राजा परीक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
मुक्तिदाता असा कृष्ण लीला त्याच्या अनंतची ।
आता सांगा कथा ऐशा ज्या ना माहीत त्या अम्हा ॥ १ ॥
सुखाला शोधिती जीव परी दुःखास पावती ।
अशा या समयी कोण पवित्र रस सोडितो ॥ २ ॥
( इंद्रवज्रा )
जी कीर्ति गाते खरि तीच वाणी
जे सेविती हातचि तेचि सत्य ।
ते सत्य चित्तो हरिसी स्मरे जे
नी कान तेची हरि कीर्ति ऐके ॥ ३ ॥
ते सत्य डोके नमि जे हरिसी
नी नेत्र तेची बघती तयाला ।
नी तेचि अंगो पदतीर्थ घेई
संतांचिये नी हरिचे तसेचि ॥ ४ ॥
सूतजी सांगतात -
( अनुष्टुप् )
परीक्षिते असा प्रश्न पुसता शुकदेव ते ।
तल्लीन जाहले चित्ती वदले त्या परीक्षिता ॥ ५ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् ! द्विज तो एक कृष्णाचा मित्र जो असे ।
विरक्त ब्रह्मज्ञानी तो शांत जैसा जितेंद्रिय ॥ ६ ॥
संसारी असुनी राही मिळेल त्यात तोषुनी ।
जीर्ण नी फाटके वस्त्र क्षुधिता पत्निही तशी ॥ ७ ॥
दारिद्यमूर्ति ती पत्नी भुकेली जी पतिव्रता ।
कांपता पतिदेवासी विनम्रे वदली असे ॥ ८ ॥
तुमचा मित्र तो कृष्ण साक्षात् जो कमलापती ।
वत्सला शरणार्थ्यांचा द्विजांचा भक्तही तसा ॥ ९ ॥
संताचे एक तो छत्र जावे त्याच्याकडे तुम्ही ।
पाहता स्थिति ती ऐशी देईल द्रव्य तो बहू ॥ १० ॥
द्वारकीं राहतो सध्या भोज वृष्णंधकेश्वर ।
भजताचि पदा त्याच्या स्वयंही दान जातसे ।
प्रपंचा धन तो देई यात ते नवलो नसे ॥ ११ ॥
या परी द्विजपत्नीने प्रार्थिता ते पुनः पुन्हा ।
धनाची गोष्ट ना मोठी दर्शनीं लाभ तो खरा ॥ १२ ॥
विचार करुनी ऐसा वदला पत्निसी द्विज ।
कल्याणी भेट वस्तू दे असेल जर कांहि ती ॥ १३ ॥
शेजार्यां घरि ती गेली पोहे मागोनि चौ मुठी ।
दिधले पतिदेवाला कृष्णा भेट करावया ॥ १४ ॥
पोहे घेवोनि तो गेला कृष्णाच्या द्वारकापुरीं ।
मनात चिंति की कैसे कृष्णदर्शन हो मला ॥ १५ ॥
द्विज तो पातला तेथे अन्य विप्रांसवे पुढे ।
पहारे तीन ओलांडी जिथे जाणे कठीण त्यां ।
अंधक् वंशीय वीरांच्या महाला पोचला असे ॥ १६ ॥
सोळा हजार राण्यांचे मधोमध महाल ते ।
एका महालि त्या आला ब्रह्मानंदात डुंबला ॥ १७ ॥
पलंगी बैसला कृष्ण तेथे सौ. रुक्मिणी सवे ।
द्विजां पाहोनिया कृष्ण धावला मारिही मिठी ॥ १८ ॥
मित्राच्या अंगस्पर्शाने कृष्णां आनंद जाहला ।
कमलापरि त्या नेत्रीं प्रेमाश्रु वाहु लागले ॥ १९ ॥
समयी कृष्ण तो नेई द्विजा मंचकी बैसवी ।
सामग्री घेउनी सर्व स्वयेची पूजिले द्विजा ॥ २० ॥
धुतले पाय नी तीर्थ शिरासी घेतले असे ।
चंदनो अर्गजा दिव्य केशरी गंध लेपिले ॥ २१ ॥
आनंदे गंध धूपाने ओवाळी आरती तशी ।
दूध तांबूल देवोनी स्वागतम् कृष्ण तो वदे ॥ २२ ॥
फाटके मळके वस्त्र कृश दुर्बलही तसा ।
रुक्मिणीदेवि ती वारा चौर्यांनी घालु लागली ॥ २३ ॥
विस्मये पाहती दास्या पवित्रकीर्ति कृष्ण तो ।
पूजितो प्रेमभावाने द्विजाला मळक्या अशा ॥ २४ ॥
वदती उघडा निंद्य दरिद्री हा भिकारडा ।
कोणते पुण्य ते याचे पूजितो त्या जगद्गुरु ॥ २५ ॥
पहा हो मंचकी कृष्णे रुक्मिणी त्यागिली असे ।
रामाच्या परि हा विप्रा हृदयी धरि की पहा ॥ २६ ॥
परीक्षित् ! द्विज नी कृष्ण हात हातात देउनी ।
स्मरती गुरुकूलीच्या घटना वर्णिती तशा ॥ २७ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
धर्म मर्मज्ञ हे देवा देवोनी गुरुदक्षिणा ।
अनुरूप अशी पत्नी तुम्ही हो वरिलीत ना ? ॥ २८ ॥
संसारी राहुनी तुम्ही विरक्त राहिले असा ।
माहीत मज ते सारे धन ते नावडे तुम्हा ॥ २९ ॥
विरळे जगती लोक वासना सर्व त्यागुनी ।
कर्म ते करिती सारे लोकांना शिकवावया ॥ ३० ॥
आठवे का निवासो तो ज्ञातव्य वस्तुज्ञान ते ।
आश्रमी होतसे सत्य जेणे अज्ञान नष्टते ॥ ३१ ॥
मित्रा या जगता मध्ये पिता हा पहिला गुरू ।
संस्कारी दुसरा तो तो माझ्याच परि पूज्य जो ।
ज्ञानगुरुहि माझेच रूप तो गुरु हे तिन्हि ॥ ३२ ॥
गुरु तो मम रूपोची तारितो भवसागरी ।
स्वार्थ नी परमार्थाचे जाणते तेचि की खरे ॥ ३३ ॥
आत्मा मी सर्व जीवात चारी आश्रमि मीच तो ।
संन्याशा जो मिळे मोद त्याहुनी गुरु पूजिता ॥ ३४ ॥
आश्रमी राहिलो तेंव्हा तुला नी मजला जधी ।
धाडिले गुरुपत्नीने इंधना त्या वनात ती ॥ ३५ ॥
अकाली पडली वर्षा वादळो ते भयानक ।
आकाशात विजा तैशा कडाडे पातल्या कशा ॥ ३६ ॥
अस्तमान जधी झाला दाटला तम घोर तै ।
झाले पाणीच पाणी ते खड्डा रस्ताहि ना कळे ॥ ३७ ॥
( इंद्रवज्रा )
ती काल वर्षा प्रलयो दुजाची
त्रासूनि गेलो चुकलेहि रस्ता ।
चिंतीत झालो अन हात हाते
दुजां धरोनी फिरलो वनात ॥ ३८ ॥
( अनुष्टुप् )
सांदीपनी गुरूला हे कळता त्या सकाळिची ।
धाडिले शिष्य ते सर्व आपणा शोधण्यास की ॥ ३९ ॥
वदलो नवलो कैसे मुलांनो आमुच्या मुळे ।
तुम्हाला पडला त्रास देहाची ना तमा तुम्हा ॥ ४० ॥
गुरुचे ऋण ते थोर शिष्याने फेडिणे असे ।
विशुद्ध भाव ठेवोनी सर्वची अर्पिणे तयां ॥ ४१ ॥
द्विजा ! प्रसन्न मी झालो कामना होय पूर्ण ती ।
कंठस्थ राहिही वेद नच निष्फळ हो कदा ॥ ४२ ॥
आश्रमी राहिलो तेंव्हा गोष्टी कित्येक जाहल्या ।
गुरुंकृपे मिळे शांती पूर्णत्व लाभते तसे ॥ ४३ ॥
ब्राह्मणदेवता म्हणाले -
देवा ! जगद्गुरो कृष्णा काय शिल्लक राहिले ।
आश्रमी परमात्म्याच्या सवे मी राहिलो असे ॥ ४४ ॥
वेद ते पुरुषार्थाचे मूळ स्रोत असेचि की ।
नी ते अंग तुझे देवा शिकशी गुरुपाशि ही ।
माणसा परि तू लीला करिशी सगळ्याच या ॥ ४५ ॥