[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यासनंदनभगवान श्री शुकदेवजी सांगतात-
( अनुष्टुप )
बळिरामासवे कृष्णे यदुवंशासवे तसे ।
कौरवो पांडवो यांच्या निमित्ते भार हारिला ॥ १ ॥
( वसंततिलका )
ओढोनि केश सतिचे अन द्यूतयोगे
त्या पांडवा दुखविले जधि कौरवांनी ।
त्या कारणास करुनी नृप कैक युद्धी
कृष्णो वधी अन हरी भुमिभार सारा ॥ २ ॥
रक्षोनि पांडव स्वयेचि तयां कराने
मारीयले नृप तरी बहुभार राही ।
हा वंश तो अजयची परी राहिला नी
तो भार कायमचि या भुमिसी उरे कि ॥ ३ ॥
केला विचार हरिने मम आश्रयाने
हे मातले यदुविरो धन शक्ति योगे ।
वंशाग्नि जै भडकतो तई पेटवोनी
होईल शांत मग मी निज धाम पावे ॥ ४ ॥
( अनुष्टुप )
सत्यसंकल्प तो कृष्ण निश्चयो करुनी मनी ।
द्विजशाप रचोनीया स्वधामा सर्व आणिले ॥ ५ ॥
स्वमूर्ति लोकलावण्य लोचने वाणिही मधु ।
उपदेश करी दिव्य मधुरा वाणिने पहा ॥
स्मरता हरि तो चित्त त्रिलोकसुंदरो पदा ।
पाहती पदचिन्हाते लागती नित्य ध्यावया ॥ ६ ॥
पसरी यशकिर्तीते सुकवी गाति कैक ते ।
कार्यपूर्ण करोनिया स्वधामा कृष्ण पातले ॥ ७ ॥
राजा परीक्षीताने विचारले -
द्बिजभक्त यदूवंश उदार वृद्धसेवक ।
कृष्णासी असता चित्त शाप त्यांना कसा मिळे ॥ ८ ॥
रूप नी कारणे त्याची कशी ते सांगणे अम्हा ।
स्वामी कृष्ण असोनिया यादवी माजली कशी ? ॥ ९ ॥
श्री शुकदेवजी सांगतात-
( वसंततिलका )
कृष्णो रुपो सकलसुंदरसारसर्व
कल्याणिआचरण तो हरि वर्तला तै ।
तो पूर्णकाम, रमला अन कीर्ति स्थापी
संहार होय सगळा उपचार हा की ॥ १० ॥
ते पूण्यकार्य हरिने सकलार्थ केले
जे गायिता कलिमलो मुळि नष्ट होतो ।
नी आज कालरुप घेउनि राहि तेथे
श्रीउग्रसेन नॄपच्या निज द्वारकेसी ॥ ११ ॥
( अनुष्टुप )
विश्वामित्रोऽसितो कण्व दुर्वास भृगु अंगिरा ।
कश्यपो वामदेवो नी वसिष्ठ अत्रि नारद ।
निरोप द्यावया आले पिंडकारण्यि तेधवा ॥ १२ ॥
उदंड यदुपुत्रो ते खेळता एकदा तिथे ।
स्त्रियेचा वेष घेवोनि पातला सांब तेधवा ॥ १३ ॥
आले नी नमुनी खोटा प्रश्न त्यांनी विचारिला ।
कामाक्षी पुसणे इच्छी परी गर्भार लाजते ॥ १४ ॥
अगाध तुम्हि तो ज्ञानी इच्छीते पुत्रची मनीं ।
प्रसवो जवळी आला वदावे काय होइल ॥ १५ ॥
नृपा ! ते इच्छीती पुत्र मुनीला फसवावया ।
बोलले मुनि क्रोधोनि होइल मुसळो हिला ।
तुमच्या कुळिचा सर्व करील नाश जे पहा ॥ १६ ॥
मुनिंचे ऐकता शब्द भिले सर्वचि पुत्र ते ।
सांबाचे फेडिता वस्त्र लोहाचे मुसळो निघे ॥ १७ ॥
वदले केवढा झाला अनर्थ भाग्यहीन हा ।
मुसळा घेतले आले सर्वची द्वाराकापुरी ॥ १८ ॥
म्लानमुख असे झाले सभी मुसळ घेवोनि ।
वदले उग्रसेनाला घडले सर्व जे तसे ॥ १९ ॥
ऐकता शापवाणी ती विस्मीत भयभीतही ।
जाहले लोक ते सारे द्विजवाक्य खरे घडे ॥ २० ॥
उग्रसेने मुसळाचे केले ते पीठ पीठ नी ।
राहिले तुकडे सर्व समुद्रीं फेकलें पहा ॥
कृष्णाला उग्रसेनाने कांहीच पुसले नसे ॥ २१ ॥
माशांनी गिळिले खंड किनारी पातला चुरा ।
कांही दिनात त्याचेची उगवे तीक्ष्ण ते तृण ॥ २२ ॥
व्याधे पकडिता मासे जाळ्यात त्याही मासळ्या ।
लागल्या गिळिले ज्यांनी तुकडॆ मुसळाचिये ॥ २३ ॥
समर्थ असुनी कृष्ण शांतची राहिला तदा ।
काळरूप अशा कृष्णे शापाला अनुमोदिले ॥ २४ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हा ॥ ११ ॥ १ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥