अवधूतोपाख्यान क्रौंच ते भिंगोरी पर्यंत सात गुरूंची कथा -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
अवधूत दत्तात्रेयजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
प्रियवस्तुपरिग्रहो दुःखाचे कारणो नृपा ।
अनंत सुख ते लाभे विद्वानें त्यजिता तया ॥ १ ॥
एका क्रौंचा मिळे मांस न मिळे बलवान् दुज्यां ।
बळी तो मारिता चोंचे त्यजिता पहिला सुखी ॥ २ ॥
मला मानापमानो ना चिंतामूळ न ते घर ।
क्रीडतो रमतो आत्मी बाळाचे शिकलो असे ॥ ३ ॥
निश्चिंत दोन ते विश्वीं भोळे-भाळेचि बाळ नी ।
गुणातीत असे थोर आनंदी मग्न राहती ॥ ४ ॥
कुमारिका कुणी एक पाहण्या लोक पातले ।
नव्हते गेहिं ते थोर केले आतिथ्य ते तिने ॥ ५ ॥
भोजनां कांडिले धान्य एकांती बसुनी तिने ।
कंकणे ती करातील मोठ्याने वाजु लागले ॥ ६ ॥
आवाज निंद्य वाटोनी कुमारी लाजली बहू ।
दो दो ठेवोनिया हाती अन्य ते काढिले तिने ॥ ७ ॥
दो दोही वाजती तेंव्हा काढिले एक एक ते ।
एकेक राहता हाती आवाज नच जाहला ॥ ८ ॥
लोकांचे वागणे सर्व पाहण्या फिरता जगीं ।
हिंडता पोचलो तेथे तिचे मी शिकलो असे ॥ ९ ॥
लोकात राहता नित्य कलह पेटतो पुन्हा ।
दोघेही बोलती व्यर्थ एकटे हिंडतो तदा ॥ १० ॥
आसनीं श्वास जिंकावे वैराग्यें मन बांधिणे ।
सावधानेचि लक्षावे शिकलो बाणकर्मिचे ॥ ११ ॥
( इंद्रवज्रा )
पदासि होते जधि स्थीर चित्त
त्या वासनांची सरतेच धूळ ।
वृद्धीत सत्वो, रज नी तमो तो
तै शांत होतो जइ अग्नि संपे ॥ १२ ॥
चित्तात होता स्थिर या परी तैं
न भान राही मग आत बाह्य ।
तो बाण कर्मी दिसला स्वकर्मी
न भान त्याला नृप थोर जाता ॥ १३ ॥
(अनुष्टुप् )
सापाचे शिकलो हे की संन्यासी एकटा फिरो ।
शिष्य नी मठ ना घ्यावे प्रमाद नच तो घडो ॥
न थांबो एकजागेसी अत्यल्प बोलणे तसे ।
सहाय्य ते न मेळावे गुहेत राहणे पहा ॥ १४ ॥
अनित्य शरिरासाठी घर बांधावयास ते ।
व्यर्थची पडतो त्रास नसते झंझटो पहा ॥
सापा परी दुज्या गेही घुसोनी शांत राहणे ॥ १५ ॥
एक नारायणो देव माया ती पूर्वकल्पि जो ।
रचितो सर्व सृष्टी नी कल्पांती एकटा उरे ॥ १६ ॥
अद्वितीय असा शून्य शेषरूपेचि राहतो ।
सर्व आश्रय तो एक स्वयाधारचि जो असा ॥
प्रकृती पुरुषाचा या दोहोचा ही नियामक ॥ १७ ॥
कार्यकारण तो एक प्रभावे कालशक्तिने ।
गुण सत्वादि निर्मोनी कैवल्यरूपि एकटा ॥ १८ ॥
विराजमानची राही अद्वितीय असाचि की ।
आनंदघन तो मुक्त पहिली अभिव्यक्ति तो ॥ १९ ॥
महत्तत्त्व असोनिया सृष्टीत भरला असे ।
म्हणोनी जीव या जन्म-मृत्यूच्या फेरि सापडे ॥ २० ॥
जाळे निर्मी गिळी अंती कोळीकिट जसा पहा ।
ईश तै निर्मितो सॄष्टी मिटवी आपुल्यात की ॥ २१ ॥
भिंगोरीचे शिक मी की भये द्वेषे नि जाणता ।
करिता चित्त एकाग्र वस्तुरूप मिळे तसे ॥ २२ ॥
अळिला कोंडिते भृंगी भयाने अळि चिंतिते ।
तद्रूप घडतो देह शरीर पालटे पहा ॥ २३ ॥
एवढ्या गुरुचे मी ते शिकलो नृपती पहा ।
स्वदेहा कडुनी जे जे शिकलो तेहि सांगतो ॥ २४ ॥
( वसंततिलका )
दोन्हीहि ते मम गुरूच विवेक हेतू
वैराग्यही शिकविते जगणे नि मृत्यू ।
हे साधने परि असे मिळण्यास तत्व
हा नाशवंत म्हणुनी फिरतो निसंग ॥ २५ ॥
जाया नि पुत्र पशु भृत्य नि आप्त वर्गा
पोसावयास नित जीवचि कष्टतो की ।
आयू सरोनि मरतो दुसर्याच साठी
वृक्षापरी उगवितो अति दुःखबीज ॥ २६ ॥
ओढीति त्या सवति जै नवर्यास भोगा
तैसेचि कान जननेंद्रिय नाक डोळे ।
नी जीभही तनुस ओढितसेचि भोग
ते गान भोग श्रवणा बघण्या रसादी ॥ २७ ॥
पक्षी नि वृक्ष किटको जलप्राणि योनी
निर्मोनिया हरिसी ना मुळि तोष झाला ।
माणूस निर्मि हरि तैं अति बुद्धियुक्ते
ज्या ब्रह्मज्ञान कळते मग तोषला तो ॥ २८ ॥
ही माणुसी तनु तशी अति दुर्लभा की ।
तैं मोक्षकार्य करणे अतिशीघ्र जीवे ॥
भंगूर देह समजा, विषयार्थ भोग ।
कोण्याहि योनि मिळती नच मेळवावे ॥ २९ ॥
( अनुष्टुप् )
असे वैराग्य ते झाले हृदयीं दीप पेटले ।
नाहंकार न आसक्ती आनंदे मुक्त हिंडतो ॥ ३० ॥
यथेष्ट बोध ना लाभे एकट्या गुरुच्या कडे ।
बुद्धिने शोधिणे अन्य, ब्रह्मा गाती ऋषीश्वर ॥ ३१ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले-
गंभीरबुद्धि दत्ताने यदुरायासि बोधिले ।
वंदिता पूजिता गेले प्रसन्न दत्त तेथुनी ॥ ३२ ॥
आमचे पूर्वजो राजे यदू तो बोध ऐकता ।
विरक्त जाहले चित्ती समदर्शी तसेचि ते ॥ ३३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ ९ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥