[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
राजा निमिने विचारिले-
( अनुष्टुप् )
भक्ताला वश होवोनि भगवान् अवतारतो ।
अनेक करितो लीला सांगाव्या त्या तुम्ही अम्हा ॥ १ ॥
योगीश्वर द्रुमिल म्हणाले-
( इंद्रवजा )
तो तो अनंतो गुणही अनंत
तो मूढ होतो कुणि मोजु पाही ।
मोजील कोणी धुळिच्या कणाते
परी न थांगो हरिच्या गुणांचा ॥ २ ॥
भूतांतुनी तो स्वय सृष्टि झाला
ब्रह्मांड योजोनि शिरे स्वयें तो ।
तो आदि नारायण याच नामे
पुरूष जो हा अवतार आद्य ॥ ३ ॥
( वसंततिलका )
ब्रह्मांडि त्या स्थितचि हे तिन्ही लोक राजा
जीवां दशेंद्रियहि हे हरिचेच जाणा ।
ज्ञान स्वताचि श्वसन तो बल ओज शक्ती
निर्मी नि पोषि लयि ने गुणि आद्य कर्ता ॥ ४ ॥
निर्मावया जग रजे अवतार ब्रह्मा
सत्वेचि विष्णु पुढती द्विजयज्ञ रक्षी ।
संहारण्यास जग हे तम रुद्र होई
ऐसेचि चक्र फिरवी नित श्रीहरी तो ॥ ५ ॥
धर्मो नि मूर्ति उदरी मग जन्मले ते
नारायणो नर ऋषिप्रवरो प्रशांत ।
नैष्कर्म्य लक्षण जगा वदले असे ते
ते आजही निवसती बदरी वनात ॥ ६ ॥
इंद्रो तपास बघुनी मनी भीवुनिया
स्त्री नी वसंत करवी करि विघ्न थोर ।
कामो न जाणि महती अन अप्सरांचे
नेत्रे कटाक्ष करुनी करिही प्रयत्न ॥ ७ ॥
जाणोनि इंद्रकृति ही वदले स्मितेचि
हे कामदेव वनिता अन हे वसंता ।
भ्यावे न, स्वागत असे करणे स्विकार
थांबा इथेच न करा रित आश्रमो हा ॥ ८ ॥
हे बोलताच अभया नरदेव देव
लज्जीत काम वदला मग तो तयांना ।
माया परा तुम्हिच तो तुमच्या पदासी
ते श्रेष्ठ संत सगळे नमिती सदाची ॥ ९ ॥
भक्तीप्रभाव तुमचा निजभक्त जाणी
स्वर्गादि ते त्यजुनिया पदि श्रेष्ठ जाती ।
ते भक्त जै भजति इंद्रचि विघ्न आणी
यज्ञात भाग मिळता मग चूप राही ।
जे भक्त ते न ढळती जरि विघ्न येते
डोक्यास पाय ठिवुनी चलती पुढे ते ॥ १० ॥
तृष्णा नि भूक गरमी सरदी नि वारा
पाऊस काम सहुनी बहु पार होती ।
नी क्रोधि तेच वशती नच लाभ ज्यात
नी आपुले कठिणसे तप नष्टितात ॥ ११ ॥
( अनुष्टुप् )
स्तविता देवतांनी त्यां स्त्रिया अद्भूत सुंदर्या ।
दाविल्या आपुल्या मायें सेविती ज्या पदा किती ॥ १२ ॥
रमेच्या परी त्या रूपे पाहता देव ते फिके ।
पडले मोहले सर्व अंगाचा गंध तो असा ॥ १३ ॥
झुकता शिर ते त्यांचे देवेश हासुनी वदे ।
अनुरूप अशी न्यावी स्वर्ग सुंदर होय तैं ॥ १४ ॥
आज्ञा ती मानुनी त्यांची वंदोनी एक घेतली ।
उर्वशी तीच स्वर्गीची अप्सरा श्रेष्ठ जाहली ॥ १५ ॥
गेले स्वर्गात नी तेथे नर नारायणी बल ।
सभेत वदता इंद्र बहू भ्याला मनात की ॥ १६ ॥
( वसंततिलका )
हंसस्वरूप हरिने स्थित राहुनीया
दत्तो कुमार ऋषभो अमुचा पिता तो ।
होवोनि आत्मरुप ते वदले जगाला
नी कैटभाहि वधिले हयग्रीव रूपे ॥ १७ ॥
मत्स्यावतार धरुनी मनु औषधींना
रक्षोनि पॄथ्वि क्षितिजा वधिले असे की ।
होवोनि कूर्म मथनी गिरि पृष्ठि घेई
नी त्याच श्री भगवते गज मुक्त केला ॥ १८ ॥
नी वालखिल्य ॠषि ते तपि दुर्बलो हो
त्या कश्यपो मुनिचिया समिधार्थ जाता ।
गोक्षूर खड्डि पडले बुडु लागले तैं
उद्धारिले तयिहि ती स्तुति ऐकुनिया ।
वृत्रासुरास वधिता मग ब्रह्महत्या
इंद्रास गाठि तइ तो लपला जळात ।
देवस्त्रियांस असुरा मधुनीहि सोडि
दैत्येंद्र मारि हरि तो रुपि त्या नृसिंहे ॥ १९ ॥
देवासुरा समरि दैत्यपती वधोनी
मन्वंतरा त्रिभुवना मग रक्षि शक्त्ये ।
होवोनि वामन बळी जितला यशाने
देवांस पृथ्वि दिधली मिळवोनि तैशी ॥ २० ॥
एक्केविसीहि समयी वधि सर्व क्षात्र
त्या हैहयीकुलवधा भृगुराम झाला ।
बांधोनि सेतु वधिला दशवक्त्र लंकी
सीतापती विजयी तो जगतात सार्या ॥ २१ ॥
त्यां जन्म तो नसुनिया यदुवंशि जन्मे
नी तो करील बहुकार्य सुरांहुनी ही ।
अपात्र होत्रि वदण्या मग बुद्ध होई
नी शूद्रभूप वधिण्या कलि होय अंती ॥ २२ ॥
( अनुष्टुप् )
अनंत भगवान् कीर्ती करितो तो जगत्पती ।
महात्मे वर्णिती जन्म करिती कर्मगान ते ॥ २३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौथा अध्याय हा ॥ ११ ॥ ४ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥