समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय १८ वा

वानप्रस्थ आणि संन्याशाचे धर्म -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

भगवान श्रीकृष्ण सांगतात -
( अनुष्टुप )
इच्छिता वानप्रस्थाते पत्‍नि पुत्रासि सोपवा ।
किंवा सवेचि घेवोनी वनात शांत राहणे ॥ १ ॥
कंद मुळे फळे भक्षो निर्वाह ,वल्कले करो ।
किंवा गवत पाने वा ल्यावे ते मृगचर्मची ॥ २ ॥
न धुवा दाढि नी केस हातही घासणे नको ।
त्रिकाल स्नान घेवोनी झोपणे पृथिवीवरी ॥ ३ ॥
ग्रिष्मी पंचाग्नि तो व्हावा पाऊस अंगि साहिणे ।
आकंठ जळि डुंबोनी घोर ते तप साधिणे ॥ ४ ॥
खावे कंद न भाजोनी समयी फळ पक्व घे ।
दगडें ठेचुनी घ्यावे चावोनी भक्षिणे पहा ॥ ५ ॥
जिथे कांही जसे लाभे आणावे गरजेस ते ।
संचयो नच तो व्हावा दुजांचे नच घे मुळी ॥ ६ ॥
पुरोडाश चरू आदी करणे वनधान्य नी ।
तसेच पशुच्या व्दारा करावे मम यज्ञ ते ॥ ७ ॥
अग्निहोत्र नि ते दर्श पूर्णमास तसेचि ते ।
चातुर्मासादिको सर्व गृहस्थ परि ते करो ॥ ८ ॥
घोर तप असे होता शिरा अंगास सर्व त्या ।
दिसती ऋषिलोकाने अंती तो मज प्राप्त हो ॥ ९ ॥
कष्टाने तप हे ऐसे करिता स्वर्ग आदि ते ।
इच्छिता मूर्खता जाणा निष्काम करणे तप ॥ १० ॥
जर हे शक्य ना होय वृद्धत्वी देह कंपतो ।
माझ्यात लाउनी चित्त अग्नीत देह त्यागिणे ॥ ११ ॥
इच्छिता लाभतो स्वर्ग दुःखपूर्णचि तो असे ।
वैराग्यपूर्ण ते व्हावे त्यागे संन्यास घेइजे ॥ १२ ॥
इच्छिता वानप्रस्थी तो संन्यासा अष्ट श्राद्ध ते ।
प्रजापत्यादि यज्ञाने मजला यजिणे असे ॥
मेळावे प्राणि यज्ञाग्नी स्वच्छंद फिरणे पहा ॥ १३ ॥
इच्छिता व्दिज संन्यास स्त्री पुत्र अन देवता ।
आणिती विघ्न ते त्यात चिंतिती आपणास हा ॥
त्यजोनी निघेला हा तो एकटा मोक्ष साधिण्या ॥ १४ ॥
इच्छिता यतिने वस्त्र फक्त लंगोटि नेसणे ।
पंचा ल्यावा अधिक्ये नी आश्रमीदंड सेविणे ॥
कमंडलू विना कांही न घ्याव्या वस्तु अन्य त्या ।
आपत्ति नसता फक्त घेणे वस्तुचि एवढ्या ॥ १५ ॥
जमीन पाहुनी चालो पाणी गाळून ते पिणे ।
सत्यची बोलणे नित्य विचारे सर्व वागणे ॥ १६ ॥
वाणीला मौन ते व्हावे शरीरा ती निचेष्टिता ।
प्राणायामे मना दंडा न स्वामी दंड धरि तो ॥ १७ ॥
चारी वर्णांचि ती घ्यावी भिक्षा त्या यतिने पहा ।
गोघाती पतितो यांची भिक्षा ती नच सेविणे ॥
सात गेही मिळे त्यात संतोषे राहणे असे ॥ १८ ॥
भिक्षा घेवोनिया जावे जलाशयास शुद्ध हो ।
भाग वाटोनि सर्वांचे मौनेचि भक्षिणे पहा ॥
न संग्रह मुळी व्हावा दुसर्‍या वेळिचा तसा ॥ १९ ॥
एकटे फिरणे नित्य निसंग संयतेंद्रिय ।
रमावे आत्मरूपात समान स्थिर धैर्यवान ॥ २० ॥
एकांती राहणे नित्य चिंतने शुद्ध राहणे ।
अव्दितीय असे माझे तयाने रूप चिंतिणे ॥ २१ ॥
ज्ञानाने चित्त बांधावे मोक्षाचा ध्यास तो असो ।
विषयीं रमता बद्ध संयमे मोक्ष लाभतो ॥ २२ ॥
म्हणोनी जिंकिणे पाचां निर्मो हे सुख घेइजे ।
मजसी भाव ठेवोनी विचरो पृथिवी वरी ॥ २३ ॥
ग्रामी भिक्षार्थची जावे टोळी वा वस्तिशी तसे ।
ममता सोडुनी हिंडो वन पर्वत आश्रमीं ॥ २४ ॥
वानप्रस्थाश्रमी यांची भिक्षा मुद्दाम घेइजे ।
तेणे मोह सुटोनीया सिद्धि प्राप्तचि होतसे ॥ २५ ॥
विचारी यतिने विश्वा नाशवंतचि मानणे ।
जयासी पाहिजे कांही विरक्त राहणे तये ॥ २६ ॥
प्राणे वाणी मनोसंघ मायारूपचि विश्व हे ।
स्वरुपी स्थितची व्हावे विचार सर्व सोडणे ॥ २७ ॥
ज्ञाननिष्ठ विरक्तो नी मुमुक्षु मोक्ष इच्छि ना ।
भक्त श्रेष्ठचि तो माझा स्वच्छंदे फिरणे तये ॥
तया ना आश्रमी बंध निषेधी असला तरी ॥ २८ ॥
ज्ञानी बाळा परी खेळो तज्ज्ञ तो जडवत बसो ।
वेदज्ञ असुनी वागो पशुवत जरि भक्त तो ॥ २९ ॥
न पडो वेदवादात पाखंड मतही नको ।
तर्क वितर्क वादात न घ्यावा पक्ष कोणता ॥ ३० ॥
नको उव्देग चित्तात उद्वेगे उत्तरा न दे ।
अनिंद्य राहुनी नित्य प्रसन्न चित्त ठेविणे ॥
न करावा अपमान वैर कोणा नकोच ते ।
वैर तो पशुची वृत्ती म्हणोनी सर्वची त्यजो ॥ ३१ ॥
अन्यान्य जलपात्रात चंद्रमा भिन्न तो दिसे ।
पंचभूतात्म देहात आत्मा तो पाहणे तसा ॥ ३२ ॥
मिळो वा न मिळो अन्न हर्ष वा दुःखही नको ।
प्रारब्धे मिळते अन्न अन्यथा नच ते मिळे ॥ ३३ ॥
भिक्षा अवश्य मागावी तेणे रक्षति प्राण ते ।
जगता चिंतनो होय ज्ञाने मुक्तीच लाभते ॥ ३४ ॥
जशी मिळेल ती भिक्षा तेणेचि भूक भागवी ।
वस्त्र नी अंथरायाते मिळेल त्यात तोषणे ॥ ३५ ॥
परमेश असोनीया जसा मी धर्म पाळितो ।
तसेचि ज्ञाननिष्ठांनी सहजी धर्म पाळिणे ॥ ३६ ॥
ज्ञाननिष्ठां न तो भेद साक्षात्कारेचि संपला ।
जरि तो जाणवे किंचित मरता मजला मिळे ॥ ३७ ॥
दुःखाचे कळता मूळ विरक्त जाहला तया ।
चिंतोनी मजला भक्ते गुरुला प्रार्थिणे पहा ॥ ३८ ॥
श्रद्धेने करणे सेवा न काढा दोष ते कधी ।
होई तो ज्ञान ते पूर्ण मद्रूप पूजिणे तयां ॥ ३९ ॥
इंद्रियां नसता ताबा वैराग्य नि न ज्ञान ते ।
त्रिदंडि ढोंग ते माना पोटार्थी धर्म नाशितो ॥ ४० ॥
स्वतास फसवी पापी हृदयस्थ मलाहि तै ।
न सुटे वासना ऐसा मुकला इह नी परी ॥ ४१ ॥
अहिंसा शांति यतिसी वानप्रस्थासि ते तप ।
गृहस्था यज्ञ नी प्रेम विप्रा आचार्य सेवन ॥
ययांचे धर्म हे ऐसे आचरावे तसे तयें ॥ ४२ ॥
ब्रह्मचर्य तपो शौच संतोष भूतप्रेम नी ।
माझी भक्ती तशी सर्वां धर्म तो शुद्ध जाणणे ॥
पत्‍निला ऋतुकाळात गृहस्थे तृपिणे असे ॥ ४३ ॥
वर्ण आश्रम हा धर्म श्रद्धेने पाळिता तया ।
सर्वभूतीं दिसे मी नी प्रगाढ भक्ती लाभते ॥ ४४ ॥
सर्व लोकास स्वामी मी हेतुंचा परब्रह्म मी ।
नित्य वाढविता भक्ती मिळतो भक्त तो मला ॥ ४५ ॥
गृहस्थे पाळुनी धर्म करोनी चित्त शुद्ध ते ।
ऐश्वर्य रूप जाणोनी करणे प्राप्तची मला ॥ ४६ ॥
वर्णाश्रम असा धर्म सदाचारासि बोललो ।
अनुष्ठिता करा भक्ती सहजी मोक्ष लाभतो ॥ ४७ ॥
साधो ! जो पुसला प्रश्र उत्तरां दिधले पहा ।
धर्म पाळोनि ते भक्त कै ब्रह्म रूप पावती ॥ ४८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठरावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ १८ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP