समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय १३ वा

हंसरुपाने सनकादिकास केलेल्या उपदेशाचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

भगवान श्रीकृष्ण म्हणातात -
( अनुष्टुप )
सत्त्व रज तमो हे तो आत्म्याचे गुण ते नव्हे ।
सत्त्वे रज तमा सारा सत्त्वाने सत्त्वा जिंकिणे ॥ १ ॥
वाढता सत्त्व तै लाभे भक्तिरूप स्वधर्म तो ।
सत्त्व ते सेविता नित्य वृत्ति भक्तास लाभते ॥ २ ॥
ज्या धर्मे वाढते सत्त्व श्रेष्ठ तो नष्टितो गुणा ।
नष्टता अन्य ते दोन अधर्म शीघ्र नष्टती ॥ ३ ॥
शास्त्र जल प्रजा देश काल कर्म नि जन्म नी ।
ध्यान मंत्र नि संस्कार गुणांना वर्धिती पहा ॥ ४ ॥
मानिती संत ते सत्त्व निंदिती तम तो असा ।
अपेक्षिती अशा सार्‍या वस्तू राजस मानणे ॥ ५ ॥
होईतो गुण निवृत्ती सत्त्वार्थ शास्त्र सेविणे ।
तयाने वाढतो धर्म धर्माने ज्ञान होतसे ॥ ६ ॥
वेळूचा पेटता अग्नि वना जाळोनि शांत हो ।
वैषम्ये जन्मतो देह ज्ञानाग्नी भस्म तो करी ॥ ७ ॥
उद्धवजीने विचारिले -
आपत्ति विषयां मध्ये मनुष्या ज्ञात ते असे ।
श्वान खरा परी दुःखा साहोनी भोगिती कसे ॥ ८ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
अज्ञाने भ्रमतो जीव अहंकार वसे तदा ।
सत्त्वप्रधान ते चित्त रजोव्याप्तचि होतसे ॥ ९ ॥
संकल्प नि विकल्पांची मालिका होतसे पुन्हा ।
विषया चिंतिते नित्य दुर्बुद्धीनेचि ते फसे ॥ १० ॥
अज्ञानां वश होवोनी कितेक काम तो करी ।
रजोगुणेचि मोहोनी दुःख लाभे नि ते करी ॥ ११ ॥
रजे तमे जरी विव्दान विक्षिप्त जाहला तरी ।
दोषीत विषया पाही आसक्ती त्या न हो कधी ॥ १२ ॥
प्राणायामे मला ध्यावे साधके शक्ति ज्यापरी ।
अपेशे उबगो ना हो उत्साहे लागणे पुन्हा ॥ १३ ॥
सनकादिक शिष्यांना योगाचे रूप बोधिले ।
साधके मन बांधोनी प्रत्यक्ष मज चिंतिणे ॥ १४ ॥
उद्धवजी म्हणाले -
सनकादिक संतांना बोधिता रूप केशवा ।
कोणते घेतले तुम्ही ते रूप जाणु इच्छितो ॥ १५ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
सनकादिक त्या संते पिता ब्रह्म्यास एकदा ।
योगाची पुसली सीमा अंताम सुक्ष्म जी असे ॥ १६ ॥
सनकादिक परमर्षिंनी विचारिले -
विषयी शिरते चित्त मिळती गुण त्यात ते ।
एकरूपचि ते होती काढावे वेगळे कसे ॥ १७ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
देवाधिदेव ते ब्रह्मा पुसता ध्यान लावुनी ।
प्रश्राचे मूळ ते त्यांना न कळे ,कर्मसाधका ॥ १८ ॥
प्रश्रांच्या उत्तरा देण्या श्रद्धेने चिंतिले मला ।
तदा मी हंसरूपाने समोर पातलो तदा ॥ १९ ॥
पाहता मजला संते समोर करुनी पिता ।
वंदिले मजला त्यांनी वदले कोण हो तुम्ही ॥ २० ॥
उद्धवा तत्त्वजिज्ञासू सनकादिक संत ते । ॥
पुसता बोललो त्यांना तेच मी सांगतो तुला ॥ २१ ॥
व्दिजांनो परमार्थो हा तत्त्वाच्याहुनि वेगळा ।
आत्म्या संबंधि हा प्रश्र युक्तिसंगतची नसे ॥
उत्तरा बोलणे जाता गुण आश्रय घेउ कां ? ॥ २२ ॥
देवता माणसे प्राणी अभिन्न परमार्थि ते ।
तुम्ही कोण ? असा प्रश्र वाणीचा खेळ व्यर्थतो ॥ २३ ॥
दृष्टिने मन वा शब्दे कळे ते सर्व मीच की ।
सिद्धांत तुम्हि हा माझा तत्वाने समजून घ्या ॥ २४ ॥
विषयाकार हे होते विचारे चित्त पुत्र हो ।
दोन्ही रूपे हि ते माझे आत्मा चित्ता न स्पर्शितो ॥ २५ ॥
विषयां सेविता नित्य आसक्त चित्त होतसे ।
चित्त नी विषयो यांसी आत्मा संबंधितो नसे ॥ २६ ॥
झोपता जागता स्वप्नी गुणांनी वृत्ति होत त्या ।
सच्चिदानंद ना भाव विलक्षणचि जीव तो ॥
अनुभवो असा युक्त सिद्धांत श्रुतिचा असे ॥ २७ ॥
बुद्धिच्या वृत्तिने बंध देती आत्म्यासि ते पहा ।
म्हणोनी तुरिया तत्वी राहोनी बंध तोडिणे ॥ २८ ॥
अहंकारेचि हे बंध आत्मा तो पूर्ण सत्यची ।
अखंड ज्ञान आनंदी जाणोनी शांत राहणे ॥ २९ ॥
’मी माझे’ त्यजिपर्यंत निवृत्ती नच लाभते ।
अज्ञानी असुनी जागा स्वप्नवत वागतो पहा ॥ ३० ॥
आत्म्याला नव ते रूप वर्ण आश्रम भेद ना ।
स्वर्गादी फळ ते त्याला मिथ्याचि स्वप्नवत असे ॥ ३१ ॥
( वसंततिलका )
जो जागृतीहि फळ भोगि क्षणीक ऐसे ।
     स्वप्नात भोगि सुख जे दिवसा दिसे ते ।
इंद्रीय बुद्धि मन यासिहि स्वामि आत्मा
     तो साक्षिभूत असला ययि सिद्ध होतो ॥ ३२ ॥
ऐसा विचार करुनी मनिच्या अवस्था
     जीवात कल्पित अशा नि असत्य तैशा ।
अंदाज बांधुनि असा गुरुच्या कडोनी
     माझे करा भजन गाठचि तोडुनीया ॥ ३३ ॥
हे विशव खेळ मनिचा अन नाशवंत
     ज्ञाता नि ज्ञेय असुनी मुळि एक भेद ।
भासे अनेक जणु हेचि अनातचक्र
     मायीकखेळ भ्रम हे हृदयो नि देह ॥ ३४ ॥
देहादि रूप त्यजुनी मनि मग्न व्हावे
     लागेल भूक त‍इ हा गमतो प्रपंच ।
मिथ्याचि भास म्हणुनी त्यजिणे तयास
     संस्कार मात्र परि ते गमती मनास ॥ ३५ ॥
झिंगे पिवोनि मदिरा नच भान राही
     ते वस्त्र कोठ पडले गळुनी कटीचे ।
सिद्धे तसेचि असणे तनुशी स्वताच्या
     प्रारब्ध जाणुनि फिरे तनु ती तयाची ॥ ३६ ॥
प्राणेंद्रिया समचि ही तनु दैवबद्ध
     ते कर्म वाट बघते तनुच्या कडोनी ।
जाणोनि वस्तु बघता त्यजि हा प्रपंच
     स्वप्नापरीच बघतो मग सृष्टि सारी ॥ ३७ ॥
( अनुष्टुप )
सांख्ययोग असा गुप्त विप्रांनो बोललो तुम्हा ।
स्वयं मी भगवान जाणा आलो मी उपदेशिण्या ॥ ३८ ॥
योग सांख्य ऋतो सत्य तेज श्री कीर्ति नी दम ।
अधिष्ठान असे मी या स्वयची परमो गति ॥ ३९ ॥
गुणातीत असा मी तो अपेक्षा नच ती मुळी ।
तरीही आवडे भक्त सर्वात्मा सत्त्व नित्य मी ॥ ४० ॥
असा संदेह संताचा शमिला उद्धवा प्रिय ।
भक्तिने पूजिले त्यांनी महिमा गायिली तदा ॥ ४१ ॥
पूजिता परमर्षींनी स्तवोनी श्रेष्ठ ते तसे ।
ब्रह्म्या समक्ष मी गुप्त होता स्वधामि पातलो ॥ ४२

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेरावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ १३ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP