समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८४ वा

वसुदेवांचा यज्ञोत्सव -


Download mp3

श्रीशुकदेव सांगतात -
( वसंततिलका )
कृष्णावरी करिति त्या बहु प्रेम राण्या
     गांधारि द्रौपदि नि कुंति तशी सुभद्रा ।
ऐकोनि विस्मित स्त्रिया बहु लाजल्या नी
     नेत्रात अश्रु भरले सगळ्या जणींच्या ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
स्त्रिया स्त्रियांत नी तैसे पुरुषासी पुरूष ते ।
बोलले, दर्शना आले कितेक ऋषि नी मुनी ॥ २ ॥
व्यास नी नारदो तैसे च्यवनो देवलो असित् ।
विश्वामित्र शतानंद भरद्वाज नि गौतम ॥ ३ ॥
सशिष्य परशूराम वसिष्ठ गालवो भृगु ।
पुलस्त्य कश्यपो अत्री मार्कंडेय बृहस्पती ॥ ४ ॥
द्वित त्रित नी तो एक ब्रह्मपुत्र नि अंगिरा ।
याज्ञवल्क्य वामदेवो पुलस्त्यादि प्रमूख ते ॥ ५ ॥
ऋषिंना पाहुनी सर्व नृप नी सर्व पांडव ।
उठले राम कृष्णोही ऋषिंना त्या प्रणामिले ॥ ६ ॥
स्वागतो आसनो पाद्य अर्घ्य माला नि धूप ते ।
धर्मे कृष्णे नृपे सार्‍या ऋषिंना पूजिले असे ॥ ७ ॥
निवांत बैसता सर्व बोलले कृष्ण त्यांजला ।
कृष्णभाषण ते सारे शांत चित्तेचि ऐकती ॥ ८ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
धन्य हो जीवनो आज साफल्य पूर्ण जाहले ।
देवदुर्लभ ही होय भेट योगेश्वरासि की ॥ ९ ॥
पूजिती मूर्ति जे कोणी जीवात्मा त्यजुनी दुरी ।
तयांना तुमचा स्पर्श पाददर्शन ना मिळे ॥ १० ॥
पाणी ना होतसे तीर्थ मूर्तीत देव का असे ? ।
संत तो देव नी तीर्थ दर्शने मोक्ष लाभतो ॥ ११ ॥
( इंद्रवज्रा )
ते अग्नि सूर्यो जल चंद्र तारा
     आकाश पृथ्वी अन वायु वाणि ।
उपासिता पाप न जाय सारे
     या संतपायी मतिभेद नष्टे ॥ १२ ॥
त्रिधातु देहो शवतुल्य ऐसा
     विकारि वस्तूसिच देव मानी ।
संता न मानी बहु तीर्थ हिंडे
     मनुष्य ना तो पशु हीन जाणा ॥ १३ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
कृष्णाचे गूढ हे भाष्य ऐकता ऋषि सर्व ते ।
विचारी राहिले सर्व कृष्ण हे कायसे वदे ॥ १४ ॥
विचार करुनी खूप सर्वेश्वर असोनिया ।
संघार्थ वागतो कृष्ण वदले संत ते पुन्हा ॥ १५ ॥
( इंद्रवज्रा )
माये तुझ्या मोहिलो आम्हि सर्व
     ते लोकपालो अन ज्ञानि सर्व ।
तू माणसाच्या परि वागशी की
     लीला तुझी आगळि सर्व आहे ॥ १६ ॥
माती जशी त्या घट पर्वतात
     तसाच तू रूप नि नाम घेशी ।
करोनि सारे नच लिप्त होशी
     लीला तुझ्या धन्य अशा अनंत ॥ १७ ॥
परा स्वयंब्रह्म असूनि तू तो
     घेशी रुपे ही जग तारण्याला ।
या वेदमार्गा हरि रक्षिसी तू
     ते वर्ण चारी तव रूप सत्य ॥ १८ ॥
( अनुष्टुप् )

ब्रह्म ते हृदयो शुद्ध तप स्वाध्याय संयम ।
साक्षात्‌कार तुझा होतो सगुणी निर्गुणी तसा ॥ १९ ॥
द्विजद्वारे मिळे वेद म्हणोनी मानिसी तया ।
द्विज भक्त शिरोरत्‍न ऐसाचि असशी हरी ॥ २० ॥
भद्र सीमा हरी तूची साधुंची गति छत्रही ।
सफल जाहले आज तप विद्या नि ज्ञान हे ॥ २१ ॥
अनंता सच्चिदानंदा कृष्णा तू ब्रह्मरूपची ।
मायेत लपशी ऐसा आमुचा प्रणिपात घे ॥ २२ ॥
यदुंना कळला ना तू अन्यांचे काय ते पुसो ।
मायेत पडदा घेशी तेणे ना रूप ते दिसे ॥ २३ ॥
स्वप्नात स्वप्निच्या वस्तू सत्यची भासती पहा ।
नाम रूपादि मायेने देह हा सत्य भासतो ॥ २४ ॥
मायेने मोहतो जीव विषयी भटके सदा ।
विवेकशक्ति नी नासे वेगळा होय ना कुणी ॥ २५ ॥
( वसंततिलका )
ते श्रेष्ठ योगि स्मरती तव पाद चित्ती
     गंगाजाळास करिती पद ते पवित्र ।
भाग्येचि आज मिळले तव दर्शनो हे
     भक्तीत मोह जळता तव लाभ होय ॥ २६ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
राजर्षी स्तुति गावोनी धृतराष्ट्र युधिष्ठिरा ।
पुसती निघण्या जाण्या आश्रमा आपुल्या नृपा ॥ २७ ॥
जाणोनी मानसां त्यांच्या पातले वसुदेवजी ।
पायासी नमुनी त्यांच्या विनम्र बोलले असे ॥ २८ ॥
वसुदेव म्हणाले -
ऋषिंनो सर्व देवांनो आपणा प्रणिपात हा ।
कृपया प्रार्थना ऐका बोधावे मोक्षदायक ॥ २९ ॥
नारदजी म्हणाले -
ऋषिंनो नच आश्चर्य कृष्णाला पुत्र मानुनी ।
जिज्ञासा शुद्ध भावाने कल्याणा पुसती तुम्हा ॥ ३० ॥
आदरो नच तो राही संसारी सन्निधी तया ।
गंगेच्या तिरिचे लोक तीर्था अन्यत्र हिंडती ॥ ३१ ॥
कृष्णाचे तीन ते हेतू न कोणी मिटवू शके ।
कोणत्याही निमित्ताने कालशक्ती न ती क्षिणे ॥ ३२ ॥
( वसंततिलका )
त्या क्लेश कर्म परिपाक गुणप्रवाहे
     ना खंडिते स्वरुप ज्ञान असे हरीचे ।
जन्म स्वये जधि तदा नच मूर्ख जाणी
     झाकेल काय कधि तो रवि त्या नभासी ॥ ३३ ॥
( अनुष्टुप् )
ऋषिंनी भगवान् कृष्णा तसे श्री बलरामच्या ।
संबोधिले वसुदेवा अन्य राजां समोरही ॥ ३४ ॥
वासना जाळण्या कर्मे उपाय एकची असे ।
यज्ञाने यज्ञदेवो श्री विष्णुला पूजिणे पहा ॥ ३५ ॥
शास्त्राधारे त्रिकालज्ञे सुगमो मार्ग दाविला ।
मिळे शांती तसा मोक्ष आनंद वर्धि धर्म हा ॥ ३६ ॥
ब्राह्मणा क्षत्रिया वैश्या कल्याणकारि मार्ग हा ।
न्यायार्जित धने श्रद्धे पूजावे पुरुषोत्तमा ॥ ३७ ॥
विचारी पुरुषो तेणे यज्ञ दानादि साधने ।
भोग ते नष्टिणे सारे निघावे त्या तपोवना ॥ ३८ ॥
द्विज क्षत्रिय नी वैश्य देवता ऋषि पितृ या ।
त्रिऋणे जन्मती तेंव्हा यज्ञ अध्ययने तसे ।
प्रजोत्पन्ने फिटे बोजा तेंव्हा संसार त्यागिणे ॥ ३९ ॥
ऋषि नी पितरे यांच्या ऋणात मुक्त हो तुम्ही ।
यज्ञे देवऋणा फेडा तपाने भगवान् स्मरा ॥ ४० ॥
पूजिले भक्तिने तुम्ही अवश्य जगदीश्वरा ।
तेणेचि जाहले तुम्हा दोन्ही हे पुत्र थोर की ॥ ४१ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
महात्मा वसुदेवाने ऋषिंचे शब्द ऐकिले ।
प्रसन्ने नमिले त्यांना वरिले ऋत्विजांरुपी ॥ ४२ ॥
पुण्यक्षेत्री कुरुक्षेत्री वरिता ऋषिला असे ।
क्षेत्री उत्तम साहित्ये केला यज्ञ तदा पहा ॥ ४३ ॥
यज्ञदीक्षा वसुदेवे घेता ते सजले यदु ।
धारिल्या कुंजमाला तै सजले नृप थोर ते ॥ ४४ ॥
वस्त्रहारे सजोनीया दीक्षिता पातल्या तदा ।
करीं मंगल सामग्री घेवोनी यज्ञमंडपी ॥ ४५ ॥
तदा मृदंग नी शंख दुंदुभी वाद्य वाजले ।
नाचले नट नी नाच्या गाती मागध सूत ते ।
गंधर्व अन गंधर्व्या गाती गान सवे तदा ॥ ४६ ॥
नेत्री अंजन नी अंगा लोणी ते वसुदेवने ।
लाविता देवकी आदी आठरा पत्‍नि यां सवे ॥ ४७ ॥
दीक्षिते मृगचर्माते पत्‍न्यांनी वसने नवी ।
कंकणे भूषणे हार लेवोनी सजल्या बहू ॥ ४८ ॥
रेशमी वस्त्र नी रत्‍न ऋत्विज् लेवोनि शोभले ।
इंद्रयज्ञीं तसे पूर्वी सजले, तैचि आज हे ॥ ४९ ॥
बंधु पत्‍न्यांसवे कृष्ण तसेचि शोभले तदा ।
शक्तिने आपुल्या सर्व जीवात वसतो हरी ।
तसे संकर्षणो आणि श्री नारायण शोभले ॥ ५० ॥
अग्निहोत्रादि यज्ञांनी ज्ञान द्रव्य तसे क्रिये ।
याजिले वसुदेवांनी मंत्राने विष्णु प्रार्थिला ॥ ५१ ॥
वस्त्रालंकार देवोनी ऋत्विजा वसुदेवने ।
दिधले धन नी गाई कन्या सुंदर नी धरा ॥ ५२ ॥
पत्‍निसंजास अवभृथ् यज्ञांतस्नान जाहले ।
नंतरे जाहले स्नान रामकुंडात तेधवा ॥ ५३ ॥
भार्या नी वसुदेवाने दिले सर्वचि दागिने ।
वंद्यांना, आणि ते अन्न सर्व प्राण्यासही दिले ॥ ५४ ॥
बंधू नी बायका त्यांच्या विदर्भी कोसली कुरु ।
सृंजयो केकया काशी-राजे नी ते सभासद ॥ ५५ ॥
ऋत्विजो माणसे भूत पितरे चारणासही ।
निरोपा दिल्या भेटी कृष्णानुमति घेउनी ।
यज्ञाची गाउनी कीर्ती स्वस्थाना सर्व पातले ॥ ५६ ॥
विदुरो धृतराष्ट्रो नी भीम अर्जुन भीष्म नी ।
कुंति नी सहदेवो नी व्यास नी आप्त ते दुजे ॥ ५७ ॥
यादवा सोडुनी जाता विरहा सोशिती तदा ।
कष्टाने आपुल्या देशी निघाले सर्व तेथुनी ॥ ५८ ॥
कृष्णे श्रीबलरामा नी नंदाने उग्रसेनला ।
गोपां सत्कारिले तैसे कितेक दिन राहिले ॥ ५९ ॥
तरले वसुदेवो ते मनोरथ महार्णवी ।
सीमा हर्षा न ती राही नंदासी वदले तदा ॥ ६० ॥
वसुदेवजी म्हणाले -
माणसा भगवंताने स्नेहबंधन ते दिले ।
न तोडू शकती त्याला शूरवीर यती तसे ॥ ६१ ॥
कृतघ्न अम्हि तो ऐसे तुम्ही ती मैत्रि साधिली ।
संतची वागती ऐसे पुढे राहील ही अशी ॥ ६२ ॥
बंधनी असता आम्ही हिता ना पडलो तुम्हा ।
धनाने माजलो आता तुम्ही ना दिसता पहा ॥ ६३ ॥
सन्मान दुसर्‍यां देता दुजांचा नच इच्छिता ।
न मिळे धन ते ठीक धनाने जन माजती ॥ ६४ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
वदता वसुदेवांचा प्रेमाने कंठ दाटला ।
आठवे नंदमैत्री ती आसवे नेत्रि पातले ॥ ६५ ॥
नंदजी मित्रप्रेमाने राहिले तीन मास तै ।
सन्मान यदुवंशाने तयांना बहुही दिला ॥ ६६ ॥
वस्त्रालंकार सामग्री श्रेष्ठ ती भेट अर्पुनी ।
नंद नी नंद बंधुना गोपांना तोषिले असे ॥ ६७ ॥
वसुदेवे उग्रसेने राम कृष्ण नि उद्धवे ।
दिधल्या भेट वस्तू त्या, व्रजास नंद पातले ॥ ६८ ॥
नंद गोप नि गोपिंचे कृष्णासी चित्त लागले ।
मन सोडोनिया तेथे त्या क्षेत्रातुनि पातले ॥ ६९ ॥
बंधु बांधव ते सारे गेले स्वस्थानि जेधवा ।
वर्षाकाल तदा आला द्वारकीं यदु पातले ॥ ७० ॥
तेथल्या सर्व लोकांना यज्ञ हा वसुदेवचा ।
प्रसंग सर्वच्या सर्व यात्रीक सांगु लागले ॥ ७१ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौर्‍याऐंशिवा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP