समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ९० वा

भगवान् कृष्णाच्या लीला विहाराचे वर्णन -


Download mp3

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
सुखाने राहिला कृष्ण द्वारकीं लक्षुमीपती ।
सर्व संपन्नता तेथे मेळिली यादवीनरे ॥ १ ॥
मार्गी नगरिच्या योद्धे अश्व नी मत्त हत्ति ते ।
सुवर्ण रथ तै नित्य बाजारी फिरती पहा ॥ २ ॥
उद्याने पुष्प पर्णांच्या वृक्षांनी दाटले तिथे ।
भुंगे नी पक्षि ते गाती वीर तै भाग्य मानिती ॥ ३ ॥
वेषभूषी स्त्रिया नित्य यौवना शिंपिती तिथे ।
दिसता अंग ते थोडे विजेचा भास होतसे ॥ ४ ॥
सोळाहजार पत्‍न्यांशी रमे तो प्राण वल्लभ ।
जाया त्या तेवढी रूपे घेवोनी कृष्ण राहिला ॥ ५ ॥
स्वतंत्र त्या महालांसी तळ्यात कंज शोभले ।
हंस सारस इत्यादी पोहती पक्षि त्यात की ॥ ६ ॥
कधी तेथे नदी मध्ये पत्‍न्यांसी रमला हरी ।
स्तनीचा लेप तो लागे कृष्ण अंगास की तदा ॥ ७ ॥
गाती गंधर्व तेंव्हा नी वंदी मागध नी सुत ।
मृदंग ढोल नी वीणा छेडिती वाद्यही तदा ॥ ८ ॥
पिचकार्‍या भरोनीया कृष्णासी त्या स्त्रिया कधी ।
भिजविती तदा वाटे कुबेर यक्षिणीच त्या ॥ ९ ॥
( वसंततिलका )
मांड्या नि वक्ष भिजता दिसती मधून
     पुष्पे गळोनि पडती, पिचकारि घेण्या ।
जाती स्त्रिया नि करिती हरि अंगस्पर्श
     वाढेचि प्रेम हरिचे अन हास्य होई ॥ १० ॥
राण्यांस्तनीचि उटिने वनमाल रंगे
     उन्मुक्त भाव भरता हलती बटा की ।
राण्या नि कृष्ण भिजवी वरचेवरी नी
     वाटे जणू करि तिथे गज तो विहार ॥ ११ ॥
( अनुष्टुप् )
क्रीडुनी भगवान् ऐसे पत्‍न्यांच्यासह वस्त्र नी ।
अलंकार उतरोनी देती त्या नर्तिकेस की ॥ १२ ॥
विहार करिता ऐसा हासणे पाहणे तसे ।
आलिंगिता हरी त्यांना न राही भान ते मुळी ॥ १३ ॥
सर्वस्व कृष्ण तो त्यांचा श्यामसुंदर लोचन ।
समीप असुनी कृष्ण विरहे रडती कधी ।
उन्मादे बोलती तैशा विसंगतचि ते असे ॥ १४ ॥
राण्या म्हणतात -
( मालिनी )
कुररि रजनी झाली, दाटला अंधकार
     हरि तर निज तो हा बोध सारा मिटूनी ।
करिशि सजनि शोका जागुनी रात्रिशी का
     कमलनयन कृष्णे पाहता होय ऐसे ॥ १५ ॥
( वसंततिलका )
रात्री कशास करिसी तव नेत्र बंद
     गावास का पति तुझा निघुनीच गेला ।
ना ना तुझेचि गुण श्री हरितो हिरावी
     ते काय दुःख तुजला नच औषधी ज्या ॥ १६ ॥
( इंद्रवज्रा )
हे सागरा गर्जसि तू सदाचा
     का जाहला तो तुज रोग तैसा ।
का घेतले श्रीहरिने गुणाते
     का व्याधि ऐशी नच औषधी ज्या ॥ १७ ॥
( वसंततिलका )
कां जाहला क्षय तुला शशिदेव ऐसा
     नाही मुळीच तम तू हटवू शके की ।
का स्वामि शब्द करिता तव बंद वाचा
     चिंतेत काय असशी हरिच्या परी तू ॥ १८ ॥
( अनुष्टुप् )
मलया त्रासिशी का रे हृदयीं काम निर्मिशी ।
माहीत तुज का तैसे हरीने चित्त बांधिले ॥ १९ ॥
( मंदाक्रांता )
मेघावर्णो तवचि परि तो कृष्ण मित्र का रे ।
     आता तू तो नयन मिटुनी ध्यासि का त्या हरी ला ॥
उत्कंठेने हृदय भरुनी ओतिशी अश्रु ऐसे ।
     श्यामो मेघा हरिसि धरिता संकटो ये घरासी ॥ २० ॥
( वियोगिनी )
करितेसचि कोकिले रवा
     वदसि कृष्णस्वारापरि अशी ।
तव वाणि सुधे परि असे
     मृतप्रेमा उठवोनि प्रेरिशी ॥ २१ ॥
( पुष्पिताग्रा )
न चलसि न वदो उदार बुद्धे
     क्षितिधरा मनि चिंतितोस काय ।
स्तन अमुचि जसे रुपो तुझे
     म्हणुनी हरिपद घ्यावया स्मरे कां ? ॥ २२ ॥
( वसंततिलका )
हा ग्रीष्म होय सरिते सलिलो न कुंडी
     ना कंज तेथ खुलले कृश देह झाला ।
आम्ही हरीस स्मरता कृश जैचि झालो
     मेघास त्या स्मरुनि का अति दीन झाली ॥ २३ ॥
( शार्दूलविक्रीडित )
या हो हंस बसा असे बसुनिया सांगा हरीच्या कथा
     आम्ही तो समजो तुम्हास हरिचे ते दूत कैसे हरी ।
त्याची मैत्रि अशी हरी कुशल ना तू क्षूद्रचा दूत कां
     लक्ष्मीशी रत तो न कां कुणि तशी आम्हात रूपी गुणी ॥ २४ ॥
( अनुष्टुप् )
कृष्णपत्‍न्या असा भाव कृष्णासी नित्य ठेविती ।
म्हणोनी लाभले त्यांना श्रेष्ठची पद ते पहा ॥ २५ ॥
कितेक परि या लीला गीतीं गाती कितेक त्या ।
हरी तो हरितो चित्ता स्त्रियांचे भाग्य केवढे ॥ २६ ॥
जगद्‌गुरू असा ज्यांनी कृष्ण तो पति मानुनी ।
न्हाविले चेपिले पाय जेवूं खाऊ हि घातले ।
तप ते काय वर्णावे भाग्य थे श्रेष्ठची असे ॥ २७ ॥
संतांचा आसरा कृष्ण वेदोक्त वागुनी तये ।
दाविले घरची धर्म अर्थ कामार्थ साधन ॥ २८ ॥
गृहस्थोचित त्या धर्मे कृष्ण ते वागले पहा ।
सोळा हजार आणीक एकशे आठ त्या स्त्रिया ॥ २९ ॥
रुक्मिणी आदि त्या पट्टराण्या नी पुत्र त्यांचिये ।
क्रमाने बोललो सर्व पूर्वीच आपणा पुढे ॥ ३० ॥
उरल्या त्याहि पत्‍न्यांना प्रत्येकी दशपुत्र ते ।
अशक्य काय तो त्याला संकल्प शक्तिमान् हरी ॥ ३१ ॥
त्यातील आठरा पुत्र होते थोर महारथी ।
यश ज्यांचे जगामध्ये नावे त्यांचीच सांगतो ॥ ३२ ॥
प्रद्युम्न अनिरुद्धो नी दीप्तिमान् भानु सांब नी ।
मधु वृक बृहद्‌भानु चित्रबाहू अरुण नी ॥ ३३ ॥
पुष्करो वेदबाहू नी श्रुतदेव सुनंदन ।
चित्रबाहू विरूपो नी न्यग्रोध कवि ही तसा ॥ ३४ ॥
राजेंद्रा कृष्णपुत्रात प्रद्युम्न श्रेष्ठ तो असे ।
गुणांनी आपुल्या सर्व पित्याच्या समची असे ॥ ३५ ॥
रुक्मिची वरिली पुत्री प्रद्युम्ने त्या महारथे ।
तिच्या गर्भे तया झाला अनिरुद्ध महाबळी ॥ ३६ ॥
मामाची मुलगी तेणे वरिली रूपवान् पहा ।
वज्र तो जन्मला जो की शापात एक वाचला ॥ ३७ ॥
वज्राचा प्रतिबाहू नी तयाचाच सुबाहु तो ।
शांतसेनो सुबाहूचा शतसेन तया पुढे ॥ ३८ ॥
न कोणि वंशि त्या झाला निर्धनो अल्प आयु नी ।
अल्पशक्ति असा कोणी, सर्वची द्विजभक्त ते ॥ ३९ ॥
यशस्वी यदुवंशात पुरूष जाहले बहू ।
तयांची मोजण्या संख्या हजार वर्ष ना पुरे ॥ ४० ॥
तीन कोटी नि अठ्ठाविस् लक्ष आचार्य तेधवा ।
मुलांना यदुचा होते विद्या ती शिकवावया ॥ ४१ ॥
तदा त्या वंशिची संख्या मोजुनी सांगणे कसे ।
उग्रसेना महापद्म सैनीक एकट्याचिये ॥ ४२ ॥
असूर देवसंग्रामी मेलेले दैत्य ते पुन्हा ।
माणुसी रूपि जन्मोनी गर्वाने त्रासिती जनां ॥ ४३ ॥
तयांना मारण्या याची कुळी ते जन्मले पहा ।
एकशे एक ही त्यांच्या कुळाची गणती असे ॥ ४४ ॥
सर्व ते भगवान् कृष्णा आपुला स्वामि मानिती ।
संबंधी यदुवंशाचे तेही उन्नत जाहले ॥ ४५ ॥
चित्त ते यदुवंशींचे सदैव कृष्णि गुंतले ।
न शुद्ध राहिली त्यांना नित्यकर्माचिही तशी ॥ ४६ ॥
( स्रग्धरा )
गंगाजी तीर्थ श्रेष्ठो परि महति हरी जन्मता अल्प झाली ।
लक्ष्मीसी ध्याति देवो परि हरि पदिती ती नित्य सेवेत राही ।
नामाची थोरवी की जरि मनि स्मरले एकवेळेचि श्रद्धे ।
नष्टेपापो धरेच नवल मुळिच ना भार हारी स्वचक्रे ॥ ४७ ॥
( मालिनी )
सकल जन निवासो जन्मिला देवकी ने
     यदुकुल पद त्याचे सेविते धर्म मार्गे ।
हसुनि हरि बघे तो प्रेमवर्षाव होई
     जय जय जगती हा श्री जेयी एकला तो ॥ ४८ ॥
( वसंततिलका )
स्थापोनि धर्म हरि तो स्वय आचरे की
     लीला मनात स्मरता भवबंध नष्टे ।
ज्यांना हवाचि अधिकार पदास जाण्या
     त्यांनी कथाचि हरिची नित ऐकणे की ॥ ४९ ॥
श्रीमत्‌कथा श्रवण कीर्तन चिंतनाने
     ते कालचक्र भजका अन्च त्रासिते की ।
ते श्रेष्ठ धाम मिळण्या तपि थोर गेले
     लीला म्हणोनि भजके भजनात गाव्या ॥ ५० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नव्वदावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP