समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय १४ वा

भक्तियोगाचा महिमा व ध्यानविधिचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

उद्धवजीने विचारिले -
( अनुष्टुप )
श्रीकृष्णा ब्रह्मवादी ते कल्याणा कैक साधने ।
सांगती त्यातले श्रेष्ठ एक साधन सांगणे ॥ १ ॥ ॥
आत्ताच तुम्हि तो स्वामी भक्तियोग स्वतंत्र नी ।
बोधिला निरपेक्षोही जेणे तन्मयता मिळे ॥ २ ॥ ॥
श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
कालाने प्रलयी वेद लुप्त जै जाहले तदा ।
स्वसंकल्पेचि ब्रह्म्याला भागवद्धर्म बोललो ॥ ३ ॥
त्याने स्वायंभुवो पुत्रा मनुने भृग अंगिरा ।
मरिच पुलहो अत्री पुलस्त्य क्रतु यासही ॥ ४ ॥
देवता दानवो गुह्यक मनुष्य सिद्ध चारण ।
किंदेव किन्नरो नाग किंपुरूष नि राक्षसो ॥ ५ ॥
या सर्वे पूर्वजांचे हे ज्ञान मेळून घेतले ।
सत्त्व रज तमो भिन्न सर्वांच्या भिन्न वासना ॥ ६ ॥
बुद्धि वृत्तिहि त्या भिन्न अनेक भेद ते तसे ।
वेदवाणीस बुद्धीने स्वभावे अर्थ लाविले ॥ ७ ॥
परंपरा अशा कैक मनुष्ये घेतल्या पहा ।
वेदविरुद्ध कोणी ते पाखंडी जाहले तसे ॥ ८ ॥
सर्वांची बुद्धि मायेने मोहीत करुनी तशी ।
कर्म संस्कार रुचिने कल्याण पथ जाहले ॥ ९ ॥
धर्म काम यशो सत्य दम नी शमही तसे ।
ऐशवर्य त्याग स्वार्थाला श्रेष्ठ लाभचि सांगती ॥ १० ॥
कोणी यज्ञ तपा दाना व्रता नी नियमा यमा ।
सांगती पुरुषार्थो हा परी ते नाशवंतची ॥
अज्ञान सर्व ते आहे दोषाने शोकपूर्ण ते ॥ ११ ॥
निरपेक्ष असा मी तो आत्मारूपात प्रेरितो ।
सर्व ते मजला लाभे न लाभे विषयीं तयां ॥ १२ ॥
अकिंचन असे होती विजयी इंद्रिया वरी।
मला पाहोनि संतोषे तया आनंदि विश्व हे ॥ १३ ॥
( इंद्रवज्रा )
जो सोपवीती मज भार सारा
     तो सत्यलोका न स्वर्गास इच्छी ।
न सार्वभौ‍मा नि रसातळाही
     न सिद्धि मोक्षा मनि इच्छितो तो ॥ १४ ॥
( अनुष्टुप )
भक्ताच्या परि ना प्रीय ब्रह्मा शंकर रामही ।
अर्धांगी लक्षुमी तैसा आत्मा माझा न तो प्रिय ॥ १५ ॥
तल्लीन मज जे होती निरपेक्ष असेचि ते ।
न राग व्देषिती कोणा समान दृष्टि ठेविती ॥
पाठीशी मी अशा संतां हिंडोनी धूळ घेतसे ॥ १६ ॥
( इंद्रवज्रा )
निष्कांचनो नी ममता न देही
     जो रंगला माझिया प्रेम रंगी ।
जो वासनांना शमवोनि शांत
     त्या प्रेमळा हो परमात्म प्राप्ती ॥ १७ ॥
( अनुष्टुप )
जितेंद्रिय न हो भक्त प्रपंची बुडला तरी ।
प्रगल्भ शक्तिने माझ्या विषया जिंकितो पहा ॥ १८ ॥
अग्निच्या भडक्या मध्ये लाकडे खाक होति जै ।
भक्तही पापराशी तै जाळोनी टाकिती तशा ॥ १९ ॥
योग साधन नी ज्ञाने विज्ञाने तैचि उद्धवा ।
जप पाठ तपी ना ते सामर्थ्य भक्तिचे असे ॥ २० ॥
संतांचा प्रीय मी आत्मा भक्तिने बुद्ध होय मी ।
उपाये मिळतो मी या पापीही मुक्त होतसे ॥ २१ ॥
भक्तिवंचित चित्ताला दया सत्य नि धर्म तो।
तप युक्त अशी विद्या न करी ही पवित्र की ॥ २२ ॥
रोमहर्ष न हो तैसे चित्तगद्‍गद त्या विना ।
आनंदे अश्रु ना वाहे तयाचे शुद्ध चित्त कैं ॥ २३ ॥
( इंद्रवज्रा )
तो कंठ दाटे स्मरता मला नी
     न अश्रु थांबे क्षण एक तैसे ।
हासे नि गायी त्यजुनीच लाजे
     नाचे असा भक्तचि प्रीय माझा ॥ २४ ॥
जै अग्निमध्ये मळ हेम त्यागी
     तो शुद्ध रूपी स्थित होय तैसा ।
त्या वासनांना त्यजुनीच आत्मा
     भक्ति मधोनी मजला मिळे की ॥ २५ ॥
पवित्र लीला कथनात माझ्या
     चित्ताचिया तो मळहि जळे नी ।
वस्तुस्थितीचे मग ज्ञान होते
     जैं अंजनाने दिसते तळीचे ॥ २६ ॥
( अनुष्टुप )
ध्याता त्या विषया नित्य फसते चित्त त्यातची ।
स्मरता मजला त्याची लागते तंद्रि ती पहा ॥ २७ ॥
म्हणोनी सर्व ते त्यागा स्वप्न माझ्या विनाच ते ।
म्हणोनी मज चिंतावे एकाग्रे , शुद्ध होइजे ॥ २८ ॥
स्त्रियांनी त्यजिणे स्त्रीया पवित्र स्थान गाठुनी।
एकांती सावधानीने करावे मम चिंतन ॥ २९ ॥
स्त्रैणा स्त्रीसंगि नी तैसे लंपटा पासुनी नरा ।
क्लेश नी बंध जे लाभे न लाभे अन्य त्या गुणे ॥ ३० ॥
उद्धवजीने विचारिले -
कृपया सांगणे आम्हा कंजाक्षा श्यामसुंदरा ।
मुमुक्षू कोणत्या रूपे भावाने ध्यान साधितो ॥ ३१ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
सम आसन साधावे निवांत बसणे तिथे ।
हात पोटात ठेवावे दृष्टि ती नासिकाग्र हो ॥ ३२ ॥
पूरके कुंभके तैसे रेचके उलटेहि या ।
प्राणयामास साधोनी इंद्रिया जिंकिणे असे ॥ ३३ ॥
हृदयीं पद्म तंतू पै ॐकारा उचलोनि घ्या ।
घंटानादा परी ठेवा स्वरतार तुटो नये ॥ ३४ ॥
तीनवेळा प्रतिदिनी दहावेळा असाचि हा।
प्राणायाम करोनीया मासी प्राणास जिंकणे ॥ ३५ ॥
पुन्हा स्मरा सवासे ते फुलली अष्टही दळे।
कर्णिका पिवळी तैसी कोवळी ती मधोमध ॥ ३६ ॥
क्रमाने रवी चंद्राग्नी यांचा न्यास तयी करा ।
मंगलो रूप हे माझे अग्नीत स्मरणे पुन्हा ॥ ३७ ॥
सुडौल अंग हे माझे रोम रोमात शांति हो ।
प्रसन्न मुखही चांग आजानुबाहु चार या ॥
मान मनोहरी ऐसी गुलाबी स्निग्ध गाल हे ॥ ३८ ॥
मंद‍हास्य समकर्णी मकराकार कुंडले ।
घनःश्याम असा वर्ण झळके किरिटास तो ॥
शंख चक्र गदा पद्म वक्षी श्रीचिन्ह शोभते ॥ ३९ ॥
कौस्तुभो शोभतो कंठी टोप कंकण कर्धनी ।
बाजुबंद असे सारे स्वस्थानी शोभती पहा ॥ ४० ॥
सुंदरो अंग प्रत्यंग दृष्टीने वर्षितो कृपा ।
सुकुमार असे रूप प्रत्यंगी मन लाविणे ॥ ४१ ॥
चतुरे विषयातून इंद्रिया काढणे तसे ।
बुद्धीच्या त्या सहाय्याने एकेक अंग चिंतिणे ॥ ४२ ॥
ध्यायिता सर्व अंगाला चित्त ओढोनिया मुखी।
मंद हास्य असे माझे केवलो ध्यानि ठेविणे ॥ ४३ ॥
स्थिरावता तिथे चित्त नभात घालणे पुन्हा ।
नभाही त्यागिणे तैसे पुन्हा मद्रूप चिंतिणे ॥ ४४ ॥
स्थिरावता असे चित्त ज्योत ज्योतीत जै मिळे ।
तसे तो मज रूपा नी सर्वात्म्या जाणितो पहा ॥ ४५ ॥
स्थिरचित्ते रुपा माझ्या तीव्र ध्यानात योगि जो ।
चिंतितो ,भ्रम तो त्याचा नष्टोनी मुक्त होतसे ॥ ४६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौदावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ १४ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP