समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ११ वा

बद्ध,मुक्त आणि भक्तांची लक्षणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
( अनुष्टुप्‌ )
बद्ध वा मुक्त तो आत्मा व्याख्या या व्यावहारिक ।
गुणमाया मुळाशी त्या न माझे बंध मोक्ष ते ॥ १ ॥
भोवरा बुद्धिचे स्वप्न वास्तवी तरि भासते ।
शोक मोह सुख दुःख मायाचि देह मृत्युही ॥ २ ॥
आत्मविद्येत मुक्ती नी अविद्येनेच बंध ते ।
मायेचे रूप ते दोन्ही तयात तथ्य ते नसे ॥ ३ ॥
मी तसा एकची धर्म शोक आनंदरुपि तो ।
जयांना भासतो ते हे बद्धमुक्तेचि जीव ते ॥ ४ ॥
चतुरा ! जीव तो एक अंश रोपात कल्पिला ।
ज्ञानी मुक्त अज्ञ बद्धो प्राचीनऽज्ञान बंधन ॥ ५ ॥
( इंद्रवजा )

जीवेश्वरो राहति एक देही
     ते मित्र दोघे नच दूर जाती ।
जीवास लाभे सुख दुःख सारे
     नी ईश्वरो तो मुळि साक्षिमात्र ॥ ६ ॥
भोक्ता न ईशो परि विश्व जाणी
     भोक्ताचि जीवो परि नेणता तो ।
अज्ञानि जीवो नित बद्ध राही
     विद्यारुपी ईशचि मुक्त होय ॥ ७ ॥
( अनुष्टुप्‌ )
ज्ञानी मुक्त तसे नित्य स्वप्नवत्‌ मानिती जगा ।
अज्ञाने बद्धची राही जीव ते सत्य मानुनी ॥ ८ ॥
सेविती गुण इंद्रिय न आत्मा सेवितो तया ।
म्हणोनी निर्विकारी तो अभिमान नसे तया ॥ ९ ॥
प्रारब्धाधीन हा देह आचरे गुण प्रेरिता ।
अज्ञानी स्वय कर्ता तो मानिता बद्ध होतसे ॥ १० ॥
विरक्त असती ज्ञानी झोपणे फिरणे तसे ।
खाणे नी ऐकणे क्रिया गुण कर्ताचि मानिती ॥ ११ ॥
कर्ता भोक्ता गुणो होती ऐसे विद्वान जाणुनी ।
वासनेच्या फळामध्ये बद्ध राहती कधी ॥ १२ ॥
आकाशा नच तो स्पर्श ओलावा नच भानुला ।
वायुला गंध ना स्पर्शी निसंग असतो तसा ॥
खड्‌ग ते शुद्ध बुद्धीचे असंगे घासिता पुन्हा ।
तीव्र होवोनि संदेहा कापोनी फेकिते पहा ॥
स्वप्नीचा उठता तैसा भेदमुक्तची होतसे ॥ १३ ॥
जयांची मन बुद्धी नी प्राण इंद्रीय सर्व ते ।
चालती विण संकल्प मुक्त तो देहिं राहता ॥ १४ ॥
मुक्त तत्वज्ञ त्या संता दुष्टाने त्रासिता तसे ।
दैवाने लाभता पूजा न दुःख सुख पावती ॥ १५ ॥
प्रशंसी वा न निंदी तो न कोणा झिडकारितो ।
बर्‍या वाईट त्या कर्मी संत ते समदर्शिच ॥ १६ ॥
जीवन्मुक्त असे संत बरे वाईट कर्म ते ।
करिती ना वदती ना आनंदी रमती सदा ॥ १७ ॥
शब्दब्रह्मात निष्णात पराज्ञानात शून्य जो ।
व्यर्थ ते श्रम जाणावे पाळावी वांझ गाय जै ॥ १८ ॥
( इंद्रवज्रा )
वांझोटि गो नी व्यभिचारि पत्‍नी
     देहो परधीन नि पुत्र दुष्ट ।
वित्ती न दानो नच नाम कंठी
     हे पाळिता दुःखचि दुःख लाभे ॥ १९ ॥
स्थिती लयो वाढ अशाहि लीला
     हे रामकृष्णो अवतार माझे ।
न गायि वाणी समजाचि वंध्या
     मुमुक्षुने कीर्तन तेच गावे ॥ २० ॥
( अनुष्टुप्‌ )
आत्मा जिज्ञासु वृत्तीने आत्म्याचा भ्रम सारुनी ।
मला सर्वात्मि पाहोनी संसारी राहणे पहा ॥ २१ ॥
परब्रह्मात हे ऐसे न स्थिरे जर चित्त ते ।
निरपेक्ष करा कर्म माझ्या साठीच सर्व ते ॥ २२ ॥
कथा पवित्र माझ्या त्या श्रद्धेने ऐकणे पहा ।
स्मराव्या गायनी गाव्या नाट्याने दाविणे तशा ॥ २३ ॥
घेवोनी आश्रयो माझा सेवावे पुरुषार्थ ते ।
असा जो वागतो त्याची अनन्य भक्ति पावते ॥ २४ ॥
सत्संगे लाभते भक्ती तेणे सन्निद्ध पावतों ।
हृदयो शुद्ध होवोनि वास्तवी रूप लाभते ॥ २५ ॥
उद्धवजीने विचारिले-
गाती संत तुम्हा कीर्ती संतांची लक्षणे कशी । ॥
करावी भक्ती ती कैसी संतांना आवडे जशी ॥ २६
जगाचा स्वामी तू देवा श्रेष्ठ ब्रह्यादिच्या हुनी ।
नम्र मी भक्तची आहे रहस्य सांगणे द्वय ॥ २७ ॥
चिदाकाश असे ब्रह्म पुरुषो प्रकृतीपरा ।
असा तू स्वय इच्छेने देह हा धारिला जसा ॥ २८ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले-
कॄपामूर्ती नि निर्वैर प्रसन्ने दुःख साहि जो ।
उपकारी समदर्शी सत्यसार नि शुद्ध जो ॥ २९ ॥
इच्छेने नच जो दोषी संयमी नी पवित्र जो ।
विसंबे मजसी भक्त सदा संलग्न चिंतनी ॥ ३० ॥
अप्रमादी नि गंभीर धैर्यवान्‌ षड्‌गुणात त्या ।
न सन्मान मुळी इच्छी दुजां सन्मान देतसे ॥
नैपुण्य मम गोष्टीशी निर्वैर जगमित्र जो ।
हृदयी करणापूर्ण तया मी कळतो पहा ॥ ३१ ॥
वेदशास्त्रीं मनुष्यांना धर्म तो मीच बोधिला ।
विक्षेप भजनी त्यागी संत तो सर्वश्रेष्ठ की ॥ ३२ ॥
केवढा कोण मी कैसा त्यजोनी भाव सर्व हे ।
अनन्य भजने गातो भक्त तो सर्व श्रेष्ठ की ॥ ३३ ॥
माझी मूर्ती नि भक्तांचे स्पर्श दर्शन नी स्तुती ।
सेवा करोनिया ऐसी कार्याची कीर्तने करा ॥ ३४ ॥
श्रद्धेने ऐकण्या लीला मला ध्यावे निरंतर ।
समर्पित मला व्हावे दास्ये आत्म निवेदन ॥ ३५ ॥
चर्चावे जन्म नी कर्म उत्सवो करणे तसे ।
संगीत नृत्य वाद्यांनी समाज मंदिरी करा ॥ ३६ ॥
यात्रेसी काढण्या दिंड्या माझ्या क्षेत्रासि येउनी ।
वेदिका मंत्र ते गावे करावे व्रतही असे ॥ ३७ ॥
मंदिरी स्थापिणे मूर्ती समाज मेळुनि पहा ।
माझ्या बागा क्रिडा स्थाने मंदिरे नगरे करा ॥ ३८ ॥
श्रद्धे निष्कपटे भावे मंदिरा झाडणे तसे ।
सडे संमार्जने व्हावी रांगोळ्या काढणे पहा ॥ ३९ ॥
दंभ गर्व नसावा तो दिंडोरा नच तो पिटा ।
खडावा दूरचि ठेवा दीपीं कर्म न साधिणे ॥
अन्य देवांचिया वस्तू मजला अर्पिणे नको ॥ ४० ॥
अत्यंत प्रीय त्या वस्तू मजला अर्पिणे पहा ।
अर्पिता वस्तु त्या देती अनंत फळ श्रेष्ठ ते ॥ ४१ ॥
सोर्य अग्नि द्विजो गाई वैष्णवो नभ वायु नी ।
पृथिवी जल नी प्राणी समस्त पूज्य स्थान ते ॥ ४२ ॥
तिन्हिही वेदमंत्राने सूर्यात पूजिणे मला ।
हवने अग्निच्या द्वारे आतिथ्ये द्विज पूजिणे ॥
हिरव्या गवते गाईमध्ये ते मज पूजिणे ॥ ४३ ॥
सत्कारे वैष्णवां मध्ये ध्यानाने त्या नभात नी ।
वायू नी जल या मध्ये फुलांनी पूजिणे मला ॥ ४४ ॥
मंत्रे न्यास करोनिया वेदीत भोग अर्पुनी ।
सर्व प्राण्यांमध्ये पूजा मज, मी स्थित सर्वि त्यां ॥ ४५ ॥
शंख चक्र गदा पद्म घेवोनी स्थित मी तई ।
वसलो करणे ध्यान एकाग्रे पूजिणे असे ॥ ४६ ॥
एकाग्रे करणे यज्ञ किंवा कूपहि खोदणे ।
सेविता साधु नी संत माझे रूप कळे पहा ॥ ४७ ॥
सत्संग भक्तियोगाच्या विना ना तरणे भवीं ।
आश्रयो मानिती संत तेथ मी नित्य राहतो ॥ ४८ ॥
गोपनीय अशी आता गोष्ट मी तुज सांगतो ।
हितैषी सेवको प्रेमी श्रोताही अससी तुची ॥ ४९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अकरावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ ११ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP