समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय १६ वा

भगवंताच्या विभूतींचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

उद्धवजी म्हणाले - ( अनुष्टुप )
स्वयं ब्रह्म तुम्ही कृष्ण न अंत पार तो तुम्हा ।
अव्दितीय असे तुम्ही सृष्टिचे हेतुही तुम्ही ॥ १ ॥
राहता सान थोरात परी अज्ञ न जाणिती ।
पुरुषा ब्रह्मवेत्तेची तुम्हा युक्त उपासिती ॥ २ ॥
श्रेष्ठ ऋषि महर्षिंनी तुमच्या त्या विभूतिसी ।
भजोनी सिद्ध ते झाले सांगाव्या मज सर्व त्या ॥ ३ ॥
भूतात्मा तुम्हि तो लीला करिता गुप्त राहुनी ।
मायेने मोहिता सर्वां तेणे प्राणी न पाहतो ॥ ४ ॥
( इंद्रवज्रा )
स्वर्गादि पाताळ दिशा विदीशीं
     प्रभावयुक्तो विभुती अशा ज्या ।
कृपा करोनि मज सांगणे त्या
     तीर्थासतीर्थो पद वंदितो मी ॥ ५ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
( अनुष्टुप )
प्रश्नशिरोमणी ऐसे उद्धवा शोभता तुम्ही ।
युद्धात अर्जुने हाची प्रश्र तो पुसला असे ॥ ६ ॥
राज्यार्थ त्या कुटुंबीया मारणे निंद्य वाटता ।
मारितो मी मरती ते लक्षोनी पार्थ थांबला ॥ ७ ॥
युक्त्या रणात सांगोनी पार्था मी समजाविले ।
त्या वेळी अर्जुने ऐसा केला प्रश्र तुम्हापरी ॥ ८ ॥
आत्मा हितैषि सुहृदो नियंता प्राणियास मी ।
प्राणी पदार्थ रूपांचा हेतूही मीच तो असे ॥ ९ ॥
गतिमंतां गती मीची स्वाधीन काळ मीच तो ।
गणांचे मूळरूपो मी स्वाभाविक गुणोहि मी ॥ १० ॥
गुणांचा सूत्र मी आहे महत्तत्व महानिही ।
सूक्ष्म वस्तूत मी जीव चपळो मन तेहि मी ॥ ११ ॥
हिरण्यगर्भ वेदांचा मंत्रीं मात्रा त्रयोहि मी ।
अकार अक्षरां मध्ये छंदी गायत्रिही तसा ॥ १२ ॥
इंद्र मी देवतां मध्ये वसूत अग्नि श्रेष्ठ मी ।
आदित्यीं विष्णु मी तैसा रुद्रात नीललोहितो ॥ १३ ॥
भृगु ब्रह्मर्षि मध्ये मी मनु राजर्षियां मधे ।
देवर्षीत नारदो मी गाईत कामधेनु मी ॥ १४ ॥
सिद्धेशवरात कपिलो पक्षांमध्ये गरूड मी ।
प्रजापतीत दक्षो मी आर्यामा पितरां मध्ये ॥ १५ ॥
दैत्यीं प्रल्हाद तो भक्त नक्षत्रीं चंद्रमाच मी ।
सोमरसौषधीं मध्ये यक्षां मध्ये कुबेर मी ॥ १६ ॥
ऐरावतो गजेंद्रात जलचरीं वरूण तो।
तपीं मध्येहि सूर्यो मी मनुष्यात नृपो असे ॥ १७ ॥
उच्चैश्रवाच अश्वात धातुं मध्ये सुवर्ण मी ।
यम मी दंडधारीत सर्पांमध्येहि वासुकी ॥ १८ ॥
नागेंद्रात अनंतो मी मृगेंद्र श्वापदात मी ।
आश्रमी यति तो मीच वर्णात व्दिज मी असे ॥ १९ ॥
तीर्थस्रोतात गंगा मी समुद्र तो जलाशयीं ।
आयुधात धनुष्यो नी धनुर्धार्‍यात तो शिव ॥ २० ॥
निवासात सुमेरु नी गिरीमध्ये हिमालय ।
अश्वत्थो तरुच्या मध्ये धान्यात जव मी असे ॥ २१ ॥
पुरोहितीं वसिष्ठो मी वेदवेत्ती बृहस्पती ।
सेनापतीत स्कंदो मी सन्मार्गीत विरंचि मी ॥ २२ ॥
स्वाध्याययज्ञ मी यज्ञीं अहिंसा त्या व्रतां मधे ।
शुद्धकर्त्यात सूर्याग्नि जलात्मा वायु वाणि मी ॥ २३ ॥
योगामध्ये समाधी मी विजयात मंत्रनीति मी ।
कुशलात असे आत्मा ख्यातिवादीं विकल्प मी ॥ २४ ॥
स्त्रियांमध्ये शतरूपा स्वायंभूव नरात मी ।
नारायण मुनीं मध्ये ब्रह्मचार्‍यात संत चौ ॥ २५ ॥
धर्मात कर्मसंन्यास अभयी साधनात ते ।
आत्म्याचे अनुसंधान, अभिप्रायात मौन मी ॥
आणीक रूप ते एक जोडप्यात प्रजापती ॥ २६ ॥
जागृतात असे काल ऋतू मध्ये वसंत मी ।
मासात मार्गशीर्षो मी नक्षत्रात अभीजितो ॥ २७ ॥
कृष्णव्दैपायनो व्यासीं सत्ययुग युगात त्या ।
विवेकींच्या मधे मी ते देवलो असितो ऋषि ॥ २८ ॥
वासुदेवो भगवंती भक्तात तूच उद्धवा ।
किंपुरुषात हनुमान विद्याधरीं सुदर्शन ॥ २९ ॥
रत्‍नात पद्मरागो मी पद्मकोश सुसुंदरीं ।
तृणामध्ये कुशो, तूप गाईचे हविषा मधे ॥ ३० ॥
व्यापारात असे लक्ष्मी छळात द्यूत मी असे ।
तितिक्षूंची तितिक्षा मी सात्त्विकां गुण सत्त्व मी ॥ ३१ ॥
वैष्णवा वासुदेवो मी नऊ मूर्तीत तोच मी ।
उत्साह बळवंता मी नैष्कर्म्य वीरतेत मी ॥ ३२ ॥
विश्वावसूचि गंधर्वी पूर्वचित्तीच अप्सरीं ।
स्थिरता पर्वतीं मी नी पृथ्वीत गंध मी असे ॥ ३३ ॥
जळात रस मी तैसा तेजस्वीयात अग्नि मी ।
प्रभा तार्‍यात मी सर्व आकाशीं शब्द मी असे ॥ ३४ ॥
बळी मी व्दिजभक्तात वीरात अर्जुनो असे ।
जन्मस्थिति लयो सारे प्राण्यांचे मीच तो असे ॥ ३५ ॥
पायात चालणे शक्ती गुदात त्याग शक्ति ती ।
जननेंद्रियि मी मोद त्वचेत स्पर्श मी असे ॥
नेत्रात दृष्टि मी आहे जिव्हेत स्वादही तसा ।
कानात ऐकणे शक्ती नाकात श्वासशक्ति मी ॥ ३६ ॥
पंचभूते महत्तत्वे अव्यक्त व्यक्त यां परा ।
त्रैगुणाच्याहुनी दूर ब्रह्म मीच असे पहा ॥ ३७ ॥
तत्त्व लक्षण नी संख्या तयाचे रूप नी फळ ।
ईश्वरो जीव नी तैसे गुण नी गुणि मी असे ॥
सर्वात्मा सर्व मी आहे माझ्या वाचून कांहि ना ॥ ३८ ॥
अणु मी शकतो मोजू विभूती मोजणे किती ।
ब्रह्मांडे कोटि कोटी ते रचिले विभुती तशा ॥ ३९ ॥
तेज श्री कीर्ति ऐश्वर्य सौंदर्य लाज त्याग नी ।
भाग्य शौर्य तितिक्षा नी विज्ञाना अंश मी असे ॥ ४० ॥
संक्षेपे विभुती सर्व उद्धवा बोललो असे ।
मनोविकार हे सर्व परमार्थ न वाणि ती ॥ ४१ ॥
त्यजी विकल्प संकल्प वाणीही रोधिणे पहा ।
प्राणां वश करोनीया इंद्रिया रोधिणे तसे ॥
शांत बुद्धि करी सत्त्वे तदाचि मुक्ति लाभते ॥ ४२ ॥
बुद्धिने मन ना रोधी तयाचे व्रत नी तप ।
दानही क्षीण होते ते कच्च्या माठात जैं जल ॥ ४३ ॥
म्हणौनी प्रेमि भक्तांनी वाणी नी मन प्राण ते ।
रोधिता शेष ना राही करिता मम भक्ति ती ॥ ४४ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सोळावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ १६ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP