राजा परीक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
शंकरे त्यागिले भोग परी दैत्य नि माणसे ।
देवता भजता त्याला सुख वैभव भोगिती ।
लक्ष्मीपतीस भजता सुख भोग न लाभती ॥ १ ॥
स्वभाव वेगळा त्यांचा उलटे भक्तिचे फळ ।
लाभते, संशयो मोठा, कृपया जाणु इच्छितो ॥ २ ॥
अह्री शुकदेव म्हणाले -
शक्तियुक्त शिवो तैसे अहंकाराधिदैवत ।
वैकारिक तसे तैजस् तामसो भेद हे त्रय ॥ ३ ॥
अहंकारे तसे सोळा विकार घडती पुढे ।
एकाही त्या विकाराने भजता भोग लाभती ॥ ४ ॥
हरि तो निर्गुणी साक्षात् पुरुषो प्रकृतीपरा ।
सर्वज्ञ साक्षि तो एक भजता निर्गुणो मिळे ॥ ५ ॥
संपता अश्वमेधो तो ऐकता धर्मभाष्य ते ।
पुसला हाहि तै प्रश्न भगवंतासि तेधवा ॥ ६ ॥
समर्थ भगवान् कृष्ण कल्याणा अवतारले ।
धर्माची ऐकुनी शंका प्रसन्ने कृष्ण बोलले ॥ ७ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
ज्याला मी पावतो राजा त्याचे धन हिरावितो ।
न दुःख जाण ते त्याचे संबंधी तोडिती तया ॥ ८ ॥
पुन्हा तो धन मेळाया लागता यश मी न दे ।
होता विरक्त ते चित्त भक्ताच्या येइ आश्रया ।
अहैतुक अशी त्याला कृपा मी वर्षितो तदा ॥ ९ ॥
सच्चिदानंद ते ब्रह्म अनंत लाभते तया ।
कठीण भक्ति ही माझी सामान्य जन ते दुज्या ।
माझ्याचि देवतारूपा भजती हेतु ठेवुनी ॥ १० ॥
त्वरीत आशुतोषाने भक्ता समृद्धि लाभते ।
माजती नी तया देवा द्वेषिती विसरोनिया ॥ ११ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
प्रसाद शाप ही शक्ती तिघांची सारखी परी ।
त्वरे ते पावती दोघे त्वरे विष्णु न पावतो ॥ १२ ॥
संदर्भ सांगती थोर इतिहास जुना असा ।
वृकासुरे गिरीशाला संकटी टाकले पहा ॥ १३ ॥
पुत्र तो शकुनीचा नी बुद्धिने पापिची असा ।
नारदा पुसले त्याने त्वरित कोण पावतो ॥ १४ ॥
देवर्षि वदले त्याला शंकरा पूजिणे पहा ।
त्वरीत पावतो तैसा क्रोधतो बहु सत्वरी ॥ १५ ॥
बाणे नी रावणे केली बंदीच्या परि ती स्तुती ।
पावता दिधले राज्य कैलासा दैत्य हालवी ॥ १६ ॥
वृकाने ऐकता गेला केदारेश्वरि नी तिथे ।
आपुले मास तोडोनी शंकरा आहुती दिल्या ॥ १७ ॥
सहा दिन जधी झाले न पावे शंकरो तदा ।
सातव्या दिवशी डोके अर्पिण्या शस्त्र घेतले ॥ १८ ॥
( इंद्रवज्रा )
तेंव्हा महादेव धरी कराला
अग्नी मधोनी प्रगटोनि तैसा ।
वृकासुराचे जयि अंग होते
तसेचि झाले शिव स्पर्शिता तो ॥ १९ ॥
नी बोलले प्रीय वृकासुरा रे
हे थांबवावे वर माग कांही ।
मी पावतो ते जळ अर्पिताही
वृथा कशा पीडिशि तू तनू ही ॥ २० ॥
( अनुष्टुप् )
पापी वृकासुरे तेंव्हा भयान वर घेतला ।
ठेवी मी हात ज्या डोई होवो तो भस्मची तसा ॥ २१ ॥
ऐकता वर हा त्याचा शिवाने आनमानिले ।
परी हासोनिया बोले तथास्तु वर हा तुझा ।
पाजावे अमृतो सर्पा तसाचि वर जाहला ॥ २२ ॥
इच्छी पारवतीला दैत्य शंकरामाथि हात हा ।
ठेवण्या धावला तेंव्हा भ्याले शंकर ते मनीं ॥ २३ ॥
भयाने कांपुनी पृथ्वी स्वर्गी नी दाहिही दिशा ।
पळाले परि हा येई गेले उत्तरि शेवटी ॥ २४ ॥
संकटा पाहुनी घोर देवता गप्प बैसल्या ।
वैकुंठी पातले अंती प्रकाशमय त्या अशा ॥ २५ ॥
नारायण तिथे राही संन्याशा गति जी मिळे ।
शांत भाव असा तेथे न जन्म तेथल्या कुणा ॥ २६ ॥
संकटा पाहुनी विष्णु योगमाया करोनिया ।
ब्रह्मचारी असा झाला निवांत चालला पुढे ॥ २७ ॥
मेखळा मृगचर्मी नी दंड रुद्राक्ष धारुनी ।
कुश ते घेतले हाती पाहता त्या वृकासुरा ।
नम्रताभाव दावोनी वंदिला दैत्य तेधवा ॥ २८ ॥
वेषधारी भगवान् म्हणाले -
शकुनीनंदना फार थकले दिसता असे ।
दुरून पातले काय ? विश्रांती थोडिशीच घ्या ।
सुखाचे मूळ हा देह त्याला पीडा न द्या अशी ॥ २९ ॥
समर्थ तुम्हि तो आहा इच्छिता काय ते मनी ।
सहाय्य घेउनी लोक आपुले कार्य साधिती ॥ ३० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
सुधावृष्टी असे गोड भगवान् बोलले तदा ।
थांबता थकवा गेला सर्व हेतु तो बोलला ॥ ३१ ॥
श्री भगवान् म्हणाले -
असे कां मजला नाही विश्वास त्या शिवावरी ।
दक्षाने शापिता झाला भूतराजा असाच की ॥ ३२ ॥
दैत्येंद्रा मानिसी त्याला आजही तू जगद्गुरू ।
आपुल्या शिरि तू ठेवी हात नी पाहि सत्य ते ॥ ३३ ॥
असत्य ठरता त्याला ठारची मारणे पहा ।
पुन्हा न कधि तो तेणे बोलेल हे असत्य की ॥ ३४ ॥
गोड हे बोलता विष्णु विवेक संपला असे ।
दुर्बुद्ध्याने चुकोनीया स्वशिरीं हात ठेविला ॥ ३५ ॥
क्षणात भस्म तो झाला जणूं वीज पडे शिरीं ।
अहो जय् जय् नमो साधु आकाशी देव बोलले ॥ ३६ ॥
पाप्याच्या मृत्युने देव ऋषि नी पितरे तसे ।
गंधर्वे वर्षिली पुष्पे शिवजी सुटले असे ॥ ३७ ॥
मुक्त तो शंकरा विष्णु वदले हर्ष हा पहा ।
पापाने निघला काटा पाप्याचा आज हा असा ॥ ३८ ॥
थोरांच्या अपराधाने क्षेम राहील कोण तो ।
विश्वेश्वर गुरू तुम्ही अपराधी जगेल कां ? ॥ ३९ ॥
( इंद्रवज्रा )
शक्ती हरीची नच थांग लागे
जेथे न जाते मन वाणि हेही ।
जे ऐकती या हरिच्या लिलेसी
त्यां शत्रुचे ते भय ना उरे की ॥ ४० ॥