समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८३ वा

भगवंताच्या पट्टराणीसी द्रौपदीच्या गप्पा गोष्टी -


Download mp3

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
गोपिंना बोधिले कृष्णे बोधवस्तुहि तो स्वता ।
युधिष्ठिरादि सर्वांना तसाचि बोलला असे ॥ १ ॥
अशूभ नष्टले सारे कृष्णाच्या पददर्शने ।
कृष्णे सत्कारिता त्यांना आनंदे बोलु लागले ॥ २ ॥
( इंद्रवज्रा )
पदारविंदी रस संत घेती
     जो दिव्य जीवा भव भेय नष्टी ।
कर्णद्वयाने भरपूर पीता
     अमंगलाची मग काय शंका ॥ ३ ॥
( वसंततिलका )
आनंदसिंधु हरि तू त‍इ ज्ञानरूपी
     बुद्धी नि वृत्ति तुअला नच वेध घेती ।
काळात वेद सरता अवतार घेशी
     तर्कोपराचे सगळे, नमितो तुला मी ॥ ४ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( इंद्रवज्रा )
गाती जधि अन्यहि कृष्णकीर्ती
     तै यादवांच्या कुरुच्या स्त्रियाही ।
गोविंदकीर्ती वदु लागल्या त्या
     मी सांगतो सर्व जशा तशाची ॥ ५ ॥
द्रौपदी म्हणाली -
( अनुष्टुप् )
रुक्मिणी जांबवंती गे भद्रे सत्ये नि रोहिणी ।
लक्ष्मणे सत्यभामे गे शैब्ये कालिंदि गे तुम्ही ॥ ६ ॥
सांगा गे भगवान् कृष्णे माया ती रचुनी कसे ।
वरिले एक एकीला माणसा परि ते कसे ॥ ७ ॥
रुक्मिणी म्हणाली -
( वसंततिलका )
दैत्यादि इच्छिति मला शिशुपाल व्हावा
     सिंहापरीच हरिने हरिले मला की ।
जे वीर विश्वि, पदिची धुळ इच्छिती ते
     सेवा अशीच घडु हे मज जन्म जन्मी ॥ ८ ॥
सत्यभामा म्हणाली -
प्रसेनमृत्यु घडता बहु दुःखि तात
     स्येमंत रत्‍न दिधले हरिने तयांना ।
मिथ्या कलंक कळता भयभीत तात
     नी अर्पिले मणि तसे मजही ययांना ॥ ९ ॥
जांबवंती म्हणाली -
ना तात सांब स्मरले हरि हाच राम
     सत्ताविसोहि दिन ते लढले ययांना ।
नी जाणिताच मजला अन तो मणीही
     अर्पीयला, मज घडो नित पादसेवा ॥ १० ॥
कालिंदी म्हणाली -
( अनुष्टुप् )
तप मी आचरी तेंव्हा ययांनी जाणिले मला ।
अर्जुना पुढती यांनी वरिले दासि झाडु मी ॥ ११ ॥
मित्रविंदा म्हणाली -
( वसंततिलका )
माझ्या स्वयंवरि यये हरिले विरांना
     जै सिंहभाग हरितो हरिले मला तै ।
द्वारवतीस मजला वरुनीच नेले
     लाभो मला चरणतीर्थ कितेक जन्मी ॥ १२ ॥
सत्या म्हणाली -
माझ्या स्वयंवरिचि बैलहि तीक्ष्ण सात
     ठेवीयले कि बघण्या बल पौरुषाते ।
टोचोनि वेसणि यये जितिले पणा नी
     कर्डापरीच हरिने मज ओढियेले ॥ १३ ॥
( अनुष्टुप् )
पौरुषे मजला तैसे दास दास्यानि सैन्य ते ।
घेवोनि निघता शत्रू रणात कैक मारिले ।
अभिलाषा मनीं ही की सेवा नित्य मिळो मला ॥ १४ ॥
मामाचे पुत्र हे माझ्या स्वये मी इच्छिले ययां ।
पित्याने जाणुनी, सेना सदास्या अर्पिले मला ॥ १५ ॥
कल्याण इच्छिते मी की कर्माने जन्म जो मिळे ।
तिथेही पदपद्मचा मजला नित्य स्पर्श हो ॥ १६ ॥
लक्ष्मणा म्हणाली -
( इंद्रवज्रा )
देवर्षि यांची नित कीर्ति गाती
     लीलावतारा बहु चांग ऐशा ।
त्या लोकपाला त्यजुनी हरीला
     वरीयले मी वश या पदासी ॥ १७ ॥
( अनुष्टुप् )
बृहत्‌सेन पिता माझे प्रेमाने वर्धिले मला ।
जाणता मम इच्छा ती पूर्ण केली तये तशी ॥ १८ ॥
ज्या परी वरचा मत्स्य अर्जुने वेधिला असे ।
माझ्याही वरणार्था तो तसाचि टांगिला असे ॥ १९ ॥
राजांना कळता तैसे कितेक नृपती तदा ।
गुरुंच्या सह ते आले पित्याच्या राजधानिला ॥ २० ॥
अवस्था बल जाणोनी सर्वां सत्कारिले असे ।
प्रण जिंकावया सर्वें धनुष्य बाण घेतले ॥ २१ ॥
प्रत्यंचा कुणि ना लावी कोणी लवोनिया त्यजी ।
दुसरे टोक ना गावे पडले झटकोनिया ॥ २२ ॥
अंबष्ठो मागधो भीम दुर्योधन नि कर्ण तो ।
लाविती धनुषां दोरी परी मासा न तो दिसे ॥ २३ ॥
अर्जुने पाहिला मासा धनुष्य योजिले तसे ।
लक्षवेध न तो झाला स्पर्शोनी बाण तो पळे ॥ २४ ॥
गर्व्यांचा संपला गर्व आशा कित्येक सोडिती ।
सहजी धनु ते कृष्णे घेवोनी एकवेळ तो ॥ २५ ॥
जळात पाहिला मासा तिराने पाडिला पहा ।
दुपारी अभिजित् वेळी मुहूर्ती घडले असे ॥ २६ ॥
जय्‌जय्‌कार धरेला नी दुंदुभी वाजल्या नभीं ।
आनंदे भरले देव वरून वर्षिती फिले ॥ २७ ॥
( वसंततिलका )
त्या रंगशालि जधि मी पद ठेविले तै
     त्या पैंजणेनि वसनें बहुमूल्य हारें ।
आले सजोनि स्मित नी बहु लाज होय
     नी रत्‍नहार करि घेतियला स्वये की ॥ २८ ॥
शोभी तशीच मजला मणि कुंडलांची
     चंद्रप्रभे परिच मी उचलोनि मान ।
हे पाहिले नरपती तिरक्याच नेत्रे
     नी माळ ती हरिस मी गळि घातली हो ॥ २९ ॥
( अनुष्टुप् )
घालिता वरमाला ती मृदंग शंख ढोल नी ।
नगारे वाजली वाद्ये नाचले नट-नर्तिका ॥ ३० ॥
जेंव्हा मी घातली माला स्वामींनी घातली पुन्हा ।
कामातुर नृपो तेंव्हा चिडले जळता मनीं ॥ ३१ ॥
चतुर्भुज हरीने या रथात घेतले मला ।
धनुष्य घेतले हाती युद्धार्थ सिद्धले तदा ॥ ३२ ॥
सोन्याने सजल्या ऐशा रथा दारूक हाकुनी ।
नेलेसे द्वारके मागी सिंह जै भाग नेतसे ॥ ३३ ॥
कांही ते धनु घेवोनी लढाया पातले परी ।
सिंहाला भुंकती कुत्रे तसे ते व्यर्थ जाहले ॥ ३४ ॥
कृष्णाने सोडिता बाण कुणी गेले पळोनिया ।
कुणाचे तुटले पाय कुणी मेले रणात त्या ॥ ३५ ॥
( गति )
पुन्हा हरि यदुपति भानुच्या परी
     मला जितोनिहि रिघले सजे पुरी ।
जनोनि आप्त जमुनि स्वागतोत्सवी
     ध्वजा कितेक चढविल्या असंख्यची ॥ ३६ ॥
( अनुष्टुप् )
पुरता मम इच्छा ही प्रसन्न तात जाहले ।
आप्त संबंधिता सर्वां सन्माने वस्तु अर्पिल्या ॥ ३७ ॥
मजला दिधल्या दास्या हत्ती अश्व तसे रथ ।
शस्त्रास्त्र श्रेष्ठ संपन्न सैनीक यांजला दिले ॥ ३८ ॥
आसक्ती सोडुनी आम्ही पूर्वजन्मात ते तप ।
असेल श्रेष्ठ ते केले तेणे सेवा अशी मिळे ॥ ३९ ॥
रोहिणी म्हणाली -
( वसंततिलका )
भौमे जितोनि नृपती अम्हि राजकन्यां
     बंदिस्त ठेवि नि तसे कळता हरीला ।
मारोनि दैत्य मग हे वरिती अम्हाला
     आम्ही सदाचि भजतो भयमुक्त पाया ॥ ४० ॥
( अनुष्टुप् )
द्रौपदी आम्ही या सार्‍या राज्य वा स्वर्ग भोग ते ।
आणता असल्या सिद्धी ब्रह्म वा मोक्ष नेच्छितो ॥ ४१ ॥
इच्छितो पदधूळी ती कृष्णाची शिरि नित्यची ।
वक्षासी धरिता श्रीने केशरीगंध त्यास ये ॥ ४२ ॥
इच्छिती व्रजिच्या नारी भिल्लिणी तृण नी लता ।
स्पर्श त्या चरणाचा तो आम्हीही इच्छितो तसा ॥ ४३ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर त्र्याऐंशिवा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP