श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
सरस्वती नदीकाठी एकदा यज्ञ योजिण्या ।
बसता चालला वाद श्रेष्ठ तो कोण देव हो ॥ १ ॥
परीक्षा पाहण्या तेंव्हा भृगुंना पाठवीयले ।
ब्रह्मा शिव नि विष्णूच्या भेटीला या क्रमे तसे ॥ २ ॥
ब्रह्माजींच्या सभी जाता वंदिले नच ते तयां ।
तेजाने तापले ब्रह्मा क्रोध तो जाहला असा ॥ ३ ॥
ब्रह्म्याने पाहिले हा तो आपुला पुत्रची असे ।
विवेके जाहले शांत अग्नि जै शांत हो तसा ॥ ४ ॥
पुन्हा कैलासि ते गेले शंकरे पाहता भृगु ।
आलिंगुनी तदा शंभु स्वागता वदलेहि या ॥ ५ ॥
परंतु भृगुने त्यांचा स्वागता न स्विकारिले ।
वदले वेद आज्ञेला तुम्ही तो नच मानिता ।
ऐकता तापले शंभू मारण्या घेतला त्रिशू ॥ ६ ॥
परी पार्वतिने त्यांच्या पायासी लागुनी तयां ।
केले शांत, तदा विप्र पातले विष्णुशी पुन्हा ॥ ७ ॥
विष्णु तै झोपले होते लक्ष्मीजीच्या कुशीत तै ।
भृगुंनी मारिली लाथ विष्णु तै उठले पहा ।
विनम्र होवुनी त्यांनी भृगुला नमिले असे ॥ ८ ॥
सुस्वागतम् तुम्हा ब्रह्मन् माहीत नव्हते मला ।
म्हणोनी स्वागता लागी न आलो असुद्या क्षमा ॥ ९ ॥
कोवळे तुमचे पाय भृगुजी हो महामुनी ।
वदोनी धरिता पाय विष्णु ते चेपु लागले ॥ १० ॥
वदले तुमच्या पायें पाण्याचे तीर्थ होतसे ।
कृपया मम वैकुंठा पवित्र करणे द्विजा ॥ ११ ॥
तुमच्या पदस्पर्शाने संपले मम पाप ते ।
वक्षाच्या पदचिन्हासी राहील नित्य लक्षुमी ॥ १२ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
गंभीर बोलता विष्णु महर्षि भृगु हे अता ।
जाहले सुखि नी तृप्त आनंदे कंठ दाटलो ॥ १३ ॥
परीक्षित् ! भृगुजी आले सत्संगी परतोनिया ।
तिघांच्या त्या प्रसंगाला वर्णिले त्या सभेत तै ॥ १४ ॥
विस्मयो जाहला सर्वां संदेह मिटला असे ।
विष्णुला मानिले सर्वे शांत नी अभयाश्रयो ॥ १५ ॥
भगवान् विष्णुने साक्षात् लाभते धर्म ज्ञान नी ।
वैराग्य आठि ऐश्वर्य यशही शुद्ध लाभते ॥ १६ ॥
अकिंचन समा शांत साधुंचा अभयो हरी ।
गतिही एक तो विष्णु सर्व शास्त्रास मान्य हे ॥ १७ ॥
सत्त्व त्याची प्रिय मूर्ति द्विज ते इष्ट देवता ।
विवेकी शांत निष्काम भजती त्याजला जन ॥ १८ ॥
राक्षसासुर नी देव मायेने मूर्ति निर्मि तो ।
सत्त्वाची देवमूर्ती ती प्राप्तीचे साधनो तया ।
पुरुषार्थ असा रूपी स्वयं विष्णुचि तो असे ॥ १९ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
सरस्वती नदीकाठी जमले सर्व जे ऋषी ।
संशयो सर्व लोकांचा मिटाया योजिले असे ।
तयांनी भजता विष्णु गति उत्तम घेतली ॥ २० ॥
श्रीसूत सांगतात -
( प्रहर्षिणी )
कीर्ति ही अशि हरिची भवास नष्टी
श्रीव्यासोतनय मुखी सुधाचि धारा ।
संसारी पथिक पिता न तो थके की
विश्वी या भटकत तो जरी फिरे की ॥ २१ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
एकदा द्वारकेमाजी द्विजेला पुत्र जाहला ।
जन्मताचि परी मेला धरेचा स्पर्श हो क्षणी ॥ २२ ॥
बाळाचे प्रेत त्या विप्रे घेतले द्वारि पातला ।
विलाप करुनी मोठा दुःखाने बोलु लागला ॥ २३ ॥
द्विजद्वेषी नि कृपणो धूर्त ते राजकर्म की ।
म्हणॊनी मम हा बाळ मेलासे वाटते मला ॥ २४ ॥
हिंसाप्रीय असा राजा अजितेंद्रिय तो म्हणा ।
नृपती म्हणता त्याला दारिद्य दुःख भोगणे ॥ २५ ॥
अल्पायु जन्मती बाळे वदता विप्र तो असे ।
टाकिले प्रेत द्वारासी गेला कृष्णास भेटण्या ॥ २६ ॥
मेलेले बाळ टाकोनी कृष्णाला भेटला द्विज ।
तिथे अर्जुनही होते ऐकता बोलले द्विजा ॥ २७ ॥
ब्रह्मन् ! या द्वारके माजी न कोणी का धनुर्धर ।
यदु हे वाटती विप्र जणू यज्ञात गुंतले ॥ २८ ॥
धन स्त्री अथवा पुत्र-वियोगे दुःखि जै द्विज ।
राज्याचे क्षत्रियो तेंव्हा व्यर्थची नट ते जसे ॥ २९ ॥
शोकात बुडले तुम्ही रक्षितो तुमची प्रजा ।
प्रतिज्ञा जर हो खोटी तर मी जाळितो स्वयां ॥ ३० ॥
ब्राह्मण म्हणाला -
वासुदेव बळीराम प्रद्युम्न वीर थोर तो ।
अनिरुद्ध असा योद्धा न समर्थ कुणी तसा ॥ ३१ ॥
न शके रक्षु तो कृष्ण तुजला शक्य ते कसे ।
मूर्खता वाटते सर्व विश्वास नच मी धरी ॥ ३२ ॥
अर्जुन म्हणाला -
न मी संकर्षणो विप्रा प्रद्युम्न कृष्णही न मी ।
अर्जुनो मम हे नाम विख्यात गांडिवो धनु ॥ ३३ ॥
तिरस्कार न व्हावा जी शौर्ये मी शिव तोषिला ।
युद्धात जिंकितो मृत्यू आणितो बाळ ते पुन्हा ॥ ३४ ॥
आश्वासिता असा पार्थ प्रसन्न विप्र जाहला ।
बल पौरुष गावोनी पातला आपुल्या घरा ॥ ३५ ॥
प्रसव समयो येता अर्जुना भेटुनी द्विज ।
या वेळी वाचवा तुम्ही माझे बालक जन्मता ॥ ३६ ॥
अर्जुने ऐकता केले आचम्य शुद्ध त्या जले ।
शंकरा नमिले आणि गांडिवा घेतले करीं ॥ ३७ ॥
अर्जुने मंत्रिले बाण प्रसवगृह घेरले ।
सर्व बाजून तो केला पिंजरा जो सुरक्षित ॥ ३८ ॥
प्रसवली द्विजा तेंव्हा मूल ते लागले रडू ।
पाहता पाहता झाले अंतर्धान नभात की ॥ ३९ ॥
कृष्णा समक्ष तो आता अर्जुना निंदु लागला ।
मूर्ख मी याच षंढाशी विश्वास ठेविला असे ॥ ४० ॥
न प्रद्युम्नो अनिरुद्धो न राम अन केशव ।
वाचवू शकले तेंव्हा कोणा सामर्थ्य या जगीं ॥ ४१ ॥
धिक्कार अर्जुना खोट्या धिक्कार धनुचा तुझ्या ।
मूढ हा आणितो बाळा म्हणे, प्रारब्ध हे असे ॥ ४२ ॥
बरे वाईट ते सारे विप्र तो बोलु लागला ।
संयमनीपुरी तेंव्हा गेला अर्जुन निश्चये ॥ ४३ ॥
न मिळे बाळ ते तेथे तै इंद्र अग्नि निर्ऋति ।
सोम वायु वरुणाच्या पुरासी पातला क्रमे ।
स्वर्गादी सर्व लोकात अन्यान्य स्थानि पातला ॥ ४४ ॥
तरी बाळ न भेटेची तेंव्हा अग्नीत जावया ।
विचार करिता त्याने रोधोनी कृष्ण बोलले ॥ ४५ ॥
स्वताला नच तू द्वेषू दावितो द्विजपुत्र तो ।
आज जे निंदिती ते ते गातील यश ते पुन्हा ॥ ४६ ॥
शक्तिमान् भगवान् कृष्णे समजावुनि त्या सवे ।
रथात बैसता गेले निघोनी पश्चिमेकडे ॥ ४७ ॥
सप्त पर्वत नी द्वीप सप्त सागर लोक ते ।
ओलांडुनि तदा घोर अंधारी कृष्ण पातले ॥ ४८ ॥
अश्व ते शैब्य सुग्रीव मेघपुष्प बलाक हे ।
चुकले मार्ग तो घोर अंधार दाटला असे ॥ ४९ ॥
योग योगेश्वरे कृष्णे चुकता अश्व हे असे ।
हजारो सूर्यतेजाचे सुदर्शनचि योजिले ॥ ५० ॥
( इंद्रवज्रा )
ज्योतिर्मयी तेज असेचि चक्र
कापीत अंधार गतीत चाले ।
श्रीरामबाणो जणु चालला तो
त्या राक्षसांना वधण्यास सार्या ॥ ५१ ॥
अंधारसीमा सरली तदा नी
अपार ज्योतीच झळाळल्या त्या ।
न साहि पार्थो अति तेज तेंव्हा
घेई मिटोनी अपुल्याच नेत्रा ॥ ५२ ॥
जळात नेले हरिने रथाला
तै वादळाने उठल्याहि लाटा ।
महाल तेथे अति श्रेष्ठ होता
झळाळला जो मणिरत्न तेजे ॥ ५३ ॥
नी शेषजी तेथ विराजमान
भयान अद्भूत सहस्रशीर्षा ।
कैलासवर्णी तनु शोभली ती
जिव्हा नि कंठा निलवर्ण शोभे ॥ ५४ ॥
नी शेषशय्यी पुरुषोत्तमाला
सुखात पाही तइ पार्थ त्याची ।
मघापरी कांति नि उच्च वस्त्र
विशाल नेत्रे बहु हास्य शोभे ॥ ५५ ॥
रत्नांकितो तो मुकुटो शिरासी
नी कुंडले नी कुरुळेहि केस ।
त्या लांब बाहू गळि कौस्तुभो नी
श्रीवत्स चिन्हो वनमाळ लोंबे ॥ ५६ ॥
सुनंदनादी हरिपार्षदो नी
चक्रादि चिन्हे करि घेतलेला ।
शक्ती नि सिद्धी नित सेविताना
तो पार्थ पाहि हरि साजिरा हा ॥ ५७ ॥
स्वरूप कृष्णे नैले अनंता
पाहोनि पार्थो भयभीत झाला ।
नी वंदुनी तोहि उभाच ठेला
तै हासुनीया वदला पुरुष ॥ ५८ ॥
मी इच्छिले भेटिसि की तुम्हा हो
नी आणवीले द्विजबाळ येथे ।
घेवोनि अंशा तुम्हि जन्मला तै
त्या दैत्यभारा त्वरि हारिताल ॥ ५९ ॥
( अनुष्टुप् )
नर नारायणो तुम्ही पूर्ण काम ऋषीश्वर ।
तरीही धर्म स्थापावा करावा लोकसंग्रह ॥ ६० ॥
आज्ञापिता असे तेणे प्रणाम करुनी तया ।
आनंदे बाळ ते दोन्ही घेता द्वारकि पातले ॥ ६१ ॥
मुले ती जाहली थोर जसे होते लहान ते ।
द्वयांनी पुत्र ते दोन्ही द्विजाला दिधले तदा ॥ ६२ ॥
विष्णुचे धाम पाहोनी पार्था आश्चर्य जाहले ।
तयाने जाणिले जीवा कृष्णाचे बळ पौरुष ॥ ६३ ॥
परीक्षित् ! भगवंताने केल्या लिला कितेक त्या ।
विषया भोगिले ग्राम्य नृपाच्या परि याजिले ॥ ६४ ॥
आदर्श राहिले कृष्ण श्रेष्ठ त्या पुरुषा सम ।
प्रजा नी द्विजवर्गाचे पूर्ण केले मनोरथ ।
प्रजेच्या साठि जै इंद्र नियमे वर्षितो जलां ॥ ६५ ॥
स्वयें अधर्मि राजांना कितेका अर्जुना करीं ।
मारिले स्थापिला धर्म धर्मराजादिकां करें ॥ ६६ ॥