[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
( अनुष्टुप )
जे जे विद्या शिकोनीया ब्रह्मनिष्ठचि जाहले ।
निवृत्त भक्त हे दोघे मजसी पावती पहा ॥ १ ॥
अभीष्ट वस्तु मी ज्ञान्या साध्य साधन स्वर्ग मी ।
अपवर्गी मला पाही सर्वत्र मीच त्यां दिसे ॥ २ ॥
सिद्ध जे ज्ञान विज्ञाने रूप वास्तव जाणिती ।
म्हणोनी मज ते प्रीय नित्य ते मज ध्यायिती ॥ ३ ॥
लेश तत्वे मिळे सिद्धी तप तीर्थ जपो तसे ।
अंतःशुद्धी विना दान साधने पूर्ण होत ना ॥ ४ ॥
म्हणोनी उद्धवा जाणी आत्मरूप पुन्हा तसे ।
ज्ञान विज्ञान संपन्न भक्तिने भजणे मला ॥ ५ ॥
ज्ञान विज्ञान यज्ञाने श्रेष्ठ ते ऋषि नी मुनी ।
मलाच यजिती चित्ती असे सिद्धीस पावती ॥ ६ ॥
( वसंततिलका )
देहो विकारि त्रिविधा मुळि हा समष्टी
आधीन तो तुमचिया नव्हता न होय ।
जन्म स्थिती नि घट वाढ प्रसंग मृत्यु
संबंध यासि तुमचा नच ,हा असत्य ॥ ७ ॥
उद्धवजी म्हणाले -
( इंद्रवज्रा )
वैराग्य विज्ञान विशुद्ध ज्ञान
सांगाचि विश्वेश्वर विश्वमुर्ते ।
त्या स्पष्ट शब्दीं सह भक्तियोगा
ब्रह्मादि ज्याला नित शोधितात ॥ ८ ॥
जे जीव ऐशा भवि सापडोनी
त्रिताप तापे जळती मधोनी ।
ना आश्रयों त्यां चरणार विंदा
विना कुठेही, पद अमृतोचि ॥ ९ ॥
अंधार कूपीं पडलो असा मी
नी काळ सर्पे विष दंशिले हो ।
वाढेचि मोहो न मिटेचि तृष्णा
कृपामृते बोधुनि मुक्ति द्यावी ॥ १० ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
( अनुष्टुप )
धर्मरायें असा प्रश्र भीष्मांना पुसला असे ।
आम्ही सर्व तिथे होतो व्दयांच्यापाशि तेधवा ॥ ११ ॥
संपता ते महायुद्ध धर्माला शोक जाहला ।
भीष्माला पुसला त्यांनी मोक्षा संबंधि प्रश्र हा ॥ १२ ॥
भीष्माच्या मुखिचा मी जो ऐकला मोक्षधर्म तो ।
ज्ञान विज्ञान वैराग्य श्रद्धा नी भक्तिपूर्ण जो ॥ १३ ॥
ज्या ज्ञाने पाहिली जाती तत्वे अठ्ठाविसीहि ती ।
तृण-ब्रह्मा मध्ये रूप परोक्षज्ञान ते तसे ॥ १४ ॥
प्रत्येक तत्व ते ब्रह्म विज्ञान पाहता असे ।
उत्पत्ति स्थिति नी मृत्यु देहाचे हेतु जाणणे ॥ १५ ॥
सृष्टि आरंभि जी वस्तू अंतीही तीच की उरे ।
साक्षीभूत उरे एक सद्वस्तु परमार्थ तो ॥ १६ ॥
श्रुति प्रत्यक्ष ऐतिह्य अनुमान प्रमाण चौ ।
कसोटी लाविता सर्व प्रपंच नश्वरो असे ॥
विरक्त म्हणुनी व्हावे कल्पना रूप या भवी ॥ १७ ॥
स्वर्गादी फलदो यज्ञ ब्रह्मलोकादि ते सुख ।
नश्वरो दुःखदायी नी अमंगलचि सर्व ते ॥ १८ ॥
भक्तियोग तुम्हा पूर्वी वदलो प्रीय जो असा ।
म्हणोनी आणखी त्याचे श्रेष्ठ साधन सांगतो ॥ १९ ॥
भक्ति ज्याला हवी त्याने मत्कथामृत ऐकणे ।
करावी कीर्तने नित्य निष्ठेने पूजिणे मला ॥
श्रद्धेने गाउनी स्तोत्र स्तुतिही करणे पहा ॥ २० ॥
मला श्रद्धेचि पूजोनी साष्टांग नमिणे पुढे ।
अधीक पूजिणे भक्तां समस्ती मजला पहा ॥ २१ ॥
सर्वकर्मी मला ध्यावे गावेही मजला मुखे ।
मनही मजला अर्पा कामना सर्व त्यागिणे ॥ २२ ॥
प्राप्त धन सुखा भोगा माझ्या साठीच त्यागिणे ।
यज्ञ दान तपो होम जप नी व्रत सर्व ते ॥
माझ्या प्राप्त्यर्थ ते सर्व कराव भक्तिने तसे ॥ २३ ॥
आत्म निवेदना बोलो पाळोनी धर्म हा तदा ।
भक्तिचा उदयो होतो कंही कर्मचि ना उरे ॥ २४ ॥
सत्त्ववृद्धी तये होते आत्म्याला शांति लाभते ।
आपैसी लाभती भक्ता वैराग्य ज्ञान धर्म ही ॥ २५ ॥
संसारी कल्पना कैक असोनी नाम तो नसे ।
लागता चित्त त्याच्यासी मोहाने सत्य भासते ॥
ज्ञान वैराग्य ते सारे अज्ञानें नष्टती पहा ॥ २६ ॥
भक्तीच धर्म तो आहे ब्रह्मत्मा कळतो तये ।
वैराग्य राहता लाभे ऐश्वर्य अणिमादिही ॥ २७ ॥
उद्धवजी म्हणाले -
यम ते किति नी कैसे नियमाचे प्रकारही ।
शम दम तितिक्षा नी धैर्य ते काय हो प्रभो ? ॥ २८ ॥
तपस्या दान नी शौर्य सत्य ऋतु स्वरूप नी ।
त्याग तो सांगणे काय धन यज्ञ नि दक्षिणा ॥ २९ ॥
सत्यबळ पुरूषाचे भग ते म्हणती कशा ।
लज्जा श्री सुख नी दुःख उच्च विद्या कशी असे ॥ ३० ॥
कोणे पंडित नी मूर्ख कु-सुमार्गीहि सांगणे ।
स्वर्ग नी नरको काय बंधु कोणास माणणे ॥
घर ते म्हणजे काय सांगणे पुरुषोत्तमा ॥ ३१ ॥
निर्धनी धनवान कोण कोण कृपण ईश्वर ।
प्रश्राची उत्तरे तैसे विरोधी भाव सांगणे ॥ ३२ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
अहिंसा सत्य अस्तेय लज्जाऽसंग असंचय ।
आस्तिक्य ब्रह्मचर्यो नी मौन स्थौर्य क्षमाऽभय ॥ ३३ ॥
बारा हे नियमो जाणा यम बारा पुढील ते ।
शौच जप तपो होम श्रद्धा सेवा अतीथिसी ॥ ३४ ॥
परोपकार संतोष तीर्थयात्रा गुरुपुजा ।
सकाम आणि निष्कामे भोगे मोक्षादि देत ती ॥ ३५ ॥
शम ते मजला चित्त इंद्रिया रोधिणे दम ।
तितिक्षा साहणे दुःख जिव्होपस्थीजयो धृती ॥ ३६ ॥
दंड देणे परं दान इच्छा त्यागात ते तप ।
वासना जिंकिता शौर्य समदृष्टीच सत्य ते ॥ ३७ ॥
शब्द सत्य मधु ऋतो अनासक्तीच शौच ते ।
वासनात्याग संन्यास महात्मे सांगती असे ॥ ३८ ॥
अभीष्ट धन तो धर्म यज्ञ मी परमेश्वर ।
प्राणायाम बलो श्रेष्ठ ज्ञानोपदेश दक्षिणा ॥ ३८ ॥
भग ऐश्वर्य ते माझे भक्ती श्रेष्ठचि लाभ तो।
आत्माविद्याच ती श्रेष्ठ लज्जा पापास जी घृणा ॥ ४० ॥
निरपेक्षादि ती श्री नी सुख दुःखा त्यजो सुख ।
विषयी कामना दुःख बंध-मोक्षज्ञ पंडित ॥ ४१ ॥
मी पणा मूर्खता होय भक्तिमार्ग सुमार्ग तो ।
बहिर्चित्त कुमार्गो नी सत्त्ववृद्धीच स्वर्ग तो ॥ ४२ ॥
नरको तमवृद्धी ती सख्खा बंधू गुरू असे ।
मी स्वता गुरु सर्वांचा देह-घर धनो-गुणी ॥ ४३ ॥
असंतुष्ट दरिद्री तो कृपणो अजितेंद्रिय ।
स्वातंत्र्य ईश्वरो रूप आसक्त असमर्थ तो ॥ ४४ ॥
उद्धवा तुमच्या प्रश्रा दिधली सर्व उत्तरे ।
कळता मोक्ष हो सोपा गुण दोष बहूत ते ॥
न पहा मुळि ते कांही शांत संकल्पि राहुनी ।
स्वरुपीं स्थिरची व्हावे सर्वात गुण श्रेष्ठ हा ॥ ४५ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणविसावा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ ११ ॥ १९ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥