समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय १२ वा

सत्संगाचा महिमा व कार्मत्यागाचा विधि -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

भगवान श्रीकृष्ण सांगतात -
( अनुष्टुप )
जगींच्या सर्व आसक्ती सत्संग नष्टितो पहा ।
न सांख्ये योग नी धर्मे स्वाध्याय तप त्याग ना ॥ १ ॥
ईष्टापूर्ती न दानाने न मी पावे तशा परी ।
वेद यज्ञ व्रते तीर्थे सत्संगा परि श्रेष्ठ ना ॥ २ ॥
सत्संगे सर्व यूगाशी दैत्य राक्षस नाग नी ।
सिद्ध चारण गंधर्वा माझी प्राप्तीच जाहली ॥ ३ ॥
मनुष्यीं वैश्य नी शूद्र स्त्रीया अंत्यज ही मला ।
मिळाले ते असोनीया रज नी तम वृत्तिचे ॥ ४ ॥
वृत्रासुर नि प्रल्हाद वृषपर्वा बळी तसा ।
बाण सुग्रीव हनुमान जांबवान मयदानव ॥ ५ ॥
जटायु गज नी व्याध कुब्जा नी व्रजगोपिका ।
यज्ञपत्‍न्यादि सारेच सत्संगे मिळले तदा ॥ ६ ॥
श्रुति ना वाचिल्या त्यांनी न पूजा विधीपूर्वक ।
वज्र तप न ते केले सत्संगे मिळले मला ॥ ७ ॥
गोपिका गाइ नी वृक्ष हरीण पशु नागही ।
साधनी सर्वथा मूढ भजुनी धन्य जाहले ॥ ८ ॥
जे न योगे न सांख्याने यज्ञे दान तपे व्रते ।
त्यागानेहि न लाभे ते सत्संगे मिळले मला ॥ ९ ॥
( इंद्रवज्रा )
बळी सवे त्या मथुरेत आलो
     अक्रूर आले मज घेउनीया ।
प्रेमात गोपी बहु रंगलेल्या
     व्याकूळल्या त्या मम रूप ध्याता ॥ १० ॥
मी प्रीय त्यांचा मुळि एक आहे
     वृंदावनी त्या क्रिडल्या अशा की ।
कित्येक रात्री सरल्या क्षणात
     आता तयांना निशि कल्प वाटे ॥ ११ ॥
समाधि योगे ऋषि स्थीरतात
     नद्या समुद्री रुप अर्पिती तै ।
गोपी मिळाल्या मज प्रेम भावे
     त्या भौतिकाची नच शुद्ध त्यांना ॥ १२ ॥
( अनुष्टुप )
गोपींना नच ते ज्ञान जार भावचि अर्पिती ।
हजारो अबला तैशा परब्रह्मास पावल्या ॥ १३ ॥
श्रुतिस्मृति विधी सर्व प्रवृत्ति नी निवृत्ति ही ।
विषया त्यागुनी सर्व जीवात पाहणे मला ॥ १४ ॥
एकरूपचि त्या सर्वीं पाहणे एकटा मला ।
शरणी मजला येता होशील निर्भयो तसा ॥ १५ ॥
उद्धवजी म्हणाले -
योग योगेश्वरा देवा ऐकला उपदेश हा ।
माझा संदेह ना जाय कृपया सांगणे मला ॥
पाळावा तो स्वधर्मो की, त्यजुनी भजणे तुला ॥ १६ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
( इंद्रवज्रा )
आत्मा प्रवेशे मुळचक्रि जेंव्हा
     तैं प्राणघोषो मग नाभि चक्री ।
पश्यंति शब्दे मनरूप होतो
     नी माध्यमानेहि विशुद्ध चक्रीं ।
वाणी स्वरूपे मग व्यक्त होतो
     नी वैखरी स्थूलहि रूप घेतो ॥ १७ ॥
त्या वीजरूपे गगनात अग्नी
     काष्ठात अग्नी ठिणगी रुपाने ।
तैं शद्धब्रह्मो रुप घेउनीया
     वाणी क्रमाने प्रगटोनि येतो ॥ १८ ॥
तसेच हाती अन पायि तैसे
     शिश्नी गुदी नासिक नेत्र कर्णी ।
मने नि बुद्ध्ये कळणे तसेची
     ते कर्म सारे मम शक्ति होय ॥ १९ ॥
ब्रह्मांड निर्मी हरि तोहि मीच
     अव्यक्त होते रुप ते पुराणे ।
बीजातुनी ये बहुथोर वृक्ष
     काळे तसे रूप अनंत होती ॥ २० ॥
पटीं जसे सूतचि पुर्ण राही
     तसेचि विश्वो परमात्मारूपी ।
संसारवृक्षो अतिही पुराणा
     तो कर्मरूपी फळ मोक्ष त्याचे ॥ २१ ॥
दो बीज त्याचे शतमूळ तैसे
     ते तीन खोडे अन पाच फांद्या ।
बारा डहाळ्या त‍इ एक खोपा
     नी त्यात ते दो वसतात पक्षी ।
त्या तीन साली फळ दो परीचे
     विशाल विस्तार नभाहुनीही ॥ २२ ॥
त्या शद्ध स्पर्शा रस या फळाला
     गुंतोनि जाता फसला म्हणावा ।
ते हंस होती विषयीं विरक्त
     रहस्य माझे गुरुला पुसावे ॥ २३ ॥
अनन्य भावे गुरुच्या पुढेच
     ते ज्ञान शस्त्रो उजळोनि घ्यावे ।
नी जीवभावे समुळेचि कापा
     ते त्यागुनीही स्वरुपी निवावे ॥ २४ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बारावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ १२ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP