[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
भगवान श्रीकृष्ण संगतात -
( अनुष्टुप )
इंद्रिय मन नी प्राण ठेवोनी वश योगि जो ।
अर्पुन चित्ति त्या ध्याता येती सिद्धी तया पुढे ॥ १ ॥
उद्धवजी म्हणाले -
कोणत्या धारणेने त्या मिळती सिद्धि कोणत्या ।
संख्या त्यांची किती आहे योग्यांना देशि कोणत्या ॥ २ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
परागामी असे योगी अठरा सिद्धि सांगती ।
प्रधान आठ त्या होती न्यून सत्त्वात पावती ॥ ३ ॥
अणिमा महिमा तैशी लघिमा या तनूतल्या ।
प्राप्ती ही इंद्रियाची नी प्राकाम्या स्वर्ग भोगिते ॥
कार्येच्छे चालवी तीते ईषिता सिद्धि नाम हे ॥ ४ ॥
विषयी जी अनासक्ती वशिता नाम हे तिचे ।
कामना चिंतिता देते सिद्धी कामावसायिता ॥
आठी माझ्याच अंगीच्या अंशाने देइ मी तयां ॥ ५ ॥
आणखी सिद्धि त्या ऐशा भूक तृष्णा न होय ती ।
दूरदृष्टी तसे ऐके मनोवेगेचि पोचणे ॥
इच्छिले रूप ते घेणे परकाया प्रवेश नी ॥ ६ ॥
इच्छामरण नी पाही अप्सरा देव क्रीडता ।
संकल्प सिद्धि नी आज्ञा दहा सत्त्वात लाभती ॥ ७ ॥
त्रिकालज्ञत्व नी तैसे निर्व्दंव्द चित्त जाणणे ।
महाभूते तसे वीष स्तंभीत करणे तसे ॥
पराभूत न होणे या सिद्धि योग्यास लाभती ॥ ८ ॥
योगाने लाभती ऐशा सिद्धि मी वदलो तुला।
कोणत्या धारणेने त्या लाभते ऐक सांगतो ॥ ९ ॥
तन्मात्रा देहची माझा तन्मात्रा ध्यानि चिंतिता ।
आणिमा सिद्धि ती लाभे अणुता प्राप्त होतसे ॥ १० ॥
महत्तत्वी प्रकाशे मी चित्त त्याच्यात लाविता ।
महिमा लाभते सिद्धि नभादी रूप तै मिळे ॥ ११ ॥
वायु आदी रुपा ध्याता लघिमा सिद्धि लाभते ।
काळाच्या परि ती सूक्ष्म हिच्याने रूप लाभते ॥ १२ ॥
अहंकार रुपामाजी योगी तो चित्त लविता ।
समस्त इंद्रियां जिंकी प्राप्तीने मज मेळि तो ॥ १३ ॥
महत्तत्वाभिमानी त्या लाविता चित्त आपुले ।
प्राकाम्या लाभते सिद्धि इच्छिले भोग लाभती ।१४ ॥
कालरूपास ध्यायी त्यां प्रेरणा शक्ती लाभते ।
ईशित्व नावची सिद्धी लाभते योगियास त्या ॥ १५ ॥
नारायण स्वरूपात लाविता चित्त आपुले ।
माझा स्वभाव त्यां लाभे वशिता सिद्धि ती मिळे ॥ १६ ॥
निर्गुणी ब्रह्म मी आहे तयात चित्त लाविता ।
कामावसायता सिद्धि लाभता पूर्ण तृप्ती हो ॥ १७ ॥
शुद्धधर्ममयी श्वेत द्वीपरूप स्मरे तया ॥
भूक तृष्णादि ऊर्मी त्या कधीच नच होत की ॥ १८ ॥
आकाश रूप ते माझे सर्वात्मा स्मरता तयां ।
दूरश्रवण सिद्धि ती लाभते साधका पहा ॥ १९ ॥
सूर्यासी नेत्र लावोनी मनी ध्याताच साधका ।
दूरदर्शन ती सिद्धि लाभते दूर पाहण्या ॥ २० ॥
मन देह नि प्राणाने संयुक्त मज चिंतिता ।
मनोजव अशी सिद्धि साधका साध्य होतसे ॥ २१ ॥
उपादान मने ध्याता देवतारूप ते तसे ।
पाहिजे रूप ते तैसे साधका लाभते पहा ॥ २२ ॥
प्राण वायूस धारोनी योगिया सिद्धि लाभता ।
परकायेमधेही तो जावोनी निवसू शके ॥ २३ ॥
गुदास टाच लावोनी क्रमाने प्राण तो वरी ।
ब्रह्मरंध्रात नेवोनी शरीर सोडणे घडे ॥ २४ ॥
शुद्ध सत्वमयी माझे मनात रूप ध्यायिता ।
सुंदरी सत्वरूपी त्या देवपत्न्याहि लाभती ॥ २५ ॥
सत्यसंकल्प रूपास लाविता चित्त योगि तो ।
संकल्प सिद्ध ते होती मनीं जे इच्छिले तसे ॥ २६ ॥
इशित्व नी वशित्वाचा स्वामी तो मीच की असे ।
माझे भाव स्मरोनीया टाकिता शब्द ना टळे ॥ २७ ॥
जयाचे शुद्ध ते चित्त जाहले मम भक्तिने ।
त्रिकालज्ञ असा होतो जाणितो सर्व तेथले ॥ २८ ॥
जळात राहती मासे जळाने मरती न ते ।
लाविता चित्त माझ्यात शैथिल्ये जळ त्रासिना ॥ २९ ॥
शंखचक्रादि शस्त्रांनी नी श्री वत्सादि चिन्ह ते ।
संपन्न चवर्यादी नी रूपा ध्याता अजेय हो ॥ ३० ॥
विचारी साधको सारे योगाने ध्याति ते मला ।
तयांना सर्वत्या सिद्धी लाभती वर्णिल्या तशा ॥ ३१ ॥
न दुर्लभ मुळी सिद्धी संयमे मज चिंतिता ।
सर्वच्या सर्व या सिद्धी प्रीय भक्तास लाभती ॥ ३२ ॥
साधको जाणणे हे की मज प्राप्तीस सिद्धि त्या ।
विघ्नची असती सर्व व्यर्थ वेळहि जातसे ॥ ३३ ॥
जन्म नी औषधी ध्याने मंत्राने सिद्धि लाभती ।
योगानेमिळती ज्या त्या मुक्तिना भजण्या विना ॥ ३४ ॥
सांख्ययोग नि धर्मादी साधने ज्ञानि सांगती ।
समस्त सिद्धिचा हेतू मीच की स्वामि नी प्रभू ॥ ३५ ॥
पंचभूतात भूतांची सत्ता ती नसते मुळी ।
तसा मी प्राणियां मध्ये आत्मा बाहेर एकची ॥ ३६ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंधरावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ १५ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥