समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ८ वा

अवधूतोपाख्यान-अजगर ते पिंगलेपर्यन्त नऊ गुरुची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अवधूत दत्तात्रेय सांगतात-
( अनुष्टुप्‌ )
इच्छा न करिती प्राणी न रोधिती तयास ते ।
पूर्वकर्मामुळे स्वर्ग नरक मिळतो पहा ॥
बुद्धिवंते प्रयत्‍नो वा इच्छा तैशा करू नये ॥ १ ॥
न मागे अथवा नेच्छी मिळता खाय जो सुखे ।
अजगरापरी वॄत्ती निर्वाहा असणे बरी ॥ २ ॥
न मिळे राहणे तेंव्हा प्रारब्धे तोष मानणे ।
उपासी राहणे होता संतोष मानणे तसा ॥ ३
मन इंद्रिय नी देह बळे निश्चेष्ट राहणे । ॥
पडावे नसुनी निद्रा सापाचे शिकलो पहा ॥ ४
समुद्रे शिकवीले ते गंभीर्य नि प्रसन्नता । ॥
अथांगहि असोनीया निमीत्ते क्षोभ ना भरो ॥
भरती लाट ना व्हावी प्रशांत नित राहणे ॥ ।५ ॥
न वाढे पावसाळ्यात उन्हाने नच आटतो ।
प्रपंची हर्ष वा दुःख न व्हावे भक्त राजसा ॥ ६ ॥
अग्नीत पडतो लोभे पतंग वश होऊनी ।
स्त्रियांना पाहता लोक सत्यनाशचि पावती ॥ ७ ॥
( इंद्रवज्रा )
जो कामिनी कांचन वस्त्र यांच्या
     मायेत गुंते फसतो पहा तो ।
लाचार होती मन वृत्ति सार्‍या
     नी तो पतंगापरि नष्ट होतो ॥ ८ ॥
( अनुष्टुप्‌ )
थोडे थोडेचि मागोनि निर्वाह करणे तसा ।
संन्याशाने गृहस्थांना न द्यावा त्रास तो कधी ॥
भुंग्याच्या परि ते व्हावे पुष्पगंधास मेळिणे ॥ ९ ॥
सान थोर फुलां मध्ये भृंग तो मधु घेतसे ।
चतुरे सर्व शास्त्राचा रस तो चाखणे पहा ॥ १०
मधमाशांकडोनिया शिकलो संग्रहो नको ।
फसती मधमाशा त्या संन्याश्या संग्रहो नको ॥ ११
संन्याशाने शिकावे की मुळीच संग्रहो नको ।
करिता संग्रहो जायी जीवही तो तया सवे ॥ १२
हत्ती हत्तिणिसी मोहे फसे त्याचे कडोनिया ।
शिकलो लाकडाच्याही स्त्रियेस नच स्पर्शिणे ॥ १३
विवेकी पुरुषाने स्त्री भोगरूप बघू नये ।
स्वीकारिती बलवंत मारिती त्यास ठार की ॥ १४ ॥
मध गोळा करी भिल्ल तयाचे शिकलो असे ।
संग्रहो करिता द्रव्यां भोगिती दुसरेच की ॥ १५ ॥
धमहारी मधा नेई माश्यांनी जो न सेविला ।
कष्टाने मिळवी जीव संन्याशी द्विज भक्षिती ॥ १६ ॥
संन्याशाने न ऐकावे विषयी गीत ते कधी ।
व्याधगीतास ऐकोनी हरीण फसतो पहा ॥ १७ ॥
स्त्रियांच्या नाचगाण्याने पाहता वश होउनी ।
बाहुले जाहला त्यांचे ऋष्यशृंग भृगोसुत ॥ १८ ॥
थोड्याशा अमिषे मासा गळां लागोनिया मरे ।
जिव्हेच्या वशि जो जाय तया मृत्यूचि तो पहा ॥ १९ ॥
जिव्हेला बांधिता शीघ्र वश ती अन्य इंद्रिये ।
तिला न आवरीता तो उपास व्यर्थची असे ॥ २० ॥
इंद्रिया निग्रहो होता सोडिता मोकळी जिव्हा ।
बलवान्‌ घडती सर्व विषयो तेचि की पुन्हा ॥ २१ ॥
मिथिला नगरी मध्ये पूर्वी नामक पिंगला ।
होती वेश्या तिचे कांही शिकलो तेहि सांगतो ॥ २२ ॥
स्वेच्छाचारी रुपवती एकदा सजली बहू ।
पुरुषा मेळवायाला दारात खूप थांबली ॥ २३ ॥
न इच्छि पुरुषा ती तो धनाची कामना धरी ।
येती जाती तिला भासे धनकू ग्राहको तसा ॥ २४ ॥
रस्त्याने चालती जे ते सर्वची धन वाटती ।
वाटले खूप ते द्रव्य देता जाईल आपणा ॥ २५ ॥
दुराशा वाढली खूप दारात खूप थांबली ।
उडाली झोप ती सारी आत बाहेर होतसे ॥
प्रकार जाहला ऐसा अर्धी रात्र सरे तशी ॥ २६ ॥
वाईट धन इच्छा ती धनाची वाट पाहता ।
सुकोनी व्याकुळा झाली वॄत्तीं वैराग्य जाहले ॥ २७ ॥
वैराग्य जाहले तेंव्हा तिने जे गीत गायिले ।
सांगतो तुजसी राजा वैराग्यशास्त्रची असे ॥
आशेच्या सर्व त्या गाठी वैराग्यें तुटती पहा ॥ २८ ॥
जया वैराग्य ना झाले जो ना उबगला यया ।
जो ना इच्छि कधी मुक्ति अज्ञानी मोह ना त्यजी ॥ २९ ॥
पिंगलेने हे गीत गायिले -
हाय मोहित मी झाले मी त्या क्षुद्रांसि इच्छिले ।
सुखाची लालसा केली मूर्ख मी दुःखची मिळे ॥ ३० ॥
( इंद्रवज्रा )
स्वामी वसे तो हृदयात माझ्या
     तो देइ साचे परमार्थ द्रव्य ।
अनित्य विश्वो नित स्वामी तोची
     मी तुच्छ जीवा उगि सेविले की ॥ ३१ ॥
पोटार्थ झाले अतिहीन वेश्या
     देहास क्लेशो अन त्रास झाला ।
मी देह माझा विकला पहा की
     त्या निंद्य जीवे मज भोगिले की ।
मी एवढी मूर्ख कशी पहा हो
     मी इच्छिले द्रव्य रतीसुखाते ॥ ३२ ॥
हा देह तंबू अन अस्थि खांब
     चर्मे नि रोमे परि झाकलेला ।
याला नऊ द्वार तयातुनी ते
     वाहे धनो जे मल-मूत्र याचे ।
माझ्या विना ती जगि कोण अन्य
     या स्थूल देहा प्रिय मानिते ती ॥ ३३ ॥
( अनुष्टुप्‌ )
विदेह नगरीमध्ये सर्वात दुष्ट मूर्ख मी ।
परमात्मा त्यजोनीया पुरुषा अभिलाषिते ॥ ३४ ॥
हृदयस्थ प्रभो स्वामी आत्मा नी सुहृदो तुची ।
विकिते मजला मीच क्रीडते मी रमे परी ॥ ३५ ॥
मूर्ख चित्ता मला सांग सुख त्या पुरुषें मला ।
किती ते दिधले तैसे जगी सर्वचि मर्त्य की ॥ ३६ ॥
पावला शुभ कर्माने अवश्य भगवान्‌ हरी ।
मला वैराग्य हे झाले लाभले सुख निश्चित ॥ ३७ ॥
अभागी असते मी तो दुःख वैराग्य ना घडे ।
वैराग्ये बंध तोडावे शांती लाभास मेळिणे ॥ ३८ ॥
उपकार तयाचा मी नमस्कारे स्विकारिते ।
भोगांची सोडते आशा भजते हरि ईश्वर ॥ ३९ ॥
आता जे मिळते तेची भक्षील तोष मानुनी
आत्मारूप प्रभूसी मी रमले नित्यची तशी ॥ ४० ॥
जीव संसारकूपात पडला अंध जाहला ।
धरिला काळसर्पाने हरीच सोडवू शके ॥ ४१ ॥
विरक्त विषयीं जीव रक्षितो स्वयची स्वया ।
सावधाने पहावे तो काळाने ग्रासिले जगा ॥ ४२ ॥
अवधूत दत्तात्रेयजी सांगतात -
राजा रे ! पिंगला वेश्ये दुराशा त्यजिली मनीं ।
शांतभाव धरोनीया शेजेसी झोपली पहा ॥ ४३ ॥
आशाचि दुःख ते सत्य निराशा सुख श्रेष्ठ ते ।
त्यजिता पिंगला आशा सुखाने झोपली पुन्हा ॥ ४४ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ ११ ॥ ८ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP