समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८५ वा

भगवंताकडून वसुदेवाला ब्रह्मज्ञान, देवकीचे मारले गेलेले सहा पुत्र परत आणणे -


Download mp3

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
एकदा कृष्ण नी राम नमिण्या मातृ पितृ ते ।
जाताचि अभिनांदोनी वदले वसुदेवजी ॥ १ ॥
मुनींनी भगवत्‌लीला वदता पुत्र हे द्वय ।
असामान्यचि जाणोनी प्रेमाने बोधिले तयां ॥ २ ॥
कृष्णा कृष्णा महायोग्या बळीराम तुम्ही द्वय ।
सनातन असेची नी नियंते परमेश्वर ॥ ३ ॥
निर्माते तुम्हि विश्वाचे सामग्रीही तुम्हीच त्या ।
भोग्य भोक्ता असे दोन्ही रूपे ती तुमचीच की ॥ ४ ॥
तुम्हा विकार तो नाही तुम्हीच जग निर्मिले ।
सर्वात्मा तुम्हिची विश्वा शक्तिने पोषिता तुम्ही ॥ ५ ॥
तुम्हीच शक्ति या विश्वा अन्यथा ते अचेतन ।
प्रयत्‍न फक्त त्यां हाती न शक्ति शक्ति तो तुम्ही ॥ ६ ॥
चंद्रकांती अग्नितेज सूर्याचे तेज नी तसे ।
गिरी पृथ्वी तसे तारे स्थानादी रूपही तुम्ही ॥ ७ ॥
जळाची तृप्ति नी शुद्धी रसही तुम्हिची प्रभो ।
चालाया तुमची शक्ती शरीर वायुसी तसे ॥ ८ ॥
दिशा आकाशही तुम्ही शब्द वाणी नि नादही ।
ओंकाररूपही तुम्ही पदरूप नि वैखरी ॥ ९ ॥
इंद्रिया शक्ति ती तुम्ही अधिष्ठात्राहि देवता ।
बुद्धीचा निश्चयो तुम्ही स्मृतिही तुम्हि ती असा ॥ १० ॥
भूती तामसऽहंकार तैजसो इंद्रियात तो ।
दैवती सत्वऽहंकार जीवा माया तुम्हीच की ॥ ११ ॥
घटां वृक्षात ती माती तया कारण ते तुम्ही ।
अविनाशी तसे तत्व वास्तवी तुमचे रुप ॥ १२ ॥
गुण रज तमो सत्व वृत्ती नी तत्व ते तुम्ही ।
योग माये तुम्हा सारे मनात कल्पिता असे ॥ १३ ॥
विकार भाव ना तुम्हा कल्पित दिसता तसे ।
कल्पा संपता तुम्ही निर्विकल्पचि ते असा ॥ १४ ॥
गुणप्रवाहि हे विश्व सुख दुःखे असे भरे ।
अज्ञानी रूप ना जाणी फसतो भवसागरी ॥ १५ ॥
प्रारब्धे लाभला देह मायेने वश जाहलो ।
खरा स्वार्थ न जाणी मी आयुष्य सरले असे ॥ १६ ॥
देह माझा अहंता ही अहंते प्रेमबंधन ।
प्रेमपाशात हे विश्व तुम्हीच बांधिले असे ॥ १७ ॥
जाणितो तुम्हि ना पुत्र जीवांचे स्वामि हो तुम्ही ।
भार तो उतरायाते पातले, बोलले तसे ॥ १८ ॥
( वसंततिलका )
जे दीन त्यास हित ते तुम्हि सत्य देता
     पाया म्हणोनि तुमच्या धरितो असा मी ।
इंद्रीयलुप्त तनु ही भयग्रस्त आहे
     तेणेचि आत्म मति ही स्थिर केलि ऐशी ॥ १९ ॥
सूतीगृहात तुम्हिची वदले मला की
     ना जन्म तो तरिहि हे जग तारण्याला ।
तुम्हा द्वया कडुनि हा अवतार घेतो ।
     वेदादि गाति सकलो तव कीर्ति तैशी ॥ २० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! वसुदेवाचे ऐकिले भक्तवत्सले ।
हासले कृष्ण नी नम्र झुकोनी गोड बोलले ॥ २१ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
पिताजी ! अम्हि तो पुत्र आम्या लक्षोनिया तुम्ही ।
वदले ब्रह्मज्ञानाते सयुक्त मानितो अम्ही ॥ २२ ॥
पिताजी तुम्हि नी आम्ही द्वारकावासि जीवही ।
सर्वच्या सर्व ती रूपे ब्रह्मरूपचि मानणे ॥ २३ ॥
आत्मा तो एकची आहे गुणाने जन्मतो तसा ।
पंचभूते असा भिन्न प्रकाशा परि दृश्य तो ।
नित्य अनित्य तो होई निर्गुणी सगुणात या ॥ २४ ॥
पंचभूतादि हे सर्व दिसती सान थोर ते ।
वास्तवी एकची रूप तुमचे बोल ते खरे ॥ २५ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! कृष्ण बोलाने त्यजिली वसुदेवने ।
विभिन्न बुद्धि ती सर्व आनंदी मग्न जाहले ।
मौन ते धारिले तैसे संकल्पहीन जाहले ॥ २६ ॥
होती तेथे कुरुश्रेष्ठा देवकी सर्वदेवता ।
मृतपुत्र गुरूचा तो आणिला ज्ञात ते तिला ।
लीला ऐकोनिया ऐशा स्तिमित चित्ति होतसे ॥ २७ ॥
आता त्या सात पुत्रांचा आठवो चित्ति पातला ।
अश्रुंनी भरले नेत्र वदली रामकृष्णला ॥ २८ ॥
देवकी म्हणाली -
लोकाभिराम तू रामा योग्यांचा योगि कृष्ण तू ।
जाणते ब्रहदेवाचे तुम्ही नारायणो असा ॥ २९ ॥
काळाने आपुले धैर्य सत्त्व संयम सोडिले ।
स्वेच्छाचारी तसे झाले धर्म ओलांडिला जये ।
अशांना मारण्या जन्म तुम्ही हा घेतला असे ॥ ३० ॥
तुम्हा पुरुष अंशाची माया ती गुण निर्मिते ।
लेशाने जग हे जन्मे विकास प्रलयो तसा ।
हृदया पासुनी आज तुम्हा शरण पातले ॥ ३१ ॥
आणिला बहुती वर्षे मेलेला गुरुपुत्र तो ।
दक्षिणा दिधली त्यांना सर्व ते ज्ञातची मला ॥ ३२ ॥
योगयोगेश्वरो तुम्ही माझी इच्छा करा पुरी ।
कंसाने मारिल्या पुत्रा आणावे, पाहु द्या मला ॥ ३३ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
मातेची ऐकता इच्छा सुतला राम कृष्ण ते ।
योगमायाश्रये गेले प्रियराजा परीक्षिता ॥ ३४ ॥
( इंद्रवज्रा )
राजा बळीने बलराम कृष्णा
     जै पाहिले त्या जगदात्मरूपा ।
नी दर्शने मग्न नि हर्ष पावे
     उठोनि सर्वें नमिले हरीला ॥ ३५ ॥
नी आसने ती दिधली बसाया
     नी बैसता ते धुतलेहि पाय ।
ब्रह्म्यासही जे करिते पवित्र
     ते तीर्थ घेई अपुल्या शिरी तो ॥ ३६ ॥
तै दैत्यराये बहुमूल्य वस्त्र
     आभूषणे तांबुल चंदनादी ।
पत्‍नीसवे ते द्वय पूजिले नी
     अर्पीयले सर्वचि नी नमीले ॥ ३७ ॥
तो दैत्यरजा हरिपाद घेई
     वक्षी तसा तो धरि मस्तकाते ।
प्रेमे तयाचे भरलेचि नेत्र
     रोमांच होता स्तुति गायि दैत्य ॥ ३८ ॥
दैत्यराज बळी म्हणाला -
( अनुष्टुप् )
नमस्ते शेषरूपाला श्रीकृष्णासी तसे नमो ।
सांख्ययोग प्रबोधाला परमात्म्या नमो नमः ॥ ३९ ॥
द्वयांची दर्शने प्राण्यां दुर्लभो, मिळते कृपे ।
रज तम स्वभावांच्या दैत्याहि भेटता तुम्ही ॥ ४० ॥
आमुच्या सम जे दैत्य सिद्ध गंधर्व दानव ।
यक्ष चारण नी भूत विद्याधर नि राक्षस ॥ ४१ ॥
भजणे दूर ते राहो तुजसी वैर ठेविती ।
वेदमय असे शुद्ध सत्वरूप तुझे हरी ॥ ४२ ॥
काहींनी स्मरता तूते पदाला मिळवीयले ।
समीप देवता त्यांना कधी ना मिळते असे ॥ ४३ ॥
योगेश्वर असे थोर तुझी माया न जाणिती ।
तर हे आम्हि ते कोण आम्हाला कळणे कशी ॥ ४४ ॥
( वसंततिलका )
सांगा मला चरणि चित्त रहावयाला
     कांही उपाय असला, गति जैचि लाभे ।
शांती अशीच हवि जी विचरेल एक
     झालाचि संग तर तो घडवा सतांसी ॥ ४५ ॥
( अनुष्टुप् )
संपावे पाप हे सर्व आज्ञा स्वामी अशी वदा ।
श्रद्धेने पाळिता आज्ञा बंध हे सर्व नष्टती ॥ ४६ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
ऊर्णीगर्भी मरीचीला सहादेवचि जन्मले ।
ब्रह्मा जै पुत्रिच्या मागे धावला हांसले तदा ॥ ४७ ॥
ब्रह्म्याने शापिता त्यांना असुरी योनि लाभली ।
हिरण्यकशिपू पोटी, पुन्हा ते देवकीचिया ॥ ४८ ॥
गर्भात जन्मले सर्व योगमाया करी तसे ।
कंसाने मारिले सर्व येथे ते पातले पुन्हा ॥ ४९ ॥
मातेचा शोक तो दूर करण्या नेउ इच्छितो ।
शाप त्यांचा मिटे तेंव्हा जातीलहि स्वलोकि ते ॥ ५० ॥
स्मरद्‌गीथो परिष्वंग पतंगो क्षुद्रभूत् घृणी ।
मिळेल सद्‌गती यांना माझ्या ऐशा कृपेमुळे ॥ ५१ ॥
वदता जाहले शांत दैत्याने पूजिले द्वयां ।
दोघांनी आणिले पुत्र दिधले देवकीस ते ॥ ५२ ॥
देवकी पाहता बाळे हृदयी प्रेम दाटले ।
स्तनात दाटले दुग्ध सुंगी त्यां वक्षि घेउनी ॥ ५३ ॥
आनंदे भरता ऐसे देवकी पाजि त्या मुलां ।
मोहीत जाहली माये विष्णुचे सृष्टिचक्र हे ॥ ५४ ॥
साक्षात् अमृत ते होय पिला जे कृष्णदेव ते ।
कृष्णाने स्पर्शिता त्यांना आत्मज्ञानचि जाहले ॥ ५५ ॥
देवकी वसुदेवाला कृष्ण रामासही तदा ।
बाळांनी वंदिले आणि देवलोकासि पातले ॥ ५६ ॥
विस्मीत देवकी झाली आले गेलेही पुत्र ते ।
उमगे ती मनामाजी कृष्णाची सर्व ही लिला ॥ ५७ ॥
कृष्णाची शक्ति ही ऐशी अनंत परमात्म तो ।
अद्‌भूत कैक त्याच्या त्या कथा, ना थांग लागतो ॥ ५८ ॥
सूतजी सांगतात -
( द्रुतविलंबित )
अमर अशि हरीची कीर्ति आहे सुधा जै
     मिटवि सकल तापा भक्तकर्णात जाता ।
सकल स्वय शुकांनी वर्णिली व्यासपुत्रे
     मिटति सकल वृत्ती लाभते मोक्षधाम ॥ ५९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंच्याऐंशिवा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP