समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २ रा

वसुदेवाकडे नारदजी येतात व जनक नि योगेश्वरांचा संवाद सांगतात -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्री शुकदेवजी सांगतात -
( अनुष्टुप )
देवर्षि भेटण्या कृष्णा इच्छितीच सदैव नी ।
वारंवार तिथे जाती जेथे शाप न दक्षाचा ॥ १ ॥
ब्रह्मादी कोण ते राजा मुकुंदचरणांबुजा ।
नेच्छिती घेरिता मृत्यु मंगलोपद सेविण्या ॥ २ ॥
एकदा वसुदेवाच्या घरी नारद पातले ।
विधीने पूजुनी त्यांना वसुदेवे विचारिले ॥ ३ ॥
वसुदेवजी म्हणाले-
येता माता पिता तैसे घरासी साधुसंत ते ।
दिवाळी दसरा तोचि कल्याणा हिंडता तुम्ही ॥ ४ ॥
देवचरित्र जीवांना दुखवी सुखवी कधी ।
संतांची कृति ती नित्य प्राण्यांकल्याण साधिते ॥ ५ ॥
जो ज्या भावे भजे देवां देवही फळ तैचि दे ।
दीनवत्सल ते संत कर्माला नच इच्छिती ॥ ६ ॥
तरीही पुसतो मी ते धर्म साधन प्रश्र्न की ।
श्रद्धेने ऐकता ज्याने भवाचे भय ना उरे ॥ ७ ॥
आदल्या जन्मि मी केले तप ते भगवान मला ।
मिळावे पुत्र रूपाने लीलेने मोहिलो तदा ॥ ८ ॥
सुव्रता उपदेशावे जन्म मृत्यु-भवातुनि ।
सहजी तारण्या कांही मोहिती सुख दुःख ते ॥ ९ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
बुद्धिमान वसुदेवाने हरिचे गुण रूप ते ।
जाणण्या पुसला प्रश्र्न तन्मयी हो-उनी तदा ॥१०॥
नारदजी म्हणाले-
छान हा पुसला प्रश्र्न तुम्ही तो यदुश्रेष्ठजी ।
धर्म भागवतो ऐसा विश्वकल्याण होतसे ॥ ११ ॥
हा असा एकची धर्म स्मरता ऐकता वदो ।
हृदयी धरिता त्याचक्षणि पावन जीव हो ॥ १२ ॥
पापी पावन ते होती करिता किर्तने अशी ।
स्मरणा वदले तुम्ही देव नारायणो मम ॥ १३ ॥
आज जे पुसले तुम्ही त्याचा तो इतिहास ते ।
सांगती संत संवाद ऋषभपुत्र जे नऊ ॥
योगीश्वर महात्म्यांचा, विदेहीचेच बोलणे ॥ १४ ॥
मनु स्वायंभुवा पुत्र प्रियव्रता पुढे तसे ।
आग्नीध्र त्यासि तो नाभ नाभा ऋषभ तो पुढे ॥ १५ ॥
वासुदेवांश ते होते मानिती शास्त्र सर्व ते ।
मोक्षधर्मोपदेशीच जाहले शतपुत्र त्यां ॥ १६ ॥
भरत श्रेष्ठ तो त्यात भक्त नारायणास जो ।
अजनाभ यया वर्षा भारतो नाम त्याचिये ॥
देश भारत हा श्रेष्ठ आहे हा की अलौकिक ॥ १७ ॥
पृथ्वीचे भोगुनी राज्य अंति ते वनि पातले ।
त्रिजन्म तप ते झाले भगवान भेटले तदा ॥ १८ ॥
उरले नऊ ते होते नऊ द्वीपास भूपती ।
एक्यांशी जाहले विप्र कर्मकांडपरायण ॥ १९ ॥
भाग्यवान नऊ ते झाले संन्यासी अधिकारि जे ।
मेळिली आत्म विद्या नी दिगंबरचि राहिले ॥
अधिकार बघोनीया बोधिती वस्तुरूप की ॥ २० ॥
कवि हरी अंतरीक्ष प्रबुद्ध पिप्पलायन ।
अविर्होत्र द्रुमीलो नी चमसो करभाजन ॥ २१ ॥
असे ते भगवद्‌रूप विश्वाला जाणुनि पहा ।
हिंडती पृथिवी सर्व स्वच्छंद मोदपूर्ण ते ॥ २२ ॥

(वसंततिलका)

वाटेल तेथ फिरती सुर सिद्धयांत
     गंधर्व यक्ष नर कीन्नर नागलोकी ।
मुक्तो भ्रमंति मुनि चारण भूत लोकीं
     विद्याधरो द्विज नि गो भुवनात सर्व ॥ २३ ॥

(अनुष्टुप्‌)

एकदा भारता मध्ये महान यज्ञ चालला ।
नवू योगेश्वर तेथे पोचले यज्ञ मंडपी ॥ २४ ॥
सूर्यकांत अशा यांना निमिने पाहिले असे ।
अग्नि ऋत्विज नी विप्र स्वागता राहिले उभे ॥ २५ ॥
विदेहनृपते त्यांना घातली श्रेष्ठ आसने ।
संत जाणोनिया त्यांना आनंदे पूजिले पहा ॥ २६ ॥
ब्रह्मपुत्रांपरी बंधू तेजे तळपती तदा ।
नमोनि प्रेमभावाने राजाने प्रश्र्न टाकिला ॥ २७ ॥
विदेहराज निमि म्हणाला -
हरिचे पार्षद तुम्ही वाटता मजला पहा ।
संसारी प्राणिमात्रांना फिरता तारण्या असे ॥ २८ ॥
दुर्लभो मानुषी देह क्षणभंगुर तो परी ।
अशा या जीवना मध्ये संत दर्शन दुर्लभ ॥ २९ ॥
म्हणोनी पुसतो प्रश्न कल्याणरूप काय ते ।
अर्धाही क्षण सत्संग मोठाचि लाभ मानवा ॥ ३० ॥
अधिकार जसा माझा तसे ते सांगणॆ तुम्ही ।
जयाने पावतो कृष्ण शरणागतवत्सल ॥ ३१ ॥
देवर्षि नारद सांगतात-
भगवतप्रेमि संतांना निमिने वसुदेवजी ।
पुसता अभिनंदोनी सर्वांना मुनि बोलले ॥ ३२ ॥
कविजी म्हणाले-
(इंद्रवजा)
उपासिता अच्युत नित्य राही
     त्या भक्त्राजाहृदयात क्षेम ।
उदविग्न तो हो मग प्रपंची
     निवृत्ति लाभे भजता हरीला ॥ ३३ ॥
(अनुष्टुप)
भोळया भाळ्याच भक्तांना पावतो श्रीहरी स्वयें ।
स्वमुखे वदला धर्म भागवत असाचि जो ॥ ३४ ॥
भागवत पथी जाता विघ्ने ती नच बाधिती।
डोळे झाकोनिया धावा त्रुटि वा वंचना नसे ॥ ३५ ॥
(इंद्रवजा)
काये नि वाचे मन इंद्रियानी
     बुद्धि स्वभावे करि कर्म जे जे ।
अनेक वा एकचि जन्मि सर्व
     नारायणा अर्पुनि टाकणे की ॥ ३६ ॥
नी विन्मुखासी रुप विस्मृती हो
     मनुष्य देवो भ्रम मानितात ।
देहादि मध्ये भय साचलेले
     म्हणोनि ध्यावे गुरुमार्गी देवा ॥ ३७ ॥
आत्म्याविना ती नच वस्तु ऐशी
     ध्याताचि येते प्रचिती तयाची ।
विकल्प संकल्प त्यजोनि देता
     जीवास होते परमात्म प्राप्ती ॥ ३८ ॥
लीला किती मंगल श्रीहरीच्या
     कित्येक नामे स्मरतात गाता ।
सोडोनि लज्जा गुणगान गावे
     स्थानादि सारे त्यजिता फिरावे ॥ ३९ ॥
व्रतास या घेउनि कीर्ति गाता
     प्रेमांकुरो ये द्रवताचि चित्ती ।
हासे रडे तो मग उच्च हो जैं
     नाचे नि गातो हरिरूप होता ॥ ४० ॥
आकाश वायू जल अग्नि पृथ्वी
     तारे दिशा वॄक्ष नद्या समुद्रीं ।
दिसे तयाला हरिरूप सर्व
     नी भक्ती भावे नमितो तयांना ॥ ४१ ॥
क्षुधा नि तुष्टी अन पुष्टि सर्व
     प्रत्येक ग्रासी मिटते सवेची ।
क्षणा क्षणाला तई भक्तराजा
     वैराग्य ते प्रेम नि रूप लाभे ॥ ४२ ॥
प्रतिक्षणाला भजता असा तो
     ती प्रेमभक्ती नि विरक्ती लाभे ।
होतो तदा भागवतस्वरूपी
     नी शांति घेतो परमो अशीच ॥ ४३ ॥
राजा निमिने विचारले-
(अनुष्टुप)
आता भागवताची ती लक्षणे धर्म भाव तो ।
सांगावे वागती कैसे बोलती प्रीयभक्त जे ॥ ४४ ॥
योगी हरिजी म्हणाले-
आत्मस्वरूप भगवान जीवात स्थित नित्य तो ।
प्रभूची पाहि जो सत्ता तो भागवत उत्तम ॥ ४५ ॥
भजे नी सेवि जो संता अज्ञांना मार्गि लावि जो ।
उपेक्षी जो अभक्तासी तो भागवत मध्यम ॥ ४६ ॥
मूर्तीला पूजि जो श्रद्धे परी ना संत सेवि तो ।
साधारण असा भक्त तो भागवत मानणे ॥ ४७ ॥
शद्बरूपादि विषया जाणितो परि आपुल्या ।
इच्छे विरुद्ध विषया न दुःखी नच हर्ष हो ॥
जाणी त्यां भगवतमाया तो भागवत उत्तम ॥ ४८ ॥
(इंद्रवज्रा)
देहेंद्रियें प्राण मने मतीने
     जन्म क्षुधा नी भय कष्ट तृष्णा ।
ना आठवे ज्या नच मोह होतो
     तो उत्तमो भागतोचि जाणा ॥ ४९ ॥
(अनुष्टुप्‌)
न काम कर्म बीजांच्या वासना मनिं येत तो ।
वासुदेवी रमे नित्य तो भागवत उत्तम ॥ ५० ॥
शरीर कुल नी भक्ती कर्म वा वर्ण आश्रमा ।
अहंभाव न जातीचा कृष्णाचा भक्त प्रीय तो ॥ ५१ ॥
धन संपत्ति देहासी समभाव नि शांत जो ।
संकल्पी नच विक्षिप्त तो भागवत उत्तम ॥ ५२ ॥
(पुष्पिताग्रा)
ऋषि मुनि नित ध्याति चित्ती त्यासी
     क्षण्भर त्यागुनि ना कुठेच जाती ।
त्रिभुवन धन देउनि न चित्ती
     विचलित हो जन श्रेष्ठ भक्त त्याचा ॥ ५३ ॥
भगवत व्रजि क्रीडला नखे ज्या
     नख मणिचंद्र बघुनि ताप जाये ।
नच पुढति गमे तयास पुन्हा
     शशि उदये रवि ताप हो न जैसा ॥ ५४ ॥
हृदयी रमुनि राहि श्रीहरि त्या
     जरि तई नाम वदेचि भक्त फक्त मुखी ।
हरि धरि हृदि प्रेमदोर पाया
     विमलचि भागवतो नि श्रेष्ठ सर्वां ॥ ५५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥ ११ ॥ २ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP