समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ५ वा

भक्तीहीन पुरुषांची गति नी भगवंताच्या पूजाविधिचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजा निमिने विचारिले -
(अनुष्टुप्‌ )
न शांत कामना ज्याच्या भोगांची लालसा उरे ।
मनेंद्रियी नसे ताबा अभक्तां गति काय ती ॥ १ ॥
योगीश्वर चमसजी म्हणाले -
मुख बाहू नि मांड्यांसी पायासी पुरुषाचिया ।
वर्ण आश्रम ते आले क्रमाने प्रगटोनिया ॥ २ ॥
वर्णांचा जन्मदाता तो आत्मा नी स्वामी तोच की ।
न भजे हरिसी जीव अधःपतन त्यां घडे ॥ ३ ॥
कीर्तनापासुनी कैक स्त्रिया शूद्रहि दूर ते ।
तुम्ही संत दयावंत कीर्तने उद्धरा तयां ॥ ४ ॥
द्विज क्षात्र तसे वैश्ये यज्ञो पवित धारिणे ।
हरिच्या पदि ते ठेले चुकती वेद‌अर्थ ते ॥ ५ ॥
रहस्य न कळे तेही गर्वे पंडित बोलती ।
भुलती गोड शब्दाते बोलती चुकिचे तसे ॥ ६ ॥
रजें संकल्प तो वाढे कामना वाढती तशा ।
भरे सापापरी क्रोध पापी भक्तास हासती ॥ ७ ॥
(इंद्रवज्रा )
उपासिती मूर्ख स्त्रियास कोणी
     स्त्री सौख्य मोठे वदती कुणी ते ।
यज्ञात दानो नच देति कोणा
     पोसावया देह वधी पशूला ॥ ८ ॥
श्रीवैभवो कूळ नि दान विद्या
     त्यागे नि रूपे बळ कर्म योगे ।
होतो तयांना बहु गर्व मोठा
     देवा नि संता अवमानितात ॥ ९ ॥
नभापरी ईश सर्वां रुपात
     आत्मारुपाने प्रिय उत्तमो तो ।
हे बोलती वेद पुनः पुन्हा ही
     ते मूर्ख स्वप्ना रचिती मनासी ॥ १० ॥
मैथून मांसो अन मद्य घेणे
     विधान नाही परि सेविण्याचे ।
विवाह यज्ञींच तशी व्यवस्था
     सीमा असे ती त्यजिण्या श्रुतिची ॥ ११ ॥
धनास ते एक फळोचि धर्म
     ज्ञानोनि निष्ठा मिळतेहि शांती ।
धनास मूढो धरिती प्रपंची
     न पाहती की जवळीच मृत्यू ॥ १२ ॥
यज्ञात मद्या मुळि सुंगणे नी
     मांसास स्पर्शो नच मान्य हिंसा ।
प्रजार्थ स्त्री ती नच भोगण्याला
     हा शुद्ध धर्मो त्यजितात मूढ ॥ १३ ॥
(अनुष्टुप्‌ )
शुद्ध धर्म असा जे ना मानिती गर्वि ते पहा ।
हींसीं ते मरता त्यांना भक्षिती पशु तेच की ॥ १४ ॥
मर्त्य देहास संबंधी मरता तुटती तदा ।
स्वताला देव मानोनि द्वेषिती भगवंत जे ॥
त्या मूर्खांचे घडे नक्की अधःपतन ते तसे ॥ १५ ॥
जया ना मिळला मोक्ष अशांत अधुरे असे ।
कुर्‍हाड मारणे पायी तसेच आत्मघाति ते ॥ १६ ॥
अज्ञाना वदती ज्ञान तया ना शांति ती मिळे ।
भंगती स्वप्न ते सर्व विषाद दाह ना मिटे ॥ १७ ॥
कृष्णा विन्मुख ते सारे श्रमे प्रपंच साधिती ।
अंती ते सोडणे लागे नरकी पडणे घडे ॥ १८ ॥
राजा निमिने विचारिले-
कोण्या काळी कसा रंग आकार घेइ श्रीहरी ।
मनुष्ये कोणत्या नामे विधीने पूजिणे तया ॥ १९ ॥
योगीश्वर करभाजन म्हणाले-
सत्य त्रेता नि द्वापार कलि या युगि केशवा ।
अनेक रूप नामाने विधिने पूजिणे असे ॥ २० ॥
श्वेत सत्यीं चतुर्बाहू जटावल्कलधारि तो ।
कृष्णाजीन पवीताक्ष धारी दंड कमंडलू ॥ २१ ॥
हितैषी समदर्शी नी शांत ती माणसे तदा ।
इंद्रियां रोधुनी ध्यानी प्रकाशात्मचि पूजिती ॥ २२ ॥
हंसो सुपर्ण वैकुंठ धर्म योगेश्वरामल ।
ईश्वरो पुरुषोऽव्यक्त नावाने पूजिती तया ॥ २३ ॥
त्रेतात रक्तवर्णो तो चारभूजा नि मेखळा ।
सुवर्ण केश ते त्याचे स्त्रुक्‌ स्रुवा धारितो करी ॥ २४ ॥
धर्मनिष्ठ असे सारे वेदाध्यायनि सर्वची ।
गावोनी तीन वेदाते पूजिती सर्वदेव तो ॥ २५ ॥
त्रेतात अधिकांशाने लोकात यज्ञ विष्णु नी ।
वॄषाकपि जयंतो नी उरुगायादि पूजिती ॥ २६ ॥
द्वापारी भगवान्‌ श्याम पीतवस्त्र निजायुधे ।
श्रीवत्सचिन्हही धारी कौस्तुभे शोभती पहा ॥ २७ ॥
जिज्ञासु छत्र चौर्‍यादी चिन्हांनी पूजिती तया ।
तांत्रिकी वैदिकी मार्गे विधिने पूजिती तसे ॥
गाती ते स्तुतिही त्याची श्रद्धेने कर जोडुनी ॥ २८ ॥
नमस्ते वासुदेवाला नमो संकर्षणास या ।
प्रद्युम्ना अनिरुद्धाला भगवंतासि या नमो ॥ २९ ॥
असे द्वापारि ते गाती स्तवने जगदीश्वरा ।
नारायण ऋषिसी नी महात्मा पुरुषास त्या ॥
विश्वेश्वरा नि विश्वा नी भूतात्मा भगवान्‌ नमो ॥ ३० ॥
आता कलियुगामध्ये विधि कित्येक पूजनी ।
पूजिती लोक या ईशा प्रकार ऐकणे तसे ॥ ३०अ ॥
कृष्णवर्ण कलीमाजी शस्त्र नी पार्षदे तशी ।
यज्ञ संकीर्तनो भक्ती प्रधान नाम गायिणे ॥ ३१ ॥
(वसंततिलका )
हे भक्त रक्षक हरी चरणारविंदा
     ध्याताचि मुक्ति मिळते जणु कामधेनु ।
तीर्थास तीर्थ पद जे पुजि सांब ब्रह्मा
     वंदे महापुरुष तू,चरणारविंदा ॥ ३३ ॥
दुस्त्यज्य राज्य त्यजिले वनि पातला तू
     मानोनि पितृवचना फिरलास पायी ।
मायामृगास हरिण्या पदि धावलास
     वंदे महापुरुष तू निजधर्मसीमा ॥ ३४ ॥
(अनुष्टुप्‌ )
राजा भिन्न युगीचे ते युगानुसार पूजिती ।
न संदेह मुळी त्यात पुरुषार्थस्वामि तो हरी ॥ ३५ ॥
नामसंकीर्तनो सोपे कलीत स्वार्थ साधण्या ।
म्हणून कलिची गाती महती संत थोर ते ॥ ३६ ॥
संसारी भटके जीव कीर्तने लाभ होतसे ।
जन्माचा चुकतो फेरा शांति ती लाभते पहा ॥ ३७ ॥
कृतादीत प्रजा राजा या युगी जन्म इच्छिते ।
कित्येक भक्त ते होती नर नारायणाश्रमी ॥ ३८ ॥
महाराजा कलियुगी द्रविडीं भक्त ते बहू ।
होतील त्या नद्या तेथे ताम्रपर्णी पयस्विनी ॥
कृतमाला नि कावेरी प्रतीची नी महानदी ॥ ३९ ॥
पिती जळ नद्यांचे ह्या त्याचे हृदय शुद्ध हो ।
भगवान्‌ वासुदेवाचा त्वरीत भक्त होतसे ॥ ४० ॥
(इंद्रवज्रा )
त्यागोनि इच्छा पदि जे हरीच्या
     आला तयाने ऋण फेडियेले ।
तो मुक्त जाणा भवसागरात
     ना राहि भृत्यो अन स्वामि कोणा ॥ ४१ ॥
अनन्य भावे भजि जो हरीला
     आस्था नि वृत्ती त्यजुनीच सर्व ।
न पाप होते मुळि त्या कराने
     धुतो हरी तो हृदयी बसोनि ॥ ४२ ॥
नारदजी सांगतात -
(अनुष्टुप्‌ )
धर्म भागवतो ऐसा ऐकता मिथिलेश्वरे ।
आनंदे पूजिले योगी ऋत्विजाचार्य यां सह ॥ ४३ ॥
सर्वा समक्ष ते सिद्ध आंतर्धानहि पावले ।
धर्माने वागला राजा गती परम पावला ॥ ४४ ॥
वदलो भागवद्धर्म भगवान्‌ वसुदेवजी ।
आचरिता तुम्ही याला लाभेल परमोपद ॥ ४५ ॥
तुम्ही नी देवकीचे ते यश सर्वत्र जाहले ।
उदरी जाहला पुत्र भगवान्‌ कृष्ण तो स्वये ॥ ४६ ॥
भगवत्‌ दर्शने स्पर्शे नी आलिंगुनि बोलले ।
वात्सल्य लावुनि त्याला पवित्र जाहले असा ॥ ४७ ॥
(वसंततिलका )
शत्रु असोनि नृपती शिशुपाल पौंड्र
     शाल्वादिकेहि स्मरता सहजी असेची ।
त्या चित्त वृत्ति बनल्या हरिरूप सर्व
     तो जो प्रियो भजक त्या नच कांहि शंका ॥ ४८ ॥
(अनुष्टुप्‌ )
न माना पुत्र त्या कृष्णा सर्वात्मा अविनाशि तो ।
ऐश्वर्य लपवी सर्व मनुष्यरूप घेउनी ॥ ४९ ॥
असुरां वधण्या तैसे रक्षाया संत सज्जना ।
जीवास शांति नी मुक्ती देण्याला अवतीर्णला ॥
जगी कीर्ती तशी त्याची गाती संत मुनीहि ते ॥ ५० ॥
श्री शुकदेवजी सांगतात-
ऐकता नारदाचे हे हर्षले वसुदेवजी ।
तसेच देवकीचेही माया मोहचि संपले ॥ ५१ ॥
इतिहास पवित्रो हा एकाग्रे ऐकता यया ।
संपतो शोक नी मोह लाभते पद ब्रह्म ते ॥ ५२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पाचवा अध्याय हा ॥ ११ ॥ ५ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP