समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ६ वा

स्वधामास येण्यास भगवंताला देवता प्रार्थितात,
प्रभासक्षेत्री जाण्यस यादवांची तयारी पाहून उध्ववजी भगवंताकडे जातात -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्री शुकदेवजी सांगतात-
( अनुष्टुप्‌ )
देवर्षि वसुदेवाते गेले बोधावया जधी ।
सनकादिक देवांच्या मी ब्रह्म्या सह द्वारकी ॥
भूतांच्या सह ते रुद्र इंद्र मरुद्‌गणां सचे ॥ १ ॥
ऋभु नी अंगिरावंशी वसु आठ नि अश्विनो ।
विश्वदेव नि गंधर्व साध्यगण नि चारण ॥
ऋषि चारण नी सिद्ध गुह्यको पितरे तसे ॥ २ ॥
पोचले सर्वच्या सर्व विद्याधर नि किन्नरें ।
लोकांना रमवी कृष्ण विग्रहे श्यामसुंदर ॥ ३ ॥
अशा या भगवान्‌ कृष्णदर्शना सर्व पातले ।
आपुल्या अवताराने पसरी कीर्ति भूवनी ॥
लोकांचे पाप नी ताप मिटवी सर्व तो हरी ॥ ४ ॥
ऐश्वर्ये नटले पूर समृद्धी दीपवी मनां ।
एकटक असे त्याला पाहता नच तृप्ति हो ॥ ५ ॥
स्वर्ग उद्यानिच्या पुष्पे झाकिले जगदीश्वरा ।
विविधा अर्थ वाणींनी स्तुति ते करु लागले ॥ ६ ॥
देवतांनी प्रार्थिले-
( इंद्रवज्रा )
नमो तुझ्या स्वामि पदारविंदा
     बुद्धींद्रियप्राण मने नि वाचे ।
मुमुक्षु आम्ही पदि चिंतितो की
     तुझ्या रुपाते अति भक्ति भावे ॥ ७ ॥
( वसंततिलका )
माये गुणत्रय अशी रचितोस सृष्टी
     नामो रुपात्मक अचिंत्य अशीच सारी ।
नी पोषिसी नि लयि नेसि न लिप्त होसी
     तू नित्य मुक्त स्वरुपी नित मग्न होसी ॥ ८ ॥
जे क्रोधि द्वेषि कलुषी जर वैदिको ते
     तेणे तयास नमिळे हृदयात शुद्धी ।
जे कीर्तनेचि भजतो मनिभाव देता
     संपुष्ट ते हृदय हो नित शुद्ध त्यांचे ॥ ९ ॥
मोक्षार्थ प्रेम पघळे हृदयात ज्यांच्या
     ते पंचरात्र विधिने पुजिती मुमुक्षु ।
संकर्षणो नि अनिरुद्ध नि वासुदेव
     प्रद्युम्न रूप चवथे पुजितात श्रद्धे ॥ १० ॥
वेदत्रयो नि विधिने ऋषि याज्ञिको ते
     संयेति हाति हवि ते स्मरूनी हवीती ।
आराध्यदेव म्हणुनी भजतात योगी
     ते पाप ताप करि भस्म हरी कृपेने ॥ ११ ॥
वक्षस्थलास विभवे वनमाळ ऐशी
     ती स्पर्धिते लछमिसी प्रति पत्‍नि जैशी ।
स्वीकारितोसि स्वजने पुजिताचि माळा
     जाळावयास विषयो धरि अग्निरूप ॥ १२ ॥
ही व्यापिण्यास धरणी त्रिपदे जधी तू
     पाऊल उंच करिशी विजयध्वजा जैं ।
भक्तास धाम नरको पतितास देशी
     हे पद्मनाभ अमुचे धुवि पाप सर्व ॥ १३ ॥
ब्रह्मादि देव त्रिगुणी मरती नी येती
     त्यां वेसणी तव असे स्वरुपेचि काले ।
तू तो परेश अन तो पुरुषोत्तमो रे
     तू भद्र तेचि करि पदि घेउनीया ॥ १४ ॥
ते शास्त्र हेच म्हणती नियता जगा तू
     उत्पत्ति वाढ लय यां तुचि कारणो की ।
वर्षादि त्रेय ऋतु ते तव कालरूपे
     गंभीर ती गति तुझी पुरुषोत्तमारे ॥ १५ ॥
माया नि वीर्य तव ते रुप गर्भ घेते
     विश्वास तत्व मिळते मग त्या मधोनी ।
पॄथ्वी जालादि कवचो मग सात होती
     ब्रह्मांड स्वर्णि निघते तयिच्या मधोनी ॥ १६ ॥
अधिश्वरो सकल तूचि चराचराचा
     हे कारणो कि नच तू मुळि लिंपतोस ।
हे तो तुलाच हरि रे परि शक्य आहे
    त्यागोनि अन्य विषया तरि भीती चित्ती ॥ १७ ॥
सोळा हजार अधिको तव सर्व राण्या
     उंचावुनीहि भुवया रतिबाण देती ।
कामीकलेत तुज त्या जरि बाहतात
     तू पूर्णकाम म्हणुनी नच गुंतसी तै ॥ १८ ॥
गंगा नि कीर्तिसरिता द्वय वाहवीशी
     त्या पापराशि हरण्या जगतात सार्‍या ।
गंगेस स्नान करुनी तव कीर्ति गाता
     ते पाप ताप सगळे मिटतात तीर्थी ॥ १९ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - (अनुष्टुप्‌ )
स्तविता मुनि नी देव आकाशी स्थिर राहिले ।
शिवाच्या सह त्या ब्रह्म्ये,पुन्हा ही स्तुति गायिली ॥ २० ॥
श्री ब्रह्मदेवजी सांगतात -
हराया भूमिचा भार पूर्वी ते प्रार्थिले अम्ही ।
उचित कार्य ते सर्व केले पूर्ण तुम्ही असे ॥ २१ ॥
धर्मही स्थापिला तुम्ही साधुकल्याण साधिले ।
कीर्ती पसरली सर्व ऐकता चित्त शुद्ध हो ॥ २२ ॥
सर्वोत्तम अशा रूपे यदूंत जन्मले तुम्ही ।
लीला पराक्रमे केल्या जगदोद्धार कारणे ॥ २३ ॥
कलीत संत ते सारे लीला गातील कीर्तनी ।
अज्ञान तम हा सर्व होतील पार ते सुखे ॥ २४ ॥
अवतारा यदुवंशी तुझ्या रे पुरुषोत्तमा ।
सव्वाशे वर्ष ते झाले शक्तीमान प्रभो तुझे ॥ २५ ॥
सर्वांधारा असे कांही नच ते कार्य राहिले ।
द्विजशाप मिळोनीया जणू हे कुळ संपले ॥ २६ ॥
उचित वाटता तुम्ही स्वधामा चालणे हरी ।
लोकपालां नि आम्हाला तेथोनी पाळणे तुम्ही ॥ २७ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
ब्रह्माजी ! निश्चयो तैसा पूर्वीच जाहला असे ।
तुमचे कार्य ते केले धरेचा भार हारिला ॥ २८ ॥
राहिले वंशिचे वीर माजले धन नी बळे ।
निघाले पृथ्वि व्यापाया लागेल रोधिणे तयां ॥ २९ ॥
नष्ट ना करिता यांना आलोचि तर सर्व हे ।
मर्यादा सांडुनी सर्व लोकांना कापितील की ॥ ३० ॥
आरंभ जाहला नाशा लाभोनी द्विजशाप तो ।
अंत होताचि तो सारा स्वधामा परतेन मी ॥ ३१ ॥
श्री शुकदेवजी सांगतात-
वदता लोकनाथे हे ब्रह्म्याने तो प्रणामिला ।
देवतांसह ते ब्रह्मा स्वलोकां पातले तदा ॥ ३२ ॥
उत्पात द्वारकी झाले कुशकूनहि सर्व ते ।
पाहता यदु ते येता भगवान्‌ बोलले तयां ॥ ३३ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
कुशकुन नि उत्पात द्वारकी घडती सदा ।
द्विजांचा लाभला शाप टाळणे तो कठीणची ॥ ३४ ॥
वाचाया प्राण ते येथे राहणे नच युक्त हो ।
अविलंबचि की जावे प्रभास क्षेत्रि आपण ॥ ३५ ॥
तेथील महिमा थोर चंद्राचा शाप नष्टला ।
मिटला रोग तो सारा कलांची वृद्धि जाहली ॥ ३६ ॥
करू स्नान तिथे सर्व पितरे देव तर्पुया ।
करू उत्तम ते अन्न द्विजां भोजन देउ ते ॥ ३७ ॥
दक्षिणा दानही देऊ श्रद्धेने ब्राह्मणा तिथे ।
संकटी तरुया सर्व जहाज तरते तसे ॥ ३८ ॥
श्री शुकदेवजी सांगतात-
आज्ञापिता असे कृष्णे सगळे यदुवंशि ते ।
एकमत करोनिया रथा सजवु लागले ॥ ३९ ॥
उद्धवो भक्त कृष्णाचा तयारी पाहता अशी ।
हरीची ऐकुनी आज्ञा कुशकून बघोनिया ॥ ४० ॥
एकांती गाठुनी भेटे एकट्या जगदीश्वरा ।
पायासी टेकुनी डोके हात जोडोनि प्रार्थिले ॥ ४१ ॥
उद्धवजी म्हणाले-
देवदेवेश योगेशा पुण्यश्रवणकीर्तना ।
शक्तिमान्‌ असुनी तूं तो द्विजाचा शाप मानिला ॥
कळाले मजला चित्ती स्वधाम इच्छिले तुम्ही ॥ ४२ ॥
क्षणार्ध त्यजिणे पाया मजला शक्य ते नसे ।
जीवस्वामी मलाही त्या स्वधामी घेउनी चला ॥ ४३ ॥
लीला सर्व तुझ्या लोका कल्याणी अमृतापरी ।
चाखिता एकदा त्याला दुसरा रस ना रुचे ॥ ४४ ॥
उठता बसता शय्यी स्नान नी भोजनी तसे ।
तुझ्यात रमलो खेळी सोडू कैसे तुला प्रभो ॥ ४५ ॥
तुझ्यामाळा गळा ल्यालो तुझे चंदन चर्चिले ।
तुझे वस्त्र तसे ल्यालो दागिने अंगि धारिले ।
उष्ट्याचे सेवको आम्ही माया ना बाधिते अम्हा ॥ ४६ ॥
कठीण तशि ती माया योग्यांही दुस्तरो अशी ।
नैष्कर्म्य यति ते होती ब्रह्मधामास पावती ॥ ४७ ॥
कर्मात भ्रमतो आम्ही करितो भजने तुझी ।
लीला मधुर त्या सार्‍या चिंतनी आणितो सदा ॥ ४८ ॥
चालणे हासणे दृष्टी स्मरता तंद्रि लागते ।
येणेचि शक्य ती माया दुस्तरा सहजी तरू ॥ ४९ ॥
देवकीनंदना कृष्णां उद्धवे प्रार्थिता असे ।
अन्यही प्रेमि मित्रांना भगवान्‌ वदले पहा ॥ ५० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ ११ ॥ ६ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP