरपेक्ष्या दुजे नाम श्रेष्ठ कल्याण हे असे ।
म्हणोनी मम ती भक्ती निष्काम करणे पहा ॥ ३५ ॥
समदर्शि महात्म्यांना बुद्धिने तत्व लाभता ।
विधि निषेध पापो नी पुण्याचा स्पर्श ना तया ॥ ३६ ॥
ज्ञान भक्ति नि कर्माने या परी घेइ आश्रयो ।
ब्रह्मतत्त्वासि जाणोनी ते येती मम धामि की ॥ ३७ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर विसावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ २० ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP