श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
मनाचा जाणता कृष्ण द्विजभक्त असाचि तो ।
द्विजांचे क्लेश तो नष्टी संतांचा एक आश्रय ॥ १ ॥
पूर्वोक्त ते असेे खूप विनोदे बोलला हरी ।
प्रेममय अशा नेत्रे द्विजदेवास तो बघे ॥ २ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
ब्रह्मन् तुम्ही मला काय भेट ती आणली असे ।
भक्त जे अर्पिती अल्प होते ते खूपची मला ।
अभक्त अर्पिती खूप तेणे संतोष ना कधी ॥ ३ ॥
प्रेमाने फळ वा फूल पान वा जळ अर्पिती ।
न घेतो फक्त प्रेमाने त्वरीत भक्षितो पहा ॥ ४ ॥
परीक्षित् ! वदता कृष्ण लाजोनी त्या द्विजे तदा ।
लक्षुमीपतिला चार मुठी पोहे न ते दिले ॥ ५ ॥
लाजोनि पाही तो खाली कृष्णाने सर्व जाणिले ।
प्रियभक्त सखा माझा हा ना हेते कधी भजे ॥ ६ ॥
आग्रहे धर्मपत्नीच्या येथे तो पातला असे ।
संपत्ती याजला देतो जी त्या देवांस दुर्लभ ॥ ७ ॥
विचार करि हा कृष्ण पोटळी पाहता वदे ।
काय या पोटळी मध्ये आणि घेई हिरावुनी ॥ ८ ॥
आदरे वदला मित्रा प्रिय ही भेट आणली ।
अरे ना मीच तो फक्त तृप्तेल जग यात की ॥ ९ ॥
वदता मूठ तो खाई दुसरी भरली तदा ।
रुक्मिणीरूपि लक्ष्मी ती कृष्णाचा हात तो धरी ॥ १० ॥
वदते थांबवी देवा पोहे हे एवढे पहा ।
पृथ्वी नी स्वर्गिची सर्व संपत्ती देउ ते शके ।
अधीक भक्षिता विप्रा देण्यास काय ते असे ॥ ११ ॥
त्या दिनी द्विजदेवो ते राहिले कृष्णमंदिरी ।
जेवले पाहिले सर्व जणू वैकुंठधाम ते ॥ १२ ॥
परीक्षित् ! ब्राह्मणा तेंव्हा प्रत्यक्ष कांहि ना मिळे ।
तरी कृष्णास कांहीही न मागे विप्र तो मुळी ॥ १३ ॥
चित्ताचा खेळ जाणोनी लज्जीत जाहला तसा ।
कृष्णदर्शन आनंदे निघाला आपुल्या घरा ॥ १४ ॥
विचार करि तो विप्र आनंद नवलाव हा ।
कृष्णाची द्विजभक्ती मी नेत्राने आज पाहिली ।
श्रीचिन्ह वक्षिं त्या कृष्णे दरिद्र्यां धरिले असे ॥ १५ ॥
दरिद्री मी कुठी पापी कुठे श्रीमंत तो हरी ।
विप्र मी म्हणूनी त्याने हृदयी धारिले असे ॥ १६ ॥
मंचकी झोपवी जैसा तयाचा बंधु मी असे ।
थकता पट्टराणीने चवर्या ढाळिल्या मला ॥ १७ ॥
देवाधिदेव त्या कृष्णे इष्टदेव द्विजास या ।
मानुनी दाबिले पाय दैवतापरि पूजिले ॥ १८ ॥
स्वर्ग मोक्ष तशी पृथ्वी योग सिद्धी रसातळी ।
संपत्ती प्राप्तिचे मूळ हरिपूजाच ती असे ॥ १९ ॥
माजेल धन हा घेता मिळाले अल्प ते जरी ।
विसरेल मला ऐशा विचारे धन ना दिले ॥ २० ॥
विचार करिता ऐसा ग्रामासी विप्र पातला ।
तिथे तो सूर्य अग्नी नी चंद्राच्या सम रत्न ते ॥ २१ ॥
घरासी जडवीलेले ठाई ठाईस बाग ते ।
रंगीत पक्षि तै गाती तळ्यात कंज शोभले ॥ २२ ॥
सजले नरनारी ते द्विजांनी पाहिले असे ।
वाटले पातलो कोठे कसे हे जाहले असे ॥ २३ ॥
विचार करिता ऐसा तेजस्वी नर नारि तै ।
द्विजाच्या स्वागता आले वाद्येही वाजती तदा ॥ २४ ॥
परीआगमने विप्रा आनंदे पातली असे ।
लक्ष्मी जै पातली तेथे कमळाच्या वनातुनी ॥ २५ ॥
पतीसी पाहता नेत्रीं आसवे पातली तिच्या ।
प्रेमभावे द्विजां तेंव्हा पतीला नमिते पहा ॥ २६ ॥
अलंकृता अशी विप्रा दासिंच्या मेळि दीपली ।
देवांगनापरी पत्नी पाहता विस्मयो द्विजा ॥ २७ ॥
पत्नीच्या सह ते प्रेमे महाली पातले तदा ।
इंद्रस्थाना परी शोभे स्थान ते मणिस्तंभ जै ॥ २८ ॥
मंचको हस्तिदंताचा सुवर्णे मढिला असे ।
शूभ्र शय्या तशी नी तै चवर्या स्वर्णदांडि त्या ॥ २९ ॥
सोन्याची आसने त्यात मऊ गाद्याहि घातल्या ।
मोत्यांच्या झालरी ज्यांनी चांदवे शोभले तिथे ॥ ३० ॥
भिंती त्या स्फटिकाच्या नी त्यात माणिक ठोकले ।
रत्नधरा अशा मूर्ती दीप ते उजळीत की ॥ ३१ ॥
समृद्धी पाहता ऐशी प्रत्यक्ष जाणण्यास ते ।
मनासी बोलले विप्र संपत्ती पातली कशी ॥ ३२ ॥
( इंद्रवज्रा )
मी जन्मताची मुळि तो दरिद्री
संपत्ती आली कुठुनी अशीही ।
श्रीकृष्ण पाही नयने मला नी
त्याचीच झाली बहुही कृपा की ॥ ३३ ॥
तो पूर्णकामो अन भोग युक्त
तो भाव जाणी अन देई सारे ।
उदार मेघापरि तो सखा की
कितीहि पावे तरि अल्प भासे ॥ ३४ ॥
भक्तास देता म्हणतोचि अल्प
नी अल्प घेता म्हणतो बहू हे ।
पोहे हरीला मुठिने दिले मी
प्रेमेचि तेणे करि घेतले की ॥ ३५ ॥
त्याची मिळो मैत्रि ती जन्म जन्मी
न इच्छि मी तो धन संपतीला ।
वाढो मनी प्रेम पदासि त्याच्या
सत्संग व्हावा नित प्रेमभक्ता ॥ ३६ ॥
संपत्तिचा तो हरि दोष जाणी
धनीक गर्वे पतनास जाती ।
मागोनि ना दे धन भक्तराजा
कृपा तयाचि बहु तीच आहे ॥ ३७ ॥
( अनुष्टुप् )
निश्चये बुद्धिची ऐशी आसक्ती सोडिली द्विजे ।
प्रसाद मानुनी चित्ती भगवत्प्रेम वाढवी ॥ ३८ ॥
असा तो देव देवांचा हरि यज्ञपती प्रभू ।
इष्टदेव द्विजां मानी म्हणोनी श्रेष्ठ ते द्विज ॥ ३९ ॥
( इंद्रवज्रा )
अजेय ऐसा हरि पाहि विप्र
अधीन भक्ता हरि तोच होतो ।
लावी हरीला नित ध्यान विप्र
संतास एको हरि आश्रयो तो ॥ ४० ॥
( अनुष्टुप् )
कृष्णाची द्विजभक्ती जो ऐकतो सांगतो दुज्यां ।
तयासी लाभते भक्ती कर्मी मुक्तीहि होतसे ॥ ४१ ॥