समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ३ रा

माया, तिच्यातून पारहोण्याचे उपाय, ब्रह्म व कर्म योगाचे निरुपण -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजा निमिने विचारले -
( अनुष्टुप्‌ )
भगवन ! विष्णुची माया मोहिते न कळे कधी ।
इच्छितो रूप मायेचे जाणण्या ते वदा मला ॥ १ ॥
मॄत्युचा सावजो मी तो संसारे तापलो बहू ।
नामामृत तुम्ही देता जये तृप्ति न हो कधी ॥ २ ॥
योगीश्वर अंतरिक्ष म्हणाले-
भगवान् शक्तिने होतो भूतांचा कारणी तसा ।
रचितो सृष्टि ही सर्व हीच माया असे पहा ॥ ३ ॥
भूतांत वसतो नित्य दशेंद्रिय विभागितो ।
तयां द्वारेचि तो सर्व विषया भोगितो पहा ॥ ४ ॥
देहाभिमानि तो जीव इंद्रियीं भोग सेवितो ।
आसक्त होऊनि बैसे आपुले रूप मानुनी ॥ ५ ॥
सकाम करितो कर्म सुख दुःख मिळे तसे ।
शरीर घेउनी हिंडे मायेचे कार्य हे असे ॥ ६ ॥
कर्मगति अशी भोगी जीव तो फळ लाभता ।
जन्मे मरे पुन्हा जन्मे माया हीच असे पहा ॥ ७ ॥
भूतांचा प्रलयो येता अनंतानादि काळ तो ।
ओढितो व्यक्त अव्यक्त माया हीच असे पहा ॥ ८ ॥
आवर्षण शतवर्षे सूर्याचे तेज वाढते ।
तापितो तिन्हि लोकांना माया हीच असे पहा ॥ ९ ॥
शेषाच्या मुखिच्या ज्वाळा वायूने जाळिती जगा ।
घेरिती सर्व विश्वाते माया हीच असे पहा ॥ १० ॥
सांवर्तक ढगगणो धारा जैं हत्तिशुंडिशा ।
करिता शतवर्षे हे बुडे ब्रह्मांड त्यात की ॥
भगवान्‌ प्रभुची माया हीच ऐशी असे पहा ॥ ११ ॥
संपता काष्ठ जैं अग्नी मिटतो तैचि ब्रह्म हा ।
सूक्ष्मात लीन तो होतो माया हीच असे पहा ॥ १२ ॥
पृथ्वीचा गंध शोषोनी वायुचे जल होतसे ।
जल हो कारणी अग्नी माया हीच असे पहा ॥ १३ ॥
तमाला गिळितो अग्नी अग्नि वायूत लीन हो ।
आकाश वायुची शक्ति घेते सर्व हिरावुनी ॥
स्पर्शतो संपतो त्याची माया हीच असे पाहा ॥ १४ ॥
काळ आकाश शब्दाचे गुण घेई हिरावुनी ।
तामसी लीन होवोनी बुद्धि राजसि लीन हो ॥
प्रकृतीत महत्तत्व ब्रह्मी प्रकृति ती मिळे ।
क्रमाने सृष्टि हो ऐशी माया हीच असे पहा ॥ १५ ॥
ही सृष्टि स्थित संहार माया त्रिगुण्य ती रची ।
वर्णिले सर्वच्या सर्व इच्छिता काय ते पुढे ॥ १६ ॥
राजा निमिने विचारले-
माया ही प्रभुची ऐसी जीवा दुस्तरची असे ।
शरीरा मानिती सत्य माया तेणे कशी तरो ॥ १७ ॥
योगीश्वर प्रबुद्ध म्हणाले-
भिन्न लिंगी रमे जीव सुखेच्छे दुःख मेळवी ।
उलटे फळ ते लाभे जाणावे त्या मुमुक्षुने ॥ १८ ॥
धनाने वाढते दुःख मेळिता मेळिल्यावरी ।
नाशवंत तसे सारे मेळिता सुख शांती ना ॥ १९ ॥
तराया इच्छितो त्याने स्वर्गही मर्त्य जाणणे ।
अल्पकर्मे मिळे स्वर्ग तिथेही लढणे असे ॥
ईर्षा द्वेष असे भाव तिथे ना सोडिती मुळी ।
घृणा येतेहि थोरांची सरता पुण्य थोडके ॥
जन्मावे लागते येथे नाशाचे भय तेथही ॥ २० ॥
गुरूच्या शरणीं जावे जिज्ञासू साधके पहा ।
शब्द ब्रह्मासि जाणी जो गुरू तो पाहिजे असा ॥
परिनिष्ठित नी ज्ञानी वागुनी सांगु जो शके ।
शांतचित्त असावा नी विशेष लोभि जो नसे ॥ २१ ॥
इष्टदेव नि आत्मा तो शिष्याने प्रिय मानणे ।
शिकावा भगवत्‌ धर्म श्रीपती आकळा तसा ॥ २२ ॥
अनासक्ति करोनिया संतसेवा करा पुन्हा ।
दया मैत्री सम भाव प्राण्यांसी ती शिका पुन्हा ॥ २३ ॥
शौच तप तितिक्षा नी मौन स्वाध्याय आर्जव ।
ब्रह्मचर्य अहिंसा नी समत्व शिकणे पुन्हा ॥ २४ ॥
सर्वात्मी पाहणे ईशा एकांत घर मानणे ।
पवित्र नेसणे वस्त्र गृहस्थी साधके तसे ॥
भाग्याने लाभले तैसे संतोषे फाटके असो ॥ २५ ॥
श्रद्धा भागवती व्हावी न निंदा अन्य शास्त्र ते ।
प्राणायामे तसे मौने वासना वाणि रोधिणे ॥
बोलावे सत्य ते नित्य मन इंद्रिय रोधिणे ॥ २६ ॥
श्रवणे कीर्तने ध्याने लीला अद्‌भूत मेळिणे ।
तयाचे जन्म नी कर्म गुण ते द्वयची पहा ॥
ध्यान कर्म तसे सर्व शिकावे त्याजसाठि की ॥ २७ ॥
यज्ञ दान तपो जाप्य सदाचार तसा असो ।
प्रियसर्व तया पायी सोपवा त्या निवेदने ॥ २८ ॥
जयांनी कृष्ण तो आत्मा स्वामीरूपचि पाहिला ।
जीव संत ययांची तै सेवा ती शिकणे पहा ॥ २९ ॥
भगवत्‌ किर्तिची व्हावी चर्चा नी प्रेमभाव हो ।
आपसी मानणे तोष निवृत्त्ये शांती मेळिणे ॥ ३० ॥
पापांच्या राशिही सर्व जळती कृष्ण बोलता ।
स्मरावा स्मरणी ध्यावा साधनी भक्ती लाभते ॥
मिळता प्रेमभक्ती ती अंग रोमांच होतसे ॥ ३१ ॥
( इंद्रवज्रा )
चिंती मनीं की हरि कोणि दावा
     जाऊ कुठे नी पुसु मी कुणाला ।
हासे वदे नी रडतो कधी तो
     आनंदमग्नी हरिसीच बोले ।
गाये नि नाचे रिझवी कधी त्या
     धुंडी कधी संनिधि शांत राही ॥ ३२ ॥
( अनुष्टुप्‌ )
असा भागवतो धर्म भक्ताने शिकता तया ।
हरीचा प्रिय तो होतो मायेच्या मधुनि सुटे ॥ ३३ ॥
राजा निमिने विचारिले-
नारायण अशा नामे परब्रह्मचि ते असे ।
जाणिता तुम्हि त्या रूपा कृपया सांगणे मला ॥ ३४ ॥
योगेश्वर पिप्पलायन म्हणाले-
( वसंततिलका )
जन्म स्थिती नि प्रलयो ययि कारणी जो
     स्वप्नी सुषुप्ति अन जागरणी तसेची ।
ध्यानात साक्षि वसतो अन त्राण देहा
     नारायणोचि समजा अशि सत्यवस्तु ॥ ३५ ॥
जाळी न तेज नच दे ठिणगी जशी ती
     ते आत्मरुप तइची नच आकळे की ।
त्या नेति शब्दि श्रुति ते रुप बोधितात
     नाही निषेध ठरतो करण्यास सिद्ध ॥ ३६ ॥
सत्वो रजो तम उरे प्रलयात गाण्या
     गावे कुणास कुणि जैं नच कोणि तेथे ।
ज्ञानक्रियार्थ फलरूप नि सर्व शक्ती
     सारेचि सर्व हरिचे निजरूप ब्रह्म ॥ ३७ ॥
आत्म्यां न जन्म मरणो स्वरुपोचि ब्रह्म
     ना वाढ नी घट तया नच कांहि कार्य ।
सर्वत्र तो बसुनिया नच की दिसे तो
     ज्ञानस्वरूप गमतो बहु त्या शरीरीं ॥ ३८ ॥
अंडीं नि नाळ धरती अन घाममार्गीं
     जे जन्मती तयि वसे मुळि प्राण एक ।
झोपेत गर्व नसतो परि होय जागा
     राही स्मृती हिच असे मुळि प्राणशक्ती ॥ ३९ ॥
चित्तास वृत्तिजधि हो हरिपादपद्मी
     भक्तीच अग्निपरि जाळितसे मळाला ।
होताचि शुद्ध मन ते मग तत्व भेटे
     जैं डोळसास दिसतो रविचा प्रकाश ॥ ४० ॥
राजा निमिने विचरिले-
( अनुष्टुप्‌ )
कर्मयोग कथा आता ज्या द्वारे सत्वरी अम्हा ।
शुद्ध होवोनि कर्माचे नैष्कर्म्य ज्ञान लाभ हो ॥ ४१ ॥
एकदा हाच मी प्रश्न पुसला पितया पुढे ।
सनकादिक संताना सर्वज्ञ असुनि तये ॥
न दिले उत्तरो त्याचे काय कारण ते असे ॥ ४२ ॥
योगीश्वर आविर्होत्र म्हणाले-
कर्माकर्म विकर्मो हे वेदवाद न लौकिक ।
वेद हे ईश्वरी रूप तात्पर्या ते कठीणची ॥
अभिप्राय करोनिया चुकती श्रेष्ठ ते मुनी ॥ ४३ ॥
अपरोक्ष असे वेद बाळाला नच बोलले ।
कर्मनिवृत्ति ते कर्म गुळांत औषधी जशी ॥ ४४ ॥
अज्ञानवश ते लोक वेदांचा मार्ग सांडिती ।
अधर्म घडतो तेणे भवाचा फेर तो पडे ॥ ४५ ॥
फळाची सोडुनी आशा कृष्णार्पणचि कर्म ते ।
करावे लाभते तेणे निवृत्ति ज्ञान सिद्धि ती ॥
व्हावया रुचि कर्माची स्वर्गादी फळ वर्णिले ॥ ४६ ॥
शीघ्रातिशीघ्र तो इच्छी मुक्ती तेणेचि वैदिक ।
तांत्रीक दोन्हि या मार्गे भजावा भगवान्‌ पहा ॥ ४७ ॥
मेळवा गुरुसेवेने शिकावा विधि सर्व तो ।
प्रीय मूर्ति तया द्वारा भजावा पुरुषोत्तम ॥ ४८ ॥
शुद्ध संमुख होवोनी प्राणायामादि ते करा ।
मंत्र नी देवता यांनी न्यासे तो हरि पूजिणे ॥ ४९ ॥
सामग्री करणे शुद्ध निर्माल्य त्यजिणे पहा ।
मंत्राने शिंपडा पाणी अर्घ्याने पात्र स्थापिणे ॥ ५० ॥
एकाग्र चित्त योजोनि करावा न्यास तो पुन्हा ।
प्रतिमा अथवा चित्ती भगवान्‌ पूजिणे असा ॥ ५१ ॥
सांगोपांग समंत्रे नी सपार्षद पुजा तया ।
अर्घ्य आचमने पाद्ये स्नाने वस्त्रे नि भूषणे ॥ ५२ ॥
अक्षता गंध माळा नी नैवेद्य धूप दीप या ।
विधिने पूजुनी त्याला स्तवुनी नमिणे तया ॥ ५३ ॥
ध्यानही असता तैशी भगवत्‌ मूर्ती ध्यावि ती ।
निर्माल्य शिरि घेवोनि युक्त स्थानास मूर्ति ती ॥
स्थापावी पुढती ऐशी पूजा संपन्न ती करा ॥ ५४ ॥
अग्नि सूर्य जलो किंवा अतिथी हृदयात त्या ।
आत्मरूप पुजे जो तो शीघ्रची मुक्त होतसे ॥ ५५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ ३ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP