राजा परीक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
द्विजची ! मजला सांगा बहीण रामकृष्णची ।
वरिली कशि त्या माझ्या प्रपिते अर्जुने तदा ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
करीत तीर्थयात्रा तो प्रभासासी महाबळी ।
जाता मामेबहीणीचा विवाह कळला तिथे ।
दुर्योधनास तो रामो सुभद्रा देउ इच्छितो ॥ २ ॥
तात नी कृष्ण यांना ही गोष्ट ना रुचली असे ।
अर्जुनाला सुभद्रेची लालसा जाहली तदा ।
त्रिदंडी विप्रवेशाने पातले द्वारकापुरी ॥ ३ ॥
रामाच्यासह सर्वांनी तयांना पूजिले बहू ।
चार मास तिथे होते कोणी ना ओळखी ययां ॥ ४ ॥
आतिथ्या एकदा रामे श्रद्धेने आपुल्या घरां ।
आणिले, जाहले प्रेमे श्रेष्ठ भोजनही तिथे ॥ ५ ॥
उपवर अशी पार्थे सुभद्रा पाहिली तदा ।
प्रफुला जाहले चित्ती वरण्या ठरवीयले ॥ ६ ॥
देखणे पार्थरूपो ते स्त्रियांच्या हृदयी भिडे ।
सुभद्रा हासुनी चित्ती अर्पिजे हृदयो तयां ॥ ७ ॥
तिच्यासी लागले चित्त हराया संधि पाहती ।
अस्वस्थ चित्त ते झाले न शांती लाभली मुळी ॥ ८ ॥
रथाने एकदा प्रीया निघता देवदर्शना।
सासू नि सासरे यांना तसेच कृष्णजीस ही ।
पार्थाने पुसले तैसे सुभद्रा हरिली तदा ॥ ९ ॥
रोधिण्या पातता सैन्य धनुष्यें ठिकिले तयां ।
स्वजन रडले तेंव्हा नेई हा सिंहभाग जै ॥ १० ॥
प्रक्षुब्ध जाहले राम समुद्रा भरती जशी ।
कृष्णाने धरिले पाय काढिली समजूतही ॥ ११ ॥
पुन्हा प्रसन्न होवोनी रामे हत्ती नि अश्व ते ।
दिधली धन सामग्री आहेर म्हणुनी तदा ॥ १२ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
मिथिला नगरीमध्ये श्रुतदेव कुणी द्विज ।
कृष्णभक्त तसा शांत विरक्त ज्ञानिही असे ॥ १३ ॥
संसारी असुनी राही निवांत बसुनी सदा ।
लाभले थोडके त्यात भागवी चरितार्थ तो ॥ १४ ॥
प्रारब्धे नित्य त्या लाभे निर्वाहा पुरतेच की ।
संतुष्ट तो असे त्यात वर्ण - धर्म परायण ॥ १५ ॥
निरहंकारि नी भक्त द्विजांचा बहुलाश्व हा ।
नृप नी श्रुतदेवो हे द्वयही कृष्णभक्तची ॥ १६ ॥
एकदा भगवान् कृष्ण प्रसन्न जाहले द्वया ।
रथात बसुनी गेले दारुकासह मैथिलीं ॥ १७ ॥
नारदो वामदेवो नी परशूराम आरुणी ।
असितो अत्रि नी व्यास च्यवनो नि बृहस्पती ।
मैत्रेय कणव नी मीही होतो त्यांच्या सवे तिथे ॥ १८ ॥
पूजिती ठायि ठायि तै तेथले नागरीक ते ।
सूर्यनारायणा ऐसे लोकांना कृष्ण वाटती ॥ १९ ॥
( वसंततिलका )
आनर्त धन्व कुरुजांगल कंक मत्स्य
पांचाल कुंति मधु केकय कोसलार्ण ।
मुखारविंद रसपान करूनि घाले
उन्मुक्त हास्य हरिच्या बघुनी मुखाला ॥ २० ॥
अज्ञान दृष्टि सरली बघता हरीला
कल्याण ज्ञान करि दानचि चालता हो ।
नी ठाइ ठाइ अपुली निज कीर्ति ऐके
वैदेहि देशि हरि हा तइ पातला की ॥ २१ ॥
( अनुष्टुप् )
ऐकता कृष्णवार्ता ती हर्षला पार ना उरे ।
सर्वची लोक तेथीचे पातले पूजनार्थ तै ॥ २२ ॥
कृष्णाला पाहता त्यांची खुलली हृदये तदा ।
तदाचि नमिले त्यांनी कृष्ण नी नवखे ऋषी ॥ २३ ॥
अनुग्रहार्थ हे आले म्हणोनी ते लवंडुनी ।
बहुलाश्व श्रुतदेवो हरीच्या पायि लागले ॥ २४ ॥
द्वयांनी हरिसी आणि तसेचि मुनिमंडळा ।
आतिथ्य ते स्विकाराया हात जोडोनि प्रार्थिती ॥ २५ ॥
स्वीकार करिता कृष्णा दोघांच्या घरि एकची ।
समया रूप तो घेता गेले ते नकळे कुणा ॥ २६ ॥
उदार बहुलाश्वाने दुष्टमर्दन कृष्ण नी ।
पूजिले ऋषि ते सर्व आसनी बैसवीयले ॥ २७ ॥
हृदयी भरले प्रेम सर्वांचे पाय धूउनी ।
तीर्थ ते घेतले माथीं गंध माला नि वस्त्र ते ॥ २८ ॥
धूप दीपादि अर्पोनी धन नी बैल गायि ही ।
अलंकारादि अर्पोनी सर्वांना पूजिले असे ॥ २९ ॥
सर्वांची भोजने झाली पोटासी कृष्णपाय ते ।
धरोनी चेपिता बोले नृप तो स्तुति ही करी ॥ ३० ॥
राजा बहुलाश्व म्हणाला -
सर्वात्मा साक्षि नी तेज सर्व जीवास तू प्रभो ।
चिंतितो नित्य या पाया म्हणोनी धन्यता मिळे ॥ ३१ ॥
तुम्हीच म्हणता की ते बलराम स्वरूप मी ।
रमा ब्रह्मा ययांहून भक्त ते मजला प्रिय ।
कराया सत्य ते शब्द पातले आज हे असे ॥ ३२ ॥
ममता पाहुनी कोण त्यजील पदपंकजा ।
सर्वस्व त्यागिती त्यांना अर्पिसी तू स्वतास ही ॥ ३३ ॥
अवतार यदुवंशी घेवोनी यश हे असे ।
विस्तारिलेस जेणे की प्राण्यांना शुद्ध ते करी ॥ ३४ ॥
नमस्ते भगवंताला ब्रह्माला कृष्णरूपसा ।
सच्चिदानंद रूपाला माझा हा प्रणिपात हो ।
नारायणरुपे विश्व शांत्यार्थ तप मांडिले ॥ ३५ ॥
अनंता सर्वव्यापी तू मुनिंच्या सहही इथे ।
रहावे कांहि ते वार तारावा निमिवंश हा ॥ ३६ ॥
प्रार्थना ऐकुनी ऐसी राहिले कृष्ण ते तिथे ।
मिथिला नरनारिंच्या कल्याणा दिन कांहि ते ॥ ३७ ॥
तसेच श्रुतदेवोही मुनी नी कृष्ण याजला ।
पाहता आपुल्या गेही नमोनी नाचले बहू ॥ ३८ ॥
चटई पाट टाकोनी केले स्वागत ते तसे ।
सर्वांचे धुतले पाय सपत्न श्रुतदेवने ॥ ३९ ॥
कृष्णाचे पदतीर्थो ते सिंचिले घरच्यास नी ।
घरा दारास सर्वत्र तेंव्हा श्री श्रुतदेवने ॥ ४० ॥
( इंद्रवज्रा )
अर्पीयले पुष्प नि गंध पाणी
सुगंधि माती तुलसी दलोही ।
पद्मे कुशाने पुजिले हरीला
आराधिले अन्नहि देउनीया ॥ ४१ ॥
मनात चिंती श्रुतदेव तेंव्हा
संसार पापी पडलो कुपात ।
अभागि मी हा असता हरीचे
नी या हरीचे पद लाभले कै ? ॥ ४२ ॥
( अनुष्टुप् )
आतिथ्या या स्विकारोनी सर्व जै बैसले तदा ।
धरोनी कृष्णपायाते ते कुटुंबीय प्रार्थिती ॥ ४३ ॥
श्रुतदेव म्हणाले -
परा नी व्यक्त अव्यक्त आजची भेट ला असे ।
नव्हे तो सर्व जीवांत वसले नित्य की तुम्ही ॥ ४४ ॥
स्वप्नात सृष्टि जै जीवा निर्मितो वागतो जसा ।
तसे मायें तुम्ही केले निर्मिले वागता स्वयें ॥ ४५ ॥
आपुल्या सर्व या लीला गाती नी ऐकिती तयां ।
हृदया करिता शुद्ध प्रकाश देतसे तिथे ॥ ४६ ॥
लौकिक वैदिकी कर्मे वासना धरिता मनी ।
न राहता तिथे तुम्ही भजका सन्निधी असा ॥ ४७ ॥
( इंद्रवज्रा )
जे आत्मज्ञानी वसता तिथे नी
लोभ्यास मृत्यू भयरूप तैसे ।
माया तुम्हाला नच झाकिते पै
दृष्टीस झाकी, नमितो तुम्हा मी ॥ ४८ ॥
( अनुष्टुप् )
स्वतेजा करु मी काय सेवा आपुलि जी प्रिय ।
पाहता संपले क्लेश दुःखात तुम्हिची असा ॥ ४९ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
स्तुति ही ऐकिली तेंव्हा वदले भक्तवत्सलो ।
हासुनी धरुनी हात श्रुतदेवास हे असे ॥ ५० ॥
अनुग्रहार्थ हे सारे ऋषीही पातले इथे ।
हिंडता पाय धूळीने जगा पावित्र्य देत जे ॥ ५१ ॥
श्री भगवान् म्हणाले -
देवता क्षेत्र नी तीर्थे विलंबे फळ लाभते ।
संतपायी त्वरे लाभ देवां शक्ति तयामुळे ॥ ५२ ॥
जन्मता श्रेष्ठ हे विप्र विद्या संतोष नी तपे ।
असता मम ही भक्ती मग ते सांगणे नको ॥ ५३ ॥
चतुर्भुज असे रूप न मला प्रीय त्याहुनी ।
सर्व देवमयी विप्र मीही तो सर्वदेवची ॥ ५४ ॥
दुर्बुद्धी ठेवुनी कांही पूजिती मूर्ति निर्जिव ।
द्विजांचे काढिती दोष ते तो रूप जगद्गुरू ॥ ५५ ॥
साक्षात्कारे मला विप्र जाणिती सर्व जीवि या ।
आत्मरूपास माझ्या ते चित्ती निश्चय तो असे ॥ ५६ ॥
म्हणोनी श्रुतदेवा ते ब्रह्मर्षि ममरूप ते ।
सदैव पूजिणे त्यांना अन्यथा सर्व व्यर्थ की ॥ ५७ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
आदेश मिळता ऐसा श्रुतदेवे नि त्या नृपे ।
पूजिता भक्तिभावाने गति उत्तम लाभली ॥ ५८ ॥
संत ते पूजिती देवा देव तो संत पूजितो ।
कांही दिन असे कृष्ण राहोनी पातले पुरीं ॥ ५९ ॥