समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ७ वा

अवधूतो पाख्यान पृथ्वी ते कबूतरा पर्यंत आठ गुरुंची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

भगवान्‌ श्रीकृष्ण म्हणाले -
( अनुष्टुप्‌ )
उद्धवा रे महाभागा इच्छिशी तेच इच्छि मी ।
ब्रह्मादी इच्छिती देव मी स्वधामास पातणे ॥ १ ॥
पृथ्वीसी देवकार्यो ते केले मी सर्व ते पुरे ।
ब्रह्म्याने प्रार्थिता जन्म घेतला मी नि रामने ॥ २ ॥
जळाले द्विजशापाने युद्धात मरतील हे ।
बुडवील समुद्रो हा सातव्या दिनि द्वारका ॥ ३ ॥
जाताचि त्या स्वधामा मी संपेल सर्व मंगल ।
कलीचा बोलबाला तो पसरेल धरेस या ॥ ४ ॥
त्यजिता पृथिवी मी तैं न राहा येथ साधु तू ।
अधर्मी रुचि वाढेल लोकांची या कलीत ती ॥ ५ ॥
स्वजनी तोडणे स्नेह अनन्य भक्ति ठेवुनी ।
समभाव मनी ठेवी विचरी पृथिवीवरी ॥ ६ ॥
मने शब्दे तसे नेत्रे कर्णे जे कळते तसे ।
नाशवंत तितका तो माया मिथ्याच जाण तू ॥ ७ ॥
अनेक दिसती वस्तू अशांता वेडची जसे ।
भासती गुण दोषो ते बुद्धिचे खेळ सर्व ते ॥ ८ ॥
संयमी उद्धवा व्हावे इंद्रीय चित्त वृत्ति त्या ।
दोराने बांधणे त्यांना सर्वात्मी ब्रह्म मी पहा ॥ ९ ॥
ज्ञान विज्ञान जाणोनी आनंदमग्न होशि जै ।
आत्मा होशील सर्वांचा न दुःख मिळते तदा ॥ १० ॥
त्यागिता गुण दोषाते बालका परि वृत्ति हो ।
पुण्यही करिता त्याने गुण बुद्धि न राहि त्यां ॥ ११ ॥
श्रुति ना जाणती चित्ती साक्षात्कारात शांति हो ।
आत्मरूप बघे विश्वा न फेरा त्याजला पुन्हा ॥ १२ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
कृष्णे आदेशिता ऐसे भगवत्‌प्रीय उद्धवे ।
नमोनि तत्त्वज्ञानाच्या इच्छेने पुसले असे ॥ १३ ॥
उद्धवजी म्हणाले -
योगाची गुप्त किल्ली नी योगेश्वर तुम्ही असा ।
योगरूप नि आधार कल्याणा त्याग बोलले ॥ १४ ॥
अनंता विषयी ज्यांचे मुरले चित्त नित्य त्यां ।
अशक्य त्यागिण्या इच्छा मजला वाटते असे ॥ १५ ॥
( वसंततिलका )
’हा मी’ म्हणोनि रुतलो तव मायिकात
     देहादि पुत्र धनि यां नित गुंतले की ।
संन्यास बोध तुम्हि जो मज बोलला तो
     सोपा करोनि वदणे मज शक्य ऐसा ॥ १६ ॥
तू काळरूप हरि तूच स्वयंप्रकाश
     देवासही न जमणे मज बोध द्याया ।
ब्रह्मादि देव सगळे रुतलेत मायीं
     तेंव्हा तुम्हीच मजला निजबोध द्यावा ॥ १७ ॥
चारी कडोनि जळलो विषयाग्नि मध्ये
     नी ही विरक्ति धरुनी तव पायि आलो ।
सर्वज्ञ नित्य हरि तू अविनाशि ऐसा
     नारायणो नर सख्या तुजला नमस्ते ॥ १८ ॥
भगवान्‌ श्रीकृष्ण म्हणाले-
( अनुष्टुप्‌ )
जगात काय नी कैसे चिकित्सा करिता अशी ।
विवेके वासना सर्व स्वताच मिटवू शके ॥ १९ ॥
जीवांचा गुरु तो आत्मा पुरुषांचा विशेषतः ।
अनुभवे अनुमाने हिताहिति समर्थ तो ॥ २० ॥
धीरवंत पुरूषो जो सांख्ययोग विशारद ।
मला तो आत्मतत्वाने प्रगट पाहुही शके ॥ २१ ॥
एक दो त्रि चतुष्पाद बहुपाद न पाद ज्यां ।
निर्मिले सर्व मी प्राणी परी माणुस तो प्रिय ॥ २२ ॥
एकाग्र चित्त नी बुद्धी अनुमान असे तया ।
विषया भिन्न मी माझी तयाला प्रचितीहि हो ॥ २३ ॥
संबंधी या महात्मे ते प्राचीन इतिहास तो ।
तेजस्वी अवधूतो नी यदुसंवादि सांगती ॥ २४ ॥
एकदा यदु धर्मज्ञे द्विज दत्तासि पाहिले ।
स्वच्छंदी फिरता त्यांना प्रश्न हा पुसला असे ॥ २५ ॥
राजा यदुने विचारिले-
कर्म ना करिता विप्रा निपुण बुद्धिमान्‌ कसे ।
विद्वान जाहला कैसे बालका परि हिंडता ॥ २६ ॥
जगात माणसे सर्व दिसती मग्न पौरुषीं ।
इच्छिती आयु नी येश अकारण कुणी नसे ॥ २७ ॥
समर्थ विद्वान्‌ निपुणो तुम्हा मी जाणितो तसा ।
भाग्य सौंदर्य ते थोर सुधावाणी स्रवे सदा ॥
तरीही हिंडता ऐसे हेतुवीण पिशाचवत्‌ ॥ २८ ॥
काम लोभे जळे विश्व तुम्ही तो मुक्त भासता ।
दावाग्नी मधुनी हत्ती गंगेत स्थिरतो जसा ॥ २९ ॥
संसाराचा न वारा नी स्वरुपी स्थिर राहता ।
आत्मानंद कसा लाभे कृपया सांगणे मला ॥ ३० ॥
भगवान्‌ श्रीकृष्ण म्हणाले -
पूर्वजो आमुचे राजे यदु ते द्विज भक्तीची ।
दत्ता पूजोनिया नम्र प्रश्न हा पुसला तये ॥ ३१ ॥
ब्रह्मवेत्ता दत्तात्रेयजी म्हणाले-
राजा मी आपुल्या बुद्धे अनेक गुरु घेतले ।
शिकोनी हिंडतो ऐसा गुरु-शिक्षाहि सांगतो ॥ ३२ ॥
पृथिवी वायु आकाश जलाग्नि चंद्र सूर्य नी ।
कबूतर समुद्रो नी पतंग मधुमक्षिका ॥
हरीण हत्ति नी मासा वेश्या नामक पिंगला ॥ ३३ ॥
कुमारी बाळ नी क्रौंच बाणकर्मी नि सर्प तो ।
किटकी भृंगि हे सर्व अज्‌गरो मधुकर्मिही ॥ ३४ ॥
चोवीस गुरु हे ऐसे गेलो त्यांच्याचि आश्रया ।
तयांचे वागणे शिक्षा मानिले गुरुमंत्र ते ॥ ३५ ॥
ययातिनंदना वीरा शिकलो जे तयांकडे ।
जसे तसेचि ते सर्व सांगतो तुज ऐकणे ॥ ३६ ॥
क्षमा मी धरतीची ती शिकलो बघ सोशिते ।
आघात दैव मानोनी न क्रोधे कधिही कुणा ॥
धीरवंते तसे व्हावे क्रोध कोणा करू नये ॥ ३७ ॥
गिरि नी वृक्ष ही तैसे दुजांचे हित साधिती ।
तयांचा जन्म त्या साठी परोपकार हा शिका ॥ ३८ ॥
आहार केवलो इच्छी प्राणवायु तनूतला ।
संक्षेपे विषयो त्यांचा शिकलो अल्प सेवना ॥ ३९ ॥
बाहेर वायु तो नित्य हिंडतो नच गुंतता ।
गुणदोष न तो घेतो न द्वेषी मुळिही कुणा ॥ ४० ॥
पृथ्वीचा गंध तो नेई परी शुद्धची राहतो ।
पार्थिवा सुख दुःखाला वाहणे त्याच की परी ॥ ४१ ॥
( इंद्रवज्रा )
घटा मठाशी नभ भिन्न भासे
     तसेचि ब्रह्मो रुपि भिन भासे ।
माळेतल्या त्या मणिसा बघावा
     आकाश तैसा हरि साधकांनी ॥ ४२ ॥
( अनुष्टुप्‌ )
लागो आग पडो वर्षा आकाशा नच स्पर्श हो ।
लाभो जन्म बुडो पृथ्वी आत्मा त्यां नच स्पर्शितो ॥ ४३ ॥
स्वच्छ शुद्ध करी पाणी उच्चार स्पर्श पाहता ।
गंगा ती नष्टिते पाप तसे आपण वागणे ॥ ४४ ॥
तेजस्वी ज्योति तो अग्नि कोणी त्याला न झाकीते ।
अग्नि ना संग्रहो ठेवी वस्तुदोषी न लिंपतो ॥
साधके विषयादिंच्या दोषात नच गुंतणे ॥ ४५ ॥
गुप्त नी प्रगटे अग्नि साधके राहणे तसे ।
भिक्षेचे हव्य घेवोनी अशुभा जाळणे पहा ॥ ४६ ॥
कसेही लाकडे होती अग्नीचे रूप वेगळे ।
तसा व्यापक तो आत्मा वेगळा पाहणे असे ॥ ४७ ॥
कला होती कमी जास्त चंद्र तो सारखा असे ।
अवस्था तनुच्या तैशा आत्म्याला नच स्पर्शिती ॥ ४८ ॥
हळूच संपते ज्योत जळही वाहते तसे ।
न कळे सरते केंव्हा तसी आयुहि संपते ॥ ४९ ॥
सूर्य तो शोषितो पाणी समयी वर्षितो पुन्हा ।
योग्याने विषयो तैसे सेविने त्यागिणे पुन्हा ॥
आसक्ती नच ठेवावी विषयी आपुल्या तशी ॥ ५० ॥
घटीं घटीं दिसे सूर्य असोनी एकची परी ।
आत्मा तो पाहणे तैसा सर्व जीवात एकची ॥ ५१ ॥
अत्यंत स्नेह आसक्ती कोणाशी न घडो कधी ।
कबूतरा न स्वातंत्र्य होती अत्यंत क्लेश ते ॥ ५२ ॥
एकदा जंगली एक कबूतर सपत्‍निक ।
राहिले दिन ते कांही खोप्यात जंगली तिथे ॥ ५३ ॥
द्वयांचा स्नेह तो वाढे गृहस्थधर्म वाढला ।
अंग अंगा तसी दृष्टी बुद्धि बुद्धीसि बांधिली ॥ ५४ ॥
विश्वास जाहला तैसा निःशंक वृक्षि झोपती ।
बसती फिरती खाती खेळती बोलती तसे ॥ ५५ ॥
पत्‍निची पुरवी इच्छा बहूत कष्ट भोगुनी ।
पतीची कामना पूर्ण करी तीही कबूतरी ॥ ५६ ॥
पहिला राहिला गर्भ समयी त्या कबूतरीं ।
पतीच्या जवळी घाली आपुली अंडि ती पहा ॥ ५७ ॥
अचिंत्य हरिची शक्ती समयी अंडि फोडुनी ।
पाय पंखादिची पिल्ले कोवळी जन्मली पहा ॥ ५८ ॥
दोघांची लागली दृष्टी सारखी त्या पिलांवरी ।
प्रेमाने पोषिती त्यांना गुटर्‌गूं हर्षि ऐकती ॥ ५९ ॥
प्रसन्न राहती पिल्ले पितृपंखास स्पर्शिती ।
कुंजती करिती चेष्टा पितरां मोद तो भरे ॥ ६० ॥
मायेने मोहिले दोघां स्नेहात बद्ध जाहले ।
लोक नी परलोकाचे भान त्या मुळिही नसे ॥ ६१ ॥
एकदा नर मादीने चारा तो आणण्या वनीं ।
पिलांच्या साठि ते गेले हिंडले ते चहू कडे ॥ ६२ ॥
खोप्यासी व्याध तो आला जाळे ही टाकिले तये ।
फड्‌फडी पाहिली पिल्ले धरिले त्यांजला पहा ॥ ६३ ॥
क्षणोक्षणी नर मादी उत्सूक पिल्ल पाहण्या ।
खोप्याच्या पाशि ते आले चारा घेवोनिया पहा ॥ ६४ ॥
दुःखे चीं चीं असे सान पिल्ले जाळ्यात पाहिली ।
दुःखाने रडली पत्‍नी पिलांच्या पाशि पातली ॥ ६५ ॥
दीन दुःखी तसे झाले माया दोरात बांधके ।
शुद्ध ना राहिली कांही मादी जाळ्यात गुंतली ॥ ६६ ॥
पिल्ले पत्‍नी अशी प्रीय जाळ्यात गुंतले असे ।
नराने पाहता दुःख खरेचि जाहले पहा ॥ ६७ ॥
अभागी मी हाय हाय सत्यनाशचि जाहला ।
आकांक्षा पूर्ण ना झाल्या गॄहस्थाश्रम मोडला ॥ ६८ ॥
इष्टदेव मला पाही प्राणप्रीया सदोदित ।
एकटा सोडुनी आज स्वर्गाला निघली पहा ॥ ६९ ॥
पिल्ले मेले तशी पत्‍नी मरणा मार्गि लागली ।
खोप्यात एकटा काय जगू मी कासया अता ॥ ७० ॥
तड्‌फडा बघुनी त्यांचा मृत्यचा सापळा तसा ।
तरी हा मूर्ख त्या जाळीं मोहाने पडला पहा ॥ ७१ ॥
दुष्ट व्याध तसा होता नर मादी नि पिल्ल ती ।
आनंदे घेतले आणि घरासी निघला असे ॥ ७२ ॥
कुटुंबी रमती त्यांना शुद्धती नच राहते ।
शांती ती न मिळे केंव्हा सदैव दुःख भोगणे ॥ ७३ ॥
मुक्क्तिचे द्वार हे आहे मनुष्य एक देह तो ।
फसे कबूतर ऐसा आरूढच्युत हो तसा ॥ ७४ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ ११ ॥ ७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP